Tuesday, February 4, 2014

ये साब से पुछो.. :Dस्थळ : हिरा-पन्ना’, ’चौधरी सुपर मार्केटकिंवा अश्याच तत्सम नावाचे मारवाडी/राजस्थानी किराणा दुकान
वेळ : होणार सून मी त्या घरचीसंपून एका लग्नाची तिसरी गोष्टसुरू व्ह्यायच्या मधला अवकाश
पात्रे :
(१) बहुधा नुकत्याच लागलेल्या अमाप भिशीमधून दुकानात फुल्ल माल भरलेला (आणि ८२ रूपयाच्या बिलाला Pay करण्यासाठी आपण शंभरची नोट दिली की इतक्या शुल्लक हिशोबासाठीही कॅलक्युलेटर वापरणारा) दुकानाचा मालक
(२) गडी ’अ’ - सेम रंगाचा शर्ट आणि सेम रंगाची पॅंट घातलेला, भरपूर तेल चोपलेला आणि सराईतपणे पिशव्या भरणारा
(३) गडी ’ब’ - कायम काहीतरी वस्तू आत गोदामात जाऊन आणणारा (हा काऊंटरला कमी व ट्रान्झिंट मध्येच जास्ती असतो)
(४) गडी ’क’ - एक पाय दुमडून, वर करून गव्हाच्या पोत्यावर ठेवून, करगंळीने कान खाजवत उभा असलेला (हे पात्र जवळपास प्रत्येक किराणा दुकानात mandatorily आढळून येते... )
(५) पैसे देण्याघेण्याच्या व्यवहारात काहीतरी गफलत झाल्याने हुज्जत घालायला आलेली मराठमोळी बाई
(६) वरील पात्राला दुकानात पाठवून लांबून गंमत बघत बसलेला तिचा नवरा
(७) भडंग किंवा जॉटर रिफील किंवा फुलवाती वगैरे किमान विक्रीमूल्याची वस्तू घ्यायला गेलेला मी

मालक: ए छोटु... इधर आ (ज्याच्याकडे बघून याचीच छोटी मुले गावाकडे असावीत हा संशय दाटून यावा असा गडी काऊंटरपाशी येतो) जरा देख सहाबको क्या चाहिए..
मी : भैय्या, जॉटर रिफील है?
(गडी ’, गडी कडे हेत्वार्थकपणे पहातो.. गडी त्याच्या दिवसभरातल्या ३७८९ क्रमांकाच्या दुकान-टू-गोदाम या फेरीला प्रारंभ करतो... मी टाईमपास म्हणून इकडेतिकडे पहायला लागतो.. तेवढ्यात एक बाई तणतणत पायर्‍या चढून वर येते... मालक उगाच सावरून उभा राहतो आणि चेहर्‍यावर तुपकट स्माईल आणतो...)

बाई :  अरे वो भैय्या... (तिला वोच्या ऐवजी म्हणायचे होते हे मी क्षणार्धात ताडतो) आपने क्या बोला घरको? (हिंदीची लक्तरे करत बाई उद्गारत्या होतात.. मालकाच्या चेहर्‍यावरून आख्खा तुपाचा डबा ओघळायला लागतो)
मालक : क्या हुआ भाभी? (मालकांचा आवाज भीहे अक्षर म्हणताना हळुवार होतो)
बाई : (लोचटपणा ला साफ इग्नोअर करत) वो पाचसो कैसे क्या हुआ? इतना महाग वस्तू हम क्या भरते है क्या?
मालक : अरे भाभी, वो आप दो बार लेके गई थी ना सामान..
बाई : इतनासा फुटकळ वस्तू लिया तो इतना मोठा बिल? (हिंदीवर भीषण वार करत बाई फुत्कारतात)
मालक : अब कितनी महंगाई हो गयी है भाभी... दाम तो बढेगे ना?
बाई : कौनसा महंगाई भैय्या? तुमने वारेमाप भाव लगाया और वर ’इन’को क्या क्या बताया ? (बाई अनेक हिंदी साहित्यीकांच्या आत्म्याला वारेमाप तळमळायला लावतात... बाहेर लांब उभे असलेले बाईंचे इननजर चुकवत दादा’, ’नानाअसे लिहीलेल्या वैविध्यपूर्ण नंबरप्लेटच्या गाड्या पाहण्यात गुंग झालेले भासवतात.... गडी गोदामातून जॉटर रिफील घेऊन आलेला असतो.. (उपकंस बिगिन्स : हे वाण्याचे गोदाम म्हणजे एक अफलातून गूढ प्रकार आहे. त्या कुठल्या तरी हॉलिवूड चित्रपटात नायकाच्या घरात एक अज्ञात खड्डा असतो.. तो इतका खोल आणि अनाकलनीय असतो की बास्स... नंतर कळते की ते एक प्राचीन अथांग विवर आहे जे आपल्याला थेट पृथ्वीच्या अंतरंगात घेऊन जाते.. मला किराणा दुकानाच्या मागे असलेली गोदामे त्याच कॅटेगरीतील गूढगम्य जागा वाटतात...उपकंस एंड) बाई मागे हटायला तयार नसतात.. मालक जुजबी स्पष्टीकरणे देत काही कारण नसताना कडेला उभ्या असलेल्या मला संभाषणात ओढतो)
मालक : अभी ये साहाब को पुछो... मार्केटमे दाम कितने बढे है..
(बाई माझ्याकडे वळतात.. मी कुठल्याही ऍंगलने साहेबदिसतो का याची चाचपणी करतात आणि मोर्चा परत मालका कडे वळवतात)

बाई : उनको क्या पुछना? हम कितने दिन से आपका खरीदते है.. इतना महाग महाग भाव पैले (पहिले चा हिंदी उच्चार) नई (नहीचा हिंदी उच्चार) लगाते थे... (नईशब्दाबरोबर अशक्य मान हलवतात)
मालक : छोटु.. इनके खाते की बही लाओ (मालक फर्मान सोडतात.. गडी आज्ञाधारकपणे वही काढायला धावतो.. छोटुहे याचे विशेषण आहे की खरोखरचं पाळण्यातलं नाव आहे या विषयावर माझ्या डाव्या मेंदूतील काही पेशी लुटुपुटीची लढाई खेळतात.. ती लढाई अजूनही करंगळीने कान खाजवण्यात मग्न असलेल्या गडी चे दर्शन होताच थांबते.. हा कान खाजवतोय की करंगळीला धार करतोय?’ असा अत्यंत हिणकस दर्जाचा (पण आपले कॉलेज रियुनियन, संध्याकाळच्या ओल्या पार्ट्या, मुंबई लोकलमधील घामट प्रवास, दवाखान्याच्या वेटींग रूम इत्यादी ठिकाणी हमखास हशा आणि दाद मिळवून देणारा) विनोद माझ्या मनात तरळून जातो.. मी तो शिताफीने बाजूला करतो)

बाई : फिर इनको क्या बताया ?
मालक : अरे भाभी, जो हो गया बिल वही बताया ना.. हम थोडी ना झूट बोलेंगे.. जो एम.आर.पी. मे लिखा है वोही लगायेंगे ना.. क्यूं साब? (हा पुन्हा एकदा मला संभाषणात ओढतो.. मी हातात विसावलेली जॉटर रिफील काऊंटरवर ठेवत होकारार्थी माल हलवतो)
बाई : ऐसा उगाच कुछभी भाव मत लगाओ.. नही तो बोलती हूं मै भैय्या हम वो वडगावके किराणा दुकानसे माल भरेंगे (बाई परत हिंदी च्या काळजात वार करत गरजतात... गडी करंगळी आणि कान बदलतो.. वर पोत्यावर ठेवलेला पाय मात्र तोच असतो!)
मालक : आप किधरभी जाओ.. इतनाही भाव होगा (मालक गडी उर्फ छोटुने आणलेली वही उघडतो.. Da Vinci Code प्रमाणे काढलेल्या चित्रविचित्र आकृत्यांच्या जंजाळावर बोट ठेवून विजयी मुद्रेने बाईंकडे पाहतो.. लांबवर उभे असलेले बाईंचे इनअस्वस्थ होतात) ये देखो .. ये देखो... (गडी ’, ’आणि मी श्वास रोखून पहात राहतात.. गडी च्या करंगळीचा रोटेशन स्पीड वाढलेला असतो..) मैने बोला था ना..
बाई : (वहीत डोकावतात.. उगाचच मागची पुढची पाने चाळतात) ये हिंग का डब्बा कायकू लिया था? (बाईंना डब्बाच्या ऐवजी डबीम्हणायचे असते हे एव्हाना चाणाक्ष अश्या मी ताडलेले असते.. बाई नैराश्य लपवत उगाच शब्दांची जुळवाजुळव करतात) इत्तासा तो सामान और इत्ते पैसे?
मालक : (Aggressive होत खस्सकन वही ओढतो) देखो भाभी, अब आपके सामने ही है.. चाहिए तो ये साब को दिखाओ (मी घेतलेली जॉटर रिफील बाजूला सरकावत मालक ती वही मला आणि बाईला दिसेल अशी अलाईन करतो.. काळी पडलेली तांब्याची अंगठी परिधान केलेले बोट परत त्या अवाचनीय अक्षरांवर फिरवत मला यादी सांगू लागतो) ये देखो सर्फ का एक किलो, ये बाजरी, ये सनफ्लॉवर ऑइल, ये अमुक अमुक, ये ढमुक ढमुक.. (एखाद्या मुद्द्यावर वक्त्याला कोंडीत सापडलेले बघून अर्णब गोस्वामी जसा टेबलावर हात मारतो तस्साच हात मालक वही बंद करून कव्हरवर मारतात.. बाईंचा भयंकर नाईलाज झालेला दिसून येतो.. गडी काही काम नसतानाही उगाचच गोदामाची एक फेरी मारून येतो..)

मी : सेठ, ये रिफील का कितना हुआ?
मालक : (अजूनही त्याच तंद्रीत) भाभी हम इतने सालसे यहां धंदा करते है.. आपसे ज्यादा पैसे क्यू लेंगे.. ये साब से पुछो.. (एखाद्या गाण्यात कोणतेही कडवे झाले तरी गायक परत परत ध्रुपद आलवत रहातो तसे ये साब से पुछोचा पट्टा मालकांनी सढळ हाताने सोडला होता.. बाईंची चीडचीड होत असते आणि त्या पायी हिंदी व्याकरणाचे निर्घृण कोथळे बाहेर पडत असतात..)
बाई : हमने कुठे बोला तुम फसवते हो? जरा वाजवी लगावा करो ना..
मालक : जो मार्केटमे होता है वही हम लगाते है.. कंपनीका माल है ना.. हमारा थोडी है .. ये.सा.स.पु. ॥ध्रु॥
(गडी एव्हाना करगंळी बाहेर काढून तिला न्याहाळण्यात मग्न असतो - करगंळीला, बाईला नव्हे !)
बाई : मध्यम लोकोने किधर जाने का? (frustrationपायी मध्यम च्या पुढे वर्गीयम्हणायचे बाईंचे राहून गेलेले असते) अब पुढच्या वेळी खरीदनेके टाईम हमको लिश्ट चाहिये पहिले और बिल भी (मी, मालक आणि सर्व गडी यांपैकी कुणालाच हा पॉईंट कळालेला नसतो).. मै इनको बोलके रखती की ये दुकानमे हिशोब चेक करो.. (लांबवर उभे असलेले इनदुसरीकडे पहायला लागतात)
मालक : बिल्कुल बिल्कुल.. हमे क्या मिलेगा पैसे ज्यादा लेके? (त्याच्या वाक्यातला टेक्निकल फॉल्ट माझ्या त्वरीत लक्षात येतो पण बाई धुमसत असल्याने मी तो बोलत नाही) आप आओ या कोई और कस्टमर आये यही रेट लगाते है हम.. सुबह आओ, श्याम को आओ, एक तारीख को आओ.. कभीभी आओ.. वही रेट मिलेगा.. ये.सा.स.पु. ॥ध्रु॥ (मालक वहावत जाऊन statistically impossible अश्या probability सांगत असतो !)

मी : सेठ.. वो रिफील का कितना हुआ.. मुझे जाना है.. कितने देरसे ये आपका चल रहा है.. (मी आवाज किंचीत चढवून म्हणतो.. करंगळीवाला दचकून माझ्याकडे पाहतो.. गडी प्रतिक्षीप्त क्रियेने गोदामाकडे वळतो.. मालकाच्या चेहर्‍यावर केजरीवालकडून दिल्लीकरांचा अपेक्षाभंग झाल्यासारखे भाव उमटून जातात.. गडी उगाच रिफील उचलून मालकाला दाखवून परत खाली ठेवतो.. ’बिलिंगच्या आधी शिपमेंट कन्फर्मेश’ हा बहुधा त्याच्या जॉब डिस्क्रीपशनचा भाग असावा... बाई शरमल्यासारखे दाखवत पोबारा करण्याचा प्रयत्न करतात.. मालक ते ओळखून डाव टाकतो ..)
मालक : भाभी, एक मिनिट रूको.. मै ये साब के पैसे लेता हू..
बाई : (डिहायड्रेशन पेशंटच्या क्षीण आवाजात) रेहनो दो भैय्या.. मै इनको बोल्ती हूं.. अगली बार बराबर करना (गरकन वळून लांब उभ्या असलेल्या इनजवळ जाते.. दोघेही दुकानाकडे प्रत्येक ओव्हरच्या पाचव्या आणि सहाव्या बॉलला बाऊंडरी बहाल करणार्‍या अजित आगरकर सारखे खांदे पाडून पहातात आणि निमूटपणे चालायला लागतात.. मालकाला हर्षोन्माद झालेला असतो.. अर्धवट छोटुला आणि अर्धवट मला address करत तो बोलू लागतो..)
मालक :  देखा.. कैसे कैसे लोग होते है.. अभी ये वही मे लिखा है.. सब किमत बराबर लगाई थी फिर भी आ गई झगडा करने.. (मालकाच्या चेहर्‍यावरचे मगाशी आलेले तुपकट भाव जाऊन आता ६० वॅटच्या बल्बचे तेज लखलखायला लागलेले असते...माझे पैसे घेऊन सुट्टे परत देतानाही त्याची बडबड चालू असते) इनको उधार देनाही नही चाहिये .. सब सामान लेके जाते है और उपरसे ये हेडेक.. (’हेडेक’ शब्दाला तो डोक्याच्या ऐवजी मानेला का हात लावतो हे मला कळत नाही..)
(मी प्रचंड उशीरा मिळालेली वस्तू, तिची किंमत आणि वाया गेलेला वेळ यांचे त्रैराशिक मांडत दुकानाच्या पायर्‍या उतरू लागतो.. गडी कानात करंगळी घालण्याच्या तयारीला लागतो ... मालक मनोमन खुश होत टूथपिक घेऊन दात कोरायला सुरूवात करता.. गडी Statue Of Liberty सारखा केप्रचे मसाले ठेवलेल्या कपाटाला टेकून स्तब्ध उभा राहतो !!)