Tuesday, August 15, 2017

गेम ऑफ थ्रोन सीजन७ एपिसोड५ : इस्टवॉच

Because we all are breathing... खलास !

कमीत कमी शब्दात जाॅन स्नो जणू सगळ्या गेम आॅफ थ्रोन ची कळ उलगडून दाखवतो. Survival of the fittest. अनेकरंगी अनेकढंगी नमुने बर्फाच्या रगाड्यात एकत्र आली आहेत - एकमेकांचे जुने हिशोब आणि द्वेषांचे EMI घेऊन. यात जळक्या चेहऱ्याचा हाऊंड आहे, बऱ्याच वर्षांनी सापडलेला कुशल कारागीर पण मूळचा क्षत्रिय गॅंड्री आहे, नवसंजीवनी मिळून खलिसीच्या सेवेत पुन्हा जाॅईन झालेला (आणि परत एकदा Friendzone व्हायला आलेला) जोराह माॅरमोंट आहे, GOT चा नाना पाटेकर असं मी ज्याला म्हणतो तो टाॅरमुंड आहे आणि या सगळ्या चक्रमादित्यांना 'सूत्रे मणिगणः इव' पद्धतीने धरून ठेवणारा जाॅनबाबा स्नो आहे. आधीच्या सर्व सीजन मधे विखुरलेली पात्र अन् त्यांचे subplots आता गुंडाळत आणत जबरदस्त शेवटाकडं जाण्याचा प्रयत्न चालू आहे HBOचा. 'यांनी यंव केलंय, त्यांनी तंव केलंय... आम्ही काय हून एकत्र लढायचं' या खदखदीच्या प्रश्नावर आपल्या तद्दन ब्रिटीश accent मध्ये स्नो म्हणतो "Because we all are breathing...."

ड्राॅगनच्या सर्जिकल स्ट्राईकमधून ब्राॅन च्या प्रसंगावधानाने वाचलेला जेमी पण तेच म्हणतोय. जे पाहिलंय त्याने तो सुन्न झालाय. फार पूर्वी (म्हणजे helmets आणि एन् नरसिंहन् नसताना) कॅरेबियन बेटांवर क्रिकेट खेळणं म्हणजे यमयातना असायच्या. जोएल गार्नर, चार्ली ग्रिफीथ वगैरे सैतान दात करवदून, लाल डोळ्यांनी तो उसळी चेंडू टाकायला धावत आले की अगदी नाॅन-स्ट्राईकर च्या फलंदाजाची ओली व्हायची असं आमच्या वासू परांजपेंनी कुठेतरी सांगितल्याचं आठवतंय. तसं फक्त एका ड्रॅगन ने केलेला विषय बघून जेमी मुळापासून हादरलेला आहे. ब्राॅन,अर्थातच, लॅनिस्टरांवर जीवरक्षणाचा अजून एक डेबिट मेमो चढवून दात विचकतो आहे. संभाव्य धोक्याची पुरेपूर कल्पना आलेला जेमी सेरसीला सावध करणार आणि काही तरी प्रतिकार करणार Because we all are still breathing...

युद्धभूमीवर टीरीयन पडेल चेहऱ्याने फिरतो आहे. हा विध्वंस त्याच्या कल्पनेपलीकडचा आणि कितीही झालं तरी जळून बेचिराख झालेली माणसं पूर्वाश्रमीचे त्याचेच लोक. Peter Dinklage चे डोळे फार बोलके आणि विलक्षण reflective आहेत. डेनेरिस पकडलेल्या सैन्याची एक छोटीशी All-Hands meeting घेते. 'शरण या किंवा मरा' या आॅफर मधे न समजण्यासारखं काय आहे बरं?? तरी काही निबर खोडं हिरवा दिवा लागूनही सिग्नल ला थांबलेल्या माठांसारखे तसेच उभे असतात. मग जे काम डेनेरिसच्या चुरचुरीत लीडरशीप भाषणाने होत नाही ते ड्राॅगनच्या एका डरकाळीने होतं. सॅमच्या बाबांना मात्र हिरोपंतीची सुरसुरी येते. अत्यंत न पटणाऱ्या लाॅजिकने ते मान तुकवायला नकार देतात. पोरगंही पेटून उठतं. ('श्लेष' हा मराठी साहित्यातून हद्दपार होत चालला आहे अशी कुरबूर करणाऱ्यांच्या तोंडावर मारण्यासाठी केलेला विनोद आहे तो.... इंग्रजी माध्यमात शिकलेल्या नवश्रीमंतांसाठी : श्लेष = Pun Intended) डेनेरिसला example सेट करायचं असतं. टीरीयनला हिंसाचार टाळायचा असतो. टार्ली पितापुत्र 'मोडेन पण वाकणार नाही' स्टेट मधे गेलेले असतात. टाईमआऊट संपतो अन् डेनेरिसच्या एका इशाऱ्यासरशी रांडेल आणि डिकाॅन महाशयांची पार होळी होते. टीरीयन व व्हेरीस दोघांनाही हे खटकतंय, पण सांगता कोणाला? रात्री श्रमपरीहीर करताना दोघांचेही मेंदू यावर ओव्हरटाईम करत आहेत. ड्राॅगन ने साजरी केलेली दिवाळी पाहून लॅनिस्टर आर्मीने सामूहिक गुडघाटेक धोरण स्वीकारलं कारण we all are still breathing...

Thanks God, we all are still breathing अगदी हेच ब्रॅन स्टार्कला वाटतंय. चौथ्या मितीमधे जाऊन तो व्हाईट वाॅकर्सचा लेटेस्ट स्टेटस घेऊन येतो तो कमाल चित्रीत केलाय प्रसंग. बर्फाळ पार्श्वभूमीवरचे सुरूवातीचे उड्डाण म्हणजे तर one of the best shot sequence in GOT. कॅमेरामन ला माझ्यातर्फे चितळेच्या दोन बाकरवड्या. नाईट किंग ची नजर भर दिवसाही आपल्याला थरारून टाकते. ब्रॅन मग लागलीच जाॅनला मेसेज करतो.

Dragonstone वर जाॅन स्नो background ला "आवारापन, बंजारापन... एक खला है सीने मे" वाजवत नुसताच फिरतो आहे. माझा बिल्डींगही खाली न उतरून जाणारा एक मित्र त्याच्या या अवस्थेला Lonxiety (loneliness+anxiety) म्हणतो. तो असा 'जीवन व मृत्यूचं स्वरूप काय?' 'वरूण धवनमधे नायकत्वाचा नेमका कोणता गुण आहे?' 'हे विश्व खरंच होलोग्राफीक आहे काय?' 'मारूबिहाग मधे कोमल स्वर का वर्ज असतात?' 'सेंद्रीय शेतीने GDP कसा वाढेल?' वगैरे महत्वाच्या विषयांवर चिंतन करत असतानाच युद्धभूमीवर विजयपताका फडकावून आलेली डेनेरिस पुढ्यात लॅंड होते. इतरांवर डाफरून त्यांना हिडीसफिडीस करणारी सरकारी रूग्णालयाची खाष्ट रिसेप्शनिस्ट एखादा handsome hunk येताच लोण्याहून मृदू होऊन जाते तसा तो अक्रारविक्राळ ड्राॅगन जाॅन स्नो च्या समोर अगदी प्रेमात येतो. बरंचसं धैर्य एकवटून जाॅन त्याला स्पर्श करतो व R+L = J थेअरी ला पुन्हा एकदा प्रचंड पाठबळ देतो. 'हे जनावर नेमकं याच माणसासमोर पघळलं कसं काय' यावर बोलायचं सोडून डेनेरिस मात्र 'तू वार पचवून, मेलेला परत जीवंत झालास म्हणे' असले फुटकळ प्रश्न विचारत राहते. दोघांमधे काही घडेल असं वाटत असतानाचं चांगल्या सिरीयल मधे जाहिरातीचा ब्रेक यावा तसा जोराह मोरमोंट मधे टपकतो. हे झुरते आशिक म्हणजे लै बेक्कार जमात. यांचा पिछा सुटता सुटत नाही. ग्रेस्केल सारख्या जीवघेण्या आजारातून, सॅमवेलच्या मटका प्रयत्नाअंती, वाचल्यावर जोराह ही हेच म्हणतोय I am still breathing.

भाऊ व बाबांचा बारबेक्यू झाल्याचं सॅमला अजून कळलेलं नाहीये. पण त्या सिटाडेल मधल्या विक्षिप्त म्हाताऱ्यांवर कावलेला आणि उणे तीन जाॅब सॅटीसफॅक्शन असलेला सॅमवेल शेवटी तिथून निघून जायचं ठरवतो. जाताना संभाव्य लढाईला उपयोगी पडणारा knowledge-base बरोबर घ्यायला तो विसरत नाही.
सान्सा व आर्या मधे मतभेदाच्या ठिणग्या पडतच आहेत. त्यांना वारा घालण्याचं काम लिटलफिंगर इमान इतबारे करत आहे. विशेषतः एपिसोडच्या शेवटी सान्साचं खूप जुनं लेटर अचूकपणे प्लॅंट करून त्याने आपला डाव व्यवस्थित टाकला आहे. आर्याचं डोकं सटकलं तर राडा होईल हा त्याचा होरा आहे. After all Chaos is the ladder !! खरं तर सगळीचं स्टार्क भावंडं या ना त्या प्रसंगातून मरणाच्या दारातून परतली आहेत. गप्प आपलं एकोप्याने रहायचं सोडून नसत्या कलागती चालू आहेत. जाॅनचं वाक्य यांनाही लागू पडतं we all are breathing...

Dragonstone च्या बोर्डरूम मधे तातडीची मिटींग होते पुढील प्लॅन ठरवायला. काॅमन शत्रूशी लढण्यासाठी सेरसीची मदत घेता आली तर पहावी असा तल्लख विचार सगळ्यांच्या सुपीक मेंदूतून बाहेर पडतो. आणि मग टीरीयन आणि सर डेव्हाॅस Kings Landing ला खुश्कीच्या मार्गाने जातात. धाकट्या बंधूंना बघून जेमीचा फ्यूज उडतो पण विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन तो पुढील कार्यवाही करतो. मधल्या काळात सर डेव्हाॅस आपल्या घरचा रस्ता असल्यागत लोहारगल्लीत पोचतात व बराथयिन कुळातील गॅंड्री ला घेऊन परततात. सगळी पात्र अशी परत एकमेकांच्या आयुष्यात आलेली बघून फार मजा येते. या दिवट्याचे दोन उपयोग आहेत - ड्रॅगन ग्लास ची हत्यारं बनवायला आणि पुढेमागे कुणीच नसेल तर थ्रोनसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला ! आयुष्यात कधी कुणाला सिक्कीम लाॅटरी लागेल ते सांगता येत नाही.

सेरसीची मदत हवी असेल तर एखादा जीवंत व्हाईटवाॅकर पकडून आणून तिला दाखवावा असा अत्यंत पांचट व अव्यवहार्य विचार डेनेरिसचा दरबार बोलून दाखवतो. हाॅटेलमधे बिल आल्यावर सर्वप्रथम पाकीट काढणाऱ्या सज्जन मित्राप्रमाणे जाॅन लगेच volunteer करतो. डेनेरिस 'खुलता कळी खुलेना' मधल्या मानसी सारखी कळवळते. जाॅन व तिच्यामधली सलगी बघून जोराह तत्परतेने 'मी पण जातो' अशी आॅफर देतो. त्यावर तीची पार अलका कुबल व्हायची बाकी होते. आपण डोथ्राकी आणि ड्रॅगन घेऊन इथे आलोय कश्याला आणि करतोय काय वगैरे विचार तिच्या अचानक हळव्या झालेल्या मनाला शिवतंही नाहीत. जाॅनचं पुणेरी टोमणं मारणं चालूचं असतं. "Your grace, if I don't come back, you will have one less king in the North to deal with" हे छद्मी उद्गार तत्कालिन युद्धाला अनुसरून नसून जोराह मोरमोंटने डेनेरिसचे हात पकडल्याच्या जळफळाटातून आल्याचा आम्हांस दाट संशय आहे !!

पण या कारणपरत्वे मंडळींना ईस्टवाॅच ची आठवण येते हे महत्वाचे. तिकडे चित्रविचित्र मंडळींची मांदियाळी भरलेली असताना आपले मॅनेजमेंट कौशल्य वापरून जाॅन त्या सगळ्यांची मोट बांधतो आणि एका अनामिक व्हाईट वाॅकरच्या शोधात बर्फात कूच करतो. Sureshot मरणाच्या सावलीला चेस करायला निघालेल्या या टोळीला आश्वस्त करणारा, सरदार जाॅनभाऊ स्नो यांचा एकच तेजस्वी विचार - We all are (still) breathing)....
जय माहेष्मती ! जय वेस्टोरस !!

टीपा:
(अ) सेरसीच्या डोहाळजेवणाला युराॅन ग्रेजाॅय उपस्थित राहील काय?
(ब) सेरसी आपल्यावरही spying करते हे कळल्यावर जेमीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
(क) जाॅन ची लीडरशिप क्वालिटी खरंच वाखाणण्याजोगी आहे. काल बोट ढकलताना तो सगळ्यात पुढे होता. मोरमोंट मागे वळून निरोपाचा छचोरपणा करत असताना जाॅन मात्र ध्येयाकडे लक्ष ठेऊन होता. ईस्टवाॅच हून निघालेल्या पलटणीच्या ही तो अग्रस्थानी होता. This is called Leading from Front. मात्र मागे Hardhome ला झालेल्या भीषण लढाईच्या वेळी सगळ्यात शेवटी तो बोटीत चढला. या त्याच्या गुणासाठी व डेनेरिस ला मारलेल्या "This time I request you to trust in stranger" डायलाॅग साठी पुणेरी पगडी व उपरणं देऊन सत्कार !!
(ड) ड्राॅगन वर काय प्रथमोपचार केले गेले व हे चिरंजीव तत्काळ इतके टुणटुणीत बरे कसे झाले या संबंधी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करावा असा सिरीयसली विचार चालू आहे.
(इ) "हॅलो... हॅलो... कुणी आहे का तिथे?" - इति ग्रेवर्म
(ई) "Ditto" - यारा ग्रेजाॅय, थिआॅन ग्रेजाॅय

#GameOfThrones #GOT #Eastwatch #S07E05

⁃ By Vikrant Deshmukh