Tuesday, May 1, 2018

अनामवीरा

आमच्या डेंझील वॉशिंग्टन चा एक चित्रपट आहे 'Unstoppable' नावाचा... एक चालकविरहीत स्वैर सुटलेली रेल्वेगाडी थांबवण्यासाठी, दुसऱ्या इंजिनावर कामाला असणारे दोन सर्वसामान्य रेल्वे चालक, कसा प्रयत्नांचा आटापिटा करतात ते नितांतसुंदर पद्धतीने दाखवणारी ही कथा. शेवटी ती अपघाती गाडी ते थांबवतात आणि कसल्याही शाबासकीची, मानसन्मानाची अपेक्षा न करता चालू पडतात. ज्या ज्या वेळी मी ते दृश्य पाहतो त्या क्षणी, नकळत, लतादिदींच्या ओळी कानात घुमायला लागतात -
"अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला... पेटली ना वात"


असे पडद्याआड राहून काम करणारे आणि यशश्री नंतरच्या गौरवाची यत्किंचितही आस नसणारे कितीतरी जण एरव्ही ही आपल्या नजरेत पडतात. मग ते कोकण रेल्वे चा जगडव्याळ प्रकल्प उभा केल्यावर नम्रपणे नामानिराळे राहणारे ई श्रीधरन असोत की पंढरीच्या वारीला निघालेल्या वारकऱ्याना पुरणपोळीचा ट्रक पाठवणारा मार्केट यार्ड मधील निनावी व्यापारी.... या लोकांचा कर्मयोग लोकाभिमुख नसून तो केवळ कर्तव्यबुद्धीने केलेला एक खासगी यज्ञच असतो. ह्या व्यक्ती कायमचं रूढ लौकीकापासून काही योजने दूर अश्या वावरत असतात. म्हणूनच तर मांडवी नदीचा पूल पडत असताना जीवाचा आकांत करत, शक्य तितक्या गाड्यांना सावध करणारा तिथला स्थानिक इसम, पेपर मधील कुठल्याच बातमीत नसतो. अत्यंत धावपळ करून बाळाच्या पहिल्या वाढदिवसाची खपून तयारी केलेले आजोबा ऐन केक कटींगच्या वेळी गैरहजर आहेत हे ना मुलाला उमगते ना सुनेला... आणि खोल बोअरवेल च्या खड्ड्यात पडलेल्या प्रिन्सला 40 तासांच्या अथक परिश्रमानी बाहेर काढल्या नंतर त्या मिलिटरी तुकडीचा प्रमुख 'We just did our job' असं म्हणून कॅमेराच्या चमचमटातून सहज बाहेर निघून जातो.

"धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी !"

या लोकांना वेगळं आवाहन करावं लागतं नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत म्हैसूर मतदारसंघात भाजपने पाटील नावाच्या नवख्या उमेदवाराला तिकीट दिलेलं. तसा हा काँग्रेसचा पारंपरिक गड. अचानक कुठून तरी हजारो स्वयंसेवक गोळा झाले आणि पाटलांच्या नकळत त्यांचा प्रचार सुरू झाला. मतदान झालं आणि दुसऱ्या दिवशी जसे आले तसे हे सर्वजण शांतपणे जणू अदृश्य झाले. पुढे पाटील म्हैसूर मधून दणदणीत मताधिक्याने विजयी झाले... असं म्हणतात की निकालानंतर सर्वप्रथम ते RSS च्या कार्यालयात गेले आणि ढसाढसा रडले.

"जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !"

कौतुकाची अपेक्षा नाही. साधे धन्यवाद ही त्यांना नकोत. स्कॉलरशिप चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी ला स्वखर्चांने रोज आपल्या गाडीवर ने-आण करणारे शिक्षक कुठल्या पदकासाठी प्रयत्न करत असतात? सचिन तेंडुलकर च्या दिग्विजयावर रकानेच्या रकाने भरून लिहिले जात असताना एक बाजू टिच्चून लाऊन धरणाऱ्या राहुल द्रविड चे योगदान काहीसे कमी प्रकाशित झाले तरी वाया जात नाही.

"काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !"

बलिदान केलेल्या अनामिक जीवांचे स्मरण विजयाच्या अंतिम क्षणांमध्ये ठेवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. एखादेच छत्रपती शिवाजी महाराज असतात जे राज्याभिषेक प्रसंगी एकेक पाऊल टाकताना 'ही पायरी माझ्या तानाजीची... ही माझ्या बाजीप्रभूची' अशी आठवण काढतात. शूटिंग संपलं की पत्रकार परिषदेत स्पॉट boys पासून ते तंत्रज्ञापर्यंत सर्व कष्टकऱ्यांचे आभार मानणारी आमची अनुष्का शेट्टी विरळीच...
त्या पडद्याआड राहून अविरत काम करणाऱ्या अज्ञात वीरांना आपण कधी ओळखू शकू का?
त्यांच्या विषयी कृतज्ञता कशी टिकून राहील? आणि आनंदाच्या, यशाच्या धुंदीत त्यांचं विस्मरण तर होणार नाही ना?
'अनामवीरा' सुरू झालं की हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात घोंगावू लागतात.
लता गातच राहते... पापण्या ओलावत राहतात. आणि छातीमधले कढ थांबवत,त्या सुराआड लपून, मी एक आभारयज्ञ आरंभतो...