Thursday, October 6, 2011

आयुष्यावर बोलू काही....

(पूर्वप्रसिद्धी: दै.सकाळ, औरगांबाद . आज बर्‍याच दिवसांनी ’डॉ. सलील च्या वाढदिवसानिमित्त”ब्लॉगवर प्रकाशित)

’जा जा जा दिले दिले मन तुला....’

डॉ. सलील कुलकर्णी मोठ्या टेचात ही कविता आळवायला सुरूवात करतात अन् एक क्षणभराचा पॉज घेतात. समोर दुथडी भरून वाहणारी तरुणाई टाळ्यांचा प्रचंड गजर करते.
’कुणाला जर कुणाच्या तोंडावर मारायला गाणं हवं असेल... तर हेच ते गाणं” सलीलदादा निर्विकार चेहर्‍याने म्हणतात. सभागृह अक्षरशः फुटतं !!
’तुला मन द्यावे असे, काही कारण नव्हते....एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते’ या खास सलील स्टाईलमध्ये म्हटलेल्या अंतर्‍याला तर खुर्च्या, दारे आणि पडद्यांचाही चीत्कार ऐकू येतो.

शिट्ट्य़ा, टाळ्या, हशा, ’वाह वा’, ’क्या बात है’ अश्या आपसुक निघणार्‍या दादी....
एवढं होऊनही शांतपणे तबला वाजवणारा आदित्य आठल्ये रांचीच्या स्तुपासारखा स्थितप्रज्ञ वाटायला लागतो.
अचूक वेळ साधत संदिप शरसंधान करतो, “असू दे... असू दे.... मगाशी उगाचंच आपलं हा म्हणाला की तो कवितेतला माणूस वगैरे...” सलीलकडे टाकलेला एक तिरका कटाक्ष आणि प्रेक्षकात पुन्हा एकदा लोळालोळी......
’आयुष्यावर बोलू काही’ पहायला आलेला प्रत्येकजण या आणि अश्या असंख्य जागांवर ’फुल्ल टू एंजॉय’ करत प्रयोगाची लज्जत चाखत राहतो.
एकदा, दोनदा, दहादा, तीसदा, कितीही वेळा बघितला, अनुभवला तरी तृप्ती न होणारा, प्रत्येकवेळची खुमारी न्यारी असणारा मराठीतला हा अद्वितीय कार्यक्रम संदिप-सलील जोडी तितक्याच निष्ठेने व जीव ओतून सादर करत राहते
.
*****************
साहित्य आणि संगीत हे मराठी जनमानसाचे जिव्हाळ्याचे विषय. या दोन्ही क्षेत्रात होऊन गेलेल्या अनेक दिग्गजांनी, मातब्बरांनी आपापल्या परीने शारदेची सेवा केली. संदिप-सलील जोडीने या कलामंदीरावर लखलखीत सोन्याचा कळस चढवला तो आपल्या ’आयुष्यावर बोलू काही’ या अनोख्या कलाकृतीने!!
बदलती गाणी पण न बदलंलेलं स्वरूप अशी संहीता असलेल्या ’आबोका’ने आबालवृद्धांना बेफाम वेड लावलं. संदिपच्या सरळ मनाला जाऊन भिडणार्‍या कवितांनी युवावर्ग परत एकदा मराठी भाषेच्या सौंदर्याकडे वळाला तर सलीलच्या सुश्राव्य आणि नाविन्यपुर्ण चालींनी संगीतप्रेमी मोहीत झाले.
एक कवि, एक गायक कम पेटीवादक आणि एक तबलावाला.....मागे नेपथ्य नाही...... नृत्य, नाट्य, निर्देशन काहीच नाही.......... बरं, कार्यक्रमाला साचेबद्ध आराखडाही नाही ...... की विषयाचं बंधन नाही......
पण पडदा उघडल्यापासून ते शेवटाची टाळ्यांच्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजातली, उभ्याने दिली जाणारी मानवंदना होईपर्यंतचा काळ हा प्रेक्षकांसाठी का मंतरलेला होऊन जातो हे कळण्यासाठी तिथे जाऊन बसलंच पाहिजे....
असं काय बरं आहे या ’आबोका’मध्ये?
***********************
संदिप खरे म्हणजे मराठी काव्यजगताला मिळालेली नवसंजीवनी.........
संदिप खरे म्हणजे आजच्या तरूणमनाची चपखल अभिव्यक्ती......
आणि संदिप खरे म्हणजे आशयघन शब्दलीलेचा अमोघ सम्राट........
बोजडपणा टाळून भाषेची लज्जत चाखायला संदिपच्या कवितेनं शिकवलं !!

’मन तळ्यात, मळ्यात, जाईच्या कळ्यात.... मन नाजूकशी मोतीमाळ, तुझ्या नाजूकश्या गळ्यात’ म्हणत लावण्य अलगद टीपायला लावणारा संदिप ’प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे... त्यावर नाचे मनींचे अबलख घोडे.. या घोड्याला लगाम शोधत आहे, परि मजला गवसत नाही’ ही आत्मव्यथा तितक्याच प्रभावीपणे मांडतो.
’मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो’, ’मी मोर्चा नेला नाही’ ’आताशा मी फक्त रकाने’, ’अजून तरी रूळ सोडून’, ’साहेब म्हणतो चेपेन चेपेन’ याच्यासारख्या कित्येक वरकरणी हलक्याफुलक्या वाटणार्‍या कवितांमधूनही प्रत्येकवेळी त्याने एक विचार श्रोत्यांसमोर ठेवला.
’संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते, ती वेळ पुरिया होती अन् झाड मारवा होते’ असा शब्दशृंगार रचावा तर संदिपनेच.....
’या जमिनीत एकदा स्वतःला गाडून घेइन म्हणतो’ अशी पराकोटीची उत्कट अवतरणे लिहावीत ती संदिपनेच... ’तुझ्या डोळ्यातल्या रानी असे रानभरीहोणे...अश्या मनात कबूल आम्हा वनवासी होणे’ अशी प्रेमवेड्या जीवाची बेहोशी मांडावी ती संदिपनेच...
’आकाशाचे देणे काही आज-उद्या फिटत नाही...आणि इतक्यात प्रलय होईल असं काही वाटत नाही’ असा शिखरावर जाउन केलेला कवितेचा शेवट असो की ’वोसाड्याच्या गावी तुझा वोसाडाचा मळा, गुलाबाला सोसवेना उन्हाळ्याच्या झळा’चा अस्सल गावरानी बाज, संदिपचं वेगळेपण ठसल्याशिवाय रहात नाही.
’कुणी अडवावे, कुणास भ्यावे, श्रीहरि सावरणारा’ अशी मधुराभक्तीची लय मांडणार्‍या संदिपच्या ’मौनाची भाषांतरे’ आणि ’नेणिवेची अक्षरे’ या कवितासंग्रहांना युवा वाचकवर्गाचा तुफान प्रतिसाद मिळालेला आहे.

संदिपने चाकोरीत अडकलेली कविता तिच्या गेयतेला अबाधित ठेवत सर्वसामान्यांच्या परीघात आणली.
त्याच्या सहज, भावस्पर्शी पण प्रत्यंयकारी काव्याने संवेदनशील जीव सुखावून गेले. प्रत्येकाच्या ओंजळीत काही ना काही टाकणारा कल्पवृक्ष संदिप खरेच्या रूपाने रंगशारदेच्या प्रांगणात आविर्भूत झाला.
संदिपच्या प्रत्येक चाहत्याला त्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी शब्दामध्ये आपलीच आपल्याशी भेट झाल्याचा अनुभव येतो हे एका कलासाधकाच्या प्रतिभेचं विलक्षण यश... आणि उत्कट अभिव्यक्तींच्या माध्यमातून प्रसृत केलेल्या शेकडो नितांतसुंदर कविता हा संदिपने श्रोतृवर्गाला दिलेला चिरंतन, मोरपिशी ठेवा !!
***********************
एकदा पाहून, ऐकून, अनुभवून सुद्धा पोट न भरल्याने पुन्हा-पुन्हा येत राहणारा प्रेक्षकवर्ग हे ’आयुष्यावर बोलू काही’चं बलस्थान. तर त्यांना तसं प्रतिक्षिप्त क्रियेसारखं यायला भाग पाडणं ही संदिप-सलीलची जादुगिरी. ’आबोका’ला असं निष्ठावंत पाईक असल्याप्रमाणं अनेकदा येणार्‍या या वेड्या चाहत्यांची जाणीव दोघांनाही असावी. म्हणूनच की काय प्रत्येक प्रयोगात काहीतरी नविन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
हजरजबाबीपणा, कमालीची सृजनशीलता, जनमानसाची नस अचूक ओळखण्याची हातोटी, प्रतिभेचं अलौकीक वरदान, आपल्यातलं सारसर्वस्व समोरच्याला भरभरून देण्याबाबत असलेला उत्साह असे अनेक सामाईक गुण असलेल्या संदिप-सलीलनी काव्यवाचन-काव्यगायन कार्यक्रमांची व्याख्याच बदलून टाकली.
’आबोका’ पहायला येणार्‍या तरूणाला अगदी सुरूवातीलाच साद घातली जाते ’जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही... चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’ या विचारप्रवर्तक गाण्याने.... हे असं मनमुराद आत्मचिंतन झाल्यावर संदिप-सलील-आदित्य रंगमंचावर अक्षरशः धुमाकुळ घालायला लागतात. संदिप एकापेक्षा एक बहारदार कविता वाचायला, गायला लागतो. सलील संधी मिळेल तिथे सहज, नर्मविनोदी शैलीत टीप्पण्या चालू करतो आणि प्रेक्षागृहात हास्याची कारंजी उडायला लागतात.
पुढे मग कसदार गायकीचा वसा लाभलेला सलील आपल्या गळ्याची करामत हळूच दाखवतो. इथे सगळंच कसं एक वेगळीच उंची गाठायला लागतं. आजचा आघाडीचा व प्रचंड लोकप्रिय संगीतकार म्हणून नावाजला गेलेला डॉ. सलील त्याची स्वतःची आणि क्वचित कधीकधी इतरांची कंपोझिशन्स अश्या काही खुमारीने सादर करतो की आपण एखाद्या अभिजात गायनाच्या मैफीलीला बसलो की काय असा भास व्हावा !
आदित्यची बोटं कधी द्रुतलयीत, कधी शांत ठेहरावासकट तर कधी ठसक्यात तबल्यावर फिरू लागतात.
मध्येच एखादा हळुवार, गंभीर क्षण येतो. ’दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई’, ’अजून उजाडत नाही गं’, ’नास्तिक’ किंवा ’दमलेल्या बाबाची कहाणी’ सारख्या खोल गर्भितार्थ असणार्‍या कविता युवामनाला अंतर्मुख करून जातात. घड्याळाचा काटा पुढे सरकत राहतो. स्थळ-काळाचं भान विसरून लोक या काव्यामृतात पुन्हा पुन्हा डुबक्या मारत राहतात. प्रेक्षकांना असं सचैल भिजवणारे संदिप-सलील मात्र पुढची रचना पेश करण्यात मग्न होऊन गेलेले असतात........
**************
डॉ. सलील हे सरस्वतीचं लाडकं अपत्य !
निष्णात पेटीवादक, अथांग प्रतिभेचा संगीतकार, तयारीचा गायक, मनस्वी कवि, संवेदनशील लेखक असे अनेक गुण दाटीवाटीने भरून वागेश्वरीने ’सलील कुलकर्णी’ ही निर्मिती सस्मित चेहर्‍याने पूर्ण केली असणार. तरूण-तरूणींचे विवीध भाव-विभ्रम जोखून, त्यांच्या हृदयातली स्पंदनं टिपत ते सगळं अनेक मनोहारी रूपात रेखाटायचे काम डॉ. सलील आपल्या संगीतातून अव्याहतपणे करत असतात.
सलीलच्या संगीताने प्रत्येकवेळी नवनवी शिखरे पादाक्रांत करायचे ठरवलेय बहुधा!! त्याचं प्रत्येक नवं कंपोझिशन हे आधीच्यापेक्षा काकणभर सरसच असतं.
’माझ्या मना’ सारखं कमालीच गोड गाणं देणारा सलील ’संधीप्रकाशात’च्या रूपाने अस्वस्थ करणारी सांजसमाधी अलगद बहाल करतो.
सलीलच्या संगीतशैलीबद्दल लोकांना जशी एक कमालीची उत्सुकता आहे तसाच त्याच्या अष्टपैलुत्वाबद्दल आदरही आहे.

’प्रेमात म्हणे, कुणी मोहरते. कुणी हुरहुरते राणी’चा दाक्षिणात्य ठेका, ’तव नयनांचे दल’ मधला नाट्यसंगीताचा बाज, ’माझे जगणे होते गाणे’ ची आर्तता ’नसतेस घरी तू जेंव्हा’ मधली एव्हरग्रीन भैरवी, अफाट लोकप्रियतेचा कळस गाठलेल्या ’डिपाडी डिपांग’ची लयदार धून, ’मी फसलो म्हणूनी’ मध्ये मुर्तिमंत उभा केलेला यमन, ’तुझ्या-माझ्या सवे’ म्हणत रंगवलेला पाऊस, ’राती अर्ध्या राती’ मधला लोकगीताला मेलोडीयस बनवण्याचा अनोखा प्रयोग, ’देते कोण, देते कोण’ सारखं निसर्गातल्या चैतन्याचं गोजिरं चित्रण किंवा ’हुरहुर असते तीच उरी’ सारखी अवाक करून टाकणारी शास्त्रीय कलाकुसर......सलील कुलकर्णींचं गाणं थेट आत जाऊन भिडतं.
’ज्ञानियांचे ज्ञेय’ सारख्या अभंगाची चाल बांधणारा सलील ’वणवा’च्या रूपाने थिरकणार्‍या तरूणाईचाही होऊन जातो.

गाण्यांमधलं नाविन्य, त्यातली गुणवत्ता, त्यातली सुश्राव्यता असे अनेक घटक जपत या संगीतकाराचं आपल्याला खिळवून टाकणं चालूच आहे.
’आबोका’मध्ये सलीलला ऐकल्यावर तर सलीलच्या चतुरस्त्र कलागुणांची पुरेपुर ओळख पटून जाते. दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, वसंत देसाई, हृदयनाथ मंगेशकर, प्रभाकर जोग, अशोक पत्की अश्या मराठी संगीतसृष्टीला लाभलेल्या अनेक दिग्गज संगीतकारांची परंपरा - त्यांच्यापेक्षा थोड्याश्या अधिकचं चांगल्या पद्धतीने- पुढे चालवण्याचे कार्य सलील कुलकर्णी करत आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये दुमत रहात नाही.
**************
३ ऑगस्ट २००३ ला एका छोटेखानी, अनौपचारीक स्वरूपात सुरू झालेला ’आयुष्यावर बोलू काही’ ने आता साडेसातशे प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. बीजाचं रूपांतर वटवृक्षात होऊन त्याच्या फांद्या आता चहूबाजूंनी विस्तारल्या आहेत. जपान, अमेरिका, इंग्लंड, दुबई, जपान इत्यादी १२ देशांमध्ये ’आबोका’चे कार्यक्रम तुफान रंगले. महाराष्ट्र आणि बाहेरही जवळपास प्रत्येक मोठ्या गावात, शहरात संदिप-सलील नी आपली कला सादर केली आहे. ’आबोका’ म्हणजे मराठी चोखंदळ संगीतप्रेमी, काव्यप्रेमींचे मानचिन्ह बनून गेला आहे.
सकाळच्या उन्हात सोनं आणि फुलांमध्ये ह्सरा चेहरा दिसायच्या वयात ज्यांनी ज्यांनी ’आयुष्यावर बोलू काही’ एकदातरी पाहिला त्या सर्वांच्या संगतीला ही कधीही न उतरणारी सांस्कृतिक भूल कायम राहते आहे.
आद्यकवि ’संत ज्ञानेश्वर महाराजां’पासून ते सध्याच्या गुरू ठाकूरपर्यंत अनेक एकापेक्षा एक सरस कवि, गीतकार या मराठी मातीत होऊन गेले. अश्या अनेक युगांचा समृद्ध वारसा लाभलेल्या मायबोलीतील कवितेला, गीतांना आजच्या काळात लोकाश्रय मिळवून देण्याचं तसंच सध्याच्या फास्ट-फॉरवर्ड पिढीची पावलं प्रेक्षागृहाकडे खेचून आणण्याचं विलक्षण महत्वाचं कार्य ’आयुष्यावर बोलू काही’ने केलं आहे.

गेल्या आठ वर्षांपासून चालत आलेलं हे मनोरंजनाचं पर्व असंच चालू राहतं....... प्रयोगाची तारीख जाहीर होते ना होते तोच शो हाऊसफुल्ल होऊन जाते....... संदिपच्या अंतःकरणाचा ठाव घेणार्‍या ओळींवर आणि सलीलच्या नित्यनूतन भासणार्‍या संगीतावर जीव ओवाळून टाकणारे कलासक्त वेडे पुन्हा तशीच गर्दी करतात........ पडदा वर जातो आणि पुन्हा एकदा सुरू होतो आयुष्याचं तत्वज्ञान तुमच्या-आमच्या डोळ्यातल्या भाषेत मांडणारा, खिळवून टाकणारा तोच लोकप्रिय अध्याय....... सलील गात राहतो,
“उद्या उद्याची किती काळजी, बघ रांगेतून....
उद्या उद्याची किती काळजी, बघ रांगेतून....

परवा आहे, उद्याच नंतर बोलू काही

परवा आहे, उद्याच नंतर बोलू काही

चला दोस्तहो, आयुष्यावर बोलू काही....
चला दोस्तहो, आयुष्यावर बोलू काही....”