Tuesday, January 24, 2012

तीन (छोट्या) कविता

-१-

ओळख

कालचं वाचलं -
की पृथ्वीचा जन्म १३७० करोड वर्षांपूर्वी झालाय
आणि ...
ही खिडकी, चेहरे, ऊन, घर, अनुभव,
दुःख, संवाद, पक्षी, युद्धं, प्रेम, दिवस, रात्र,
तुम्ही, मी, देव.....
सगळं... सगळं कसं ओळखीचं वाटू लागलंय
अचानक !

-२-

सोवळं

“हात लावू नकोस तिथे” दुरून ओरडलात तुम्ही
“सोवळ्यात आहोत, दिसत नाही का?” कडाडलात तुम्ही
अंगभूत पापभीरूपणे
(आणि धार्मिक ऐवजी अध्यात्मिक असल्याने)
मी चटकन सरकलो दोन पावलं मागे....
म्हटलं नको मोडायला तुमच्या मंदीराची पवित्रता!
मग मात्र उगाच आठवत राहिले -
तुमचे ते न धुतलेले अस्वच्छ हात
येता जाता उच्चारलेले ते अर्वाच्य शब्द
ओठी एक आणि पोटी एक वागवलेली, चक्रावून टाकणारी गाणी
आणि स्वतःच्या स्वार्थाभोवती घोटाळलेलं तुमचं संपूर्ण जग.....
पैश्यामागे नको तसे धावतानाही
तुम्ही असता का हो तसेच शुचिर्भूत?
रागाचा पारा काय ... चढवता येईल मला पण इतरांसारखा
पण.....
त्या सोवळ्याआड कसंही वागायचं ’लायसन्स’ मिळवलंय तुम्ही
आणि सोवळं नसल्यामुळे...
माझ्या प्रार्थना मीच वहायची मोठी जोखीम पेलतोय मी !

-३-

पर्णकुटी

म्हटलं वनवास तर काय कुणाला चुकायचा नाही
तेंव्हा बांधायला घ्यावी
आपली आपणच एक छोटी पर्णकुटी....
शोधून आणल्या मग
वनभर पसरलेल्या अबोल वेली,
माझ्या भूतकाळासारख्या दिसणार्‍या निर्मम झावळ्या
आणि उगाचच खोटं खोटं आश्वस्त करणारे
बांबूचे पोकळ खांब !
झालं... छत शाकारलं.... अंगण उभारलं....
कंदीलही तेवता केला - माझ्या असण्या आणि नसण्यावर !

वनवासाचा एकेक दिवस वजा करत करत
चांगली भक्कम बांधली होती मी पर्णकुटी..

तेवढा तो एक कांचन-मृग दिसायला नको होता !!!