Tuesday, January 17, 2012

डोक्यात जाणे - भाग २

पुण्यातल्या हॉटेल्समधल्या वेटर्सचे प्रकार दोन.....
१) गिर्‍हाईकाकडे दुर्लक्ष करणारे
आणि
२) गिर्‍हाईकाकडे साफ दुर्लक्ष करणारे
तुम्ही कितीही आदळआपट करा ते त्यांच्या कलाने जाणार आणि त्याला हवे तेंव्हा, हवे तेवढे आणि हवे तसेच तुमच्या पदरात errrrr ताटात पडणार !

पुण्यातल्या रिक्षावाल्यांचे प्रकार दोन......
१) जवळची अथवा लांबची भाडी नाकारणारे
आणि
२) सर्व प्रकारची भाडी नाकारणारे
रिक्षा या त्रिकोणी वाहनाचा शोध लावणार्‍या बजाज कंपनीतल्या इंजिनियरचा मला आधी सत्कार करायचा आहे. माणसाच्या शरीरात ज्याप्रमाणे appendices नावाचा बिनकामी अवयव कोणत्याही कारणाशिवाय दिलेला असतो तसा रिक्षांमध्ये इंडीकेटर हा फक्त जागा व्यापण्यासाठी बसवलेला पार्ट मानावा.
पुणेरी रिक्षावाले कोणते भाडे न्यायला होकार देतात ह्या विषयावर अनेक मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये सखोल संशोधन चालू आहे.

पुण्यातील दुचाकीस्वारांचे प्रकार दोन.....
१) बेशिस्त
आणि
२) अतिशय बेशिस्त
’वाहतुकीचे नियम ही काय पाळण्याची गोष्ट आहे का?’ हा विनोद तर खुप जुना झाला. सध्या पुणेरी दुचाकीचे लायसेन्स देताना फूटपाथवर गाडी घालता येणे, सिग्नल तोडणे, उलट्या बाजूने येणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवायची आवड असणे, डावीकडून गाड्या टाकून रस्ता ब्लॉक करणे आदी अत्यावश्यक गुणांची चाचणी घेतली जात असावी !

पुण्यातील बिल्डर्सचे प्रकार दोन.....
१) ग्राहकांना लुबाडणारे
आणि
२) ग्राहकांना पुरेपुर लुबाडणारे
माणूस बदलतो म्हणजे काय होते याचे उदाहरण पहायचे असेल तर Agreement करण्यापूर्वीचा बिल्डर आणि सर्व पैसे देउन झाल्यानंतर दिसणारे तयाचे रूप याचा अभ्यास करावा.
गरीब पारशी, गरम तव्यावर उगाचच पाणी मारून चर्रर्रर्र आवाज न काढणारा डोसावाला, एजंटच्या आधी सर्वसामान्य ग्राहकांना preference देणारी पोस्टातली कर्मचारी, आवाज न करणारी P.M.T. ची बस आणि वेळेत पझेशन देणारा बिल्डर या गोष्टी अद्याप कोणी पाहिल्या नसाव्यात !

पुण्यातील दुकानदारांचे प्रकार दोन......
१) गिर्‍हाईकाने मागितलेली वस्तू ’नाही’ म्हणून सांगणारे
आणि
२) गिर्‍हाईकाने मागितलेली वस्तू ’संपलीये’ म्हणून सांगणारे
यात पारंपारीक निरूत्साही दुकानदारांबरोबरच ’क्रॉसवर्ड’, ’शॉपर्स स्टॉप’, ’सब-वे’ अश्या तारांकीत ब्रॅंडसचाही समावेश होतो.
खरेदी करायला आलेल्या व्यक्तीला ’नाही’ हा शब्द विजयीमुद्रेने ऐकवून रिक्त हस्ते पिटाळण्यात यांना बहोत मजा येत असावी.

पुण्यातील भाषेचे प्रकार दोन......
१) भोचक
आणि
२) खोचक
जिज्ञासूंनी स्वतः अनुभव घेऊन पहावा !!

पुण्यातील कार्यक्रमांचे प्रकार दोन....
१) वेळेत सुरू न होणारे
आणि
२) वेळेत कधीही सुरू न होणारे
प्रेक्षकांच्या उपहासात्मक टाळ्या, बाहेर गाडी लावलेल्या भैय्याच्या भेळचा खप, टॉयलेटमधील द्रावणाची पातळी, बसलेल्यांच्या पायातल्या मुंग्या इत्यादी गोष्टी कमाल सीमेला जाउन ठेपल्या की मग कार्यक्रमाला तब्ब्येतीत सुरूवात होते !!
(क्रमशः)