Monday, October 24, 2011

’आयटी’तील बाला - तनिष्का दिवाळी २०११ लेख

(पूर्वप्रसिद्धी: सकाळ-तनिष्का दिवाळी अंक २०११)
वाचकहो,
विषय म्हटला तर गंभीर आहे आणि म्हटलं तर हसतखेळत पाहण्याजोगा आहे. आज व्यावसायिक जगाच्या प्रत्येक दालनात काहीतरी करून दाखवण्याची इर्षा असलेल्या गुणी स्त्रीयांचा पदरव वाढतो आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आणि क्वचित प्रसंगी प्रस्थापित वर्चस्वाला आव्हान देत या यशोमति आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत. आय.टी. सारखे ’सुजलाम्‍-सुफलाम्’ क्षेत्र याला अपवाद कसे असेल? एकेकाळी तर ’कॉंप्युटर इंजिनियरींग’ ही सर्वार्थाने मुलींच्या अधिपत्याखालील शाखा म्हणून गणली जात असे. अर्थातच आय.टी. मधील रोजगाराच्या बाबतीतही त्यांचे प्रमाण सर्वार्थाने उजवे आहे हे सांगणे नकोचं !!
मुलगी माहिती-तंत्रज्ञान विश्वात आली की व्यक्तीमत्वाला नवी झळाळी प्राप्त होऊन तिचे राहणीमान पार बदलून जाते अशी एक वदंता आहे.
सामान्य अज्ञ जनांना सॉफ्टवेअर मध्ये काम करणार्‍या बालिकांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कृतीचे व त्यांच्या आचार-विचारांचे विलक्षण आकर्षण आणि कौतुक वाटत असते.
या क्षेत्रातील एक अंतःस्थ माहितीगार म्हणून सदरहू विषयाचे बारकाईने चिंतन केल्यावर आम्हास काही गोष्टी प्रकट कराव्याश्या वाटू लागल्या आहेत.
बाह्य जगताच्या ’सब घोडे बारा टक्के’ न्यायानुसार इथल्या सगळ्यांना एका तागडीत तोललं जात असलं तरी अभ्यासू वाचकांच्या सोयीसाठी आय.टी. क्षेत्रात कार्यरत असणार्याज महिलांची विभागणी पाच प्रमुख गटांमध्ये आम्ही करू इच्छितो. या अभिनव आणि अपारंपारिक वर्गीकरणाचे प्रयोजन हे केवळ कथनामध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी केले असून अधिक जाणून घेण्यासाठी संबधित नायिकांशी संवाद साधणेच इष्ट !

(१) फ्रेशर –
आय.टी. क्षेत्रात आलेली फ्रेशर मुलगी ही तिच्या व्यवच्छेदक लक्षणांवरून त्वरीत ओळखू येते.
कुठल्याही कामात तत्परता दाखवणे हे तिचे प्रतीत होणारे अगदी प्रमुख चिन्ह! आणि शिकण्याची तीव्र लालसा हा तिच्या भात्यात असलेला सर्वात मोठा गुण!!
कॉलेजच्या अल्लड वातावरणातून कार्यक्षेत्राच्या रूक्ष बगिच्यात आल्यावरही जिच्या डोळ्यातला स्वप्नाळूपणा अद्याप कमी झालेला नाही ती फ्रेशर मुलगी अशी नेमक व्याख्या करता येईल.
नोकरीस लागल्याबरोबर अश्या मुलीच्या कपड्यांमध्ये जीन्सचे अगणित जोड आणि आधुनिक टी-शर्टची भर पडते. कॅंटीनचे नाविन्य आणि कॉफी मशिनचे अप्रुप असलेली ही कन्या काही काळ घरचा डबा नेण्याचे बंद करते. ग्रुपची निवड करताना ’आपल्या सोबत जॉईन झालेल्यांबरोबर जेवायला जायचं’ की ’जिथे आपली नेमणुक झालेली आहे त्या विभागाच्या मंडळींबरोबर जायचं’ हा प्रश्न तिला सतत सतावत असतो.
सिनियर्सबद्दल आदरयुक्त भिती आणि कंपनीच्या सुखसुविधांनी हरखून जाणं या गोष्टी तिच्या दिनक्रमाचा अपरिहार्य भाग असतात. आय-कार्ड स्वाईप करताना थोडीशी चिंतीत भासली तरी शनिवारी ज्यादा कामासाठी येण्याची तयारी ती नेहमीच दर्शवित असते.
पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्षात कितीतरी निराळ्याच पद्धतीने केल्या जात असलेल्या पाहून फ्रेशर मुलीचा सुरूवातीला प्रचंड गोंधळ उडतो. या अज्ञानापायी आपली थट्टा होऊ नये म्हणून कुणाला थेट प्रश्न अगर शंका न विचारण्याचा समजूतदारपणा ती दाखवते. अर्थात तिची जिज्ञासा तिला स्वस्थ बसवू देत नाही. अश्या वेळी आधार असतो तो मर्यादीत वेळेत उपलब्ध असलेल्या इंटरनेटचा आणि नुकत्याच रूजू झालेल्या काही स्मार्ट बॅचमेट्सचा !! फ्रेशर मुलीची धडपड ही नवशिक्या पोहणार्‍यासारखी असते.
आय.टी. कंपनीत कामाला लागलेल्या प्रत्येकालाच लॅपटॉप दिला जातो आणि न्यायला स्वतंत्र गाडी येते असं फ्रेशर मुलीला उगाचच वाटत राहतं. आजूबाजूला प्रत्यही अनुभवायला मिळत असलेली मिटींग्स आणि क्लायंट कॉल्सची लगीनघाई तिला मनोमन सुखावून जाते. सुरूवातीच्या काळात नुसतं मूक श्रोता म्हणून अश्या कार्यक्रमांना जायला मिळालं तरी तिला कोण आनंद होतो. गोर्‍या लोकांशी अगम्य, गूढ परवलीचे शब्द वापरत तासन्तास बोलणार्‍या सिनियर मंडळींबद्दल तिच्या मनात कमाल आदराची भावना निर्माण होते. अश्याच एखाद्या कॉलमध्ये जेंव्हा तिची रितसर ओळख करून दिली जाते आणि पलीकडून नावाची लाडिक मोडतोड करून कस्टमर काहीबाही बोलतो, तेंव्हा फ्रेशर मुलीला गगन ठेंगणे झाल्याचा अनुभव येवून जातो.
मुलगी आय.टी. कंपनीमध्ये जितकी नविन तितकी तिची ईमेल सिग्नेचर मोठी असा एक सिद्धांत आहे. सुरूवातीस चातकाच्या उत्कंठेने ती मेल्सची वाट पहात असते. ’नविन मेल आलेली कळलं नाही’ असं होऊ नये म्हणून दर काही मिनीटाने स्क्रीन रिफ्रेश करत राहते. हे नव्याचे नऊ दिवस ओसरून नंतर नंतर तिच्या इन-बॉक्समधील ’अन्‌रीड’ मेल्सची संख्या वाढू लागली की फ्रेशरचे हे सुरवंट ’डेव्हलपर’नामक फुलपाखरात रूपांतरीत होवू लागलंय असं खुशाल समजावं :P
आपली कौटुंबिक अगर वैयक्तिक पार्श्वभूमी व आपले ऑफीसमधील जीवन यामधील अंतर्विरोध हा आय.टी. क्षेत्रात पदार्पण करणार्‍या बर्‍याचश्या मुलामुलींना अगदी ठळकपणे जाणवत राहतो.
’बिपिन’मध्ये वडा आणि ’तिलक’मध्ये कटींग चहा पिणारे आपण टीमबरोबर ’लिटल इटली’, ’जॅझ-बाय-द-बे’ सारख्या तारांकीत ठिकाणी जायला लागलो आणि सुदर्शन हॉलमध्ये जमिनीवर मांडी घालून नाटक पाहणार्‍या आपणाला इतर सहकार्‍यांबरोबर ’आयनॉक्स’ व ’इन ऑरबिट’ मॉलमध्ये जावे लागते हा बदल ती आपखुशीने स्वीकारते.
कंपनीतील पहिले काही महिने तिच्यासाठी खरंच परीक्षेचे असतात. रोज एका नव्या जगाची ओळख होत असते. माहितीचा, कामाचा वेग प्रचंड असतो. व्यवस्थेचे, कामाचे चित्र-विचित्र अनुभव येत राहतात. यातून तावून सुलाखून जी बाहेर पडते तीच फ्रेशर मुलगी पुढे व्यावसायिक जीवनात यशाच्या पायर्‍या चढत राहते.

(२) प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोजेक्ट लीड –
अनेकांना हेवा वाटावा असं कर्तृत्व आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांनी मंडीत असलेली ही स्त्री म्हणजे खरोखरीच एक अभ्यासाचा विषय आहे. आजपर्यंतच्या कामावर जणू शिक्कामोर्तब म्हणून कंपनीने तिला ही अधिकाराची भूमिका दिलेली असते. नाठाळ घोड्यांपासून ते मत्सरी, महत्वाकांक्षी सहकार्यालपर्यंत सर्वांना काबूत ठेवून त्यांच्याकडून इप्सित काम करवून घेण्याची कठीण जबाबदारी हिच्यावर तिच्या गलेलठ्ठ पगारासोबत सोपवली गेलेली असते.
प्रोजेक्ट मॅनेज करण्यासाठी करडा चेहरा ही आवश्यक गोष्ट आहे असा यातील काही जणींचा समज होऊन जातो. त्यामुळे कनिष्ठांनी केलेल्या विनोदांवर न हसणे, सतत तणावाखाली असल्याचे भासवणे एक उद्विग्नतेचे भाव चेहर्‍यावर नांदवत वावरणे अश्या स्वतःला इजादायक कृती ही मंडळी करत राहतात.
समोरच्याने सांगितलेले आकडे आणि एस्टिमेटस् या कायमच फुगवलेल्या आहेत असा प्रबळ विश्वास जगातल्या सगळ्या प्रोजेक्ट मॅनेजर्सच्या ठायी नित्य वसती करून असतो. त्यामुळे कुठल्याही बाबतीत घासाघीस ही अनिवार्य गोष्ट होऊन बसते.
’क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही उक्ती संपूर्णपणे विसरून आपापल्या टीमकडून अचाट, अवाजवी कामांच्या अपेक्षा करणे हा यांचा अजून एक गुणधर्म. मॅनेजमेंटचे राक्षसी टार्गेट आणि टीम मेंबरच्या नैसर्गिक मर्यादा या दोन्हींचा व्यवस्थित ताळमेळ घालण्याची तारेवरची कसरत त्यांची अहर्निशी चालू असते.
एकीकडे महत्वाकांक्षा तर दुसरीकडे भावना या चक्रात सापडल्यामुळे प्रचंड मानसिक घालमेलीला या वर्गाला तोंड द्यावे लागते.
चालत आलेल्या परदेशगमनादी अनेक सुवर्णसंधी कौटुंबिक अथवा इतर कारणांमुळे नाकाराव्या लागल्याचे शल्य काही काहींच्या मनात पूर्ण करीयरभर रूतून बसते.
मधाच्या पोळ्यामध्ये ज्याप्रमाणे राणी माशी काही काम न करता फक्त स्वस्थ बसून इतरांकडून होणार्याण सुमधूर कार्याची दखल ठेवण्याचे काम करते, त्याचप्रमाणे आयटी मधील हा प्रवर्ग सोपवलेल्या व्यक्तींच्या दैनंदीन बिलींगची आणि प्रोजेक्टच्या डेडलाईन्सची काळजी वहात असतो.
कनिष्ठांसारखं मुक्तपणे आनंद लुटता येत नाही, आपल्या समपदीयांबरोबर मन मोकळं करता येत नाही तर वरीष्ठांकडे खदखद नीट व्यक्त करता येत नाही अश्या तिहेरी कुचंबणेच्या अवस्थेत यांची केबिन म्हणजे ’सोन्याचा पिंजरा’ बनून जाते.
एकंदरीत करीयरची ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था होऊन गेल्याने बर्‍याचश्या लेडीज प्रोजेक्ट मॅनेजर्स या भरभराटीच्या पदावर असूनही आंतरीक ताणाखाली अडकलेल्या दिसून येतात.

(३) डेव्हलपर/इंजिनीयर/कन्सल्टंट –
कंपनीच्या गोवर्धनाचा खराखुरा भार उचललेल्या या सगळ्या आदीशक्ती म्हणजे आय.टी. मधील बहुसंख्य वर्ग होय!
रूजू झाल्यावर काही वर्षातच आपापली टेक्नॉलॉजी ठरवून घेऊन, प्रोजेक्टची इत्यंभूत माहिती करून घेऊन त्यात आपले योगदान देत राहणे हे त्यांच्या अंगवळणी पडून जाते. अधूनमधून ’अपग्रेड स्कील’च्या नावाखाली प्रशिक्षणाचे सोहळे आयोजित करून ना यांच्यावर अधिक बोजा कसा टाकता येईल याचा साकल्याने विचार मॅनेजमेंट करीत असते.
निरनिराळ्या संगणक-प्रणाली तयार करणे, केलेल्या प्रणालींची देखभाल करणे आणि त्या बदलत राहणे हे यांच्या कामाचे ढोबळमानाने दिसून येणारे स्वरूप !
ही मंडळी फावल्या वेळात कंपनीच्या आवारात आणि बाहेर घडणार्याच बहुविध गुणदर्शनाच्या, समाजपोयोगी तसेच उपयुक्त कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतात. या वर्गाचा वयोगट हा कंपनीत एक वर्ष पूर्ण केलेल्या नवख्या मुलीपासून ते अपत्ये दहावीच्या परीक्षेला बसलेल्या अनुभवसंपन्न गृहीणींपर्यंत विस्तारलेला आहे.
’पीटर’, ’डेव्हीड’, ’जोसेफीना’ वगैरे मंडळींशी क्लीष्ट तांत्रिक विषयांवर साधक-बाधक चर्चा करणारी ही स्त्री आपल्या ड्रॉवरमध्ये अरूणा ढेरे, शांता शेळके, मंगला गोडबोले वगैरेंची पुस्तके बाळगून असते.
वयाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे देखणे पोशाख आणि उच्च पेहराव करणार्‍या या गटातील एखादी भगिनी श्रावणी शुक्रवारी दुपारच्या मधल्या सुट्टीत अगदी लीलया सवाष्ण म्हणून जेवायला जावून येते.

सोमवारी सकाळी चेहर्‍यावर सुतकी कळा आणून कामावर जाणे ही तमाम आय.टी ची प्रतिक्षिप्त क्रिया! या वर्गामध्ये त्याची अभिव्यक्ती जरा जास्तीच मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच की काय हाडाचे मॅनेजर्स महत्वाच्या मीटींग सोमवारी ठेवण्याची चूक चुकूनही करत नाहीत !!

या जमातीमध्ये ’कष्टाळू’ आणि ’स्मार्ट’ अश्या दोन मुख्य प्रजाती आपल्याला प्रकर्षाने पहावयास मिळतात.
कष्टाळू डेव्हलपर मुली ’आपण बरं आणि आपला कोड बरा’ अश्या विरक्त भावाने दिवसभर कष्ट उपसत बसतात. आपल्यापाशी असलेले ज्ञान पणाला लावून, क्वचित अडल्यास थोडे बहुत हात पाय मारून आपल्याला दिलेले काम चोखपणे व वेळेत पूर्ण करणे हे त्यांचे कर्तव्य असते. संध्याकाळी वेळेत घरी जायला मिळणे आणि ऑनसाईटहून कामाच्या गुणवत्तेबद्दल कधीतरी एखादी कौतुकाची मेल येणे इतक्या माफक अपेक्षा त्या बाळगून असतात. अश्या मुली इंटरनेटही थोडाच वेळ बघतात आणि ’फेसबुक’ ही केवळ घरी करमणुकीच्या वेळात पहायची गोष्ट आहे अश्या गोड भ्रमात असतात. आपल्या मागून येवून प्रोजेक्ट लीड झालेल्या इतरांबद्दल यांना तसूभरही असूया वाटत नाही आणि पगारवाढीसाठी कंपनीची आर्थिक स्थिती व आपले प्रारब्ध या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत असा त्यांचा ठाम विश्वास असतो.
कॉफी मशिनपाशी घडणार्‍या रिसेशनविषयक चर्चांनी यां भगिनींचा जीव घाबराघुबरा होऊन जातो. त्या जेवणाचा डबा रोज घरून घेऊन येतात आणि गाडीत बसल्याबरोबर कानाला इअर-फोन लावून बसतात.
मीटींग किंवा कॉनफरन्समध्ये अगदी स्पष्टपणे कुणी आज्ञा केल्याशिवाय बोलणे यांच्या स्वभावात बसत नाही.
मन लावून काम करणे, फक्त हक्काच्याच सुट्ट्या घेणे, आपण भरत असलेल्या घराच्या हप्त्याचे भान राखून वागणे आणि शक्यतो कुणाच्या अध्यात-मध्यात न पडणे आदी उपकारक गुणांमुळे असे कर्मचारी कंपनीच्या दृष्टीने पिळवणुकीसाठी अतिशय योग्य ठरतात.

या वर्गातील ’स्मार्ट’ मुली हा मात्र ओळखायला, हाताळायला आणि टाळायला कठिण असा प्रकार आहे !! गोड गोड बोलून दुसर्‍यांना कामाला लावणे हे त्यांचे प्राथमिक लक्षण म्हणून सांगता येईल.
’स्मार्ट’ डेव्हलपर मुली या नेहमी छान, नीटनेटक्या सजून येतात आणि जिकडे तिकडे आपल्या व्यक्तीमत्वाचा जमेल तितका प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत राहतात. यांच्यासाठी बस अगर कॅब पाच-पाच मिनीटे थांबवून ठेवली जाते व त्यानंतर त्यांना जागा देण्यासाठी उपस्थितांमध्ये अहमिहीका लागते. यांच्या मशिनवर हवे ते सॉफ्ट्वेअर काही क्षणातच इन्स्टॉल केले जाते. टीममध्ये सर्वात कमी ज्ञान असूनही सर्वात जास्ती पगारवाढ वाट्याला जाणे, वीकेंडला लागून आलेल्या सुट्ट्यांच्या अलीकडे किंवा पलीकडे रजा मंजूर होणे, एकही पैसा खर्च न करता रोज कॅंटीनमध्ये खायला मिळणे, पूर्ण करायला सुलभ अशीच कामे असाईन होणे इत्यादी चमत्कार स्मार्ट कन्यांच्या बाबतीत नित्य घडत असतात.
विशेषतः “बरं ऐक ना..” या पालुपदाने सुरू होणारे कुठलेही संभाषण हे फार घातक ठरू शकते याची इतरांनी नोंद घ्यावी.
या निरूपद्रवी शब्दसमूहापाठोपाठ एखादे काम करून देण्याची गळ ही येतेच येते. आणि योग्य तो सावधपणा नसल्यास काही कळायच्या आत एखादा पुरूष कर्मचारी या स्मार्टपणाला नाहक बळी पडण्याची दाट शक्यता असते.
असा दयाळू कर्मचारी तिच्या कोडमधले बग्स काढून कोड सुधरवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत थांबून करत बसतो तेंव्हा आपली स्मार्ट नायिका मात्र वेळेवर घरी पोहोचून फार्मा कंपनीत मॅनेजर असलेल्या आपल्या मित्राबरोबर चतुःश्रुंगीच्या टेकडीवरून दिसणारा सूर्यास्त जोडीने पहात असते.
बाकीच्या ठिकाणी बंदी असलेले जीटॉक, स्काईप, याहू असे विविध मेसेंजर्स आणि इतर वेबसाईटस् अश्या मुलींच्या पीसीवर हमखास चालू आढळतात.
बराच फावला वेळ मिळत असल्याने ‘bfn’ किंवा ‘ttyl’ असे लघुरूपातील चॅट-पंथीय संवाद यांनी आत्मसात व रूढ केलेले असतात. या भाषेचा अर्थ न कळल्याने गोंधळलेल्या समोरच्या व्यक्तीस ’तू आयटी मध्ये काम करण्यास लायक नसून तुझी जागा ही बॅंक किंवा विमा कंपनीच्या कचेरीत(च) असायला हवी’ अश्या तीव्र न्यूनगंड-उत्पादक विचाराच्या भेटी देणे ही मग ओघानेच येणारी गोष्ट ठरते!
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या सर्वजणी उत्साहाने पुढाकार घेतात आणि त्या नावाखाली आपल्या वाट्याची उरलीसुरली कामे इतरांच्या गळ्यात मारतात. बोलण्यातील चतुराई आणि वरीष्ठांबरोबरचे सौहार्द्र ही त्यांची बलस्थाने असल्याने आपला स्मार्टनेस अविरोध मिरवत कंपनीतील त्यांचा प्रवास सुखेनैव चालू असतो.

(४) टेस्टर –
आयटी मध्ये यायची संधी मिळालेले, पात्रता असणारे पण थोडेसे कमनशिबी असलेले जीव टेस्टर बनतात. कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणे हा नंतर नंतर त्यांच्या स्वभावाचाच भाग बनून जातो. दुसर्‍यांनी लिहीलेल्या संगणक-प्रणालींची चाचणी करून त्यावर योग्य तो निर्णय देणे हे यांचे प्रमुख कार्य. पण दुसर्‍याच्या चुका काढण्याचे रसभरीत काम मिळाल्यामुळे अशी मंडळी आपले उपद्रवमूल्य खूप वाढवून घेतात.
क्वालिटी अथवा टेस्टींग साठी काम करत असलेल्या मुलींना डेव्हलपरने लिहीलेल्या प्रत्येक ओळीबद्दल निकराचा संशय येत असतो.
ज्याप्रमाणे सीआयडी मालिकेतील एसीपी जवळपास प्रत्येक पात्रावर खुनाचा आळ घेतो त्या पद्धतीने कोडमध्ये लिहीला गेलेला प्रत्येक शब्द हा चुकीचा आहे अशी रास्त खात्री टेस्टर लोकांना असते.
डेव्हलपर आणि टेस्टरमधील या पारंपारीक युद्धात विजयाचा लंबक कधी इकडे तर कधी तिकडे झुकत असतो.
टेस्टींग क्षेत्रात काम करणार्‍या भगिनींना कामाचा तणाव तुलनेने कमी असल्याने त्या विविध छंद आणि कलागुणांची जोपासना करताना दिसतात.

(५) बेंच –
’बेंच’ हे आयटी मधील बहारदार प्रकरण आहे. कोणत्याही प्रोजेक्टवर थेट बिलींग करता न येणारे, कोणत्याही कामासाठी सध्या थेट उपयोग करून न घेता येणारे, अर्हतेला साजेसे काम अजून न आल्याने इतर कामांमध्ये वापरण्याची मिजास न परवडणारे असे सगळे लोक या ’बेंच’वर टाकले जातात.
’बेंच’ वर आलेल्यांनी आपला वेळ आणि क्रियाशक्ती ज्ञानाची उजळणी करण्यात खर्च करावी अशी बाळबोध अपेक्षा काही काही कंपन्या करतात. तर ’बेंच’ म्हणजे आपला विश्रांतीचा अगर करमणुकीचा कालखंड आहे अशी सोईस्कर समजूत कर्मचारी करून घेतात.
’बेंच’वरील मुली हे इतरांच्या हेव्याचे कारण ठरू शकते. अश्या मुलींचे थवे कॅंपसमध्ये इकडून तिकडे बागडताना पाहून समोर साचलेल्या कामाकडे पहात आपल्या नशिबाला दोष देणार्‍यांची संख्या काही कमी नाही.
कॅंटीन, कॉफी मशिन्स, स्पोर्टस्‍ रूम, लायब्ररी, आवारातील बागा, जिम इत्यादी ठिकाणी यांचा संचार मोठ्या संख्येने पहावयास मिळतो.
’बेंच’वरील काही काही मुली या कायम सेलफोनला चिकटलेल्या दिसतात. ते पाहताना एवढा वेळ संभाषण करणारी पलीकडील व्यक्तीही ’बेंच’वर असावी असा विचार मनास चाटून जातो.
आय.टी. आणि आय.टी. मधील सुखासीनतेबद्दल समाजात गोड गैरसमज पसरवण्यामध्ये या वर्गाचा मोठा हात आहे असा आम्हांस दाट संशय आहे.
इकडच्या जीवनाबद्दल असे मृगजळाचे मळे फुलवणारी हे लोक भवितव्याबाबत कुठेतरी थोडीशी चिंताग्रस्त देखील असतात. त्यानुसार ’बेंच’वरील कालखंडात इतर ठिकाणी मुलाखतीसाठी जाणे आणि बाहेर चांगल्या नोकरीसाठी चाचपणी करत राहणे हा उपक्रम देखील त्यांच्या करणीय गोष्टींच्या यादीमध्ये समाविष्ट होऊन जातो.
*****************
खरं तर माहिती तंत्रज्ञान हे स्त्री-बाहुल्य असलेलं क्षेत्र ! समाजाच्या इतर थरात निदर्शनास येणारा ’व्यक्ती तितक्या प्रकृती’ हा प्रवाद इथे देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
त्यामुळे ’आयटी मध्ये गेलं की मुलींच्या डोक्यात हवा जाते’ अगर ’तिकडच्या मुली कॉमर्स किंवा आर्टसच्या विद्यार्थ्यांकडे प्रथम वर्ग एसीच्या प्रवासाने जनरल डब्यातल्या गर्दीकडे तुच्छतेने पहावे तश्या पाहतात’ असे निष्कर्ष सरसकट काढू नयेत.
’Grass Always Looks Greener on other side’ या वचनाप्रमाणे सामान्यांना त्यांच्या आयुष्यातला चकचकीतपणा दिसत असला तरी या प्रवासात घडलेल्या अनंत कर्मकहाण्या या कायम पडद्याआडच राहतात याची नोंद घ्यावी.
उपर्निदेष्टीत प्रकार हे केवळ वाचकांच्या स्पष्टतेसाठी केलेले असून त्याच्या अधिक तपशीलात जाण्यापेक्षा या क्षेत्रात योगदान देणार्‍या व आपला स्वल्पसा का होईना ठसा उमटवणार्‍या समस्त कर्मयोगिनींना अभिवादन करणे हेच प्रस्तुत लेखकास श्रेयस्कर वाटते.... !!!!!!!