Monday, September 18, 2017

गेम ऑफ थ्रोन सीजन ७ एपिसोड ६ : बियॉंड द वॉल

किती सांगू मी सांगू कुणाला.... आजि आनंदी आनंद झाला,
आजि आनंदी आनंद झाला...

जाॅन ने डेनेरिसला 'डॅनी' म्हणून हाक मारली. आणि Be My Queen अशी प्रपोजवजा आॅफर दिली. सात सीजन झाले,पण तुम्हाला सांगतो, अश्या क्षणांइतकी उत्कंठा कशाचीच वाटली नव्हती. मृत्यूशी सापशिडी खेळून आल्यावर जाॅनचा काॅनफीडन्स (आमचा 'हक से सिंगल' झाकीर खान म्हणतो तसा) 'आसमान फाडके' गेलाय. डुचमळणाऱ्या बोटीत, ग्लानीतून भानावर आल्या आल्या त्याने थेट मुद्द्याला (व डॅनी ला) हात घातला. डॅनी वितळली; कातर आवाजात म्हणाली -"तूच रे ! तूच रे तो !!"

आर्याचं टाळकं फिरल्याने ती सान्साच्या प्रत्येक कृतीवर व विचारांवर प्रश्नचिन्ह उभे करते आहे. दोघींमधली दरी डीपी रोडप्रमाणे रूंदावते आहे. कोण समजावणार यांना? विशेषतः जाॅनच्या अनुपस्थितीत ही sibling rivalry टोकाला जावी असा लिटलफिंगर चा फुल्ल-स्केल प्रयत्न चालू दिसतोय. आर्याने साठवलेली चेहऱ्यांची inventory पाहून तर सान्साची दातखीळ बसलेली दिसली. सगळं माहिती असलेला ब्रान पोरींना सामोरं बसवून घडाघडा बोलून का टाकत नाही हे त्या एका मार्टीनेश्वरालाच ठाऊक....

चिटपाखरूही न दिसणाऱ्या त्या बर्फाळ भूमीत जाॅन स्नो ची तुकडी व्हाईट वाॅकर ला शोधावयास निघालेली आहे. टाॅरमुंड आणि हाऊंड मधे शिवराळ जुगलबंदी चालू आहे. तूर्तास डेनेरिस-प्रेमाच्या त्रिकोणाच्या दोन भुजा असलेले जाॅन व जोराह माॅरमोंट एकमेकांशी nice वागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातल्या त्यात जोराहची अवस्था 'छुपाना भी नही आता... जताना भी नही आता... म्हणणाऱ्या सिद्धार्थ सारखी झाली आहे. धर्मराज स्नो मधेच दानशूर कर्ण होऊन Valerian Steel ची तलवार जोराहला द्यायला निघाला होता. पण clinically depressed भासणाऱ्या माॅरमोंटने 'बाबांनी तुला प्रदान केली आहे तर ही तुझ्याच हाती जास्ती शोभून दिसते' असं सांगत भेट स्वीकारायला नम्र नकार दिला. अध्यक्ष महोदय, यालाच पुरस्कारवापसी म्हणता येईल काय?
बाकी हाऊंडला आगीच्या ज्वाळात दिसलेलं गिरीशिखर तंतोतंत समोर दिसलं आणि भविष्याची चाहूल लागली.
वर्गात किंवा ग्रुप मधे एखादा मुलगा कायम थट्टेचा विषय असतो तसं गॅंड्री ची 'खेचाया आवडे सर्वांसी' ! ज्या दिवशी त्याचा खरा कुलवृत्तांत कळेल तेंव्हा यांच्या reactions बघायला मजा येतील.

Death is the Enemy असं ठासून सांगणाऱ्या बेरीक व जाॅन मधे 'परतीच्या वाटा' या विषयावर एक उद्-बोधक परीसंवाद झाला. मृत्यूच्या दाढेतून सुटून येण्याचं कारण म्हणजे आपणाहातून काही लोकोत्तर काम होणे हे आहे असं conclusion हे दोघे काढते झाले. काही ध्यानीमनी नसताना बर्फाच्या वावटळीत पोलर बिअर चा हल्ला झाला. ते अवाढव्य जनावर आवरता आवरता थेराॅस गंभीर जखमी झाला. भारतीय उपखंडा बाहेर खेळताना आपल्या फलंदाजांचा उजव्या यष्टीबाहेरील चेंडूंबाबतचा weakness उघडा पडतो तसे कुठल्याही form, fit and functionality मधे आग समोर आली की हाऊंडचा मादाम तुंसाॅं होऊन जातो. शोले मध्ये समोर टाकलेली बंदूक फेकू न शकलेल्या असहाय्य ठाकूर रामदेव सिंग ची आठवण आली.

मंडळींना थोडं अजून अंतर चालून गेल्यावर व्हाईट वाॅकर्सचा एक गुच्छ सापडला. सर्वांनी निकराची लढाई करून जाॅनच्या मास्टर-स्ट्रोकच्या जोरावर त्यांना नेस्तनाबूत केलं. एका नमुन्या पोत्यात घालून बंदी पण बनवला. पण तितक्यात आगीमोहोळ उठावं तसे अनेक Wights आणि White-Walkers चाल करून आले. गोठलेल्या हिमनदी वा समुद्राने आपल्या पलटणीला तात्पुरतं वाचवलंय. प्रसंगावधान राखत जाॅनने गॅंड्री बाळाला वाॅलवर जाऊन डेनेरिसला मदतीचा संदेशा पाठवायला सांगितला.
सगळीकडून शत्रूचा जीवघेणा वेढा पडलाय.... शुअरशाॅट पराभव आणि मरण समोर दिसतंय....
"दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली.. जरी ही छाती
अजून जळते अांतरज्योती.. कसा सावरू देह परी" अशी खरं तर ही अवस्था. सगळे डोळ्यात तेल, नव्हे नव्हे बर्फ, घालून दुश्मनावर लक्ष ठेऊन आहेत. Wait and Watch चा थरारक खेळ चालू आहे. जखमी झालेला प्रिस्ट शेवटची मान टाकतो आणि त्या नैराश्यातून म्हणा किंवा अंगभूत मूर्खपणातून म्हणा, हाऊंड Army of Dead च्या दिशेने एक धोंडा भिरकावतो. तो दगड टणटण करत गोठलेल्या पाण्यावर पडतो आणि सगळ्यांच्या लक्षात येतं की रस्ता सुगम सोपा झालाय...that's it then. हाऊंडच्या बेअक्कलपणाने शत्रूसैन्याला मोठी ओपनिंग मिळते आणि मग सुरू होते एक धमासान लढाई...

गेम आॅफ थ्रोन मधली युद्धं हा तमाम चाहत्यांच्या दृष्टीनं नेहमीच एक आकर्षणाचा विषय राहिला आहे. विशेषतः मानव व अमानव ही झुंज तर आपल्या उत्कंठेची अभिप्सा पूर्ण करणारी. (पोलोचे टी शर्ट घालणाऱ्या इंग्रजाळलेल्या बांधवांसाठी : अभिप्सा = thirst). चीत्कारत वेडेवाकडे पळत येणारे wights आणि त्यांच्यावर त्वेषाने तुटून पडलेली जाॅन स्नो ची तुकडी. Statistically and practically अतिशय विसंगत वाटणारा हा संग्राम. पण सगळेच जण होता होईल तो प्रतिकाराला लागले आहेत. हलकल्लोळ नुसता. मृत्यूचं, हिंसेचं थैमान. हाणा.. मारा... कापा. शक्ती कमी पडते आहे पण Do or Die एवढेच आॅप्शन समोर आहेत. बाहू तोकडे पडताहेत पण टिकून आहोत...
"पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजे, तो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का... आता घरी?
सरणार कधी रण प्रभो...
कुठवर साहू, घाव शिरी?" अशी giving up ची भावना दाटून येत असतानाच ज्या सीन साठी डोळे 'त्रिफळांजन' ड्राॅप टाकून टाकून बळकट केले होते तो डेनेरिसच्या युद्धभूमीवरील आगमनाचा प्रसंग. आगीचे कल्लोळ सोडीत, शत्रूंची राखरांगोळी करीत डॅनीचे ड्रॅगन्स जबरदस्त काऊंटर अॅटॅक करतात त्या चित्रीकरणाला माझ्या शरीरातील ७२,००० नाड्यांनी एकदम दाद दिली. जिसका मुझे.... था इंतजार.... वो घडी आ गई, आ गई. Song of Ice and Fire असं प्रत्यक्षात उलगडताना पाहून काॅर्पोरेट क्षेत्रात अनेक वर्ष काम करून बथ्थड झालेली संवेदना झणाणून उठली. डॅनीच्या राॅयल एअर फोर्स ने रणकंदन माजवलं आणि दिसेल ते भस्मसात करायचा सपाटा लावला. जियो मेरे लाल ! दोस्त राष्ट्रांच्या सेनेला बळ मिळालं. बाजी पलटली. अन् तितक्यात दूर टेकडी उभ्या असलेल्या नाईट किंग चे निळेशार डोळे अनामिक planning ने चमकले.
आपल्याला हे पात्र आधीपासून आवडतं. सीधी बात, नो बकवास. Thus guy knows his business pretty well. कसल्याही आक्रस्ताळपणाचं प्रदर्शन न करता किंवा रामानंद सागर कृत 'संभाल अपने आप को' टाईप युद्धसंवाद न म्हणता तो शांतपणे आपलं अमोघ शस्त्र उचलतो आणि खपाक् कन् उडत्या ड्रॅगनवर मारतो. व्हाईट वाॅकर चा असला म्हणून काय झालं शेवटी तो किंग आहे. एक घाव, दोन तुकडे... (Pun intended).
व्हिसेरीयन चमत्कारीक कळवळत धराशायी होतो. सगळ्यांच्या छातीत, फायनल ला ३०० रन चेस करताना विराट कोहली स्वस्तात आऊट झाला की होतं तसं, धस्सं होतं. एक आख्खा ड्रॅगन जमिनदोस्त? डेनेरिसवर दुःखाचा अतीव डोंगर कोसळतो.

पहिला गोल केला की तातडीने आक्रमण करावे, दुसरा गोल होण्याची शक्यता खूप जास्ती असते असं आमच्या Barclays English Premier League मधील विचारवंत सांगतात. त्याच तत्वाला अनुसरून नाईट किंगने ड्राॅगनसाठी दुसरा भाला उचलला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रसंगावधान दाखवत जाॅन स्नो ने 'तुम्ही व्हा फुडे.. मी आलोच' असं बहुमुल्य सजेशन दिलं. ड्राॅगन काठावर पास झाला. (हा पन Pun आहे!!) जाॅन ला असं भयंकर चक्रव्यूहात सोडून जायची डेनेरिसची अजिबात इच्छा नव्हती. पण करणार तरी काय?

नाट्यप्रवेश : काका मला वाचवा
पात्रे : त्यागमूर्ती जाॅन स्नो, गूढ काका बेंजेन स्टार्क, आयुष्यात काहीही करू न शकलेली Army of dead
(पडदा उघडतो. जाॅन स्नो कितीही उपटून टाकले तरी परत उगवणाऱ्या गवता सारखा कित्येक फूट खोल बर्फाळ पाण्यातून कसाबसा वर येतो. वाईटांच्या (उपकंस: आज Pun व्होलसेल मधे मिळत आहेत... ख्या ख्या ख्या) ते लक्षात येतं. ते आपला मोर्चा स्नो शेठकडे वळवतात.)
Wight 1 : मला एक सांग भाऊ. ये दिवार टूटती क्यू नही है?
Wight 2 : टुटेगी कैसे? टार्गेरियन और स्टार्क के संयोग से जो बनी है !!
Wight 3 : ते काही असो. पुण्यात मेट्रो झालीच पाहीजे.
(इंजिनियरींग काॅलेजेस मधे सबमिशन करायला निघालेल्या झोंबी विद्यार्थ्यांसारखे सगळे जाॅनच्या दिशेने चालू लागतात. आपण क्लिअर कट outnumbered आहोत हे जाॅन ला पहिल्याझूट समजतं. पण पार माणिकबागेपर्यंत ट्रॅफीक जॅम झाल्याचं समजूनही सिंहगड रोडवर गाडी घालणाऱ्या असहाय्य ड्रायव्हर सारखा तो घनघोर लढाईला तयार होतो.)
जाॅन : काही चुकलं माकलं असेल तर माफ करा. यथावकाश वेस्टोरस मधील शालेय पुस्तकात माझ्यावर धडा येईलचं पण आपली माणसं म्हणून सांगतो डेनेरिसला पाहिल्यानंतर - आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है... ट्यांव ट्यांव ट्यांव.
('फिर' या शब्दावरचा जाॅन स्नो ला उद्देशून असलेला श्लेष ज्यांच्या लक्षात येणार नाही अश्या सर्वांनी मुळामुठेच्या - उजनी धरणासाठी सोडून उरलेल्या - पाण्यात जीव द्यावा!!)
Wights : घाई कसलीच नाही. सावकाश हालत डुलत जाऊ. भक्ष्य आपलं जातंय कुठं??
एवढ्यात एक आक्रीत घडतं. भात-कापणीच्या मशिन ने दोन्ही रांगांमधली पिकं छाटतं जावीत तसं घोड्यावर बसून आलेला एक अनामिक योद्धा आग लावलेला लोहगोळा घेऊन सैन्य मारत सुटतो. जवळ आल्यावर जाॅन पाहतो तो काय? काका बेंजन स्टार्क.
Merchant Navy मधील लोक जसे काही ठराविक महिनेच काम करतात तसे हे बेंजन काका फक्त विवक्षीत जागी व विवक्षित ठिकाणीच अवतरीत होतात.
अर्थात 'वेळेला केळं' या उक्ती ला अनुसरून जाॅन त्यांचा घोडा घेऊन व काकांना मरायला एकटंच सोडून तिथून पसार होतो.

इस्टवाॅच-बाय-द-सी च्या उंच मनोऱ्यात डेनेरिस अस्वस्थपणे उभी आहे. पुत्रशोक व नवप्रेमसंजीवक जाॅन स्नो ला गमावल्याने तिच्या दुःखाला पारावार उरला नाहीये. संधी साधून माॅरमोंट "Khalisee, I think we should go" असा बाण मारून घेतो. पण तेवढ्यात दूर परीघावर Open The Gate ची ललकारी ऐकू येते आणि ठिपक्यासमान भासणारा, घोड्याच्या पाठकुळी कसाबसा लटकून आलेला जाॅन स्नो प्रेक्षकांना दृग्गोचर होतो. डेनेरिसच्या हृदयात खुशीची लहर उमटून जाते. प्रत्यक्ष मरणाला (परत एकदा) हुलकावणी देऊन आल्यामुळे जाॅनची कथानकातली व राणीच्या मनातली intrinsic value एकदमच वाढते. Energy आणि Matter, इडली आणि सांबार, शक्ती आणि शिव तसे आमचे डेनेरिस आणि जाॅन स्नो. चांगली शुश्रुषा करून शुद्धीवर आणताच तो अगदीच मौसम मधे येतो आणि डॅनी सकट सगळे प्रेक्षक एकच पिंगा घालू लागतात -
किती सांगू मी सांगू कुणाला.... आजि आनंदी आनंद झाला,
आजि आनंदी आनंद झाला...

क्लायमॅक्स मात्र निव्वळ थरकाप उडवणारा... मेलेल्या व्हिसेरीयन ड्रॅगन ला नाईट किंग केवळ आपल्या स्पर्शाने Wight मधे रूपांतरीत करतो. त्याचं अवजड धूड ओढून काढण्याचा प्रसंग कलात्मकतेच्या निकषावर एकदम दर्जेदार. आणि मग नंतर ते त्याचे गर्द निळे डोळे उघडणं म्हणजे येणाऱ्या कित्येक संकंटांची जणू नांदीच ठरावी. ही ट्विस्ट कट्टर मार्टीनप्रेमींना कितपत रूचेल काही सांगवत नाही... तूर्तास तरी सर सलामत तो पगडी पचास !!!

#GameOfThrones #S07E06 #BeyondTheWall

विशेष नोंद :
वरील रसग्रहण हे मुंबई ते न्यूयाॅर्क विमानप्रवासात ३६००० फुटांवरून प्रवास करताना लिहीले असून त्या वेळी आमचे विमान Northern Ireland, Belfast वगैरे गेम आॅफ थ्रोन चे शूटींग होणाऱ्या टापूवरून चालले होते. हा मी फार विलक्षण योगायोग समजतो.

⁃ विक्रांत देशमुख