Tuesday, August 30, 2011

’डोक्यात जाणे’ - एक चिंतन

पुणेरी भाषेने या मायमराठीला अनेक अजरामर शब्द बहाल केले आहेत. यापैकीच एक आणि सांप्रतकाळात सर्रास वापरला जाणारा शब्दप्रयोग म्हणजे ’डोक्यात जाणे’ !!
वाचकहो, एखादी व्यक्ती ’मनात भरणे’, ’डोळ्यात मावेनाशी होणे’, ’काळजात सामावणे’, ’हृदयात शिरणे’ वगैरे वाक्प्रचार आम्हांस माहीती होते. पण या भूतलावर जीवन कंठीत असलेला एखादा सजीव ’डोक्यात जातो’ म्हणजे नेमके काय होते याचा आम्ही खूप बारकाईने अभ्यास सुरू केला. पुणेरी लोकांच्या मते ’(तो किंवा ती)डोक्यात जाणे’ या मध्ये राग, संतापा पासून ते परकोटीचा उद्वेग आणि त्राग्यापर्यंत सर्व मनोभावांच्या छटा आहेत.
’Getting on the nerves चे हे पुण्यातील कट्ट्यांवर केलेले भ्रष्ट भाषांतर आहे का?’ या आमच्या प्रश्नाला सरकारने अण्णांच्या मागण्यांना दिली तशी सहज बगल दिली गेली.

’एखाद्यामुळे वाईट्ट्ट्ट्ट (’ट’ ला ’ट’ जोडला नाही तर तो निंदनीय अपराध मानावा !) चीडचीड झाली की त्याला डोक्यात जाणे म्हणतात’ अशी मौलीक माहिती मला टिळक रोडवर भेटलेल्या एका जुन्या मित्राने (मी फुकटात त्याला कॉपी करून दिलेल्या ’Inception’ आणि ’Shutter Island’ चित्रपटांच्या बदल्यात) दिली.
मानवजाती मधील काही काही लोकांना दुसर्‍याला मनस्ताप झाला अथवा राग-राग झाला की अवर्णनीय आनंद होतो. हे लोक कायम दुसर्‍याच्या डोक्यात जात रहातात. असे नियमितपणे डोक्यात गेल्याने त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते. आपल्या जुन्या शत्रूंचा, व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्यासाठी अश्या ’भेजा फ्राय’ करणार्‍या महापुरूषांचा अत्यंत उपयोग होतो.

वाचकहो, ’डोक्यात जाणे’ हा म्हटलं तर टाळणीय प्रकार आहे पण म्हटलं तर कमावण्यासारखा गुणही आहे. दुसर्‍याची सात्विक संतापाने फुरफुरणारी मुर्ती बघून तुम्हांस आनंद होतो?
वात लावून दिल्यावर तडतडणार्‍या गुंडाळीचे दृश्य तुम्हाला तोष देऊन जाते?
कोणत्याही विषयावर आक्रमक आक्रेस्ताळपणे मते मांडणारे लोक तुम्ही enjoy करता?
निष्पाप भाव चेहर्‍यावर आणून समोरच्याचे रक्त उसळवण्यातली मजा तुम्हाला लुभावून टाकते?
वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर आपल्याला या कलेचा अभ्यास त्वरीत करायला हवा.

’टोपी पडताक्षणी’ (At the drop of a hat चे हे भ्रष्ट मराठी भाषांतर... ’लोकसत्ता’ आणि ’महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये येणार्‍या भयानक मराठीतील जाहिराती वाचून मान्यवरांना आजकाल असले काहीकाही सुचत असते..) डोक्यात जाण्याची विद्या फार कमी लोकांना अवगत आहे म्हणून निराश होण्याचे कारण नाही. आमची कमालीची निरीक्षणशक्ती आणि दांडगा सार्वजनिक अनुभव यांच्या संगमातून घुसळून काढलेली काही रत्ने आम्ही आज वाचकांसमोर ठेवू इच्छितो. यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करून भीड चेपेपर्यंत सराव केल्याने आपल्या अंतरंगाला तजेला प्राप्त होतो व पुणेरी असल्याचा सार्थ अभिमान आपल्यामध्ये दृढ होऊ लागतो. अर्थात इतर कोणत्याही व्यसनाप्रमाणे ’डोक्यात जाणे’ या अस्त्राचा वापर आपापल्या मापात राहून करावा. घडणार्‍या दुष्परीणामांना लेखक, सरकार, पाऊस, इंडीया टीव्ही, नंदन निलेकणी आणि परमेश्वर जबाबदार नाही याची ’आधार’ कार्ड काढलेल्या अथवा न काढलेल्या सर्वांनीच नोंद घ्यावी !!

युक्ती (१) भीषण पीजे –
दुसर्‍याला अक्षरशः वात येईल असे पीजे मारले की माणूस आपसूकच डोक्यात जायला लागतो. जोक मारणार्‍याच्या विनोदबुद्धीपेक्षा त्याच्या चुकीच्या टायमिंगवर डोक्यात जाण्याची तीव्रता अवलंबून असते.

प्रसंग:
तुम्ही आणि ’ती’ गाडीवरून चालले आहात. मागे बसलेल्या सुखद ’प्रकरणा’मुळे उत्तेजित होऊन तुमचा गाडीचा वेग वाढत चाललेला आहे. लटक्या रागाचे हुंकार (अथवा चिमटे, गुद्दे, थाप, बिलगणे..ज्याच्या त्याच्या सोयीनुसार, अनुभवानुसार आणि कल्पनाशक्तीनुसार आपण आपला पर्याय निवडावा !) ऐकून तुम्हाला जास्तीच चेव येतो आहे. इतक्यात एक प्रचंड मंद दिसणारा माणूस प्रकृतीधर्मानुसार शांतपणे मध्ये येतो. जीवनात कुठल्याच गोष्टीची घाई नसल्यासारखा तो मुंगीच्या पावलांनी रस्ता ओलांडणार अस्तो. तुम्ही ब्रेकचा (ऑटोमोबाईल कंपनीने डिझाईन केलेल्या क्षमतेपेक्षा अधिक) छळ करत त्याला चुकवता/घासता/थोडक्यात वाचवता.
मागे बसलेली व्यक्ती ओरडते/चीत्कारते/डोळे मिटते/अधिकच बिलगते वगैरे वगैरे.
वाचणारा आणि वाचवणारा दोघेही पुणेरी असल्याने एका आळसावलेल्या नेत्रपल्लवीखेरीज जास्ती नाट्य तिथे घडत नाही. गाडी पुढे जातेच आहे.
प्रकरण आता भानावर येऊन मोठ्या रागाच्या आविर्भावात म्हणते, “अरे काय चालवतो आहेस गाडी तू? उडवला असतास ना त्याला?”
वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण !
तुमच्या भात्यातून निघालेला अशक्य पीजे – “असा कसा उडवेन? (जमल्यास ’ईटीव्ही कॉमेडी एक्सप्रेस’ मधील कमलाकर सातपुतेचा आवाज काढत) तो काय दिवाळीचा फटाका आहे का उडवायला?”
तुमच्या प्रेमात कितीही आकंठ बुडालेली व्यक्ती असो, या विनोदाने तुम्ही तिच्या (हृदयातून) डोक्यात जाणारंच !!
याचेच थोडे सामाजिक variation:
“असा कसा उडवेन? तो काही जमिन विकून आलेला पैसा आहे का उडवायला?”
त्याच व्यक्तीसोबत हा प्रसंग दुबार घडत असल्यास घ्यायचे variation:
“असा कसा उडवेन? तो काही पतंग आहे का उडवायला?”
प्रथम प्रयत्नात अपेक्षित परीणाम न साधल्यास लगेच पुढचा जोड-विनोद तयार असायलाच हवा.
“असा कसा उडवेन? तो म्हणजे काही जत्रेत मिळणारे विमान आहे का उडवायला?”

युक्ती (२) शब्दच्छल –
शब्दच्छल हा दुसर्‍याच्या डोक्यात जाण्याचा बौद्धीक राजमार्ग आहे असे आचरट-विज्ञान सांगते.
सदरहू प्रकारात इतरांनी बोललेल्या शब्दांचा सहारा घेऊन त्यातील काही शब्दांवर अत्यंत बालीश अगर ओढून ताणून केल्यासारखी कोटी करणे अपेक्षित आहे. काही काही वेळा यातून चपखल विनोद निर्माण होऊ शकतो पण ते आपले ध्येय नसल्याने हसू न येणार्‍या शब्दच्छलाकडे तूर्तास आपण सोदाहरण लक्ष देऊया.
तुमची ओळखीची कोणीही व्यक्ती एका गंभीर विषयावर तुमच्याशी चॅट करीत आहे. (टीप: शब्दच्छलाची खुमारी समोरासमोर घडणार्‍या संभाषणापेक्षा अप्रत्यक्ष बोलण्यामध्ये वापरल्याने खुप वाढते. शिवाय अघोरी शब्दच्छलामुळे दुसर्‍याच्या डोक्याची नस तडकल्याने तुम्हांस होऊ शकणार्‍या शारीरीक इजेपासून बचाव होतो) गप्पांचा विषय (कन्या राशीच्या प्रारब्धानुरूप) अनुक्रमे तक्रार, दुःख, वेदना, वैषम्य, करूणा, उद्वेग इत्यादी स्थानके पार करून असहाय्यतेच्या ’डेपो’मध्ये येत आहे.

तुम्ही: I think you should leave everything behind !
समोरील व्यक्ती: hmm… I wish
(वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण !)
तुम्ही: I amrut

समोर भयानक शांतता पसरते. आधी मूळात हा जीवघेणा पीजे कळायला अंमळ वेळ लागतो अन् त्यानंतर राग, चीड, वैताग अश्या अनेक भावनांचा उद्रेक झाला असल्याने नेमके काय उत्तर द्यावे हे त्याला अथवा तिला समजत नाही.
आपल्या हजरजबाबी वाक्यानंतर प्रसंगवशात :P, :D किंवा ;) अश्या स्माईलीचा उपयोग करावयास हरकत नाही. चिन्हांचा वापर करताना आपला चारचौघात ’मनिष तिवारी’ होत नाही ना याची खबरदारी घ्यावी.
पलीकडील व्यक्ती अचानक लॉग ऑफ होणे, संतापाच्या भरात असंसदीय शब्द वापरणे, शिफ्ट आणि की-बोर्डवरील १ ते ९ पर्यंतच्या सर्व ’कीज्’ दाबून निर्माण होणारा स्माईलीसमूह पाठवणे या व अश्या प्रतिक्रीया आल्या की आपला शब्दच्छल उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला असे समजावे !

समोरासमोरच्या संभाषणात शब्दच्छल वापरताना डोक्यात जाण्याची तीव्रता अनेक पटींनी वाढवायची असेल तर खालील बारकाव्यांकडे सूज्ञांनी लक्ष द्यावे –
अ) एकसे भले दो... एकाच वाक्यातील दोन शब्दांवर अथवा एकाच शब्दावर ’कॅस्केड’ केलेले दोन शब्दच्छल
उदा.
Project Manager: Let’s have another sitting tomorrow on this issue
तुम्ही: This requires system ‘setting’ rather than ‘sitting’ !!
Technical team doesn’t like to ‘sit’ on the issue for long time !!
किंवा
The way it is wiping the records from database, this issue should be called as tissue !!

आ) शब्दच्छलाच्या वेळी आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या व्यक्ती (जसे - ज्याला आपण व्रत घेतल्यासारखे टपरीवर रोज फुकटात चहा पाजतो असा सहकारी, ऑफीसच्या वेळात सिनेमाची तिकीटे आणायला गेल्यावर ज्याचा मेसेंजर आपण ऑनलाईन ठेवतो व टाईमशीट भरून देतो असा टीम मेंबर, विकतची पावभाजी खाण्याची इच्छा झाल्याने ज्याचा घरून दिलेला डबा संपवण्यास आपण नित्यनियमाने मदत करतो असा निम-वरीष्ठ इत्यादी इत्यादी) आजूबाजूला असतील असे पहावे. केल्या मदतीला स्मरून अश्या व्यक्ती आपला विनोद उचलून धरतात अन्‍ त्यामुळे आपण अगदी सुकरपणे इतरांच्या डोक्यात जातो.

इ) पहीला शब्दच्छल वाया गेल्यास नविन तयार करून मारण्यापेक्षा आपण केलेली कोटी समजावून देणे हा डोक्यात जाण्याचा हमखास उपाय आहे हे जिज्ञासूंनी लक्षात घ्यावे. समजावून सांगत असताना खोटे, खोटे डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणे, टेबलावर हात आपटणे, पाय झाडणे, ’तुला सांगतो’, ’Did you get that?’ वगैरे शब्दप्रयोग मुश्कीलीने उच्चारणे या क्लृप्त्यांचा वापर करावा

ई) शब्दच्छलाचा चीड येईल असा उपसंहार म्हणजे जोक संपताक्षणी ऐकणार्‍याच्या तोंडाकडे हसण्याच्या अपेक्षेने पाहणे. टाळीसाठी हात पुढे करणे ही त्याच्याही पुढची पायरी. ’विनोदाचा दर्जा जितका दरीद्री तितकी टाळीस्तव हात पुढे करण्याची तत्परता अधिक’ हे सूत्र मात्र कायम लक्षात ठेवावे.

उ) शब्दच्छलानंतर दुसर्‍याला हाताने स्पर्श करणे हा डोक्यात जाण्याच्या प्रकाराचा कडेलोट आहे. आपल्या एकापाठोपाठ एक अश्या असहनीय कोट्यांमुळे जर्जर झालेल्या व्यक्तीस हाताने ढोसून हसण्यास प्रवृत्त करणे या अतीव रोमहर्षक कृतीमुळे मनमोहन सिंगसारख्या थंड व्यक्तींच्या मनातही आपल्याबद्दल पराकोटीचा संताप निर्माण होऊ शकतो.

युक्ती (३) सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वाजणारे मोबाईल –
एकाचवेळी अनेकांच्या डोक्यात जाण्याची खुबी शोधण्यासाठी आपण हा लेख इथपर्यंत वाचत आला असाल तर अभिनंदन!! आता उलगडण्यात येणारी बहुमुल्य माहिती या बाबतीत आपल्या खरंच कामी येऊ शकते.
प्रेक्षागृहे, सिनेमा थिएटर, गाण्याच्या मैफीली, नाट्यगृहे, सभा-मिटींगचे हॉल्स ही ठिकाणे यासाठी अतिशय उपयुक्त म्हणून गणली जातात.
आपले आसन रंगमंचापासून जवळ आणि रांगांच्या दोन्ही शेवटांकडून बरोबर मध्यभागी असेल तर मोठी पर्वणीच !
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ’आपला मोबाईल बंद ठेवावा’ या सूचनेकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे. फावल्या वेळेत कामे नसलेल्या (म्हणजेच सरकारी कचेरीत नोकरीस असणार्‍या) आपल्या आप्तेष्टांना, बडबड्या मित्रांना, आपण देणे लागत असलेल्या महात्म्यांना “Give me call after 30 minutes”, “Call me once you reach home.. need to discuss something”, “Ring me after an hour… will sort out the matter” वगैरे आपल्या Free SMS Pack च्या कक्षेत येतील इतपतच मेसेज पाठवावेत.
त्यानंतर मोबाईलची रिंगटोन कर्णकर्कश अश्या ’सोनी दे नखरे’, ’कोंबडी पळाली’ किंवा ’ए गणपत’ यांपैकी कोणत्याही गाण्याला सेट करावी. होता होईल तो हिंदीपेक्षा प्रादेशिक भाषेतील गाण्यांना पसंती द्यावी.
गब्बरसिंग किंवा मकरंद अनासपुरेच्या आवाजातील धन्य संवाद किंवा ’बाबा लगीन’ सारखा मिरवणुकीत वाजवायचा लूप असेल तर सोन्याहून पिवळे !!
मोबाईलमधील व्ह्यायब्रेटर आणि साऊंड असे दोन्ही पर्याय आपण उदारपणे स्वीकारावेत.
कीपॅड पूर्णपणे लॉक करावे. मोबाईल जीन्सच्या अगदी आतल्या कप्प्यात (ए. राजाने 2G स्कॅमचा पैसा दडवला तसा) लपवून ठेवावा.
त्यावर रूमाल, पेन, खाली पडताच ’खळ्ळकन्’ अथवा ’खण्णकन्’ वाजणारी गाडीची किल्ली अश्या बहुविध वस्तू ठेवाव्यात. सर्व तजवीज करून झाल्यानंतर अत्यंत एकाग्र चेहरा करून रंगमंचाकडे पहात रहावे.

मध्ये मध्ये स्व-मनोरंजनासाठी ’उशीरा आलेल्या लोकांकडे दुपारची झोपमोड झाल्यासारखे अत्यंत त्रासिकपणे बघणे’, ’उग्र कांदा घातलेली भेळ तोंडाचे आवाज करत आणि सांडत सांडत खाणे,’ ’सादर होत असलेल्या गाण्याच्या अथवा कवितेच्या पुढच्या ओळी बाकीच्यांना ऐकू जातील अश्या पद्धतीने म्हणणे’, (हेच विनोदी नाटक असेल तर) ’जोक संपायच्या आधीच मोठ्यांदा हसू लागणे अथवा तो विनोद शेजारच्याला सांगून टाकणे’, ’झोपेत एका कुशीवरून दुसरीवर वळतो तसे आसनात जागा बदलत राहणे’, ’प्रेक्षागृहामधील ए.सी.च्या स्थितीनुसार हुडहुडी भरल्याचा अगर घामेघुम झाल्याचा अभिनय करत राहणे’ वगैरे गोष्टी चवीने कराव्यात.

कार्यक्रम रंगात येऊ लागला की आपण तयारीत रहावे. अंधारलेल्या हॉलमध्ये आपल्या आजूबाजूचे सर्व जण रंगमंचावर सादर होणार्‍या कलेमध्ये मग्न आहेत. कलाकार अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण करत आहेत. एवढ्यात........मगाशी पाठवलेल्या अनेक (फ्री) SMS पैकी एखादा सुफल होतो....
आणि.... वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण! ....
सर्व वातावरणाला पालटून टाकणारा एक खणखणीत नाद आपल्याच खिश्यातून येवू लागतो... प्रत्येक रिंगबरोबर आवाजाची तीव्रता वाढत जाते.... त्याला साथसंगत करण्यासाठी रात्री दोन-अडीचला कर्वेनगर चौकात मोकाट फिरणार्‍या कुत्र्यांच्या घश्यातून येतो तसा ’गुर-गुर’ हा व्हायब्रेटरचा रांगडा आवाज... क्या बात है !
काही कळायच्या आत जपानचा किनारा आणि भूप्रदेश गिळंकृत करणार्‍या सुनामीसारखी ही रिंगटोन आपल्या खुर्चीपासून उगम पावून आजूबाजूच्या अनेक प्रेक्षक-श्रोत्यांपर्यंत जाऊन धडकू लागते.
अल्पसंतुष्ट लोकांनी इथे थांबायला हरकत नाही. पण ज्यांना ’सामुहीक डोक्यात जाण्याच्या’ कल्पनेचा प्रगत थरार अनुभवायचा असेल त्याने पुढच्या नाट्याला प्रारंभ करावा.
सर्वप्रथम लोकांमधून उमटणार्‍या ’श्या’, ’चुक् चुक्’, ’शी’, ’काय हे’ असल्या प्रतिक्रीयांकडे साफ कानाडोळा करावा. मोबाईल ज्यात आहे तो सोडून इतर सर्व खिसे चाचपल्याचा/धुंडाळल्याचा अभिनय करावा.
इथे तात्कालिक परिस्थितीनुसार जीन्सच्या खिशात हात अडकून बसलाय, पाण्याची अथवा पिऊन ठेवलेल्या कोल्ड्रींकची बाटली लवंडली वगैरे variations घ्यायला लेखकाची हरकत नाही.
जवळ कॅरीबॅग असेल तर त्यात पूर्ण आतपर्यंत हात घालून वाद्यांपेक्षाही मोठा आवाज होईल अश्या रितीने ती चुरगळावी. चष्माधारी व्यक्तींनी आधी काही वेळ चष्मा काढणे, साफ करणे, पुन्हा घालून मोबाईल शोधायला लागणे असे उपचार आचरावेत.
शोधकार्य चालू असताना ’आत्ता नेमका कुणाचा फोन आला?’, ’कुठे ठेवला बरं फोन?’ असे प्रश्न पुटपुटत रहावे. एव्हाना रिंगटोनच्या गाण्याचे पहिले आवर्तन पूर्ण होऊन त्याचे पडसाद स्टेजवरही उमटायला लागलेले असतात. आता फोन सापडल्याचा आविर्भाव आणावा. त्या खिश्यातून मोबाईल काढण्यासाठी खुर्चीत अर्धवट उठून बसण्यापासून ते पाय समोरच्याच्या खुर्चीखाली लांब ताणण्यापर्यंत सर्व शक्कली लढवाव्यात. फोन बाहेर निघत असताना शक्य तेवढ्या सर्व वस्तू खाली पाडाव्यात. ती उचलण्याचे निमित्त करून उरलेली भेळ सांडावी.
आपण खाली वाकलेले असताना हॅंडसेट मात्र उंच वर धरावा जेणे करून आपली रिंगटोन समस्त प्रेक्षागृहाला व्यापून टाकेल.
आता इथून पुढचा टप्पा मात्र अगदी बेरकी साधकांसाठी आहे. मार्ग खूप खडतर आहे. पण त्यातून तरून गेल्यावर लाभणारा असुरी आनंद काही औरच आहे. प्रत्येकाने आपल्या बाय-सेपचा साईज, LIC Policyची संख्या आणि रक्कम, जवळच्या पोलिस मित्रांचे नंबर इत्यादींचे यथोचित भान राखून पुढील भाग अवलंबणे हेच इष्ट!
मोबाईल काढल्यानंतर आपण खुर्चीत स्थिर होऊन बसावे. गाणे चालूच आहे. इनकमिंग कॉलच्या बॅकलाईटमुळे तुमचा चेहरा उजळून निघालेला आहे. आता भगवंताने दिलेल्या या सुंदर चेहर्‍याचा यथायोग्य उपयोग करून घेण्याची नामी संधी तुम्हाला बहाल झालेली आहे.
आपण नितांत गोंधळल्याचे भाव आणावेत. मगाशी चष्मा काढलेल्यांनी इथे तो परत घालून फोनवरील नंबर वाचण्याचा निष्फळ प्रयत्न करावयाचा आहे. इतरांनी फोनवर आलेल्या नंबरकडे (अप्पा बळवंत चौकातील पुस्तक दुकानातील कर्मचारी हातातली कामे सोडून एकाच ग्राहकाकडे अगर रस्त्यावरील रहदारीकडे पहात राहतात तसे) बघत रहावे. एव्हाना तुम्ही तिथे उपस्थित असलेल्या बहुसंख्य लोकांच्या डोक्यात गेलेले असता.
इथे आपण फोन कट करून खांदे उडवत परत चित्रविचित्र आवाज करत तो फोन आत ठेवू शकतो. पण तुम्ही जर इतक्याने मन न भरलेले खंदे वीरपुरूष असाल तर आपण आता ’सामुहीक डोक्यात जाण्याच्या’ क्लायमॅक्सकडे जाऊया.. ही स्टेप प्रत्येकाने आपल्या जोखमीवर घेणे अपेक्षित आहे.
निष्णात वाचकहो, आता कॉल चक्क रिसीव्ह करावा. ’मी आत्ता एका कार्यक्रमात आहे’ हे वाक्य हळूच बोलल्याचा आव आणत पण खरं तर बॅकस्टेजपर्यंत ऐकू जाईल अश्या बेताने म्हणावे. अजून रसनिष्पत्तीसाठी ’त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात घे रे’, ’फोल्डरला राईट क्लीक कर...दिसतंय ना ते पिवळे फोल्डर’, ’हॅल्लो...कुठे आहेस? विरारहून अंधेरीला चालला आहेस का?’ किंवा ’अहो मॅडम, तुमचे पैसे कुठे पळून जात आहेत का? कार्यक्रम संपल्यावर मी ब्रॅंचला लगेच येतो’ अशी वायफळ वाक्ये मोठ्यांदा उच्चारावीत.
लोकांची शिवीगाळ, तिरस्कारपूर्ण कटाक्ष, आरडाओरडा, शाप शांतपणे झेलावेत आणि आपण इतक्या बखुबीने इतक्या मोठ्या जनसमुदायाचं रक्त तापवलं/उसळवलं/वाया घालवलं या विकृत आनंदात रमून रहावं !!

डिसक्लेमर:
१. या प्रयोगाने चिडून जाऊन एखाद्या सहप्रवाश्याने तुमचा मोबाईल (’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मध्ये फरहान ह्रतिकचा फेकून देतो तसा) बाहेर फेकून दिल्यास लेखक जबाबदार नाही. चाणाक्ष लोकांनी अश्या वेळी कंपनीने दिलेला हॅंडसेट, अनेक वर्षे पडून असलेला जुना दणकट नोकीया किंवा सासुरवाडीच्या लोकांकडून एका दिवसाच्या वायद्यावर मागून आणलेला फोन वापरावा !!
२. हे डोक्यात जाण्याचे टेक्निक ’आयुष्यावर बोलू काही’ मध्ये चुकूनही वापरू नये. तिथे याचा प्रयोग करणे म्हणजे स्वतःच्या पायावर ’कपिल सिब्बल’ पाडून घेण्यासारखे आहे. असला वावदूकपणा करणार्‍या मंडळींवर ’आबोका’च्या स्टेजवरील मान्यवरांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे बाजी उलटून असले चाळे करणारा गुन्हेगार त्यांच्या विनोदाचा एक भाग केंव्हा बनून जाईल हे सांगता येत नाही.
मान्यवरांकडून उडवली गेलेली खिल्ली, चुरचुरीत विनोदी पद्धतीने घेतला गेलेला समाचार आणि त्याला सहप्रेक्षकांचा मिळालेला कानठाळ्या बसवणारा प्रतिसाद यामुळे एखाद्याच्या आत्मविश्वासाला major तडे जाऊ शकतात !!
३. श्रीराम लागू, नाना पाटेकर, विक्रम गोखले, राहुल सोलापूरकर, मकरंद देशपांडे इत्यादी मंडळी भूमिका करत असलेल्या नाटक समयी हा प्रयोग करणे हे आपल्या व समाजाच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते !!

युक्ती (४) सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालणारी बालके –
वर दिलेल्या युक्ती क्रमांक ३ मध्ये जीवाला असलेल्या संभाव्य धोका टाळायचा असेल आणि तरीही ’सामूहिक डोक्यात जाण्याच्या’ भावनेचा आनंद लुटायचा असेल तर या अमोघ मार्गाला पर्याय नाही. बहुतांश मुलांमध्ये आपल्या पालकांचे गुण उपजतच आलेले असल्याने द्वाडपणा व संभावितपणा शिकवण्याचे विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. मुलांनी कसा आणि किती गोंधळ करावा याचे काही विशेष ठोकताळे नसल्याने ती गोष्ट आपण व्रात्य अपत्यांवर सोडून द्यावी. सार्वजनिक कार्यक्रमात दंगा करणार्‍या मुलांचे ढोबळमानाने पुढीलप्रमाणे चार प्रमुख प्रकार पडतात -

(अ) अकलनीय शब्द अथवा सुरस आवाज काढणारे – जसे ’आव्व्व्व्व’, ’धुडुम’, ’क्वाड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड’, ’बाब्य्य्य्य्य्य्य्य्या’. श्रोत्यांकडून मिळणारा हशा हे त्यांचे बलस्थान.
(आ) रडणारे/किंचाळणारे/हुंदके देणारे – या मुलांना जितके शांत करायला जावे तितके त्यांचे रडणे अधिकच वाढते असा सार्वत्रिक अनुभव आहे
(इ) खुर्च्यांच्या मध्ये, पॅसेजमध्ये, स्टेजसमोरील मोकळ्या जागेत खेळणारे – चेंडूपासून शिवणा-पाणीपर्यंत आणि कोलांट्या उड्यांपासून ते हावभावापर्यंत कोणत्याही मनोरंजक खेळात मग्न असलेले.
(ई) कार्यक्रम भर रंगात आलेला असताना थेट स्टेजवर अथवा कलाकाराच्या समोर जाऊन उभे ठाकणारे – ही सर्वात धीट आणि हाताळायला आगाऊ जमात. असे बालवीर पुढच्या क्षणाला काय करतील याचा अंदाज येऊ न शकल्याने भलेभले कलाकारही यांना वचकून असतात. मोठमोठ्यांची पत्रास न बाळगायची (आणि त्यांची फजिती करायची) सवय लागल्याने अशी मुले पुढे जाऊन अर्णब गोस्वामी, राजदीप सरदेसाई, दीपक चौरासिया, सागरीका घोश, बरखा दत्त, निखील वागळे इत्यादी नावांनी कुप्रसिद्ध होतात.

आपले मूल यापैकी कोणत्याही गटात बसत असले अथवा नसले तरी कार्यक्रमस्थळी त्यांना उधळू दिले की ते उपस्थितांच्या डोक्यात रितसर जाते ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
कार्यक्रम/समारंभ रंगात आलेला आहे. श्रोते/प्रेक्षक तल्लीन झालेले आहेत. कलाकर ऐन भरात आले आहेत. वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण ! आपल्या चिरंजीवांच्या अथवा कन्येच्या उपद्रवमूल्याचा रसरशीत आविष्कार होऊ देण्यासाठी याहून चांगली घटीका ती कोणती?
गाण्याच्या अथवा कवितेच्या कार्यक्रमात किंवा गंभीर सिनेमाच्या वेळी भोकाड पसरणार्‍या लहान मुलापरता ’डोक्यात जाण्याचा’ दुसरा जालीम उपाय नाही.
एकीकडे बालकांना त्यांची प्रतिभा मुक्तहस्ताने उधळण्याची मुभा देत असताना आई-बाबांनी मात्र कपाळ्यावर आठ्या किंवा ’काय करू? कसं सांभाळू? ऐकतच नाहीये’ अश्या भावना दर्शवणारे हताशतेचे भाव धारण करावेत. आतून उकळ्या फुटत असतानाही केवळ चार-दोन प्रेक्षकांच्या रागीट नजरांमुळे आपल्या मुलांना पकडायला अगर शांत करायला जाऊ नये. अगदीच आणिबाणीची परिस्थिती ओढवल्याने मुलांच्या पाठीमागे जावे लागलेच तर तो गोंधळ द्विगुणित कसा होईल हे निग्रहाने पहावे.
कितीही डोक्यात जात असलो तरी पालकत्वाच्या सहानुभूतीमुळे आपल्यावर थेट कसलीही कारवाई होणार नाही याबद्दल आपण अगदी निःशंक असावे !
(क्रमशः)