Thursday, July 12, 2018

Dunkirk

Dunkirk पाहताना मी रूमाल किंवा मोठा नॅपकीन घेऊनच बाजूला बसतो. डोळे न पाझरता हे पहात राहणं म्हणजे महामुश्कील काम !!
***
ख्रिस्तोफर नोलान चांगली कथा निवडतो हा त्याचा मोठेपणा नाही.
त्याचा स्क्रीनप्ले कमीत कमी संवादात जास्तीत जास्त खोल रूततो हाही त्याचा मोठेपणा नाही. सुमार लोकांकडून तो अभिनयाचं सकस पीक काढून घेतो हा सुद्धा म्हणावा तेवढा चमत्कार नाही.
तर त्याचा चित्रपट आपल्यासारख्या निब्बर बैलांच्या नेत्रांमधून घळघळा पाणी काढतो हे त्याचं खरं यश !!

Interstellar मध्ये नायक Blackhole च्या गर्तेत स्वतःला लोटतो तेंव्हा किंवा The Prestige मध्ये जादूगार भाऊ फाशीला जातो तेंव्हा हृदयात असंच चरचर होत जातं. Dunkirk मध्ये भावना उचंबळवणारे पण मेलोड्रामाविरहीत असे कित्येक प्रसंग कथेच्या दुतर्फा दाटीवाटीने उभे आहेत. उगाच नाही आम्ही नोलान ला किमयागार ही सार्थ पदवी बहाल केलेली आहे !!
***
विस्टन चर्चिलच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कित्येक खाजगी बोटी, होड्या, तराफे Dunkirk च्या दिशेने कूच करतात. तिकडे शत्रूच्या चक्रव्यूहात अडकलेल्या अदमासे ३००००० सैनिकांना सुखरूप परत आणायला... आधी पाठवलेल्या अजस्त्र युद्धनौका जर्मन बाॅंबहल्ल्यात पार सागरतळी विसावलेल्या. आता सेतूबंधनात खारीचा वाटा असावा अशी इंग्लंडहून सुटकेसाठी स्वेच्छेनी आलेली कित्येक गलबतं क्षितीजावर दिसू लागतात. या अभियानाचा प्रमुख असलेला कमांडर बोल्टन दुर्बिणीतून या बोटी पाहतो अन् हरखून जातो. पायदळाचा प्रमुख त्याला विचारतो, “What do you see?”
कमांडरचे निळे डोळे डबडबून येतात आणि सद्-गदीत आवाजात तो म्हणतो, “Home....”
***
खरं तर इंधन संपत आलेलं असताना व इतर दोन SpitsFire विमानं नष्ट झालेली असताना परत फिरणंच श्रेयस्कर. लढवय्या वैमानिक Ferrier च्या मनात मात्र काही वेगळंच होतं.
“पावन खिंडीत पाऊल रोवून | शरीर पिंजेतो केले रण” अश्या बाण्याने तो शत्रूच्या कोंडाळ्यात घुसलाच... शेवटचं इप्सित साध्य करून त्याचं इंजिन थंडावलेलं विमान Dukirk च्या किनाऱ्यावर तरंगत जातं त्या चित्रीकरणासाठी बाॅलिवूडने नोलान चे पाय धुऊन पाणी प्यावं... हॅन्स झिमर ने या प्रसंगाला वाजवलेली सुरावट तर वेड लावणारी.

SpitsFire ग्लाईड होत होत खाली कोसळत आहे, Ferrier ने शिरस्त्राण वगैरे सामुग्री भिरकाऊन दिलेली आहे, खाली या विमानाच्या प्रतिकारामुळे वाचलेले कित्येक सैनिक हात हलवून अभिवादन करत आहेत आणि उजव्या पंख्यावरचा युनियन जॅक सोनेरी प्रकाशात झळाळून उठतो आहे. या सीनला जो हुंदका आवरू शकतो तोच खरा परम योगी आणि जितेंद्रीय माणूस !!
***
बोटी भरभरून सैनिक ब्रिटीश चॅनेल पार करत आहेत. Dunkirk सुटका अभियानाला सुयश मिळत आहे. शेवटची तुकडी रवाना होत असताना पायदळ प्रमुख नेव्हीच्या ॲडमिरलला म्हणतो, “चला... कामगिरी फत्ते होत आली. चर्चिल ला हवे तितके लोक परतले. कदाचित जास्तीच”
टीपीकल इंग्लिश शैलीत अॅडमिरल उत्तरतो, “so far...” आणि बोटी कडे जाणारी फळी स्वहस्ते लाऊन घेत मागे धक्क्यावरच थांबतो.
अवाक् होऊन कॅप्टन विचारतो, “so far म्हणजे? तुम्ही नाही येत आहात का परत?”
ॲडमिरल भारदस्त आवाजात सांगतो, “No... I am staying. For the French....”
हा डायलाॅग, उलटी निघालेली बोट, त्यानंतर नोलानच्या कॅमेरातून दिसणारा लांब पडत चाललेला पूल आणि कॅप्टन ने कपाळाला हात लाऊन नेव्ही चीफला केलेला सलाम.... रूमालाचा कोपरा न् कोपरा खाऱ्या गरम पाण्याने भिजून जातो.
***
काॅलीन्स ने पण प्रयत्नांची पराकाष्ठा केली. एकीकडे बोटींना संरक्षण दिलं तर दुसरीकडे मागावर असलेल्यांना टीपत गेला. ऐनवेळी त्याचं SpotsFire दुश्मनाच्या तडाख्यात सापडलं आणि जवळपास जलसमाधीला प्राप्त झालं. ऐनवेळी आलेल्या प्रवासी होडीना त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. पुढं तो त्याच बोटीतून Dunkirk च्या किनाऱ्यापर्यंत आला आणि कित्येकांना वाचवून बोटीत घालून परत आणलं.

इंग्लंड मध्ये परतल्यावर त्याचा Royal Air Force चा गणवेश पाहून एक सैनिक करवदून ओरडला, “(आम्ही तिकडे मरत होतो आणि तुम्ही काही काही केलं नाही) Where the bloody hell were you?”
काॅलिन्स काहीच बोलला नाही. पण पाठीमागून खांद्यावर थाप टाकून मि. डाऊसन नी त्याने वाचवलेल्या सैनिकांकडे इशारा केला व म्हणाले, “They know exactly where you were...”
मितभाषी शैलीत रचलेले पण हेलावून टाकणारे डायलाॅग हे आमच्या मान्यवर ख्रिस्तोफर नोलानांचं बलस्थान !!
***
Dunkirk एकट्यानेच पहावा. उगाच आपला हळवा चेहऱ्या दुनियेला दाखवण्यात काय हशील आहे?
दर काही काही मिनिटांनी उमाळे आले तर चारचौघात शोभा नको.
Dunkirk ला युद्धपट संबोधून त्याला Action/Adventure गटात टाकणारे लोक मूर्ख आहेत. हा फक्त आणि फक्त नोलानपट आहे. मग ते जमिन, आकाश आणि पाणी अश्या तीन आघाड्यावर उलगडलेल्या तीन Timescales असोत किंवा वेगवान घटनाक्रमातही टिकून राहलेली नाट्यमयता असो, ‘युद्धस्य वार्ताः रम्यः’ हे खरंच पण श्री नोलानांचा परीस स्पर्श झाला की त्याची अजरामर कलाकृती बनून जाते.

परतणाऱ्या सैनिकांना एक आंधळा वृद्ध मनुष्य चहा, फळे वगैरे वाटप करतोय. प्रत्येकाचा चेहरा चाचपडणाऱ्या हातांनी कुरवाळत तो म्हणतोय, “Well done, man, well done !!”
एक वीर म्हणतो, “All we did is to survive”
म्हातारा क्षणाचीही उसंत न घेता उत्तरतो, “That’s enough”
खल्लास....आपल्या दगडी आणि बधीर मनाला फोडून अश्रूंचे पाट वाहीले नाही तरच नवल !!!!

- विक्रांत देशमुख

ता.क. :
Dunkirk चे मी इंग्रजी मध्ये लिहीलेले समीक्षण -
https://tossthefeathers.wordpress.com/2017/08/15/dunkirk/

Tuesday, May 1, 2018

अनामवीरा

आमच्या डेंझील वॉशिंग्टन चा एक चित्रपट आहे 'Unstoppable' नावाचा... एक चालकविरहीत स्वैर सुटलेली रेल्वेगाडी थांबवण्यासाठी, दुसऱ्या इंजिनावर कामाला असणारे दोन सर्वसामान्य रेल्वे चालक, कसा प्रयत्नांचा आटापिटा करतात ते नितांतसुंदर पद्धतीने दाखवणारी ही कथा. शेवटी ती अपघाती गाडी ते थांबवतात आणि कसल्याही शाबासकीची, मानसन्मानाची अपेक्षा न करता चालू पडतात. ज्या ज्या वेळी मी ते दृश्य पाहतो त्या क्षणी, नकळत, लतादिदींच्या ओळी कानात घुमायला लागतात -
"अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला... पेटली ना वात"


असे पडद्याआड राहून काम करणारे आणि यशश्री नंतरच्या गौरवाची यत्किंचितही आस नसणारे कितीतरी जण एरव्ही ही आपल्या नजरेत पडतात. मग ते कोकण रेल्वे चा जगडव्याळ प्रकल्प उभा केल्यावर नम्रपणे नामानिराळे राहणारे ई श्रीधरन असोत की पंढरीच्या वारीला निघालेल्या वारकऱ्याना पुरणपोळीचा ट्रक पाठवणारा मार्केट यार्ड मधील निनावी व्यापारी.... या लोकांचा कर्मयोग लोकाभिमुख नसून तो केवळ कर्तव्यबुद्धीने केलेला एक खासगी यज्ञच असतो. ह्या व्यक्ती कायमचं रूढ लौकीकापासून काही योजने दूर अश्या वावरत असतात. म्हणूनच तर मांडवी नदीचा पूल पडत असताना जीवाचा आकांत करत, शक्य तितक्या गाड्यांना सावध करणारा तिथला स्थानिक इसम, पेपर मधील कुठल्याच बातमीत नसतो. अत्यंत धावपळ करून बाळाच्या पहिल्या वाढदिवसाची खपून तयारी केलेले आजोबा ऐन केक कटींगच्या वेळी गैरहजर आहेत हे ना मुलाला उमगते ना सुनेला... आणि खोल बोअरवेल च्या खड्ड्यात पडलेल्या प्रिन्सला 40 तासांच्या अथक परिश्रमानी बाहेर काढल्या नंतर त्या मिलिटरी तुकडीचा प्रमुख 'We just did our job' असं म्हणून कॅमेराच्या चमचमटातून सहज बाहेर निघून जातो.

"धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी !"

या लोकांना वेगळं आवाहन करावं लागतं नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत म्हैसूर मतदारसंघात भाजपने पाटील नावाच्या नवख्या उमेदवाराला तिकीट दिलेलं. तसा हा काँग्रेसचा पारंपरिक गड. अचानक कुठून तरी हजारो स्वयंसेवक गोळा झाले आणि पाटलांच्या नकळत त्यांचा प्रचार सुरू झाला. मतदान झालं आणि दुसऱ्या दिवशी जसे आले तसे हे सर्वजण शांतपणे जणू अदृश्य झाले. पुढे पाटील म्हैसूर मधून दणदणीत मताधिक्याने विजयी झाले... असं म्हणतात की निकालानंतर सर्वप्रथम ते RSS च्या कार्यालयात गेले आणि ढसाढसा रडले.

"जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !"

कौतुकाची अपेक्षा नाही. साधे धन्यवाद ही त्यांना नकोत. स्कॉलरशिप चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी ला स्वखर्चांने रोज आपल्या गाडीवर ने-आण करणारे शिक्षक कुठल्या पदकासाठी प्रयत्न करत असतात? सचिन तेंडुलकर च्या दिग्विजयावर रकानेच्या रकाने भरून लिहिले जात असताना एक बाजू टिच्चून लाऊन धरणाऱ्या राहुल द्रविड चे योगदान काहीसे कमी प्रकाशित झाले तरी वाया जात नाही.

"काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !"

बलिदान केलेल्या अनामिक जीवांचे स्मरण विजयाच्या अंतिम क्षणांमध्ये ठेवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. एखादेच छत्रपती शिवाजी महाराज असतात जे राज्याभिषेक प्रसंगी एकेक पाऊल टाकताना 'ही पायरी माझ्या तानाजीची... ही माझ्या बाजीप्रभूची' अशी आठवण काढतात. शूटिंग संपलं की पत्रकार परिषदेत स्पॉट boys पासून ते तंत्रज्ञापर्यंत सर्व कष्टकऱ्यांचे आभार मानणारी आमची अनुष्का शेट्टी विरळीच...
त्या पडद्याआड राहून अविरत काम करणाऱ्या अज्ञात वीरांना आपण कधी ओळखू शकू का?
त्यांच्या विषयी कृतज्ञता कशी टिकून राहील? आणि आनंदाच्या, यशाच्या धुंदीत त्यांचं विस्मरण तर होणार नाही ना?
'अनामवीरा' सुरू झालं की हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात घोंगावू लागतात.
लता गातच राहते... पापण्या ओलावत राहतात. आणि छातीमधले कढ थांबवत,त्या सुराआड लपून, मी एक आभारयज्ञ आरंभतो...

सेकंड हँड जगणे

गडद अंधारून आलं. सोसाट्याचा वारा सुटला होता. अवकाळी पावसाने आपल्या आगमनाची वर्दी अशी मोठा गाजावाजा करत दिली होती. ऑफिस मधील सगळी मंडळी पार्कींग मध्ये पळाली. पुण्यामध्ये एप्रिल महिन्यात असं अवर्णनीय वातावरण असताना काचेच्या खुराड्यात काम कोण करत बसेल बरं?

मीही बाहेर पडलो. नवव्या मजल्याच्या गच्चीमध्ये लोकांची गर्दी उसळली होती. मृदगंधाचा दरवळ मनाला मोहित करत होता. टप्पोरे थेंब पडायला सुरुवात झाली. आभाळाची माया त्या जलधारा बनून धरतीला भेटायला आवेगाने येत होती. आसमंत रमणीय बनून गेला होता.
मी एक उंचवट्या पाशी येऊन थबकलो. तिथून मला पावसात सचैल न्हाणारं पुणं आणि ते दृश्य अनुभवायला आलेली कर्मचारी मंडळी एकाच वेळी दिसत होती.
पण हे काय? जवळपास प्रत्येक जण मोबाईल काढून उभा होता. कोणी फोटो काढत होते, कोणी video तर कोणी थेट Facebook लाईव्ह करत होते. कसल्या तरी संयंत्रा मध्ये ते क्षण टिपण्याची केविलवाणी धडपड चालू होती. कोणी Whatsapp वर बोलत होते तर कोणी पावसाबरोबर सेल्फी असला आचरट प्रकार करत होते.
समोर निसर्गाचा एक अत्यन्त रमणीय आणि प्रेमास्पद आविष्कार चालू असताना लोकांना मात्र मूळ दृश्यापेक्षा अप्रत्यक्ष अनुभूतीमध्ये जास्ती स्वारस्य होते. मी या प्रकाराला एक नाव दिलंय - 'सेकंड हँड जगणं'...

का वागतो असे आपण? का वर्तमानात राहू शकत नाही आपलं व्यवहारी मन?
उगवतीचा भास्कर कसा लालचुटुक गोळा बनून संथ पावलांनी पूर्वेला उगवत असतो. आपण त्या रंगछटा पाहण्याऐवजी मोबाईल वर क्लिक करण्यात धन्यता मानतो. आठवण म्हणून, प्रियजनांबरोबर शेअर करण्यासाठी म्हणून एक दोन फोटो ठीक आहेत. पण सतत मोबाईल कडे हात आणि काही दिसले रे दिसले की छबी घेण्याची असह्य ओढ. हा त्या सौन्दर्याचा कसलासा घोर अपमान वाटतो मला....
विमला ठकार म्हणतात , "जीवनाची समग्रता, ऐश्वर्य पूर्ण एकवटून वर्तमानाच्या त्या तुकड्यात तुमच्या समोर आलंय... त्याला विन्मुख होऊ नका". आपण वाचून ढिम्म च राहतो.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं "हो कां तरंगु लहानु । परी सिंधूसी नाहीं भिन्नु ।" या प्रमेयानुसार हा आत्ताचा इवलुसा क्षण जीवनाचं सारसर्वस्व तुमच्या ओंजळीत द्यायला आलाय... आणि आपण असे कर्मदरिद्री की भलत्याच प्रकारात गुंतून गेलेलो. वर्तमानात समरसता आणि समोरच्या देखाव्याशी तादात्म्य हेच खरे रसिकत्वाचे लक्षण वाटते मला....
सध्याच्या गतिमान युगात आणि सतत 7 x 24 ऑनलाईन राहण्याच्या अट्टाहासात आपण जगण्याची खुमारी विसरत चाललोय की काय?
आमरसाचा लोभस घोट जिभेपासून जठरापर्यंत कसा माधुर्याची उधळण करत जातो हे अनुभवायचं की #First Mango of season म्हणत त्याचे धडाधड फोटो काढत पोस्ट करत राहायचे?
आपल्या बाळाचा गालाला होणारा मलईदार स्पर्श ह्रदयात साठवायचा की या बाळाच्या लीला इंटरनेट वरच्या रिकामटेकड्या मंडळी ना सतत सांगत रहायच्या?
ट्रिप ला गेलेले असताना समोरची गर्द वनराई आणि नितळ निळा जलाशय बघून हरखून जायचं की तिथली वर्णने Whatsapp वर लगबगीने देत रहायची?

गौतम बुद्धांनी सांगितलं की भूतकाळ हा फक्त तुमच्या स्मृतीमध्येच आहे आणि भविष्यकाळ अजून आलेलाच नसल्याने त्याला तसे अस्तित्व नाही. खरं सत्य, खरं घनीभूत काही असेल तर तो हा चालू क्षण. यातील खोल अध्यात्म जाऊ द्या पण चिरंतन अश्या वर्तमान काळा ला न्याय देतोय ना आपण? पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रियानी जगण्याचं हे आयुष्य मोबाईल, सोशल मीडिया आणि कॅमेराच्या कलकलाटामध्ये 'सेकंड हँड' करून तर नाही ना टाकलंय आपण?

Monday, September 18, 2017

एअरपोर्ट डायरीज - ३

** Airport Diaries 3 **

तर सांगायचा मुद्दा हा की मी एका पायलटशी बोललो. आणि पायलट म्हणजे प्राॅपर पायलट बरं का... चंदेरी बिल्ले वगैरे असलेला, विमान-बिमान उडवणारा, देखण्या चेहऱ्याचा पायलट.... खराखुरा पायलट.
(विमानात युनिफाॅर्म घालून, घोटीव दाढी करून चढलेला प्रत्येक इसम हा पायलट नसतो हे इंटरनॅशनल प्रवास न केलेल्या तुम्हा गरीब जनतेला मी निक्षून सांगू इच्छितो!!)

"काय मग? कुठलं विमान?" मी South Bombay Accent मधे विचारता झालो. कसलीही ओळखबिळख नसताना कुणाशीही बोलण्याच्या बाबतीत माझी जीभ कुणीच धरू शकत नाही.
"लुफ्तांसा. जर्मनीहून आलोय." तो नम्रपणे म्हणाला.
"माझं नाव निकोलस xxxxx" अठरा अवघड व्यंजनं असलेलं त्याचं आडनाव एअरपोर्ट च्या गोंगाटात मी सोईस्कर पणे ऐकून न ऐकल्यासारखं केलं.
"कशी होती फ्लाईट?" त्याने औपचारीक चेंडू टाकला.
"नाॅट बॅड. Can't complain." मी डाऊनलोड करून करून पाहिलेल्या अमेरीकन सीटकाॅम मधील हिरोंपासून प्रेरणा घेउन म्हणालो.
निकोलस दिलखुलास हसला. मी सलगी वाढवली.
"एअरबस की बोईंग?" मी माझ्या aviation knowledge चे थेंब सांडू लागलो. निकोलस माझ्या ज्ञानाने दिग्मूढ झाला.
"एअरबस ३५०. इकडे आमचे मालक कायम एअरबसच विकत घेतात."
"Ohh nice" मी ओळखीचं स्माईल दिलं व शक्य तितक्या कोरडेपणाने म्हणालो "मी बोईंगने फिरणारा माणूस. पण तुमच्या एअरबस ने पण केलाय बरं का प्रवास २-३ दा..."
"क्या बात है" निकोलस इस्ट-युरोपियन इंग्लिशमधे उद्गारला.
"अर्थात. तुम्ही एअरबस वाले पण आमचेच रे" मी सिहंगड रोड इंग्लिश मधे जवळीक वाढवली.
निकोलस विरघळला. माझं ज्ञान व मार्दव दोन्हीची त्याला भुरळ पडली.
"तू खूप इंटरेस्टींग विमान प्रवासी दिसतोस. Can I buy you a coffee?" त्याने औपचारीक आॅफर दिली. मी चित्त्याच्या चपळाईने ती झेलली व तेजस्वी यादवच्या निर्गलतेने म्हणालो, "शुअर शुअर. व्हाय नाॅट. After all it's not everyday you meet a person driving international flight".
निकोलस पार जीवण्या फाकून हसला.

पूर्ण कडक पायलटी पोशाखातला, युरोपियन वंशाचा तो आणि गौरवर्णीय सहा फूट व्यक्तिमत्वाचा, तर्खडकर व्याकरणमाला कोळून प्यायलेला मी अश्या दोन माननीयांची वरात चालत चालत विमानतळावरील महागड्या काॅफीलयात आली. पैसे तो देणार असल्याने मी म्हाडा वसाहतीत फ्लॅट मिळालेल्या लाभार्थीसारखा निर्धास्त होतो. अनेक विषयातला माझा दांडगा व्यासंग आणि संभाषणामध्ये मी सतत करत असलेली विनोदाची पखरण यामुळे कप्तानसाहेबांना मी आवडून गेलो होतो.
"पण काही म्हणा, बोईंग ची एक गोष्ट तुम्हा एअरबस वाल्यांना बिल्कुल जमलेली नाहीये" मी डाव्या डोळ्याने किमतींचा धावता आढावा घेत म्हणालो.
"And that is?" निकोलस मिशीतल्या मिशीत फिस्करला.
"Nose." मी आमच्याकडे मत्सराने बघणाऱ्या बाकीच्यांच्या नाकावर टिच्चून म्हणालो. "तुमचे नोज डिझाईन बघा. बेक्कार आहे एकदम."
निकोलस ने दोन सेकंदाचा पाॅज घेतला आणि डोळे मिटून बोलू लागला,
"That's the thing my friend. बाकीचे परफाॅरमन्स फीचर चांगले असतील तर फक्त एका aesthetic गोष्टीला का महत्व द्यावे माणसांनी?"
मी सावळी दिसते म्हणून वधू रिजेक्ट करणाऱ्या देशातून आलो आहे हे त्याला शेवटपर्यंत कळू दिले नाही !!
काॅफी आॅर्डर झाल्या. Nose design of Airbus वर मी 'नाक' खुपयासला नको होते असं मला नंतर उगाच वाटून गेलं. निकोलस (स्वतःचं) नाक फुगवून डिझाईन डीफेंड करत राहीला.
"बोईंग मी स्वतः चालवलंय. त्यांचा आॅटो पायलट व आमचा आॅटो पायलट कंप्लिटली वेगळ्या पद्दतीने काम करतात". मी संमतीदर्शक मान हालवली आणि माझ्या airline industry मधील ज्ञानाची अधीक फवारणी करत विचारलं, "What about rudders?"

माझं चित्त काॅफीच्या वर साचलेल्या गुबगुबीत क्रीमवर अडकलं होतं. साखरेच्या पुड्या डिक्लेअर होऊन लगेच लुप्त होणाऱ्या सरकारी अनुदानांसारख्या नाहीश्या होत होत्या. द्रावण पुरेसं ढवळून झाल्यावर कलाकुसर केलेल्या प्लास्टीक झाकणाने मी ग्लासचं तोंड बंद केलं आणि निकोलस बरोबर पुढील चर्चेला तोंड फोडलं.
" पुढचा प्लॅन कसा काय? थांबणार की लागलीच परत?"
निकोलस ने तोंडातला घोट गिळून टाकला. "हम्मम्म... लेट मी सी. कदाचित उद्या इथून टोकीयो आणि मग तेरवा परत जर्मनी"
"Por Favor. कठीण आहे. Oh Dios Mio" ब्रिटीशेतर सर्व युरोपिअन हे स्पॅनिश बोलतात अशी बाळबोध श्रद्धा असलेला मी माझ्या लिमीटेड vocabulary ची पुरचुंडी रिती करता झालो.
"नाहीतर काय..." खिश्यावरच्या चांदणीला कुरवाळत निकोलस ने आपली सौम्य नाराजी बाहेर काढली.
"Extra cream please. आणि काही कुकीज् वगैरे असतील तर येऊ द्यात" मी सौजन्यसप्ताहाचा पुरेपूर फायदा करून घ्यायचं ठरवलं. अशीच तत्परता मी डेक्कन वरच्या 'सुकांता' मधे अनलिमीटेड आमरस असतो त्यादिवशीही दाखवतो.

निकोलस काचेतून दिसणाऱ्या रनवे कडे बघत स्वगतपर बोलत राहीला. "ह्या धावपट्ट्या, हे खुलं आकाश, ही विमानतळं हेच आमचं जग. बाकी वेळ काळ सगळं भासमान."
मी अर्ध्या कपावर क्रीमची फवारणी करत त्याच्या सूरात सूर मिसळत म्हणालो, "Trust me. We do understand. अरे तुम्ही तिकडे आकाशात उडत असता पण आमच्यासारखे हवाईप्रेमी सतत तुमच्या कौशल्याचे चिंतन करीत असतात. आमच्या प्रवासाचेच नव्हे तर जीवनाचे सारथ्य करता तुम्ही लोग."
निकोलसचे निळे डोळे डबडबून GOT च्या नाईट किंग सारखे दिसू लागले. मग मी संभाषण आटोपत घेतलं.
"मित्रा... फार बरं वाटलं एअरबस च्या पायलट ला भेटून. मागचा अर्धा तास कसा गेला हेच कळालं नाही."
निकोलस अजूनच गहीवरला. बिलासाठी स्वतःचे क्रेडीट कार्ड पुढे करून त्याने माझ्याशी हस्तांदोलन केलं.
"खरचं असं किती कमी वेळा होतं की इतकं knowledge आणि इतकी आवड असलेला प्रवासी भेटतो. I will remember you." बोलता बोलता त्याने परत आवंढा गिळला.
मी माझी पोतडी खांद्यावर मारली, शैलेश आॅप्टीकल्स मधे वट्ट ८०० रूपये मोजून तयार केलेला चष्मा डोळ्यावर चढवत प्रभास सारखा दाढीतल्या दाढीत छद्मी हसत म्हणालो, "Adios Amigo. आपण नक्की परत भेटू.
ये मेरा वचन है... और मेरा वचन ही है मेरा शासन!!"

⁃ विक्रांत देशमुख


एअरपोर्ट डायरीज - २

** Airport Diaries 2 **

एखादं चित्र हे Trick-Picture असतं. ज्या दिशेने पाहू त्याप्रमाणे दिसतं. डिपार्चर आणि अराईव्हल च मुंबई टर्मिनल २ मला नेहमीच खूप वेगळं भासतं.
जाणाच्या ठिकाणी असणारा भावनांचा कल्लोळ संमिश्र. तर उतरल्यावर भासणारं विमानतळ टोटली वेगळं. हरि म्हणा कुणी गोविंद म्हणा.. एकाच परमात्म्याची ही दोन रूपं. किती निराळी पण अंततः एकच !
कोणास सोडायला आलेले लोक त्या काचेपलीकडून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सोडलेल्या व्यक्तीस नजरेत साठवायचा प्रयत्न करत असतात. ते दृश्य मला फार गलबलून टाकतं. आत गेलेला मनुष्य बोर्डींग पास, चेक-इन काऊंटर वगैरे धांदलीत असताना दूरवर त्याचा पाठलाग करणारे डोळे मौजूद असणं फार अस्वस्थ करतं बाॅ... इथे मान्यवर लेखक मेल्ट होतात व केविलवाणे हसत बिसलेरीचा एक भुरका मारतात.
उतरलेल्या प्रवाश्यांची बाहेर पडताना काही ओळखीची खूण टिपण्याची धडपड पण मला फार हालवून टाकते. किती घाई. किती त्या साचलेल्या भावना. सामान कलेक्ट करून केंव्हा एकदा भूमीवर पाय टाकतो असं झालेले हे सगळे मर्त्य मानव. मी रांगेतून अंमळ बाहेर येऊन ती लगबग निवांत पहात राहतो.
जीवनाचा एक सिद्धांत तुम्हाला म्हणून सांगतो : कितीही हरामी माणूस असू द्या - एकटा जेवत असताना, चष्मा लावल्यावर किंवा बॅग ओढत जाताना तो लै म्हंजे लै बिचारा दिसतो !!
****
निरीक्षण करणं हा एक छंदच झालाय जणू. Observing without reacting. हे असं काही न बोलता आजूबाजूचं जग नुसतं पहात रहाणं तासन् तास करण्याचं ठिकाण म्हणजे बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन किंवा अगदी एअरपोर्ट. Hardcore साक्षित्व.
चिद्-विलास वादाचं समर्थन करताना आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी म्हटलंय -
हे विश्व नव्हे रे माया,
हे विश्व प्रभुची काया
That is the thing. हा कोलाहल, हे चलनवलन सगळा जगनियंत्याचा खेळ. मजा येते बघत बसायला.
मी फक्त नोंदी टिपतोय. दृश्यामध्ये इनव्हाॅल्व न होता केवळ दर्शन घेता येतंय का हा अभ्यास चालू आहे.

समोरच्या सीटवर एक स्पॅनीश आई छोट्याश्या मुलीला घेऊन बसली आहे. एकीकडे कन्येला खेळवत असताना तिचे कान मात्र बोर्डींग अनाऊन्समेंट कडे लागले आहेत.
कन्येच्या लीलांनी ती हसते आहे; मधेच मोबाईल मधले मेसेज वाचून तिचे डोळे भरून येत आहेत. ती इमोशनल झाली की छोटुकली गोंधळून जाते आहे व खेळ टाकून देऊन आसवे ढाळणाऱ्या मातेला बिलगत आहे.

त्या तिथे स्टारबक्स समोर खुरटी दाढी वाढवलेला एक वृद्ध प्रवासी धारदार डोळ्यांनी काऊंटर वर लक्ष ठेऊन आहे. एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध पण कमालीचा शांत . जणू त्याच्या शरीरातले सगळे प्राण एकवटून त्या दोन डोळ्यांमध्ये अवतरले आहेत.

आणि माझ्या उजवीकडे दोन सीट सोडून एक सूटधारी बिझीनेस क्लास वाला लॅपटाॅप मधे घुसलेला आहे. कुण्या कंपनीच्या बोर्ड मिटींग प्रेझेंटेशनवरून शेवटचा हात फिरवतो आहे. मधेमधे विमनस्कपणे डाएट कोक चे घोट पिताना त्याची चलबिचल लपत नाहीए. कदाचित ही मीटींग त्याची शेवटची मीटींग ठरू शकेल. किंवा काही चमत्कार होईल आणि कौल याच्या पदरात पडेल.
महागडं घड्याळ, सोन्याची बटणं, ब्रॅंडेड टाय वगैरे आभूषणांआड लपलेली त्याची अनिश्चितता बूट काढून पाय फिरवत बसलेल्या माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचते आहे.
***
एखादा गाव बघावा कुठून? तर विमानाच्या कवडश्यामधून. 
टेकआॅफ पेक्षाही उतरताना होणारं गावाचं पहिलंवहिलं दर्शन मला अजूनही हरखून टाकतं. त्याच्या तऱ्हा अनेक. ढगांच्या पुंजक्यातून खाली येऊन समोर अचानक Amsterdam किंवा Frankfurt दिसतं तो निव्वळ अवर्णनीय अनुभव असतो. टुमदार आखीव रेखीव घरं, तऱ्हेतऱ्हेच्या शेतजमिनी, रस्त्यांची वेधक जाळी, सळसळत जाणाऱ्या सापाप्रमाणे नागमोड्या वाहत असलेल्या नद्या, कॅनाॅलवरचे प्रेमास्पद पूल, मिठाईच्या दुकानात लावल्याप्रमाणे शिस्तीत पार्क केलेल्या अगणित कार, पवनचक्क्यांचे तपश्चर्येला उभे असलेले ब्लेडस्, एखाद्या कारखान्याच्या उंच चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धूराचा puffy वाटणारा लोट आणि नशिब बलवत्तर असेल तर दूर क्षितीजावर उमटलेलं इंद्रधनुष्य. ही त्या गावाची मनाच्या कॅमेऱ्याने कैद केलेली इमेज मग आयुष्यभरासाठी पुरते.

याउलट भारतातल्या कुठल्याही शहरात उतरत असताना मला तिथले लोक आता काय करत असतील असा प्रश्न सतावतो. कसा गेला असेल यांचा दिवस? काय कमावलं असेल त्यांनी आजच्या आयुष्यात? ... देणं ना घेणं... पण मला हा फुकटचा प्रश्न पार लॅंड होईपर्यंत छळत राहतो. माझ्याही अजून कितीतरी वर, आभाळातून, बाप्पा आपल्या लेकरांकडे असाच सचिंत होऊन पहात असेल काय?
आॅफीस, बाजार, जेवणं, फॅशन आणि सोयऱ्यागोयऱ्यांच्या भांडणात अडकलेलं आपलं जग किती खुजं आहे हे कळायचं असेल तर विमानाच्या उंचीवरून आपापलं गाव एकदा तरी न्याहाळायलाच हवं !!
***
⁃ विक्रांत देशमुख

एअरपोर्ट डायरीज - १

** Airport Diaries 1 **

"काय? स्कायट्रेन बंद आहे?" मी अस्खलित इंग्लिशमधे जोरात ओरडलो. आजूबाजूचे दोनचार मेक्सिकन, चायनीज, आफ्रीकन दचकून पळाले.
मला ही मनहूस बातमी देणारी नेवार्क विमानतळावरील कर्मचारी स्त्री गोठलेल्या आईसक्रीम सारखी थंड उभी होती.
"कसं शक्य आहे हे?" मी परत डेसिबलची कमाल मर्यादा ओलांडत व आवाजात शक्य तितकं नैराश्य, उद्विग्नता वगैरे आणत म्हणालो. परत काही guilty conscious वाली मंडळी दचकून दूर पळाली.
अमेरीकेत पाऊल ठेवल्या ठेवल्या असली 'काम चालू, रस्ता बंद' टाईप कारणं ऐकायला माझं मन तयार नव्हतं. त्यातून हा आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा. मला वाटतं की भारतीय सरकार ने या असल्या हिंदी भाषांतरांवर सख्त पाबंदी लावावी ! 'हवाई अड्डा' हा शब्द मला सदाशिव अमरापूरकर, रणजित, डॅनी डेंझोप्पा वगैरे महात्म्यांच्या वर्कस्टेशन ची आठवण करून देतो. हे विमान कंपनी वाले female employees ना 'कार्मिक स्त्री' म्हणतात, seatbelt ला 'कुर्सी की पेटी' संबोधतात आणि आपल्याला 'उपकरणोंका प्रयोग' करायला भाग पाडतात. जेट वाले turbulence ला 'उमंग मचल' वगैरे म्हणत असतील काय??

नेवार्क च्या त्या भव्य विमानतळावर एकीकडून दुसऱ्या टर्मिनल ला जायला या रेल्वे ने जावं असे शाही मनसुबे आखलेला मी गाडी बंद असलेला बघून कमालीचा निराश झालो. (असाच हताश मी पुण्यात एअरटेल 4G च्या 0.5 kbps स्पीडकडे बघून होत असतो.) सकाळच्या उन्हाची कोवळी किरणे, काॅफ्यांचे मोठाले टमरेल भरभरून रिचवत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगाखांद्यावर लडीवाळपणे खेळत होती. विमानकंपन्यांचे कर्मचारी चेहऱ्यावरून जमिनीवर उतू जाईल इतक्या सुहास्य मुद्रेने बोलत होते तर सेक्युरिटी वाले 'छोड दिया जाय... या मार दिया जाय... बोल तेरे साथ क्या सलूख किया जाय?' या भावात प्रत्येकाकडे बघत होते. या दोहोंचाही समन्वय असलेल्या ग्राऊंड स्टाफ मधील एका ताईंकडे मी दोन टर्मिनल जोडणाऱ्या स्कायट्रेनविषयी विचारणा करत होतो.

"बंद आहे ती" कमीत कमी शब्दात उत्तर देत तिनं आपलं तोंड बंद केलं.
"काय? स्कायट्रेन बंद आहे?" मी अस्खलित इंग्लिशमधे जोरात ओरडलो. मागे एकदा "हा काय गायक आहे?" असा प्रश्न मी H रांगेतून स्टेजवर ऐकू जाईल इतक्या बारीक आवाजात, बालगंधर्व रंगमंदीरातील एका कार्यक्रमात (गायकाचं गाणं गाऊन संपल्यानंतर) विचारल्याचं मला स्पष्ट आठवतं.
माझी रिॲक्शन पाहूनही बाईच्या थंड posture मध्ये यत्किंचीतही बदल झाला नाही.
"एरव्ही चालू असते. Not working today" टीपीकल अमेरीकन पद्धतीने दोन्ही खांदे टणाटणा उडवत तिने आम्हाला उडवून लावलं. दादर ला भर गर्दीत ढुशाढिशी करून तिकीट विंडोवाल्याला समाधान होईस्तोवर प्रश्न विचारत राहणारा मी इथे सहजासहजी हार जाणार नव्हतो.
"पण काय झालंय कायं नेमकं? आम्हाला कनेक्टींग फ्लाईट पकडायची आहे. आता आम्ही इतरं लांब जावं तरी कसं?" मी प्रश्नांची सरबत्ती केली.
याच गुणामुळं व सिक्क्यांशी माझ्या एकंदरीत असलेल्या वैरामुळं आमचा मित्रपरीवार मला प्रश्नमूर्ती म्हणून हाक मारतो !

"मेंटेनन्स असेल. किंवा अजून काही." ती Schrodinger Cat सारखी संदीग्धता ठेवत गुरगुरली. (टीप - सदरहू जोक फक्त B.Sc. Physics चे विद्यार्थी व The Big Bang Theory चे प्रेक्षक यांनाच कळेल)
मी ऐनवेळी निवडणुकीचं तिकीट कापलेल्या पक्ष पदाधिकाऱ्याप्रमाणे नाराज आलो. आफ्टरआॅल ती एक ट्रेन होती.
"मग आता?" काहीतरी 'मार्ग काढणे' भागंच होते.
"तुला काय वाटतं, आम्ही टर्मिनल अमुकतमुक ला कसं जावं?" परदेशी भूमीवर गेल्यावर मी नेहमीच मोकळाढाकळा वागतो.
गेले काही तास एकाच जागी खिळून असलेली कर्मचारी स्त्री किंचीतशी हलली. (इथे 'हलली' शब्दावर श्लेष नाही, सबब कसलाही विनोद नाही हे अर्ध्या वाक्यावरच हसून घेणाऱ्या नव-वाचकांनी आवर्जून लक्षात घ्यावं!!)
तऱ्हेतऱ्हेच्या काॅफी प्रजातींनी ओलाचिंब झालेला घसा सविस्तर खाकरत तिने दूर क्षितीजाकडे बोट दाखवलं आणि म्हणाली ,"Go straighttttt, take right and ask anybody".... हाफ चड्डीतून फुल पॅंटीत येतानाचं आख्खं आयुष्य 'रास्त्यांचा वाडा ना? कुणालाही विचारा... सांगतील' ऐकण्यात घालवलेला पुणेकर मी लगेच सावध झालो. (संदर्भ : मान्यवर लेखकांचा २०१० च्या सकाळ दिवाळी अंका करीता लिहीलेला लेख - http://vikrantdeshmukh.blogspot.com/2009/08/blog-post.html ) आणि पाणीपुरीवाल्या भैय्याला अजून एका मसालापुरीसाठी याचना करावी तसा अजीजीने म्हणालो "नक्की कुठे जायचं हो? परत एकदा नेमका पत्ता सांगाल काय?"

मानेला झटका देत तिने आपली नापसंती बऱ्यापैकी व्यक्त केली.
"एकदा तुम्हाला सांगून झालंय सर... सरळ जा आणि त्या तिथे, पलीकडे विचारा." अमेरीकेत हे एक बरं आहे. राग, लोभ, प्रेम, हिंसा इत्यादी कोणतीही भावना असली तरीही ते बोलताना 'सर' असं अदबशीर संबोधन वापरत राहतात. आमच्या बाॅस्टन, शिकागो वगैरे शहरात तर रात्री अपरात्री पर्यटकांना लुबाडणारे काही घटक 'प्लीज.. पैसे व चीज वस्तू देताय की तुम्हाला इथंच जीवंत गाडू सर?' असं म्हणत असल्याची दंतकथा मी ऐकून आहे. असो.

आम्हाला निर्वाणीचा इशारा देऊन कातावलेली ती स्त्री पुढच्या कस्टमर ला तितक्याच निरूत्साहात बोलू लागली आणि नेवार्क विमानतळाचे सगळे अक्षांश रेखांश माहिती असल्यागत आमची पावलं दृढ विश्वासाने समोरच्या दिशेने पडू लागली.
स्काय ट्रेन अजूनही बंदच होती. Damn It !

⁃ विक्रांत देशमुख

गेम ऑफ थ्रोन सीजन ७ एपिसोड ७ : द ड्रॅगन अँड द वुल्फ

"भिंत खचली, कलथून खांब गेला"
⁃ बालकवी (पारवा)

".........."
⁃ नाईटकिंग (गेम आॅफ थ्रोन्स)

वेल्डींगच्या निळ्याशार ज्वाला बाहेर याव्यात तशी धगधगती आग ओकणारा 'त्यांचा' ड्रॅगन आणि त्याच्या पाठीवर बसून खतरनाक आक्रमण करणारा दुरात्मा नाईटकिंग...चेक अॅंड मेट. व्हिसेरीयन सरळ लाईन मध्ये कापत जातो. सातशे फूट उंचीची आणि ऐंशी लाख वर्ष जुनी भिंत हां हां म्हणता म्हणता जमिनदोस्त होते. या एकाच सीनमधे आपले डेटापॅकचे पैसे पुरेपूर वसूल होतात. बर्लिनची भिंत पडल्यावरही झाली नसेल इतकी खळबळ आपल्या मनात माजते. 'त्यांचं' सैन्य मग अनेक शतकानंतर, आस्तेकदम, वाॅलच्या या बाजूस प्रवेश करतं. The fight between Living and Dead !!

फिनाले एपिसोड हा कुठल्याही सीरीजचा कळसाध्याय ठरावा असा प्रघात आहे. S07E07 ती अपेक्षा बव्हंशी पूर्ण करतो. १० च्या ऐवजी ७ भागातच पर्व संपवण्यामागचं लाॅजिक अनाकलनीय आहे. पण सगळ्या कथा-उपकथा सांधत सांधत, पात्रांना भेटवत भेटवत शेवटाकडे वेगाने येत आहोत आपण. सिहांसनाचे अनेक प्रबळ दावेदार ठरवण्याचं काम या सीजन ने केलं. त्यामुळे शेवटाकडे येताना सगळी मांदियाळी एकत्र येण हे ओघाने आलंच!!

किंग्ज लॅंडीग मधील एक सोनेरी रम्य सकाळ. विरोधी पक्षांनी EVM Machine च्या आणि रवी शास्त्रीने खेळपट्टीच्या नावाने खडे फोडण्याची वेळ. तह करण्यासाठी व लॅनिस्टरांचे सहकार्य घेण्यास्तव आलेला डेनेरिस कॅंप. त्यातही टीरीयन ची चिमुकली पावलं कितीतरी दिवसांनी मातृभूमीला (??) लागलेली आहेत. सर डेव्हाॅस Make My Trip बनून सगळ्यांना संगत करत आहेत. त्यांना सामोरे येतात एंप्लाॅई आॅफ द मंथ ब्राॅन आणि रेड आर्मी. टीरीयनचा तिरकसपणा उचंबळून आलेला. पण टोमणे मारण्यात (अजूनही कॅसल न मिळालेला) ब्राॅन काही कमी नाही. ब्रियान व हाऊंड ची पण हलकीशी तण्णातण्णी झाली. नदी वाहतेच आहे. घड्याळाचा काटा पुढे सरकतोय. अखेरीस जुने-नवे सगळे एकसाथ ड्रॅगनपिटामधे आले. लाकडी खोक्यात बंद केलेलं wight चित्कारत राहीलं.

पार्टी नंबर एक स्थानापन्न होईस्तोवर पार्टी नंबर दोनचं आगमन झालं. मंडप कुत्सित हास्यांनी, दबलेल्या भावनांनी, रागाच्या अनामिक प्रेरणांनी व अशब्द हालचालींनी भरून गेलाय.
<
अध्यक्षीय संघ :
डेनेरीस टार्गेरियन (कप्तान), जाॅन स्नो, सर डेव्हाॅस, ब्रियान टार्थ, थिआॅन ग्रेजाॅय, पाॅड्रीक, हाऊंड, जोराह माॅरमोंट, टीरीयन लॅनिस्टर, डोथ्राकी सहयोगी
सभापती संघ :
सेरसी लॅनिस्टर (कप्तान), सर जेमी लॅनिस्टर, युराॅन ग्रेजाॅय, क्यूबर्न वैद्य, ब्राॅन, माऊंटन, रेड आर्मी
>
वर्गात आल्या आल्या काही कारण नसताना एखाद्या पापभीरू मुलाच्या कानफटात मारावी तसं युराॅन ने उगाच थिआॅन ला डिवचलं. पण मंडळ शांत राहीलं. शूटींगला नेहमी लेट येणाऱ्या गोविंदा किंवा कपिल शर्माप्रमाणे डेनेरीस ने सगळे स्थिरस्थावर झाल्यावर अलोट शक्तीप्रदर्शन करत grand entry केली.
"आम्ही इथे माश्या/xxx मारत बसलो होतो. एवढा उशीर के कारणे?" सेरसी कडाडते.
"माफी असावी. सिंहगड रोड, त्यातून संतोष हाॅल चं पिक आवर ट्रॅफीक. ड्रॅगन काय प्रत्यक्ष भगवंत आले तरी या गर्दीतून वाट काढू शकत नाहीत." डेनेरीसचा नाविलाज. (करा म्हणावं अजून आजूबाजूची गावं समाविष्ट पुणे मनपा हद्दीत !!)
टीरीयन ख्यातनाम सूत्रसंचालकासारखा उठतो व आपल्या ओघवत्या शैलीत सुरू होतो.
"सभ्य स्त्री पुरुषहो (पन् इंटेंडेड), या विशेष अधिवेशनात स्वागत आहे. इथे सगळे एकमेकांना पाण्यात बघतात. पण आपापसात लढण्याचे दिवस गेले. खरी लढाई तिकडे उत्तरेकडे." चांगला पाचदहा मिनीटे प्रखर युक्तीवाद करूनही सेरसी फारशी convince होत नाही म्हटल्यावर ते हाऊंडला पेटारा घेऊन यायला सांगतात.
मग इतक्या लोकांचा जीव धोक्यात घालून व एका ड्रॅगन चा बळी देऊन पकडून आणलेला Wight सभेमध्ये पेश केला जातो. त्याचं भयानक दर्शन सगळ्यांना थरारून टाकतं. मग प्रोफेसर जाॅन स्नो आपल्या थिक युरोपियन अॅक्सेंट मधे विशद करू लागतात, "या मेलेल्यांना परत मारायचे दोन प्रचलित उपाय आहेत - पूर्णपणे जाळून टाकणे वा ड्रॅगनग्लासने छेदून टाकणे. हे पहा.."
सर्वजण अवाक् होऊन पाहतात. युराॅन मुद्द्याचं विचारतो, "ही मंडळी पोहू शकतात का?"
"नाही." पाच-सहा wightsना घेऊन हिमनदीत बुडालेला स्नो उत्तरतो.
"मग तुम्ही तुमची....व्यवस्था करा. मी चाललो परत आयर्न आयलंडला".
सेरसीचा भलताच हेका चालू होतो. माझी मदत हवी असेल तर जाॅन स्नो ने विंटरफेल ला जावं आणि मांडलिकत्व पत्करावं असा स्थळ-वेळ-काळ यांना सूट न होणारा हट्ट धरते. (अगदी गुडघ्याच्या वाट्या सरकायची वेळ आली तरी या येडचापांचा Bend The Knee चा बावळटपणा काही संपता संपत नै). पेचप्रसंग निर्माण होतो. डेनेरीसवर लुब्ध झालेला जाॅन स्नो सेरसीच्या प्रस्तावाला फाट्यावर मारतो आणि सभा कुठलाही निर्णय न होता बरखास्त होते. या प्रेमांधळेपणे केलेल्या प्रमादाबद्दल सगळे जण जाॅन ला बोल बोल बोलतात - अगदी डेनेरीस सुद्धा ! पण नंतर तिला कोपऱ्यात घेऊन जाॅन आपला धर्मराज युधिष्ठीर मोड आणि नवप्रेमाचा फुटलेला अंकुर पद्धतशीरपणे तिच्या गळी उतरवतो आणि जाता जाता भविष्यकथन, गायनाकाॅलाॅजी वगैरे विषयांवर तिच्याशी उद्बोधक चर्चा करून आपली पुढची सोय लाऊन घेतो.

प्रिन्सीपलच्या केबिन मधे जायला volunteer करणाऱ्या जिगरबाज विद्यार्थ्याप्रमाणे टीरीयन सेरसी ला एकांतात भेटायची तयारी दाखवतो. भयंकर टेन्स प्रसंग. सगळा कडवटपणा सेरसीच्या डोळ्यातून आणि तिखटी मिरचीप्रमाणे चाललेल्या जीभेतून बिनचूक प्रकट झालाय. टीरीयन अगदी आत्मसमर्पणाची तयारी दाखवतो (आणि टेबलावरच्या बाटलीतून रंगीत द्रावण चांदीच्या ग्लासात भरून घेतो.. PRIORITIES)
शेवटी सेरसीला आतून बसणाऱ्या बेबी किक्स वरचढ ठरतात व ती तहाला तयार होते. मला वाटतंय या आख्खा सीजन मधे टीरीयन ला मिळालेलं हे पहिलं यश.
प्लॅन ठरतो. डेनेरीस ने उत्तर दिशेला हवाई उड्डाण करावं की पदयात्रा काढावी यावर एक परीसंवाद झडतो. नेहमीप्रमाणे डॅनी जाॅनच्या पदरात झुकते माप टाकते आणि जोराहचा जोरात अरिजित सिंग होतो.

विंटरफेल ला 'सान्सा की अदालत' भरते. आर्याला बोलायला सुरूवात करत शेवटी ती अब्बास-मस्तान ला लाजवेल अशी ट्विस्ट देत लिटलफिंगरवर येऊन पोहोचते. बेलिशच्या पापाचा घडा अखेर भरलाच! गुरूची विद्या गुरूलाच फळवत सान्सा त्याच्या कृष्णकृत्यांचा पाढा वाचते. लिटलफिंगर आरोपानंतर आकांडतांडव करणाऱ्या व 'तो मी नव्हेच' सिद्ध करू पाहणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांप्रमाणे काहीबाही बोलतो. पण ब्रॅन विकीलीक्स सारखे गोपनीय पुरावे धडाधड पेश करतो. आणि ज्या खंजीराच्या योगे गेम आॅफ थ्रोन्स मधले कलह सुरू झाले तीच कट्यार आर्या डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच त्याच्या मानेवर चालवते. ही सफाई पाहून महागुरू 'पीळ' देत म्हणाले असते, "तुम्ही खूप चांगला वध केलात. इतने मुदस्सर अंजाम के बाद भी, इतना सन्नाटा क्यू है भाई?"
सॅमवेल टार्ली कुटुंबकबिल्यासह विंटरफेल मधे दाखल झाला व आल्या आल्या ब्रॅन ला जाऊन भेटला. 'मी बिग बझार ला जाऊन येतो' किंवा 'आज इस्त्रीवाला आला नाही' हे ज्या सहजतेने सांगावं त्या भावात राहून ब्रॅन ने पूर्ण सीरीजचे मर्मभेदी रहस्य अत्यंत कोरडेपणाने सांगितले, "जाॅन हा स्टार्क वंशाचा कुलदीपक नसून तो रेहेगार-लायना दांपत्याचा पुत्र आहे". सॅमवेल ने त्याला दुजोरा देऊन संपूर्ण राॅबर्ट रिबेलियन कशी चुकीच्या गृहीतकावर आधारीत होती हे ठासून सांगितलं. R+L=J हे सिद्ध होत असताना एपिसोड मन लावून पाहणारा मी सौदागर मधील मंधारी बाबा (पक्षी : अनुपम खेर) सारखा एका पायावर नाचलो. इतका मोठा उलगडा होत असताना तिकडे जाॅन मात्र तिरीमिरीत अंतःपुरात दाखल झाला आणि 'जागून ज्याची वाट पाहिली.... ते सुख आले दारी' म्हणत म्हणत डेनेरीस आपलं कर्तव्य नीटनेटकेपणे पार पडती झाली. असो.

साप, आॅस्ट्रेलिया आणि सेरसी धरलेला डूख कधी सोडत नाही असं म्हणतात. दोस्य राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लाऊन व्हाईट वाॅकर शी लढायला निघालेल्या सर जेमी ची सेरसीने 'Are you a traitor or idiot?' अशी निर्भत्सना केली. तिने डेनेरीसला दिलेला पाठींबा हा खोटा व संधीसाधू होता हे लक्षात येताच जेमीला तिच्या कुटील बुद्धीचं कौतुकवजा कुतूहल वाटलं. दिल्या शब्दाला जागून युद्धाला जायला निघालेल्या जेमी वर तिने माऊंटन घातला तेंव्हा मात्र ही विषवल्ली किती खोल आहे याची जाणीव झाली. बिचारा एकटा दूरवर निघालेला असताना हिमवर्षाव सुरू झाला आणि ज्याचा सर्वांनीच धसका घेतला होता तो हिवाळा सुरू झाला.
Finally winter is here !!!

आणि मग या पर्वाचं शेवटचं टोक. इस्टवाॅच-बाय-द-सी वर होणारं 'त्यांचं' आक्रमण. ड्रॅगनच्या अक्राळविक्राळ ज्वालांनी छेदलेली वाॅल ची अभेद्य तटबंदी आणि काही कळायच्या आत धरणीशायी झालेला वेस्टोरसच्या सुरक्षेचं प्रतिक असलेल्या बांधकामाचा मोठा भाग. आता या मोठ्या भगदाडातून 'ते' आतमध्ये आलेत. आपल्या जमिनीवर 'त्यांची' अशुभ पाऊलं पडताहेत - थड् थड् थड्. यालाच "अंतारंभ" म्हणत असतील काय?
हम्म्म... उडाले ते कावळे (डबल पन् इंटेंडेड)... उरले ते आपले.

शेवटी काय तर आमचे स्टार्क म्हणतात तसे "When the winter comes, lonely wolf dies but the pack survives.." .
अगदीचं.

⁃ विक्रांत देशमुख

#GameOfThrones #S07E07 #TheDragonAndTheWolf #Finale
(क्रमशः)

गेम ऑफ थ्रोन सीजन ७ एपिसोड ६ : बियॉंड द वॉल

किती सांगू मी सांगू कुणाला.... आजि आनंदी आनंद झाला,
आजि आनंदी आनंद झाला...

जाॅन ने डेनेरिसला 'डॅनी' म्हणून हाक मारली. आणि Be My Queen अशी प्रपोजवजा आॅफर दिली. सात सीजन झाले,पण तुम्हाला सांगतो, अश्या क्षणांइतकी उत्कंठा कशाचीच वाटली नव्हती. मृत्यूशी सापशिडी खेळून आल्यावर जाॅनचा काॅनफीडन्स (आमचा 'हक से सिंगल' झाकीर खान म्हणतो तसा) 'आसमान फाडके' गेलाय. डुचमळणाऱ्या बोटीत, ग्लानीतून भानावर आल्या आल्या त्याने थेट मुद्द्याला (व डॅनी ला) हात घातला. डॅनी वितळली; कातर आवाजात म्हणाली -"तूच रे ! तूच रे तो !!"

आर्याचं टाळकं फिरल्याने ती सान्साच्या प्रत्येक कृतीवर व विचारांवर प्रश्नचिन्ह उभे करते आहे. दोघींमधली दरी डीपी रोडप्रमाणे रूंदावते आहे. कोण समजावणार यांना? विशेषतः जाॅनच्या अनुपस्थितीत ही sibling rivalry टोकाला जावी असा लिटलफिंगर चा फुल्ल-स्केल प्रयत्न चालू दिसतोय. आर्याने साठवलेली चेहऱ्यांची inventory पाहून तर सान्साची दातखीळ बसलेली दिसली. सगळं माहिती असलेला ब्रान पोरींना सामोरं बसवून घडाघडा बोलून का टाकत नाही हे त्या एका मार्टीनेश्वरालाच ठाऊक....

चिटपाखरूही न दिसणाऱ्या त्या बर्फाळ भूमीत जाॅन स्नो ची तुकडी व्हाईट वाॅकर ला शोधावयास निघालेली आहे. टाॅरमुंड आणि हाऊंड मधे शिवराळ जुगलबंदी चालू आहे. तूर्तास डेनेरिस-प्रेमाच्या त्रिकोणाच्या दोन भुजा असलेले जाॅन व जोराह माॅरमोंट एकमेकांशी nice वागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातल्या त्यात जोराहची अवस्था 'छुपाना भी नही आता... जताना भी नही आता... म्हणणाऱ्या सिद्धार्थ सारखी झाली आहे. धर्मराज स्नो मधेच दानशूर कर्ण होऊन Valerian Steel ची तलवार जोराहला द्यायला निघाला होता. पण clinically depressed भासणाऱ्या माॅरमोंटने 'बाबांनी तुला प्रदान केली आहे तर ही तुझ्याच हाती जास्ती शोभून दिसते' असं सांगत भेट स्वीकारायला नम्र नकार दिला. अध्यक्ष महोदय, यालाच पुरस्कारवापसी म्हणता येईल काय?
बाकी हाऊंडला आगीच्या ज्वाळात दिसलेलं गिरीशिखर तंतोतंत समोर दिसलं आणि भविष्याची चाहूल लागली.
वर्गात किंवा ग्रुप मधे एखादा मुलगा कायम थट्टेचा विषय असतो तसं गॅंड्री ची 'खेचाया आवडे सर्वांसी' ! ज्या दिवशी त्याचा खरा कुलवृत्तांत कळेल तेंव्हा यांच्या reactions बघायला मजा येतील.

Death is the Enemy असं ठासून सांगणाऱ्या बेरीक व जाॅन मधे 'परतीच्या वाटा' या विषयावर एक उद्-बोधक परीसंवाद झाला. मृत्यूच्या दाढेतून सुटून येण्याचं कारण म्हणजे आपणाहातून काही लोकोत्तर काम होणे हे आहे असं conclusion हे दोघे काढते झाले. काही ध्यानीमनी नसताना बर्फाच्या वावटळीत पोलर बिअर चा हल्ला झाला. ते अवाढव्य जनावर आवरता आवरता थेराॅस गंभीर जखमी झाला. भारतीय उपखंडा बाहेर खेळताना आपल्या फलंदाजांचा उजव्या यष्टीबाहेरील चेंडूंबाबतचा weakness उघडा पडतो तसे कुठल्याही form, fit and functionality मधे आग समोर आली की हाऊंडचा मादाम तुंसाॅं होऊन जातो. शोले मध्ये समोर टाकलेली बंदूक फेकू न शकलेल्या असहाय्य ठाकूर रामदेव सिंग ची आठवण आली.

मंडळींना थोडं अजून अंतर चालून गेल्यावर व्हाईट वाॅकर्सचा एक गुच्छ सापडला. सर्वांनी निकराची लढाई करून जाॅनच्या मास्टर-स्ट्रोकच्या जोरावर त्यांना नेस्तनाबूत केलं. एका नमुन्या पोत्यात घालून बंदी पण बनवला. पण तितक्यात आगीमोहोळ उठावं तसे अनेक Wights आणि White-Walkers चाल करून आले. गोठलेल्या हिमनदी वा समुद्राने आपल्या पलटणीला तात्पुरतं वाचवलंय. प्रसंगावधान राखत जाॅनने गॅंड्री बाळाला वाॅलवर जाऊन डेनेरिसला मदतीचा संदेशा पाठवायला सांगितला.
सगळीकडून शत्रूचा जीवघेणा वेढा पडलाय.... शुअरशाॅट पराभव आणि मरण समोर दिसतंय....
"दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली.. जरी ही छाती
अजून जळते अांतरज्योती.. कसा सावरू देह परी" अशी खरं तर ही अवस्था. सगळे डोळ्यात तेल, नव्हे नव्हे बर्फ, घालून दुश्मनावर लक्ष ठेऊन आहेत. Wait and Watch चा थरारक खेळ चालू आहे. जखमी झालेला प्रिस्ट शेवटची मान टाकतो आणि त्या नैराश्यातून म्हणा किंवा अंगभूत मूर्खपणातून म्हणा, हाऊंड Army of Dead च्या दिशेने एक धोंडा भिरकावतो. तो दगड टणटण करत गोठलेल्या पाण्यावर पडतो आणि सगळ्यांच्या लक्षात येतं की रस्ता सुगम सोपा झालाय...that's it then. हाऊंडच्या बेअक्कलपणाने शत्रूसैन्याला मोठी ओपनिंग मिळते आणि मग सुरू होते एक धमासान लढाई...

गेम आॅफ थ्रोन मधली युद्धं हा तमाम चाहत्यांच्या दृष्टीनं नेहमीच एक आकर्षणाचा विषय राहिला आहे. विशेषतः मानव व अमानव ही झुंज तर आपल्या उत्कंठेची अभिप्सा पूर्ण करणारी. (पोलोचे टी शर्ट घालणाऱ्या इंग्रजाळलेल्या बांधवांसाठी : अभिप्सा = thirst). चीत्कारत वेडेवाकडे पळत येणारे wights आणि त्यांच्यावर त्वेषाने तुटून पडलेली जाॅन स्नो ची तुकडी. Statistically and practically अतिशय विसंगत वाटणारा हा संग्राम. पण सगळेच जण होता होईल तो प्रतिकाराला लागले आहेत. हलकल्लोळ नुसता. मृत्यूचं, हिंसेचं थैमान. हाणा.. मारा... कापा. शक्ती कमी पडते आहे पण Do or Die एवढेच आॅप्शन समोर आहेत. बाहू तोकडे पडताहेत पण टिकून आहोत...
"पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजे, तो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का... आता घरी?
सरणार कधी रण प्रभो...
कुठवर साहू, घाव शिरी?" अशी giving up ची भावना दाटून येत असतानाच ज्या सीन साठी डोळे 'त्रिफळांजन' ड्राॅप टाकून टाकून बळकट केले होते तो डेनेरिसच्या युद्धभूमीवरील आगमनाचा प्रसंग. आगीचे कल्लोळ सोडीत, शत्रूंची राखरांगोळी करीत डॅनीचे ड्रॅगन्स जबरदस्त काऊंटर अॅटॅक करतात त्या चित्रीकरणाला माझ्या शरीरातील ७२,००० नाड्यांनी एकदम दाद दिली. जिसका मुझे.... था इंतजार.... वो घडी आ गई, आ गई. Song of Ice and Fire असं प्रत्यक्षात उलगडताना पाहून काॅर्पोरेट क्षेत्रात अनेक वर्ष काम करून बथ्थड झालेली संवेदना झणाणून उठली. डॅनीच्या राॅयल एअर फोर्स ने रणकंदन माजवलं आणि दिसेल ते भस्मसात करायचा सपाटा लावला. जियो मेरे लाल ! दोस्त राष्ट्रांच्या सेनेला बळ मिळालं. बाजी पलटली. अन् तितक्यात दूर टेकडी उभ्या असलेल्या नाईट किंग चे निळेशार डोळे अनामिक planning ने चमकले.
आपल्याला हे पात्र आधीपासून आवडतं. सीधी बात, नो बकवास. Thus guy knows his business pretty well. कसल्याही आक्रस्ताळपणाचं प्रदर्शन न करता किंवा रामानंद सागर कृत 'संभाल अपने आप को' टाईप युद्धसंवाद न म्हणता तो शांतपणे आपलं अमोघ शस्त्र उचलतो आणि खपाक् कन् उडत्या ड्रॅगनवर मारतो. व्हाईट वाॅकर चा असला म्हणून काय झालं शेवटी तो किंग आहे. एक घाव, दोन तुकडे... (Pun intended).
व्हिसेरीयन चमत्कारीक कळवळत धराशायी होतो. सगळ्यांच्या छातीत, फायनल ला ३०० रन चेस करताना विराट कोहली स्वस्तात आऊट झाला की होतं तसं, धस्सं होतं. एक आख्खा ड्रॅगन जमिनदोस्त? डेनेरिसवर दुःखाचा अतीव डोंगर कोसळतो.

पहिला गोल केला की तातडीने आक्रमण करावे, दुसरा गोल होण्याची शक्यता खूप जास्ती असते असं आमच्या Barclays English Premier League मधील विचारवंत सांगतात. त्याच तत्वाला अनुसरून नाईट किंगने ड्राॅगनसाठी दुसरा भाला उचलला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रसंगावधान दाखवत जाॅन स्नो ने 'तुम्ही व्हा फुडे.. मी आलोच' असं बहुमुल्य सजेशन दिलं. ड्राॅगन काठावर पास झाला. (हा पन Pun आहे!!) जाॅन ला असं भयंकर चक्रव्यूहात सोडून जायची डेनेरिसची अजिबात इच्छा नव्हती. पण करणार तरी काय?

नाट्यप्रवेश : काका मला वाचवा
पात्रे : त्यागमूर्ती जाॅन स्नो, गूढ काका बेंजेन स्टार्क, आयुष्यात काहीही करू न शकलेली Army of dead
(पडदा उघडतो. जाॅन स्नो कितीही उपटून टाकले तरी परत उगवणाऱ्या गवता सारखा कित्येक फूट खोल बर्फाळ पाण्यातून कसाबसा वर येतो. वाईटांच्या (उपकंस: आज Pun व्होलसेल मधे मिळत आहेत... ख्या ख्या ख्या) ते लक्षात येतं. ते आपला मोर्चा स्नो शेठकडे वळवतात.)
Wight 1 : मला एक सांग भाऊ. ये दिवार टूटती क्यू नही है?
Wight 2 : टुटेगी कैसे? टार्गेरियन और स्टार्क के संयोग से जो बनी है !!
Wight 3 : ते काही असो. पुण्यात मेट्रो झालीच पाहीजे.
(इंजिनियरींग काॅलेजेस मधे सबमिशन करायला निघालेल्या झोंबी विद्यार्थ्यांसारखे सगळे जाॅनच्या दिशेने चालू लागतात. आपण क्लिअर कट outnumbered आहोत हे जाॅन ला पहिल्याझूट समजतं. पण पार माणिकबागेपर्यंत ट्रॅफीक जॅम झाल्याचं समजूनही सिंहगड रोडवर गाडी घालणाऱ्या असहाय्य ड्रायव्हर सारखा तो घनघोर लढाईला तयार होतो.)
जाॅन : काही चुकलं माकलं असेल तर माफ करा. यथावकाश वेस्टोरस मधील शालेय पुस्तकात माझ्यावर धडा येईलचं पण आपली माणसं म्हणून सांगतो डेनेरिसला पाहिल्यानंतर - आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है... ट्यांव ट्यांव ट्यांव.
('फिर' या शब्दावरचा जाॅन स्नो ला उद्देशून असलेला श्लेष ज्यांच्या लक्षात येणार नाही अश्या सर्वांनी मुळामुठेच्या - उजनी धरणासाठी सोडून उरलेल्या - पाण्यात जीव द्यावा!!)
Wights : घाई कसलीच नाही. सावकाश हालत डुलत जाऊ. भक्ष्य आपलं जातंय कुठं??
एवढ्यात एक आक्रीत घडतं. भात-कापणीच्या मशिन ने दोन्ही रांगांमधली पिकं छाटतं जावीत तसं घोड्यावर बसून आलेला एक अनामिक योद्धा आग लावलेला लोहगोळा घेऊन सैन्य मारत सुटतो. जवळ आल्यावर जाॅन पाहतो तो काय? काका बेंजन स्टार्क.
Merchant Navy मधील लोक जसे काही ठराविक महिनेच काम करतात तसे हे बेंजन काका फक्त विवक्षीत जागी व विवक्षित ठिकाणीच अवतरीत होतात.
अर्थात 'वेळेला केळं' या उक्ती ला अनुसरून जाॅन त्यांचा घोडा घेऊन व काकांना मरायला एकटंच सोडून तिथून पसार होतो.

इस्टवाॅच-बाय-द-सी च्या उंच मनोऱ्यात डेनेरिस अस्वस्थपणे उभी आहे. पुत्रशोक व नवप्रेमसंजीवक जाॅन स्नो ला गमावल्याने तिच्या दुःखाला पारावार उरला नाहीये. संधी साधून माॅरमोंट "Khalisee, I think we should go" असा बाण मारून घेतो. पण तेवढ्यात दूर परीघावर Open The Gate ची ललकारी ऐकू येते आणि ठिपक्यासमान भासणारा, घोड्याच्या पाठकुळी कसाबसा लटकून आलेला जाॅन स्नो प्रेक्षकांना दृग्गोचर होतो. डेनेरिसच्या हृदयात खुशीची लहर उमटून जाते. प्रत्यक्ष मरणाला (परत एकदा) हुलकावणी देऊन आल्यामुळे जाॅनची कथानकातली व राणीच्या मनातली intrinsic value एकदमच वाढते. Energy आणि Matter, इडली आणि सांबार, शक्ती आणि शिव तसे आमचे डेनेरिस आणि जाॅन स्नो. चांगली शुश्रुषा करून शुद्धीवर आणताच तो अगदीच मौसम मधे येतो आणि डॅनी सकट सगळे प्रेक्षक एकच पिंगा घालू लागतात -
किती सांगू मी सांगू कुणाला.... आजि आनंदी आनंद झाला,
आजि आनंदी आनंद झाला...

क्लायमॅक्स मात्र निव्वळ थरकाप उडवणारा... मेलेल्या व्हिसेरीयन ड्रॅगन ला नाईट किंग केवळ आपल्या स्पर्शाने Wight मधे रूपांतरीत करतो. त्याचं अवजड धूड ओढून काढण्याचा प्रसंग कलात्मकतेच्या निकषावर एकदम दर्जेदार. आणि मग नंतर ते त्याचे गर्द निळे डोळे उघडणं म्हणजे येणाऱ्या कित्येक संकंटांची जणू नांदीच ठरावी. ही ट्विस्ट कट्टर मार्टीनप्रेमींना कितपत रूचेल काही सांगवत नाही... तूर्तास तरी सर सलामत तो पगडी पचास !!!

#GameOfThrones #S07E06 #BeyondTheWall

विशेष नोंद :
वरील रसग्रहण हे मुंबई ते न्यूयाॅर्क विमानप्रवासात ३६००० फुटांवरून प्रवास करताना लिहीले असून त्या वेळी आमचे विमान Northern Ireland, Belfast वगैरे गेम आॅफ थ्रोन चे शूटींग होणाऱ्या टापूवरून चालले होते. हा मी फार विलक्षण योगायोग समजतो.

⁃ विक्रांत देशमुख

Tuesday, August 15, 2017

गेम ऑफ थ्रोन सीजन७ एपिसोड५ : इस्टवॉच

Because we all are breathing... खलास !

कमीत कमी शब्दात जाॅन स्नो जणू सगळ्या गेम आॅफ थ्रोन ची कळ उलगडून दाखवतो. Survival of the fittest. अनेकरंगी अनेकढंगी नमुने बर्फाच्या रगाड्यात एकत्र आली आहेत - एकमेकांचे जुने हिशोब आणि द्वेषांचे EMI घेऊन. यात जळक्या चेहऱ्याचा हाऊंड आहे, बऱ्याच वर्षांनी सापडलेला कुशल कारागीर पण मूळचा क्षत्रिय गॅंड्री आहे, नवसंजीवनी मिळून खलिसीच्या सेवेत पुन्हा जाॅईन झालेला (आणि परत एकदा Friendzone व्हायला आलेला) जोराह माॅरमोंट आहे, GOT चा नाना पाटेकर असं मी ज्याला म्हणतो तो टाॅरमुंड आहे आणि या सगळ्या चक्रमादित्यांना 'सूत्रे मणिगणः इव' पद्धतीने धरून ठेवणारा जाॅनबाबा स्नो आहे. आधीच्या सर्व सीजन मधे विखुरलेली पात्र अन् त्यांचे subplots आता गुंडाळत आणत जबरदस्त शेवटाकडं जाण्याचा प्रयत्न चालू आहे HBOचा. 'यांनी यंव केलंय, त्यांनी तंव केलंय... आम्ही काय हून एकत्र लढायचं' या खदखदीच्या प्रश्नावर आपल्या तद्दन ब्रिटीश accent मध्ये स्नो म्हणतो "Because we all are breathing...."

ड्राॅगनच्या सर्जिकल स्ट्राईकमधून ब्राॅन च्या प्रसंगावधानाने वाचलेला जेमी पण तेच म्हणतोय. जे पाहिलंय त्याने तो सुन्न झालाय. फार पूर्वी (म्हणजे helmets आणि एन् नरसिंहन् नसताना) कॅरेबियन बेटांवर क्रिकेट खेळणं म्हणजे यमयातना असायच्या. जोएल गार्नर, चार्ली ग्रिफीथ वगैरे सैतान दात करवदून, लाल डोळ्यांनी तो उसळी चेंडू टाकायला धावत आले की अगदी नाॅन-स्ट्राईकर च्या फलंदाजाची ओली व्हायची असं आमच्या वासू परांजपेंनी कुठेतरी सांगितल्याचं आठवतंय. तसं फक्त एका ड्रॅगन ने केलेला विषय बघून जेमी मुळापासून हादरलेला आहे. ब्राॅन,अर्थातच, लॅनिस्टरांवर जीवरक्षणाचा अजून एक डेबिट मेमो चढवून दात विचकतो आहे. संभाव्य धोक्याची पुरेपूर कल्पना आलेला जेमी सेरसीला सावध करणार आणि काही तरी प्रतिकार करणार Because we all are still breathing...

युद्धभूमीवर टीरीयन पडेल चेहऱ्याने फिरतो आहे. हा विध्वंस त्याच्या कल्पनेपलीकडचा आणि कितीही झालं तरी जळून बेचिराख झालेली माणसं पूर्वाश्रमीचे त्याचेच लोक. Peter Dinklage चे डोळे फार बोलके आणि विलक्षण reflective आहेत. डेनेरिस पकडलेल्या सैन्याची एक छोटीशी All-Hands meeting घेते. 'शरण या किंवा मरा' या आॅफर मधे न समजण्यासारखं काय आहे बरं?? तरी काही निबर खोडं हिरवा दिवा लागूनही सिग्नल ला थांबलेल्या माठांसारखे तसेच उभे असतात. मग जे काम डेनेरिसच्या चुरचुरीत लीडरशीप भाषणाने होत नाही ते ड्राॅगनच्या एका डरकाळीने होतं. सॅमच्या बाबांना मात्र हिरोपंतीची सुरसुरी येते. अत्यंत न पटणाऱ्या लाॅजिकने ते मान तुकवायला नकार देतात. पोरगंही पेटून उठतं. ('श्लेष' हा मराठी साहित्यातून हद्दपार होत चालला आहे अशी कुरबूर करणाऱ्यांच्या तोंडावर मारण्यासाठी केलेला विनोद आहे तो.... इंग्रजी माध्यमात शिकलेल्या नवश्रीमंतांसाठी : श्लेष = Pun Intended) डेनेरिसला example सेट करायचं असतं. टीरीयनला हिंसाचार टाळायचा असतो. टार्ली पितापुत्र 'मोडेन पण वाकणार नाही' स्टेट मधे गेलेले असतात. टाईमआऊट संपतो अन् डेनेरिसच्या एका इशाऱ्यासरशी रांडेल आणि डिकाॅन महाशयांची पार होळी होते. टीरीयन व व्हेरीस दोघांनाही हे खटकतंय, पण सांगता कोणाला? रात्री श्रमपरीहीर करताना दोघांचेही मेंदू यावर ओव्हरटाईम करत आहेत. ड्राॅगन ने साजरी केलेली दिवाळी पाहून लॅनिस्टर आर्मीने सामूहिक गुडघाटेक धोरण स्वीकारलं कारण we all are still breathing...

Thanks God, we all are still breathing अगदी हेच ब्रॅन स्टार्कला वाटतंय. चौथ्या मितीमधे जाऊन तो व्हाईट वाॅकर्सचा लेटेस्ट स्टेटस घेऊन येतो तो कमाल चित्रीत केलाय प्रसंग. बर्फाळ पार्श्वभूमीवरचे सुरूवातीचे उड्डाण म्हणजे तर one of the best shot sequence in GOT. कॅमेरामन ला माझ्यातर्फे चितळेच्या दोन बाकरवड्या. नाईट किंग ची नजर भर दिवसाही आपल्याला थरारून टाकते. ब्रॅन मग लागलीच जाॅनला मेसेज करतो.

Dragonstone वर जाॅन स्नो background ला "आवारापन, बंजारापन... एक खला है सीने मे" वाजवत नुसताच फिरतो आहे. माझा बिल्डींगही खाली न उतरून जाणारा एक मित्र त्याच्या या अवस्थेला Lonxiety (loneliness+anxiety) म्हणतो. तो असा 'जीवन व मृत्यूचं स्वरूप काय?' 'वरूण धवनमधे नायकत्वाचा नेमका कोणता गुण आहे?' 'हे विश्व खरंच होलोग्राफीक आहे काय?' 'मारूबिहाग मधे कोमल स्वर का वर्ज असतात?' 'सेंद्रीय शेतीने GDP कसा वाढेल?' वगैरे महत्वाच्या विषयांवर चिंतन करत असतानाच युद्धभूमीवर विजयपताका फडकावून आलेली डेनेरिस पुढ्यात लॅंड होते. इतरांवर डाफरून त्यांना हिडीसफिडीस करणारी सरकारी रूग्णालयाची खाष्ट रिसेप्शनिस्ट एखादा handsome hunk येताच लोण्याहून मृदू होऊन जाते तसा तो अक्रारविक्राळ ड्राॅगन जाॅन स्नो च्या समोर अगदी प्रेमात येतो. बरंचसं धैर्य एकवटून जाॅन त्याला स्पर्श करतो व R+L = J थेअरी ला पुन्हा एकदा प्रचंड पाठबळ देतो. 'हे जनावर नेमकं याच माणसासमोर पघळलं कसं काय' यावर बोलायचं सोडून डेनेरिस मात्र 'तू वार पचवून, मेलेला परत जीवंत झालास म्हणे' असले फुटकळ प्रश्न विचारत राहते. दोघांमधे काही घडेल असं वाटत असतानाचं चांगल्या सिरीयल मधे जाहिरातीचा ब्रेक यावा तसा जोराह मोरमोंट मधे टपकतो. हे झुरते आशिक म्हणजे लै बेक्कार जमात. यांचा पिछा सुटता सुटत नाही. ग्रेस्केल सारख्या जीवघेण्या आजारातून, सॅमवेलच्या मटका प्रयत्नाअंती, वाचल्यावर जोराह ही हेच म्हणतोय I am still breathing.

भाऊ व बाबांचा बारबेक्यू झाल्याचं सॅमला अजून कळलेलं नाहीये. पण त्या सिटाडेल मधल्या विक्षिप्त म्हाताऱ्यांवर कावलेला आणि उणे तीन जाॅब सॅटीसफॅक्शन असलेला सॅमवेल शेवटी तिथून निघून जायचं ठरवतो. जाताना संभाव्य लढाईला उपयोगी पडणारा knowledge-base बरोबर घ्यायला तो विसरत नाही.
सान्सा व आर्या मधे मतभेदाच्या ठिणग्या पडतच आहेत. त्यांना वारा घालण्याचं काम लिटलफिंगर इमान इतबारे करत आहे. विशेषतः एपिसोडच्या शेवटी सान्साचं खूप जुनं लेटर अचूकपणे प्लॅंट करून त्याने आपला डाव व्यवस्थित टाकला आहे. आर्याचं डोकं सटकलं तर राडा होईल हा त्याचा होरा आहे. After all Chaos is the ladder !! खरं तर सगळीचं स्टार्क भावंडं या ना त्या प्रसंगातून मरणाच्या दारातून परतली आहेत. गप्प आपलं एकोप्याने रहायचं सोडून नसत्या कलागती चालू आहेत. जाॅनचं वाक्य यांनाही लागू पडतं we all are breathing...

Dragonstone च्या बोर्डरूम मधे तातडीची मिटींग होते पुढील प्लॅन ठरवायला. काॅमन शत्रूशी लढण्यासाठी सेरसीची मदत घेता आली तर पहावी असा तल्लख विचार सगळ्यांच्या सुपीक मेंदूतून बाहेर पडतो. आणि मग टीरीयन आणि सर डेव्हाॅस Kings Landing ला खुश्कीच्या मार्गाने जातात. धाकट्या बंधूंना बघून जेमीचा फ्यूज उडतो पण विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन तो पुढील कार्यवाही करतो. मधल्या काळात सर डेव्हाॅस आपल्या घरचा रस्ता असल्यागत लोहारगल्लीत पोचतात व बराथयिन कुळातील गॅंड्री ला घेऊन परततात. सगळी पात्र अशी परत एकमेकांच्या आयुष्यात आलेली बघून फार मजा येते. या दिवट्याचे दोन उपयोग आहेत - ड्रॅगन ग्लास ची हत्यारं बनवायला आणि पुढेमागे कुणीच नसेल तर थ्रोनसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला ! आयुष्यात कधी कुणाला सिक्कीम लाॅटरी लागेल ते सांगता येत नाही.

सेरसीची मदत हवी असेल तर एखादा जीवंत व्हाईटवाॅकर पकडून आणून तिला दाखवावा असा अत्यंत पांचट व अव्यवहार्य विचार डेनेरिसचा दरबार बोलून दाखवतो. हाॅटेलमधे बिल आल्यावर सर्वप्रथम पाकीट काढणाऱ्या सज्जन मित्राप्रमाणे जाॅन लगेच volunteer करतो. डेनेरिस 'खुलता कळी खुलेना' मधल्या मानसी सारखी कळवळते. जाॅन व तिच्यामधली सलगी बघून जोराह तत्परतेने 'मी पण जातो' अशी आॅफर देतो. त्यावर तीची पार अलका कुबल व्हायची बाकी होते. आपण डोथ्राकी आणि ड्रॅगन घेऊन इथे आलोय कश्याला आणि करतोय काय वगैरे विचार तिच्या अचानक हळव्या झालेल्या मनाला शिवतंही नाहीत. जाॅनचं पुणेरी टोमणं मारणं चालूचं असतं. "Your grace, if I don't come back, you will have one less king in the North to deal with" हे छद्मी उद्गार तत्कालिन युद्धाला अनुसरून नसून जोराह मोरमोंटने डेनेरिसचे हात पकडल्याच्या जळफळाटातून आल्याचा आम्हांस दाट संशय आहे !!

पण या कारणपरत्वे मंडळींना ईस्टवाॅच ची आठवण येते हे महत्वाचे. तिकडे चित्रविचित्र मंडळींची मांदियाळी भरलेली असताना आपले मॅनेजमेंट कौशल्य वापरून जाॅन त्या सगळ्यांची मोट बांधतो आणि एका अनामिक व्हाईट वाॅकरच्या शोधात बर्फात कूच करतो. Sureshot मरणाच्या सावलीला चेस करायला निघालेल्या या टोळीला आश्वस्त करणारा, सरदार जाॅनभाऊ स्नो यांचा एकच तेजस्वी विचार - We all are (still) breathing)....
जय माहेष्मती ! जय वेस्टोरस !!

टीपा:
(अ) सेरसीच्या डोहाळजेवणाला युराॅन ग्रेजाॅय उपस्थित राहील काय?
(ब) सेरसी आपल्यावरही spying करते हे कळल्यावर जेमीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
(क) जाॅन ची लीडरशिप क्वालिटी खरंच वाखाणण्याजोगी आहे. काल बोट ढकलताना तो सगळ्यात पुढे होता. मोरमोंट मागे वळून निरोपाचा छचोरपणा करत असताना जाॅन मात्र ध्येयाकडे लक्ष ठेऊन होता. ईस्टवाॅच हून निघालेल्या पलटणीच्या ही तो अग्रस्थानी होता. This is called Leading from Front. मात्र मागे Hardhome ला झालेल्या भीषण लढाईच्या वेळी सगळ्यात शेवटी तो बोटीत चढला. या त्याच्या गुणासाठी व डेनेरिस ला मारलेल्या "This time I request you to trust in stranger" डायलाॅग साठी पुणेरी पगडी व उपरणं देऊन सत्कार !!
(ड) ड्राॅगन वर काय प्रथमोपचार केले गेले व हे चिरंजीव तत्काळ इतके टुणटुणीत बरे कसे झाले या संबंधी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करावा असा सिरीयसली विचार चालू आहे.
(इ) "हॅलो... हॅलो... कुणी आहे का तिथे?" - इति ग्रेवर्म
(ई) "Ditto" - यारा ग्रेजाॅय, थिआॅन ग्रेजाॅय

#GameOfThrones #GOT #Eastwatch #S07E05

⁃ By Vikrant Deshmukh

गेम ऑफ थ्रोन सीजन७ एपिसोड४ : द स्पॉईल्स ऑफ वॉर

"ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं"... हा मग फक्त वापरून गुळमुळीत झालेला डायलॉग राहत नाही. ती येतेच मुळात तुफानावर स्वार होऊन. सात सीजन ज्या क्षणाची वाट डोळ्यांच्या खाचा होईपर्यंत पाहिली ते वेस्टोरेसच्या भूमीवरचं डेनेरिसचं थेट युद्ध एकदाचं पहायला मिळालं. आग ओकणं म्हणजे काय ते असं सोदाहरण स्पष्ट केल्याबद्दल HBOकारांना दाद द्यावीच लागेल....

अर्थात एपिसोडची सुरूवात चेतेश्वर पुजारा आणि राहुल द्रविडच्या कूर्मगतीने झाली. हायगार्डन च्या सुलभ विजयानंतर ल्यानिस्टर कंपूमधे उत्साहाचं उधाण आलेलं.. (iPhone 7 या माझ्या महागड्या फोनच्या मराठी टाईपिंगमधे La हे ल्या असंच लिहावं लागतं हे इथे सखेद नमूद करावंस वाटतं... असो). आता कधी एकदा हे सोनं गाडीत भरतो आणि आयर्न बँकेकडून आलेल्या मायक्रॉफ्ट च्या तोंडावर मारतो असं जेमी ला झालेलं. ब्रॉनचं आपलं तुणतुणं चालूच. अगदी एकशे सदोतीसावा वेतन आयोग लागू करून दिला तरी कुरकुर करत राहणार्या सरकारी कर्मचार्याप्रमाणे ब्रॉन "एक Castle द्या मज कुणी आणुनी" चा राग आळवायचा थांबत नाही.

विंटरफेलला आमच्या आर्या स्टार्क ची 'घरवापसी' झाली. फारच रोमाचंक प्रसंग बॉ... I am Aarya Stark and I live here ला आणि नंतर So they call you Lady Stark now? या चुरचुरीत संवादाला मी गगनभेदी काल्पनिक शिट्टी पण मारली. परतलेली आर्या काहीच्या काही बदललेली आहे हे ब्रियान सकट सगळ्यांच्या लक्षात आलं - विशेषतः सान्सा च्या ! आर्याला सफाईदार प्रमाणे लढताना पाहून तिचा चेहरा कुणाचं काही चांगलं न बघवणार्या ठराविक मराठी न्यूज अँकर सारखा काळवंडून का जात होता हे त्या एका लॉर्ड बेलिशालाच ठाऊक. मीरा रीड घरी निघाली आणि जाताना ब्र्यानच्या (remember iPhone typing issue) कठोर बनलेल्या हृदयाला दूषणं देऊन गेली.
आर आर मार्टीन ने अलोट पात्रं निर्माण केली.पुण्यातील लबाड उडपी हॉटेल वाले एकच भाजी जुजबी फरक करून व्हेज कढाई, मिक्स व्हेज, व्हेज कोल्हापुरी इत्यादी बहुसंख्य नावाने खपवतात. तसं बहुधा स्टॉक संपत आल्याने मार्ट्याने 'ब्र्यान-ब्रॉन-ब्रियान प्रथमा' अश्या विभक्त्या सुरू केल्या. हे सारं लक्षात ठेवणं महाकर्मकठीण काम.

लिटलफिंगर ने वादग्रस्त dragger ब्र्यान ला दिला आणि चिरंजीवांनी तो 'एका cripple ला याचा काय उपयोग' असा सेमी-इमोशनल डायलॉग मारून पुढे आर्याकडे सरकावला. एका कट्यारीच्या जीवावर (व महागुरूंच्या कृपेने) झी मराठी आपल्याला किती पकवत असते हा इतिहास ताजा असतानाच आर्या सारख्या सूडयात्रेवर असलेल्या पात्राच्या हातात हत्यार आलंय. ही कट्यार निःसंशल लिटल फिंगरच्या(च) काळजात घुसणार !!
तिकडे Dragonstone ला खाणकाम करताना जॉन स्नो ला काहीतरी सापडलंय आणि तो ते डेनेरिसला दाखवू इच्छितोय. दोघेजण एकटेच गुहेत घुसताना पाहून कोट्यावधी चाहत्यांची मनिषा सरतेशेवटी पूर्ण होणार असा फुकाचा विचार मनात तरळून गेला. कारण मागे जॉन गुहेत गेलेला तेंव्हा येग्रीट बरोबर होती आणि पुढे.... असो. पण अजून तरी डेनेरिस चा इगो कोकणकड्या सारखा अभेद्य उभा आहे. त्यामुळे जवळीकीच्या एकदोन बाष्कळ क्षणांखेरीच कुणाच्या हाती काहीच लागलं नाही. गुहेतल्या भित्तीचित्रांवरून असं लक्षात आलं की पुरातन Children Of Forest आणि First Men हे एकत्र येऊन व्हाईटवॉकरशी लढले होते. त्यामुळं त्यांच्या वारश्याची शेखी मिरवणार्या आपण एकत्र येण्यात भलाई आहे असं जॉन ने ड्यानीला (iPhone सुधारा रे कुणीतरी..ड्यानी काय ड्यानी?) पटवलं. तिथे ती ओके होती पण काठावर येऊन स्वारी टिरीयन वर अचानक सटकली. सगळीकडे यथेच्छ दारूण पराभव स्वीकारल्यानंतर सोनिया गांधी अहमद पटेलांवर अश्याच भडकल्या असतील काय?? तिकडे इसॉस वगैरे भागात प्रतिरोज दोन या रेटने लढाया करणार्या डेनेरिसला या बेटावर नुसतं वाट पहात बसणं थोडीच मंजूर होणार?
मागे एकदा रिअल माद्रीद च्या कोच ला कीडा आला आणि त्याने महत्वाच्या म्याचमधे आमच्या ख्रिस्तीयानो रोनाल्डो ला चांगला तासभर बाहेर बसवून ठेवला. समोरच्या टीमची आक्रमणं रोनाल्डो सीमारेषेच्या बाहेर हात चोळत (व पाय झाडत) नुसताच पहात राहीला होता. डेनेरिसची अवस्था मला तशी वाटली. या प्रभागात घडलेली अजून एक घटना म्हणजे थिऑन ग्रेजॉय यत्किचींतही अपराध वा शरम न बाळगता परतून आला. त्याला यारा ला सोडवण्यासाठी राणीची मदत हवी आहे. मला तर वाटतंय थिऑन ला सर्वप्रथम एखाद्या निष्णात psychotherapist ची नितांत गरज आहे!!

हायगार्डनला लुटीचे पेटारे भरून परत निघण्याच्या तयारीत असलेल्या ल्यानिस्टर आर्मी ला संभाव्य धोक्याची चाहूल लागली. कमाल चित्रीत केलाय हा प्रसंग. दिग्दर्शकाला दहापैकी अकरा मार्क. एक्सप्रेस ट्रेन यायच्या आधी रूळ तडतड आवाज करतात तसे घोड्याचा टापांचे resonate होणारे आवाज, थरथरणारी भूमी आणि मग टीपीकल डोथ्राकी हाकारे देत सरळ चाल करून येणारं सैन्य. Its bloody War.
आणि मग ज्या क्षणासाठी आख्खा इंटरनेट Datapack एकेक एमबी करून वाचवला ते अंगावर बाभळी-कम-निवडुंग फुलवणारं, रोमहर्षक, Dragonमयी आक्रमण.
वीकीपीडीयाच्या सौजन्याने डेनेरिसचे तीन पुत्र पुढीलप्रमाणे :
Drogon - Black with red marking
Rhaegal- Green with bronze marking
Viserion - Creamy white with gold marking

या युद्धासाठी ती ड्रॉगनवर स्वार होऊन आलीये. सैन्याच्या डोक्यावरून झेपावत तो एक जबरदस्त चीत्कार टाकतो आणि मुखातून आगीचा लोळ सोडतो हा निव्वळ रिपीड मोडवर पहाण्याजोगा प्रसंग. याचसाठी केला... होता अट्टाहास!! GOTभक्त बनल्यापासून या दिवसासाठी मन आसुसलेलं होतं... लगे रहो.
हिटलरच्या blitzcreig सारखा सपाट्यानं झालेला हा हल्ला बघून ब्रॉन व जेमीची चांगलीच हातभर फाटली. इकडे येडे डोथ्राकी आणि तिकडे आग ओकणारं जनावर या दोहोंमधे बेक्कार फसले सगळे. Ageon-The Conquerer ने प्राचीन काळी अश्याच Dragons च्या जोरावर आख्खा खंड जिंकून घेतला होता त्याची प्रकर्षाने आठवण आली. Aerial Shooting अद्वितीय दर्जाचं. VFX वर्णनापलीकडचा भारी आणि युद्धभूमीवरचं चित्रीकरण पण एकदम कडक. आग हे पंचमहाभूतांपैकी एक तत्व किती terrifying असू शकतं हे समजतं. Dragonच्या झंझावातात कुणाचा टिकाव लागणं शक्यच नव्हतं. सेरसीने डोकं लाऊन करून घेतलेलं एक मशिन सरतेशेवटी कामी आलं. ब्रॉन ने हिरोगिरी करून ड्रॉगन ला एक बाण घुसवून जखमी केलंच. Shear bad luck and misfortune. एरव्ही अजून दहा एक मिनीटात त्याने सगळ्यांना जाळून खाक करत 'रक्षा'बंधन साजरं केलं असतं. घाव मात्र वर्मी बसलाय. डेनेरिस ने त्याला कसाबसा land केला पण पोरगं घायाळ झालेलं पाहून आपण हळहळलो. चालायचंच.

विनाशकाले विपरीत बुद्धी: Crash Site वर एकाकी असलेल्या खलिसी ला बघून जेमीचं क्षत्रिय रक्त सळसळलं आणि त्याने अविचारी attack केला. फार पूर्वी जेमीने डेनीच्या बाबांचा खेळ केला होता. यावेळी तो पोरीवर उठला. अर्थात Down but not out हे टारगेरीयन परीवाराचं व्यवच्छेदक लक्षण असल्याकारणाने ऐनवेळी Drogan ने तोंड उघडलं आणि थरारक काहीतरी घडलं. ब्रॉन ने उडी मारून जेमीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय खरं पण खरेच ते पूर्णपणे वाचलेत का? जेमीचा विषय टोटल मधे संपतोय की काय?? एका वाईट cliffhanger moment वर एपिसोड संपवून HBO ने आमचा आख्खा आठवडा परत एकदा खराब करून टाकला.

काही अनुत्तरीत प्रश्न :
(१) जे dragons वास्तविक army of deads शी लढताना वापरायचे आहेत ते डेनेरिस इथल्या फालतूच्या चढायांमधे वाया घालवते आहे. जॉन स्नो ने हेच कोकलून सांगितलं पण इथे लक्षात कोण घेतो? उद्या एखादं पिल्लू मेलं तर त्याला जबाबदार कोण??
(२) जेमी ल्यानिस्टर या पात्राविषयी मला कधी कधी खूप सहानुभूती वाटते. विशेषतः मेहनतीने जमा केलेल्या गाड्या जाळपोळीत नष्ट झालेल्या पाहतो तेंव्हा त्याचा चेहरा किती केविलवाणा झालेला दाखवलाय...या माणसाचं भवितव्य काय?
(३) आर्याचा पुढचा plan काय? की ती जॉन परत येण्याची वाट पाहतेय?
(४) जॉन ला काळ-वेळेचं काही बंधन आहे की नाही? नॉर्थ-बिर्थ सगळं विसरून तो आपला निवांत खणत बसलाय...आणि शेवटी तो knee bend करणार की नै??
(५) सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन स्टेशन मधे यायच्या आधी गाडी साईडींग ला थांबून रहावी तसे विंटर आला तरी व्हाईटवॉकर अजूनही वॉलच्या मागे (वेटींगमधेच) आहेत की काय??

⁃ Vikrant Deshmukh

#GOT #GameOfThrones #S07E04 #TheSpoilsOfWar

गेम ऑफ थ्रोन सीजन७ एपिसोड३ : द क्वीन्स जस्टीस

बंदी बनवून आणलेल्या राजा पुरू ला अलेक्झांडरच्या सभेत आणण्यात आलं. सुंभ जळाला तरी पीळ तसाच होता. सिकंदराने विचारलं, "हे राजा, तुला कशी वागणूक दिली जावी?"
यत्किंचीतही वेळ न दवडता पुरू ताठ मानेने उत्तरला, "एक सम्राट दुसर्या सम्राटाला देतो तशी!!"


सीजन ७ भाग ३ मधे Dragonstone च्या काठावर उतरल्या उतरल्या जॉन स्नो आणि टिरीयन मधे संवादाची जी लवंगी माळ फुटली ती पाहून प्राथमिक शाळेच्या लायब्ररीत वाचलेल्या वरील प्रसंगाची आठवण न झाली तरच नवल.. सगळ्या नॉर्थ सरदारांनी दिलेल्या A Targeryan can't be trusted या सल्ल्याला फाट्यावर मारून जॉन डेनेरिस ला भेटायला या बेटावर अवतरला. त्याचं लक्ष एकच - Dragon Glass.
डेनेरिस मात्र याला झुकवून आपला एकछत्री अंमल establish करायला उतावीळ झालेली. मिसांड्रीने लांबलचक मालगाडीसारख्या उपाधींनी डेनेरिसची उद्घोषणा केल्यानंतर सर डेव्हॉस नी "This is Jon Snow and he is king in the North" अशी सुटसुटीत पण खसखस पिकवणारी ओळख करून दिली. मला ते 'धमाल' नामक चित्रपटातील "अय्यो नाम बताते बताते गोवा आ जायेगा.... चिन्नास्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर" या अजरामर डायलॉगसमूहाची आठवण आली.

रेड वुमन ने "My work is done... I have brought Ice and Fire together" असं सांगितल्यावर कट्टर मार्टीन चाहत्यांच्या डोळ्यात पाणी, कंठात आवंढा आणि अंगावर रोमांच उभे राहिले असतील... याचसाठी केला, होता अट्टाहास !!
अर्थात सुरूवातीला दोन्ही पक्षकारांनी जाम लाऊन धरलं.. पण अबलख सल्लागार टिरीयन ने प्रकरण हाताबाहेर जाऊ न देता मिटवलं. तो जॉन ला ऑनेस्ट म्यान म्हणून ओळखतो. डेनेरिस किंवा तत्सम कुणालाही व्हाईट वॉकर शी एका टक्क्याचं देणंघेणं नाही पण जॉन स्नो च्या इशार्यातली तळमळ एका टिरीयन लाच थोडीबहुत कळते आहे असं दिसतंय...

अनेक लोकांनी सोशल मिडीयावर लिहील्याप्रमाणे या एपिसोडचे नाव 'Queen's Justice' न ठेवता 'Queen's Revenge' असायला हवं होतं. युरॉनने पकडून आणलेल्या कन्यांवर जो भीषण अत्याचार तिने सुरू केलाय तो पाहता बाई दिवसेंदिवस दुपारी झोपेतून उठवलेल्या पुणेकरासारखी कडवट होत जाणार हे क्लीअर दिसतंय. युरॉन ला नेव्ही चीफ करून तूर्तास दूर धाडलं पण त्याच्यासारखा अस्तनीतला साप बाळगणं किती धोक्याचं आहे हे सांगायला तिला कोणा प्रशांत किशोर सारख्या strategist ची गरज नाही. एलेरिया रूढार्थाने संपली आणि ओलेना ला जेमी ने बर्यापैकी वेदनारहीत मृत्यू दिला. पण जाता जाता 'Tell Cersai, I want her to know it was me" असा जबरदस्त उलटा प्रहार करून म्हातारीने मजा आणली. टिरीयन च्या मदतीने ग्रे वर्म ने Casterly Rock चा पाडाव केला खरा पण हे म्हणजे बांगलादेश किंवा केनयाच्या टीम ला भारतात पाटा पीचेस वर खेळायला लाऊन शतकं ठोकण्यासारखं आहे. खरी Lannister Army तिकडे हायगार्डन ला जाऊन कार्यभाग साधत असताना इथला विजय (दीनानाथ चौहानांचा नव्हे.... Sorry, bad punch under influence of चला हवा येऊ द्या) किती कुचकामी आहे हे लौकरच कळेल. वरती युरॉन ने त्याची गलबतं जाळून पुरती कोंडी केल्याने ग्रे वर्म ला कुठून इकडे येऊन पडलो असं वाटत असणार..

 जेमी च्या सैन्यात आपला राऊडी ड्यूड ब्रॉन आणि Samwell चे बाबा पण दिसले. म्हातारा बर्यापैकी राजनिष्ठ आणि हेकेखोर वाटतो. पोरगं जितकं नोबेल बाप तितकाच वाकड्या चालीचा दिसतो. असो.
डेनेरिसच्या बाबतीत मागणी-पुरवठ्याचं गणित थोडं बिघडत चाललंय. ते साधारण असं :
वजा ओलेना आणि टायरेल समूह
वजा यारा थिऑन व ग्रेजॉय परीवार
वजा एलारीया आणि Sandsnakes

अर्धवजा अनसलीड्
अधिक जॉन स्नो व उत्तरगण
अधिक जोराह मॉरमोंट

अगदी 'आमुचा रामराम घ्यावा' मोड मधे गेलेल्या जोराह ला स्यामवेल ने बॉलिवूड स्टाईल चमत्काराने बरा केला. जरा तब्बेत वगैरे बनवायची सोडून तो कपडे चढवून थेट ड्यानी च्या ताफ्यात सामील व्हायलाच निघालाय... बाकी या आगाऊ achievement बद्दल सिटाडेलचा प्रोफेसर अस्थाना (पहा, वाचा : मुन्नाभाई MBBS) भयंकर खवळलाय. 'तुम्हे क्या लगा? सरदार खूश होगा? सबासकी देगा?? आक् थू..' अशी यथेच्छ संभावना करून त्याने Samwell ला बर्यापैकी कोलला. जोराह तिकडे पोचून लढाईत काही tangible मदत करणार की नुसतेच emotional conflict उभे करत बसणार हे आता येणारे HBOच ठरवेल.

विंटरफेल ला गेट शी कोणी येऊन धडकलं. ती व्यक्ती आर्या असेल अशी सर्वमान्य अटकळ असताना समोर आला तो थ्री-आईड् रेव्हन बनण्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेला ब्रान! Another Stark back home...चलो, एक से भले दो... पोराला काही दृश्यं दिसताहेत आणि त्याला जॉन स्नो ला काहीतरी सांगायचंय... मला वाटतं की R+L=J थेअरी त्याला कळालेली आहे. When Winter will come, I need to be ready for that असं त्याने व्यक्त केलेलं रेव्हनीय मनोगत शहारा उमटवून जातं. बागेतलं तेच नाक-डोळे काढलेलं झाड पकडणार बहुतेक तो... लिटलफिंगरचा बिब्बेघालणी कार्यक्रम डाव्या विचारवंतांच्या नेटाने चालू आहे. सान्साला फुकाचे सल्ले देणे हा त्याचा वैयक्तिक छंद. पण आख्खं गेम ऑफ थ्रोन त्याच्या या कलागतींनी(च) सुरू झालंय हे पुस्तकाचे जुनेजाणते वाचक अद्याप विसरले नसतील...

आता पुढे काय? टारगेरीयन रक्त अंगात खेळवणारा जॉन स्नो ड्र्यागन वर कधी स्वार होईल काय? सेरसी चा अश्वमेध कोण अडवणार? थिऑन ग्रेजॉय हा टॉन्सिल किंवा एपेंडीक्सप्रमाणे अत्यंत निरूपयोगी भासणारा प्राणी आपण कथाभागात का पाळून आहोत? जेमीचं केमिकल व सायकॉलॉजिकल कंपोझिशन नेमकं आहे तरी काय? युरॉन दैत्याचंदहन केंव्हा व कोणाहस्ते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्या स्टार्क सारखा इस्पिक एक्का बाजूला ठेवून इतर तिर्या, चौव्या उतारी करण्याचं कारणंच काय ???

#GameOfThrones #GOT #S07E03 #QueensJustice


गेम ऑफ थ्रोन सीजन७ एपिसोड२ : स्टॉर्मबॉर्न

आमच्या इंग्रजी मधे एक म्हण आहे "Power corrupts... and absolute power corrupts absolutely". बिचार्या Vareys ला तोंड सोडून फाडफाड बोलणारी डेनेरीस बघून हीच्या डोक्यात पुरेपुर हवा गेलेली आहे हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नाही. चार बायका मिळून (पक्षी : यारा, डेनेरिस, एलेरा, ओलेना) पाचव्या बाईच्या (पक्षी: सेरसी) साम्राज्याचा विनाश करण्याच्या कल्पना लढवत असतात हा नवपुरोगामी विचारांचा विजय आहे !!! त्यातही ओलेना ने You are dragon so be a dragon म्हणत डेनेरिस चा फुल्ल भरलेला फुगा अजून चेकाळेल याची पुरेपुर व्यवस्था केलेली आहे.
Agon The Conquerer असो की नंतर आलेला महाविध्वंसक Mad King, वेस्टोरेस रयतेच्या मनात Targeryan नावाविषयी घृणा आहे. टिरीयन ने हाच मुद्दा उचलून धरत डोळ्यावर येणार्या लढाया टाळत, मोठ्या हुशारीने डोथ्राकी व Unsullied ना Lannisport ला पाठवण्याची क्लृप्ती योजली आहे. सल्लागार असावा तर असा... उगाच नाही जॉन स्नो त्याला He is a Good Man म्हणाला. तरीही चान्स घेऊन "आम्ही तरी सैन्य घेऊन आलोत, तू काय आणलंय घंटा?" असं एलेरा ने टिरीयन ला सुनावलंच.. समाजवादी (सत्तेमधे + माजवादी) झालेली डेनेरिस "बोलवा त्या जॉन स्नो ला Dragonstone वर" असं फर्मान काढते तेंव्हाच तिला near future मधे मोठे फटके बसणार हे चाणाक्ष अश्या मी ताडलं !!

राजधानीमधे सेरसीचा राजकारणी मेंदू फुल्ल हॉर्सपॉवर मधे काम करत आहे. साऊथमधल्या सगळ्या सरंजामदारांना एकत्र करून तिने त्यांच्या मातृभूमी प्रेमाला साद घातली आहे. त्यांच्या डोक्यातली उरलेली किल्मिषं घालवण्याचं काम जेमी करतो आहे. सिटाडेल मधे Samwell काही कारण नसताना मुन्नाभाई MBBS बनून जोराहची कातडी कुरतडायच्या मागे लागला आहे. (IT Joke alert : हे म्हणजे नुकताच मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिकलेल्या माणसाला Unix System Administrator बनवण्यासारखं आहे.)
त्याने पाठवलेला रेव्हन व डेनेरिसचं समन्स जवळपास एकाच वेळी विंटरफेल ला पोचलं व (IT Joke Alert) जॉन स्नो ने एखाद्या कसलेल्या प्रोजेक्ट म्यानेजर सारखी झडून सगळ्यांची मीटींग बोलावली. यात धर्मराज स्नो देवांचं स्वगत आणि काही फुटकळ सरदारांची मनोगतं सादर करण्यात आली. (IT Joke Alert) कस्टमर कमिटमेंट आणि ऑफशोअर रिसोर्सेचा गाढवीपणा या दुहेरी कचाट्यात सापडलेला IT Project Manager जसा चर्चेसाठी नव्हे तर केवळ डिसीजन convey करण्यासाठी मीटींग घेतो तसं आपण डेनेरिस ला भेटून मैत्री करणार आहेत असा मानस जॉन स्नो ने भर सभेत बोलून दाखवला. सत्तेत असलेल्या भाजपाच्या प्रत्येक निर्णयाला विरोध(च) करायचा असं ठरवलेल्या (आणि सत्तेत असलेल्या) शिवसेनेप्रमाणे सान्साने लगेच दोन पाँईट रेज केले. पण उपद्रवी मुलाला वर्गाचा मॉनिटर करावा तसं Till I come back, North will be in your hands असं म्हणत स्नो ने आपण कच्च्या गुरूचे चेले नाहीत हे सप्रमाण सिद्ध केलं. ते ऐकून लिटलफिंगरचं कारस्थानी रक्त 'किती सांगू मी सांगू कुणाला... आज आनंदीआनंद झाला' म्हणत नाचू लागलं. त्याच भावनेच्या भरात तो जॉनला नडायला गेला व मार खाता खाता वाचला.
Lesson Learnt : प्रवासाला निघालेल्या माणसाची आई-बहीण काढू नये !! (Hint - Lynna Stark, Sansa Stark पहा,वाचा : जॉन स्नो ची वंशावळ)

आर्याचं गणितंच मला कळेनासं झालंय. ती Kings Landing कडे का चालली आहे? मागच्या आठवड्यात एड शिरीन, या आठवड्यात हॉट पाय/नेमेरीया... कुणीही भेटत आहेत तिला.. आता एक हाऊंड आणि गँड्री तेवढे राहीले. आर्याने विंटरफेल ला जाऊन स्टार्कांची position consolidate करावी या मताचा मी आहे. पण आले मार्टीनच्या मना, तेथे कोणाचे चालेना ...
बाकी facial expressions च्या बाबतीत मेसी विल्यम्स सगळ्यांची मुकुटमणी आहे. जाणार्या डायरवूल्फ ला पाहून डोळे किंचीत पाणावत ती जेंव्हा "It's not you" म्हणते तेंव्हा एखाद्या सरकारी बाबूच्या किंवा HR Managerच्या अंतःकरणालाही पाझर फुटावा !!
'वळचणीचं पाणी शेवटी वळचणीलाचं जातं' अशी पण एक म्हण आहे. (या वाक्याने तरी लेखकाचं भाषेवरील प्रभुत्व लक्षात यावं एवढीच माफक अपेक्षा आहे!) तद्वत युरॉन ने क्रोर्य, कावेबाजपणा व द्वेष यांचा Triple Sundae पेश करत सनस्पीअर ला जाणार्या ताफ्यावर हल्ला केला. त्याची ताकद establish करण महत्वाचं असल्याने 'कौसल्या चायनीज सेंटर' चालवणारा शेफ ज्या स्पीडने कोबी व पातीचा कांदा कापतो त्या सफाईने युरॉन ने यारा, एलेना व कंपूची कत्तल केली. त्यातही थिऑन च्या सबकॉन्शस मनाने ऐनवेळी दंगा घालणार्या सेलिब्रीटी प्रमुख पाहुण्याप्रमाणे नको तेंव्हा चोथा केला. He was never the same person again हे वाक्य क्रॉसवर्डमधे आपण फुकटात उभ्या उभ्या वाचून घेतलेल्या बर्याच पुस्तकात असतं. तसा रिक चा थिऑन कधी झालाच नाही. Very Sad. हे पाहून दुपारी १२ ते ४ दुकान बंद ठेवणारा व सुईच्या नेढ्यातून दोराही ओवू न शकणारा आमचा एक मित्र त्वेषाने म्हणाला, "तू लढूच नको... तू फक्त कुत्रीच सांभाळ" (संदर्भ : https://www.popsugar.com/…/Alfie-Allen-Brings-Dog-Comic…/amp. ). असो. टीम डेनेरिस डाऊन बाय मेनी. अर्थातच, डाऊन बट नॉट आऊट !!

⁃ विक्रांत देशमुख

तळटीपा :
(१) मिसांड्री व ग्रेवर्म मधला "प्रसंग" हा कथेच्या दृष्टीने Queue शब्दामधील ueue अक्षरसमूहांप्रमाणे useless असल्याने त्यावर काहीही बोलणे व्यर्थ आहे.
(२) कौसल्या चायनीज सेंटर हे दुकान पुण्यात म्हात्रे पुलाजवळ आहे/होते. दुकानावरील लाल ड्र्यागन हा ड्र्यागन कमी व बोकड जास्ती वाटायचा!!
(३) भागाचे शीर्षक हे नव-व्हीलन मान्यवर युरॉन ग्रेजॉय यांना उद्देशून आहे किंवा कसे??

#GameOfThrones #GOT #S07E02 #Stormborn

गेम ऑफ थ्रोन सीजन७ एपिसोड१ : ड्रॅगनस्टोन

फाल्गुनी पाठक नवरात्रीची, नगरसेवक मनपाच्या अंदाजपत्रकाची, तरण आदर्श 'खानाव'ळीच्या नव्या सिनेमाची व सरकारी कर्मचारी ५ वाजण्याची ज्या आतुरतेने वाट पहात असतात त्याचा कित्येक पट अधिक उत्कंठा आपल्या सगळ्यांना देऊन राहिलेला गेमऑफ थ्रोनचा सातवा सीजन अखेर सुरू झाला. HBO ची खरखर असलेली स्क्रीन जाताच वॉल्डर फ्रे च्या अंधार्या महालातील छोटेखानी गेटटुगेदर चे दर्शन झाले आणि आपल्या आसनावरची पकड घट्ट करून बसलो आपण... एखाद्या दिवशी वारं पिऊन आलेला ख्रिस गेल किंवा कोरी अँडरसन कसा पहिल्या चेंडूपासून पिसाटल्यासारखा मारत सुटतो तसं आरंभिक प्रसंगातच आर्या स्टार्क ने एपिसोड खाऊन टाकला.
"Leave the one wolf alive and the sheep are never safe" .... कडकडीत षडज् लागलेला. आणि कत्तलीनंतर आलेलं धडाकेदार "the North remembers" हे महावाक्य... इथे अंगावर काट्याचं जंगल उभं राहिलं नसेल तर तुम्ही आपलं GOT सोडून देऊन सोनी वर डब हिंदी व्हर्जनचा "रूद्रम्मादेवी"(च) बघत बसलेलं उत्तम !!
विंटरफेल मधे जॉन स्नो आणि सान्सा मध्ये strategic मतभेद होतात. पण ते भर मिटींग मधे करणं हा दोघांचाही बालिशपणा आहे. हे पाहताना लिटलफिंगरला मोदीविरोधी फुटकळ बातमी मिळालेल्या बरखा दत्तसारखा आसुरी आनंद झालेला दिसला. अर्थात 'I know exactly what he wants' असं म्हणत सान्साने आपल्या सजगपणाची तूर्तास तरी ग्वाही दिलेली आहे.
नविन जॉब मधला पहिलाच दिवस जॉन साठी तण्णातण्णीचा गेला. Kastrark and Amber कुटुंबांची लफडी, dragonglass चा शोध घेण्याची मोठी मोहीम आणि 6 to 60 वयोगटातील आबालवृद्धांना मिलीटरी प्रशिक्षण देऊन White Walkers च्या against लढायला तयार करणं असे अनेक दूरगामी निर्णय (ज्याला आम्ही आमच्या management च्या भाषेत High Impact Decisions म्हणतो) जॉनला घ्यावे लागले. सिटाडेलमधे सामवेल ला Dragonstone च्या पायथ्याशी भरपूर DragonGlass material आहे हा शोध लागला आणि त्याने रेवन द्वारे मेसेज सेंड पण केला. मला कधीकधी सान्सा चा approach खूप practical वाटतो तर जॉन स्नो अजूनही धर्मराज युधिष्ठीर mode मधेच आहे. असो.

Kings Landing ला सेरसी 'असंगाशी संग' करायला निघाली आहे. ही ग्रेजॉय जमात अत्यंत बेभरवशाची व नवसागर दारूप्रमाणे जहरी आहे हे न कळण्याइतकी राणी खुळी नाही. शिवाय जेमी insecure तिला आत्ता परवडणारं नाही. पण utility पहा. युरॉन कडे Dragon Taming horn आहे. तो वापरून तिन्हीपैकी एक Dragon तरी तो पकडून आणून सेरसीला तोहफा देणार, हा आपला माझा अंदाज!
हाऊंड चं कथानक मला नेहमीच शर्टाला असलेल्या extra गुंड्यांसारखं वाटतं. याचा काहीतरी उपयोग आहे पण नेमका कसला हेच कळत नाही. त्यालाही आगीच्या ज्वाळांमध्ये White Walkers वॉलपाशी आलेले दिसले हे महत्वाचं. मित्रहो, आता वॉलपाशी खूप महत्वाच्या गोष्टी घडणार आहेत. Bran Stark तिकडे पोचून हर्षा भोगले बनणार असं दिसतंय. Hodor ची कमी त्याला पदोपदी भासणार आहे. "You will never be able to walk but you will fly" असं सुस्पष्ट वचन 3-eyed Raven ने त्याला दिलं होतं. मी त्या परीवर्तनाची वाट पाहतोय. एक गोष्ट मात्र नक्की की वॉलवर पहिली आहुती Wilding ची पडणार.

आणि मग डेनेरिसचा ताफा Dragon Stone च्या abandoned castle वर येऊन धडकल्याचा रोमांचक प्रसंग. डेनेरिसचं स्वभूमीवर परत येणं हा खूप मोठा विषय आहे. एकेकाळी Targaryen कुटुंबाचा बालेकिल्ला असलेली ही जागा Stannith Baratheon नंतर ओकीबोकी होऊन गेली. सर डेव्हॉस, मेलेसांड्री सगळे सगळे ही जागा सोडून कुठेकुठे स्थलांतरीत झालेत. आता उरलेत फक्त भग्न पण तरीही टोलेजंग अवशेष. मी मध्यंतरी काही कामानिमित्त मुंबई ला लोअर परळ भागात एका बंद पडलेल्या मोठ्या कापड गिरणीत गेलो होतो. तिथल्या भयाण शांततेच्या पोटातही एक दैदीप्यमान गजबज लपलेली होती. ती अजस्त्र यंत्रं, धूळ खात पडलेले जिने, डॉकींग स्टेशन्स सारं काही स्तब्ध होतं. पण या एकूण एक गोष्टी तिथं घडून गेलेल्या प्रचंड activitiesच्या जीवंत साक्षीदार होत्या. डेनेरिस निर्मनुष्य DragonStone च्या किल्ल्यात प्रवेश करती झाली आणि कुणी काहीच न बोलता त्या भव्य पण ऐतिहासीक प्रासादामध्ये फिरत होते तेंव्हा I could totally co-relate what that experience could have been !!
आणि मग जे ऐकण्यासाठी डी-मार्ट मधील ईअर स्टड आणून आणून आपण कान साफ करून ठेवलेत ते महत्वाचं वाक्य डेनेरिस च्या तोंडातून "Shall We Begin??"
Of course. मग आम्ही काय येडे म्हणून बसलो आहोत का?

⁃ विक्रांत देशमुख

#GOT #Season7Episode1

Tuesday, February 4, 2014

ये साब से पुछो.. :Dस्थळ : हिरा-पन्ना’, ’चौधरी सुपर मार्केटकिंवा अश्याच तत्सम नावाचे मारवाडी/राजस्थानी किराणा दुकान
वेळ : होणार सून मी त्या घरचीसंपून एका लग्नाची तिसरी गोष्टसुरू व्ह्यायच्या मधला अवकाश
पात्रे :
(१) बहुधा नुकत्याच लागलेल्या अमाप भिशीमधून दुकानात फुल्ल माल भरलेला (आणि ८२ रूपयाच्या बिलाला Pay करण्यासाठी आपण शंभरची नोट दिली की इतक्या शुल्लक हिशोबासाठीही कॅलक्युलेटर वापरणारा) दुकानाचा मालक
(२) गडी ’अ’ - सेम रंगाचा शर्ट आणि सेम रंगाची पॅंट घातलेला, भरपूर तेल चोपलेला आणि सराईतपणे पिशव्या भरणारा
(३) गडी ’ब’ - कायम काहीतरी वस्तू आत गोदामात जाऊन आणणारा (हा काऊंटरला कमी व ट्रान्झिंट मध्येच जास्ती असतो)
(४) गडी ’क’ - एक पाय दुमडून, वर करून गव्हाच्या पोत्यावर ठेवून, करगंळीने कान खाजवत उभा असलेला (हे पात्र जवळपास प्रत्येक किराणा दुकानात mandatorily आढळून येते... )
(५) पैसे देण्याघेण्याच्या व्यवहारात काहीतरी गफलत झाल्याने हुज्जत घालायला आलेली मराठमोळी बाई
(६) वरील पात्राला दुकानात पाठवून लांबून गंमत बघत बसलेला तिचा नवरा
(७) भडंग किंवा जॉटर रिफील किंवा फुलवाती वगैरे किमान विक्रीमूल्याची वस्तू घ्यायला गेलेला मी

मालक: ए छोटु... इधर आ (ज्याच्याकडे बघून याचीच छोटी मुले गावाकडे असावीत हा संशय दाटून यावा असा गडी काऊंटरपाशी येतो) जरा देख सहाबको क्या चाहिए..
मी : भैय्या, जॉटर रिफील है?
(गडी ’, गडी कडे हेत्वार्थकपणे पहातो.. गडी त्याच्या दिवसभरातल्या ३७८९ क्रमांकाच्या दुकान-टू-गोदाम या फेरीला प्रारंभ करतो... मी टाईमपास म्हणून इकडेतिकडे पहायला लागतो.. तेवढ्यात एक बाई तणतणत पायर्‍या चढून वर येते... मालक उगाच सावरून उभा राहतो आणि चेहर्‍यावर तुपकट स्माईल आणतो...)

बाई :  अरे वो भैय्या... (तिला वोच्या ऐवजी म्हणायचे होते हे मी क्षणार्धात ताडतो) आपने क्या बोला घरको? (हिंदीची लक्तरे करत बाई उद्गारत्या होतात.. मालकाच्या चेहर्‍यावरून आख्खा तुपाचा डबा ओघळायला लागतो)
मालक : क्या हुआ भाभी? (मालकांचा आवाज भीहे अक्षर म्हणताना हळुवार होतो)
बाई : (लोचटपणा ला साफ इग्नोअर करत) वो पाचसो कैसे क्या हुआ? इतना महाग वस्तू हम क्या भरते है क्या?
मालक : अरे भाभी, वो आप दो बार लेके गई थी ना सामान..
बाई : इतनासा फुटकळ वस्तू लिया तो इतना मोठा बिल? (हिंदीवर भीषण वार करत बाई फुत्कारतात)
मालक : अब कितनी महंगाई हो गयी है भाभी... दाम तो बढेगे ना?
बाई : कौनसा महंगाई भैय्या? तुमने वारेमाप भाव लगाया और वर ’इन’को क्या क्या बताया ? (बाई अनेक हिंदी साहित्यीकांच्या आत्म्याला वारेमाप तळमळायला लावतात... बाहेर लांब उभे असलेले बाईंचे इननजर चुकवत दादा’, ’नानाअसे लिहीलेल्या वैविध्यपूर्ण नंबरप्लेटच्या गाड्या पाहण्यात गुंग झालेले भासवतात.... गडी गोदामातून जॉटर रिफील घेऊन आलेला असतो.. (उपकंस बिगिन्स : हे वाण्याचे गोदाम म्हणजे एक अफलातून गूढ प्रकार आहे. त्या कुठल्या तरी हॉलिवूड चित्रपटात नायकाच्या घरात एक अज्ञात खड्डा असतो.. तो इतका खोल आणि अनाकलनीय असतो की बास्स... नंतर कळते की ते एक प्राचीन अथांग विवर आहे जे आपल्याला थेट पृथ्वीच्या अंतरंगात घेऊन जाते.. मला किराणा दुकानाच्या मागे असलेली गोदामे त्याच कॅटेगरीतील गूढगम्य जागा वाटतात...उपकंस एंड) बाई मागे हटायला तयार नसतात.. मालक जुजबी स्पष्टीकरणे देत काही कारण नसताना कडेला उभ्या असलेल्या मला संभाषणात ओढतो)
मालक : अभी ये साहाब को पुछो... मार्केटमे दाम कितने बढे है..
(बाई माझ्याकडे वळतात.. मी कुठल्याही ऍंगलने साहेबदिसतो का याची चाचपणी करतात आणि मोर्चा परत मालका कडे वळवतात)

बाई : उनको क्या पुछना? हम कितने दिन से आपका खरीदते है.. इतना महाग महाग भाव पैले (पहिले चा हिंदी उच्चार) नई (नहीचा हिंदी उच्चार) लगाते थे... (नईशब्दाबरोबर अशक्य मान हलवतात)
मालक : छोटु.. इनके खाते की बही लाओ (मालक फर्मान सोडतात.. गडी आज्ञाधारकपणे वही काढायला धावतो.. छोटुहे याचे विशेषण आहे की खरोखरचं पाळण्यातलं नाव आहे या विषयावर माझ्या डाव्या मेंदूतील काही पेशी लुटुपुटीची लढाई खेळतात.. ती लढाई अजूनही करंगळीने कान खाजवण्यात मग्न असलेल्या गडी चे दर्शन होताच थांबते.. हा कान खाजवतोय की करंगळीला धार करतोय?’ असा अत्यंत हिणकस दर्जाचा (पण आपले कॉलेज रियुनियन, संध्याकाळच्या ओल्या पार्ट्या, मुंबई लोकलमधील घामट प्रवास, दवाखान्याच्या वेटींग रूम इत्यादी ठिकाणी हमखास हशा आणि दाद मिळवून देणारा) विनोद माझ्या मनात तरळून जातो.. मी तो शिताफीने बाजूला करतो)

बाई : फिर इनको क्या बताया ?
मालक : अरे भाभी, जो हो गया बिल वही बताया ना.. हम थोडी ना झूट बोलेंगे.. जो एम.आर.पी. मे लिखा है वोही लगायेंगे ना.. क्यूं साब? (हा पुन्हा एकदा मला संभाषणात ओढतो.. मी हातात विसावलेली जॉटर रिफील काऊंटरवर ठेवत होकारार्थी माल हलवतो)
बाई : ऐसा उगाच कुछभी भाव मत लगाओ.. नही तो बोलती हूं मै भैय्या हम वो वडगावके किराणा दुकानसे माल भरेंगे (बाई परत हिंदी च्या काळजात वार करत गरजतात... गडी करंगळी आणि कान बदलतो.. वर पोत्यावर ठेवलेला पाय मात्र तोच असतो!)
मालक : आप किधरभी जाओ.. इतनाही भाव होगा (मालक गडी उर्फ छोटुने आणलेली वही उघडतो.. Da Vinci Code प्रमाणे काढलेल्या चित्रविचित्र आकृत्यांच्या जंजाळावर बोट ठेवून विजयी मुद्रेने बाईंकडे पाहतो.. लांबवर उभे असलेले बाईंचे इनअस्वस्थ होतात) ये देखो .. ये देखो... (गडी ’, ’आणि मी श्वास रोखून पहात राहतात.. गडी च्या करंगळीचा रोटेशन स्पीड वाढलेला असतो..) मैने बोला था ना..
बाई : (वहीत डोकावतात.. उगाचच मागची पुढची पाने चाळतात) ये हिंग का डब्बा कायकू लिया था? (बाईंना डब्बाच्या ऐवजी डबीम्हणायचे असते हे एव्हाना चाणाक्ष अश्या मी ताडलेले असते.. बाई नैराश्य लपवत उगाच शब्दांची जुळवाजुळव करतात) इत्तासा तो सामान और इत्ते पैसे?
मालक : (Aggressive होत खस्सकन वही ओढतो) देखो भाभी, अब आपके सामने ही है.. चाहिए तो ये साब को दिखाओ (मी घेतलेली जॉटर रिफील बाजूला सरकावत मालक ती वही मला आणि बाईला दिसेल अशी अलाईन करतो.. काळी पडलेली तांब्याची अंगठी परिधान केलेले बोट परत त्या अवाचनीय अक्षरांवर फिरवत मला यादी सांगू लागतो) ये देखो सर्फ का एक किलो, ये बाजरी, ये सनफ्लॉवर ऑइल, ये अमुक अमुक, ये ढमुक ढमुक.. (एखाद्या मुद्द्यावर वक्त्याला कोंडीत सापडलेले बघून अर्णब गोस्वामी जसा टेबलावर हात मारतो तस्साच हात मालक वही बंद करून कव्हरवर मारतात.. बाईंचा भयंकर नाईलाज झालेला दिसून येतो.. गडी काही काम नसतानाही उगाचच गोदामाची एक फेरी मारून येतो..)

मी : सेठ, ये रिफील का कितना हुआ?
मालक : (अजूनही त्याच तंद्रीत) भाभी हम इतने सालसे यहां धंदा करते है.. आपसे ज्यादा पैसे क्यू लेंगे.. ये साब से पुछो.. (एखाद्या गाण्यात कोणतेही कडवे झाले तरी गायक परत परत ध्रुपद आलवत रहातो तसे ये साब से पुछोचा पट्टा मालकांनी सढळ हाताने सोडला होता.. बाईंची चीडचीड होत असते आणि त्या पायी हिंदी व्याकरणाचे निर्घृण कोथळे बाहेर पडत असतात..)
बाई : हमने कुठे बोला तुम फसवते हो? जरा वाजवी लगावा करो ना..
मालक : जो मार्केटमे होता है वही हम लगाते है.. कंपनीका माल है ना.. हमारा थोडी है .. ये.सा.स.पु. ॥ध्रु॥
(गडी एव्हाना करगंळी बाहेर काढून तिला न्याहाळण्यात मग्न असतो - करगंळीला, बाईला नव्हे !)
बाई : मध्यम लोकोने किधर जाने का? (frustrationपायी मध्यम च्या पुढे वर्गीयम्हणायचे बाईंचे राहून गेलेले असते) अब पुढच्या वेळी खरीदनेके टाईम हमको लिश्ट चाहिये पहिले और बिल भी (मी, मालक आणि सर्व गडी यांपैकी कुणालाच हा पॉईंट कळालेला नसतो).. मै इनको बोलके रखती की ये दुकानमे हिशोब चेक करो.. (लांबवर उभे असलेले इनदुसरीकडे पहायला लागतात)
मालक : बिल्कुल बिल्कुल.. हमे क्या मिलेगा पैसे ज्यादा लेके? (त्याच्या वाक्यातला टेक्निकल फॉल्ट माझ्या त्वरीत लक्षात येतो पण बाई धुमसत असल्याने मी तो बोलत नाही) आप आओ या कोई और कस्टमर आये यही रेट लगाते है हम.. सुबह आओ, श्याम को आओ, एक तारीख को आओ.. कभीभी आओ.. वही रेट मिलेगा.. ये.सा.स.पु. ॥ध्रु॥ (मालक वहावत जाऊन statistically impossible अश्या probability सांगत असतो !)

मी : सेठ.. वो रिफील का कितना हुआ.. मुझे जाना है.. कितने देरसे ये आपका चल रहा है.. (मी आवाज किंचीत चढवून म्हणतो.. करंगळीवाला दचकून माझ्याकडे पाहतो.. गडी प्रतिक्षीप्त क्रियेने गोदामाकडे वळतो.. मालकाच्या चेहर्‍यावर केजरीवालकडून दिल्लीकरांचा अपेक्षाभंग झाल्यासारखे भाव उमटून जातात.. गडी उगाच रिफील उचलून मालकाला दाखवून परत खाली ठेवतो.. ’बिलिंगच्या आधी शिपमेंट कन्फर्मेश’ हा बहुधा त्याच्या जॉब डिस्क्रीपशनचा भाग असावा... बाई शरमल्यासारखे दाखवत पोबारा करण्याचा प्रयत्न करतात.. मालक ते ओळखून डाव टाकतो ..)
मालक : भाभी, एक मिनिट रूको.. मै ये साब के पैसे लेता हू..
बाई : (डिहायड्रेशन पेशंटच्या क्षीण आवाजात) रेहनो दो भैय्या.. मै इनको बोल्ती हूं.. अगली बार बराबर करना (गरकन वळून लांब उभ्या असलेल्या इनजवळ जाते.. दोघेही दुकानाकडे प्रत्येक ओव्हरच्या पाचव्या आणि सहाव्या बॉलला बाऊंडरी बहाल करणार्‍या अजित आगरकर सारखे खांदे पाडून पहातात आणि निमूटपणे चालायला लागतात.. मालकाला हर्षोन्माद झालेला असतो.. अर्धवट छोटुला आणि अर्धवट मला address करत तो बोलू लागतो..)
मालक :  देखा.. कैसे कैसे लोग होते है.. अभी ये वही मे लिखा है.. सब किमत बराबर लगाई थी फिर भी आ गई झगडा करने.. (मालकाच्या चेहर्‍यावरचे मगाशी आलेले तुपकट भाव जाऊन आता ६० वॅटच्या बल्बचे तेज लखलखायला लागलेले असते...माझे पैसे घेऊन सुट्टे परत देतानाही त्याची बडबड चालू असते) इनको उधार देनाही नही चाहिये .. सब सामान लेके जाते है और उपरसे ये हेडेक.. (’हेडेक’ शब्दाला तो डोक्याच्या ऐवजी मानेला का हात लावतो हे मला कळत नाही..)
(मी प्रचंड उशीरा मिळालेली वस्तू, तिची किंमत आणि वाया गेलेला वेळ यांचे त्रैराशिक मांडत दुकानाच्या पायर्‍या उतरू लागतो.. गडी कानात करंगळी घालण्याच्या तयारीला लागतो ... मालक मनोमन खुश होत टूथपिक घेऊन दात कोरायला सुरूवात करता.. गडी Statue Of Liberty सारखा केप्रचे मसाले ठेवलेल्या कपाटाला टेकून स्तब्ध उभा राहतो !!)