Wednesday, January 4, 2012

मौनातल्या कथा माझ्या...

या कवितेची जन्मवेळ:
आवंढा गिळावासा वाटणारा कोणताही प्रसंग... दगडी चेहर्‍याच्या आणि रापलेल्या बुद्धीच्या सोबतीला एक टचकन्‌ हळवं होणारं मन नावाचं अकरावं इंद्रीय आहे याची सादर आठवण करून देणारी कोणतीही रात्र... बर्‍याच दिवसात आपण आपले होऊन राहिलो नाही असं वाटायला लावणारा कोणताही क्षण... मनातल्या बहुसंख्य प्रश्नांना उत्तरे मिळणार नाहीत हे ठाऊक असूनही रित्या जमिनीशी संवाद साधण्याचे वेडे ऋतू..

चालता जुन्याच वाटेवरी, छाया ढळू लागल्या,
मौनातल्या कथा माझ्या, सार्‍या कळू लागल्या...

होते कधी रान हिरवे, पायवाटही होती सुखी,
एका अनाम क्षणी कश्या, दिशा वळू लागल्या...

फुल माझे पानही माझे, नव्हते साक्ष कुणी उद्या,
भर दुपारी चंद्र-वेड्या, वेली छळू लागल्या...

बुडता खोल आज मी, हाक न मारी तरी कुणा,
प्रवाहाला पापण्यांच्या भेटी मिळू लागल्या....

सवाल अनेक घेऊनी, पाही आकाश मोकळे,
तळहातींच्या रेषा माझ्या, मज टाळू लागल्या..

होतो उभा कधीचा, दिस मोजत पाखरांचे,
सांज-ज्योती आठवांचे थवे गिळू लागल्या....

उरता सोयरीचे काही, वेदना पळू लागल्या,
अन्
मौनातल्या कथा माझ्या, आता कळू लागल्या...
मौनातल्या कथा माझ्या, सार्‍या कळू लागल्या........ !!!