Wednesday, April 4, 2012

उन कोवळे सोनेरी...

You love her… you love her not….

एकीकडे खिडकीच्या गजांना घट्ट धरून उभं रहायचं, डाव्या आणि उजव्या नाकपुडीतल्या श्वासांना समतोल करायचा निष्फळ प्रयत्न करायचा आणि बाहेर गर्द सावलीचा कोट घालून उभ्या असलेल्या आंब्याच्या डेरेदार झाडाकडे नुसतं पहात रहायचं.. खुळ्यासारखं... कुठून तरी लांबवरून आल्यासारखा तिचा सूर मग कानावर येणारचं येणार... आणि तुम्ही त्यात हरवून न जाता, आपलं भान राखून ऐकायचं म्हणे ! मुश्कील... महामुश्कील काम !

You love her… you love her not….
८ वर्षे १ महीना ... इतक्या अल्पवयात ती डॉ. सलील कुलकर्णींसमोर ’हे सुरांनो चंद्र व्हा’ एवढ्या खुमासदारीत गायली की तिथे झी-मराठीची ऑडीशन आहे की नितळ आनंदाचा बालमेळावा, काही कळेना म्हणे....
सत्य साईबाबा असोत की शास्त्रीय संगीतातील मेरूमणी म्हणून ओळखले जाणारे दिग्गज कलाकार.. त्यांच्या कौतुकाची स्निग्ध-धार तिच्या गाण्यावर... समोर बसलेले आधीच हारलेले... कसली मैफील आणि कसलं काय? तिथे श्रोता, गायक, गाणे ही त्रिपुटी संपून निनादत राहतं फक्त एक सूरांचं दैवी आवर्तन !
कुणी तिच्याबद्दल कसलीही मतं बनवू नयेत.. आडाखे तर मुळीच बांधू नयेत... कारण अलौकीकाच्या साम्राज्याची वेस जिथे डौलदारपणे उभी आहे त्या नगरीपासून पुढं खरं तर तिचं गाणं सुरू होतं.... अवाक् होणं हा शब्दप्रयोग गुळमुळीत होईल या दर्जाचे श्रवण-सोहळे घालून तिने श्रोत्यांच्या कानांचं पारणं अनेकदा फेडलं आहे...

You love her… you love her not….
भयंकर आहे सगळंच प्रकरण ! आपण आपले चांगले आपल्या फाटक्या-तुटक्या झोळीशी मैत्र राखून काट्याकुट्यातून जमेल तशी वाट काढत चालत असतो आणि ही.... क्षणांच्या आडून अवचित समोर येणार आणि गुणगुणणार ’कुठला रस्ता सांग खरा.. वळणाचा की सरळ बरा...’ .. झालं? अवसान गळालं? थबकायला झालं? कंठ आवळला गेला?
Welcome to the finespun vocal world of Mugdha Vaishampayan !


You love her… you love her not…
तिचं पहिलं दर्शन.. कोण विसरेल बरं?
दिवस असतो २८ जुलै २००८. कुंद पावसाळी मंगळवारची रात्र आज वेगळीच भासत असते. टीव्हीपासून कटाक्षाने दूर असणारा मी, गॅलरीमध्ये फेर्‍या मारत असतो. कानावर दुरून पडणारे काही शब्द, काही नाद .. मी माझ्या विचारांमध्ये आणि रिमझिम पावसाचा आस्वाद घेण्यामध्ये बुडून गेलेला... आणि अचानक ... लोहचुंबकासारखा ओढून घेणारा आणि पुढे भावविश्वात कमालीची उलथापालथ घडवून आणणारा जादुई स्वर - ’आकाश पांघरोनी, जग शांत झोपले हे... घेऊनी एकतारी, गातो कबीर दोहे’.. खलास !
या ओळींपासून सुरू झालेली एक लोभसवाणी चित्तर-कथा... आजपर्यंत अव्यहायत !!

You love her… you love her not….
सत्य आणि स्वप्न यामध्ये एक धूसर मखमली पडदा आहे. त्याला आम्ही ’मुग्धागीत’ म्हणतो.
डुबक्या मारून मारून रत्ने काढावीत तसे तिच्या गायनातून अनेक नीलकांत, चंद्रकांत माणकं आपण लुटायची असतात. आग्रह कसलाच नसतो. मर्त्य जगात पूर्वीसारखेच परत लोटू का याची शाश्वती नसते. आनंद मात्र बक्कळ ! वेचताना आपली शुष्क छाती धापा टाकू लागते पण समोरून येणारा सूरांचा लोट काही केल्या थांबत नाही.
या अनिवार वर्षणार्‍या गान-सौरभालाच आम्ही ’मुग्धागीत’ म्हणतो.
आपल्याला पंख असते तर, आपण पिसाप्रमाणे हलके झालो तर, सगळी सुखं आपल्या दारात हात जोडून उभी राहती तर वगैरे कल्पनाविस्तारांमध्ये माणसाला भारी रस असतो.
World of parallels and world of fantasies …

बघायला गेलं तर त्यातलं एकही पुरं व्ह्यायची शक्यता जवळपास नसतेचं ! हिच्या सान्निध्यात मात्र त्या मनात फुटलेल्या धुमार्‍यांना मोहकपणे नाचायला मिळतं.
बेसुमार रंजकतेचा Out of the world अनुभव तत्काळ देणार्‍या सादरीकरणाला आम्ही ’मुग्धागीत’ म्हणतो.
चैत्रपालवी फुटली की कोकीळेला आमंत्रण देऊन बोलवावं लागत नाही. तिचं कूजन आसमंत भारून टाकायला त्वरीत सिद्ध होतं. घाण्याचा बैल बनलेल्या, जुनाट मनाला जे शब्द आगंतुक मोहर आणतात त्यांनाच आम्ही ’मुग्धागीत’ म्हणतो.

You love her… you love her not….
आमचा संदीप खरे एका कवितेत काहीतरी अफाट लिहून जातो ,
’आरोहा बिलगायाचा, तो धीट खुळा अवरोह,
भरभरून यायचे तेंव्हा, त्या कृष्णनयनीचे डोह
डोहात तळाशी खोल, वर्तमान विरघळलेले,
शब्दांच्या गाली पाणी, थोडेसे ओघळलेले’
मुग्धाने असं निष्प्राण शब्दांशी सोयरीक करून आमच्या सारख्या पाषाणांच्या गालीही दोन थेंब तरळवले. हे तिचं खरं यश... आणि हीच तिची भन्नाट जादू ! ते थेट रोखलेले दोन टप्पोरे डोळे आणि त्या आड लपलेले प्रश्न, कुतुहल, शंका, विस्मय, उत्सुकता इत्यादी इत्यादी अनेकानेक नेमस्त प्रकार... आणि सभोवती भरून राहिलेलं मोठं रम्य वातावरण..
’मुग्धा वैशंपायन’ या कलावतीचा प्रसाद फक्त दोन कानांनी स्वीकारायचा नसून ’सर्वेंद्रीयाणी’ घ्यायचा असतो ही शिकवण एका झटक्यात मिळून जाते.


You love her… you love her not….
माझ्या बेडरूमच्या खिडकीबाहेर एक झाडाची फांदी आहे. उन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता ती फांदी एखाद्या व्रतस्थ साधूसारखी उभी असते. एरव्ही आपलं लक्ष जाण्याची शक्यता कमीच. अशी नीरसतेच्या फिक्या रंगाशी इमान राखून वर्षानुवर्षे तिथे असतानाच एके दिवशी त्यावर एक चिमुकलं, गोंडस पाखरू येऊन बसलं.
या पक्ष्याला सूरांची प्रमेय माहिती नव्हती की त्याच्या डोईवर प्रस्थापिततेचा राजमुकुट नव्हता. होता तो फक्त लोभसवाणा गळा... आणि त्याची पहिली लकेर ऐकल्यावर फांदी जी काही फुलून आली की त्याचे नावचं ते !!
आता रोज त्या पाखराचं मधुगान ऐकणं आणि त्या स्तिमित करणार्‍या बदलांकडे हरखून बघत राहणं हेच काम बनून गेलं... आता ती फांदी अरसिक राहिली नाही. विविधांगी भावसुमनांनी त्याला डवरून आणण्यात या पिल्लाचा फार मोठा वाटा होता. आता चतुर्दशीची चंद्रकोर आणि वसंताचा महोत्सव थेट नजरेच्या टप्प्यात आला होता.
त्या लळा लावणार्‍या या गोड पक्ष्याचं नाव होतं ’मुग्धा वैशंपायन’.. ५ एप्रिल हा त्या मनोहर लीलेचा जन्मदिवस !

You love her… you love her not….
२-३ वर्षांपूर्वीची गोष्ट. काही कार्यक्रमासाठी एका सरकारी गेस्ट हाऊसमध्ये मुग्धाबरोबर थांबलो होतो. आतमध्ये आवराआवर करत असताना तिने सहजच ’मन लोभले.. मन मोहने’ ही लयकारी अश्या काही लज्जतदार पद्धतीने घुमवली की मन थरारून गेलं. लगेच जाणवून गेलं की ’मुग्धा वैशंपायन’ हा वर्णनात सापडणारा विषय नाही. ती फक्त आणि फक्त समरस होऊन अनुभवण्याची गोष्ट आहे. अशी सर्वांचं मन लुभावणारी पोतडी भगवंताने सोडायला सुरूवात केली होती तो हा दिवस ... !

रंगमंच बदलत राहील.... उद्याचा सूर्य आजच्यापेक्षा खचितच निराळा असेल..... प्रत्येकाचे भोग आणि योग काही नविन संकेत घेऊन आले असतील.... कुणी इथे तर कुणी तिथे... पण सोबतीला ठायीठायी असेल हृदय हस्तगत करणारा तोच सोनकोवळा आवाज..... आणि आपण त्याच भारावलेल्या नजरेने बघत असू तोच स्वराभिषेक.. अंतरींचा.... मुग्धाचा !
- (मुग्धाच्या वाढदिवसानिमित्त लिहीलेल्या "उन कोवळे सोनेरी" या लेखातील काही अंश)