Tuesday, May 1, 2018

सेकंड हँड जगणे

गडद अंधारून आलं. सोसाट्याचा वारा सुटला होता. अवकाळी पावसाने आपल्या आगमनाची वर्दी अशी मोठा गाजावाजा करत दिली होती. ऑफिस मधील सगळी मंडळी पार्कींग मध्ये पळाली. पुण्यामध्ये एप्रिल महिन्यात असं अवर्णनीय वातावरण असताना काचेच्या खुराड्यात काम कोण करत बसेल बरं?

मीही बाहेर पडलो. नवव्या मजल्याच्या गच्चीमध्ये लोकांची गर्दी उसळली होती. मृदगंधाचा दरवळ मनाला मोहित करत होता. टप्पोरे थेंब पडायला सुरुवात झाली. आभाळाची माया त्या जलधारा बनून धरतीला भेटायला आवेगाने येत होती. आसमंत रमणीय बनून गेला होता.
मी एक उंचवट्या पाशी येऊन थबकलो. तिथून मला पावसात सचैल न्हाणारं पुणं आणि ते दृश्य अनुभवायला आलेली कर्मचारी मंडळी एकाच वेळी दिसत होती.
पण हे काय? जवळपास प्रत्येक जण मोबाईल काढून उभा होता. कोणी फोटो काढत होते, कोणी video तर कोणी थेट Facebook लाईव्ह करत होते. कसल्या तरी संयंत्रा मध्ये ते क्षण टिपण्याची केविलवाणी धडपड चालू होती. कोणी Whatsapp वर बोलत होते तर कोणी पावसाबरोबर सेल्फी असला आचरट प्रकार करत होते.
समोर निसर्गाचा एक अत्यन्त रमणीय आणि प्रेमास्पद आविष्कार चालू असताना लोकांना मात्र मूळ दृश्यापेक्षा अप्रत्यक्ष अनुभूतीमध्ये जास्ती स्वारस्य होते. मी या प्रकाराला एक नाव दिलंय - 'सेकंड हँड जगणं'...

का वागतो असे आपण? का वर्तमानात राहू शकत नाही आपलं व्यवहारी मन?
उगवतीचा भास्कर कसा लालचुटुक गोळा बनून संथ पावलांनी पूर्वेला उगवत असतो. आपण त्या रंगछटा पाहण्याऐवजी मोबाईल वर क्लिक करण्यात धन्यता मानतो. आठवण म्हणून, प्रियजनांबरोबर शेअर करण्यासाठी म्हणून एक दोन फोटो ठीक आहेत. पण सतत मोबाईल कडे हात आणि काही दिसले रे दिसले की छबी घेण्याची असह्य ओढ. हा त्या सौन्दर्याचा कसलासा घोर अपमान वाटतो मला....
विमला ठकार म्हणतात , "जीवनाची समग्रता, ऐश्वर्य पूर्ण एकवटून वर्तमानाच्या त्या तुकड्यात तुमच्या समोर आलंय... त्याला विन्मुख होऊ नका". आपण वाचून ढिम्म च राहतो.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं "हो कां तरंगु लहानु । परी सिंधूसी नाहीं भिन्नु ।" या प्रमेयानुसार हा आत्ताचा इवलुसा क्षण जीवनाचं सारसर्वस्व तुमच्या ओंजळीत द्यायला आलाय... आणि आपण असे कर्मदरिद्री की भलत्याच प्रकारात गुंतून गेलेलो. वर्तमानात समरसता आणि समोरच्या देखाव्याशी तादात्म्य हेच खरे रसिकत्वाचे लक्षण वाटते मला....
सध्याच्या गतिमान युगात आणि सतत 7 x 24 ऑनलाईन राहण्याच्या अट्टाहासात आपण जगण्याची खुमारी विसरत चाललोय की काय?
आमरसाचा लोभस घोट जिभेपासून जठरापर्यंत कसा माधुर्याची उधळण करत जातो हे अनुभवायचं की #First Mango of season म्हणत त्याचे धडाधड फोटो काढत पोस्ट करत राहायचे?
आपल्या बाळाचा गालाला होणारा मलईदार स्पर्श ह्रदयात साठवायचा की या बाळाच्या लीला इंटरनेट वरच्या रिकामटेकड्या मंडळी ना सतत सांगत रहायच्या?
ट्रिप ला गेलेले असताना समोरची गर्द वनराई आणि नितळ निळा जलाशय बघून हरखून जायचं की तिथली वर्णने Whatsapp वर लगबगीने देत रहायची?

गौतम बुद्धांनी सांगितलं की भूतकाळ हा फक्त तुमच्या स्मृतीमध्येच आहे आणि भविष्यकाळ अजून आलेलाच नसल्याने त्याला तसे अस्तित्व नाही. खरं सत्य, खरं घनीभूत काही असेल तर तो हा चालू क्षण. यातील खोल अध्यात्म जाऊ द्या पण चिरंतन अश्या वर्तमान काळा ला न्याय देतोय ना आपण? पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रियानी जगण्याचं हे आयुष्य मोबाईल, सोशल मीडिया आणि कॅमेराच्या कलकलाटामध्ये 'सेकंड हँड' करून तर नाही ना टाकलंय आपण?