Tuesday, January 7, 2014

मध्य रेल्वे आणि मी - एक चिंतनिकाया मुंबईतल्या मध्य रेल्वेचे आणि माझे अचानकच काय बिनसते, काही कळत नाही. तसा तर मी पुण्याहून आलो म्हणजेच समलाईनी’.. पण नाही... कुठे जरा निवांतपणे मुंबई लोकलमध्ये टेकावे म्हटले की झाली सुरूवात ......वास्तविक पाहता वेस्टर्न रेल्वेही आमची मावशी.. पण चर्चगेटपासून ते वसई रोड पर्यंत अनेक चित्रविचित्र वेळी प्रवास करूनही तिने कायम आपल्या प्रेमळ पदराखाली माझी निगराणी केलेली आहे. (मला हार्बर लाईनआपल्या नातेवाईकांमध्ये हमखास आढळणार्‍या एखाद्या शिष्ठ शहरी भाच्या सारखी वाटते... तर दिवा-वसई रेल्वेलाईन "वद जाऊ कुणाला शरण गं?" असं केविलवाणे गाणे म्हणत आपली आयडेंटीटी शोधते आहे असा भास होतो. अंधेरी-घाटकोपर मोनोरेलच्या फक्त नावातच रेलआहे... झाडाला डवरलेला मोगरा वेगळा आणि प्लास्टीकच्या पिशवीत ठासून रॅप केलेला शोभेचा मोगरा निराळा... कलीना, साकीनाक्याच्या पुलावरून सुरकन जाणारे ते निळ्या रंगाचे अंडाकृती डबे पाहिले अन् मी ठार निराश झालो...असो) पण आमच्या मायमाऊली सेंट्रल रेल्वेला कधी कधी मधूनच आमच्या सारख्यांची मज्जा करण्याची लहर येते. आणि रेल्वेच्या अतोनात प्रेमापायी मग हा निष्पाप जीव काही च्या काही करामती करत राहतो !! 

बर्‍याच वेळा माझी लोकल पकडण्याचा दिवस हा वीकेंड पैकी एखादा असतो अन्‌ वेळ सूर्य डोईवर आल्याची...! त्या दिवशी मध्य रेल्वेच्या पंचांगानुसार मला जावयाच्या बहुतेक सर्व उपलाईन्सवर मेगा ब्लॉकअसतो. बरे मेगा ब्लॉक तिकडे विद्याविहार किंवा पार भायखळ्याला असला तरी माझ्या ट्रेनचे मोटरमन अंतर्ज्ञानी असल्यासारखे कळव्यापासून गाडीचा वेग कमी-कमी करत राहतात. 
 
पूर्वी विहीरीवर किंवा नदीवर पाणी भरायला जाणार्‍या बायका ठुमकत, मुरडत, मध्येच झाडाचे फुल तोड, मध्येच काठीने वेल सरकव, मध्येच शेजारणीला थांबवून गप्पा मार असले वेळकाढू प्रकार करत निवांतपणे आपला पाणी भरण्याचा कार्यक्रम करत असत. तसे मेगा-ब्लॉकच्या दिवशी मध्य रेल्वे ची गाडी (ही स्लो ट्रेन असेल तर आधीच मर्कट.. त्यात वृश्चिकदंश जाहला’ !!) प्रत्येक साईडींगला, नाहूर, ठाकुर्ली, मुंब्रा, शीव अश्या अतिशय uninteresting स्थानकांवर किंवा उल्हासनगरचा तो सुप्रसिद्ध नाल्यावरचा पुल, पारसिकचा बोगदा, मस्जिद बंदरचे रेल्वे यार्ड इत्यादी प्रेक्षणीय स्थळांसमीप थांबत थांबत पुढे सरकते.
बरे गाडी पुढे गेली तरी प्लॅटफॉर्मवर अजूनही वैशाली सामंतच्या’ (तरूणपणीच्या) आवाजात रेकॉर्ड केलेली आपल्याच गाडीच्या आगमनाची उद्‍घोषणा अजूनही चालूच असते !!! (त्यातही फास्ट ट्रेनची घोषणा करताना ही गाडी घाटकोपर, मुलुंड, ठाणे, कल्याण या स्थानकांवर थांबेल...आणि अचानक खटका ओढल्यासारखे पुढे..सर्व स्थानकांवर थांबेलही लाईन मला खूपच गंमतशीर वाटते... केवळ या फ्रेजच्या श्रवणाचा आनंद लुटता यावा म्हणून मी बर्‍याच वेळा एक-दोन स्लो गाड्या सोडून देतो :P)

मनुष्याला जीवनात काही काही महा-प्रश्न कायम भेडसावत राहतात. मृत्यूनंतर जीवन असते काय?’ सुखाची खरी व्याख्या कोणती?’ ’काय केले असतात समाधान टिकून राहील?’ ’कोण्या काळी परग्रहावर मनुष्य वस्ती सापडेल काय?’ इत्यादी इत्यादी... या सर्व प्रश्नांचा मेरूमणी असा प्रश्न मध्य रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रत्येक प्रवाश्याला पडतो तो म्हणजे - पुढच्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म डाव्या बाजूला येईल की उजव्या बाजूला?’ (बंबईया भाषेत इस साईड आयेगा या उस साईड?’ !!) अनेक होराभूषणांचे, बेटींग करणार्‍यांचे, मी-मी म्हणणार्‍या महाभागांचे अंदाज सपशेल चुकवत सेंट्रल रेल्वेच्या गाड्या अचूकपणे अनपेक्षित फलाटांवर जाऊन थांबतात.
अगदी परवाची गोष्ट. खच्चून भरलेल्या आसनगाव स्लो लोकलमध्ये डाव्या दरवाज्यातून सुखरूप, सदेह प्रवेश करता झालो. काही क्षणातच, कोणत्याही जनगणनेमध्ये कॅप्चर न झालेल्या वाढीव लोकसंख्येने मला रेटत रेटत विरूध दिशेच्या दरवाज्याच्या पार तोंडाशी नेले. माझ्या बरोबर मुंबईचा सेंट्रल रेल्वे ने प्रवास करण्यात आयुष्य गेलेला माझा मित्र अमित होता. दोन लोकांच्या मध्ये निर्माण झालेल्या अवकाशामध्ये डोकावून मला म्हणाला, "काही काळजी करू नकोस.. कल्याण स्टेशन याच बाजूला येते..." या वाक्यानिशी १००-२०० लोकांच्या माना आमच्या बाजूस वळाल्या आणि सगळे जय्यत तयारीनिशी उभे राहिलो...

मजल-दरमजल करत गाडी एकदाची कल्याणमध्ये दाखल झाली. आता उतरायचे या तयारीने मी माझ्या टाचेवर ठेवलेले आजूबाजूच्या दहा जणांचे पाय मुंग्या झटकाव्यात तसे झटकले.. अन्‌ तेवढ्यात... हाय रे दैवा ! दाराच्या तीन-चतुर्थांश बाहेर लटकत असणार्‍या एका घामट सजीवाने तीमनहूस बातमी दिली.. "अरे स्टेशन उस तरफ है.." डब्यात एकच हलकल्लोळ माजला... (याची तुलना लेडीज रूममध्ये अचानक बेडूक निघाल्यावर किंवा गावात पाण्याचा टॅंकर आल्यावर माजणार्‍या गहजबाशीच होऊ शकते !!) माझ्यासकट अनेक लोकांनी (केजरीवालसारखा) अतिशय वेगात यु-टर्नकेला आणि आम्ही सगळे समोर पसरलेल्या अथांग प्रवाश्यांच्या परीवारात सामील झालो. नेहमी ४ नंबरवर येणारी गाडी आज ५ नंबर वर येऊन थबकली. आणि यादवी युद्धाप्रमाणे असंख्य चीत्कार, आरोळ्या, शिव्या इत्यादींनी आसमंत दुमदुमून निघाला. प्रसंग मोठा बाका होता. आम्ही दोघेही मेन दरवाज्याच्या अगदीच विरूद्ध दिशेला, म्हणजे पार १८० अंशामध्ये होतो. समोर भारत सरकारची कुटुंब नियोजन योजनाफसल्याचा ढळढळीत पुरावा वाटावा असा दीडएकशे लोकांचा जमाव हिंस्त्र हालचाली करत होता.
मागे मी एकदा टाटा स्कायवर दोन महिने एच.डी. चॅनेल फ्री असल्याची संधी साधून एक सिनेमा पाहिलेला... त्यामध्ये खुप प्रशिक्षित प्राणी असलेल्या एका सर्कसला आग लागते. कोणत्याही उपायाने ती आटोक्यात येत नाही हे पाहून सर्कसचा मालक शेवटी विषण्ण मनाने सर्व प्राण्यांना पिंजर्‍यातून सोडून देतो. उद्देश हा की तंबू जळून खाक झाला तरी atleast त्यांचे प्राण तरी वाचतील... मालकाने सोडून दिलेले ते सर्व वन्यजीव त्या छोट्याश्या दरवाज्यातून एकदम रेटारेटी करत, एकदुसर्‍यावर कुरघोडी करत बाहेर पडू लागतात. आसनगाव लोकलच्या दक्षिण दरवाज्यातून आरडाओरडा करत बाहेर सांडणारे लोक पाहून मला त्या चित्रपटाची आणि त्या दृश्याचीच आठवण झाली !! मीही मग लोकांच्या लाटेवर अलगद स्वार झालो आणि काही नॅनोसेकंदात हे पंचभौतिक शरीर कल्याण स्थानकावर पुरी भाजी - १० रू.असे लिहिलेल्या कळकट्ट स्टॉलसमोर येऊन विसावले !!
(क्रमशः)