Sunday, August 7, 2011

गाणे - ’कन्या’ राशीचे

प्रास्ताविक :
कपाळाला जास्ती आठ्या घालण्याचे कारण नाही. ’कन्या’ राशीच्यांचे दुखणे ’कन्या’रासवालेच जाणे ! आज अचानक हे गाणे सुचले.... एकदम out & out ’कन्या’वान व्यक्तीचे हे स्वगत... एक कडवे सोडले तर बाकी सर्व पद नर्मविनोदी अंगाने वाचायचे आहे - वास्तवतेचे भान न सोडता !!
पटले तर ठीक नाहीतर ’कन्या’ राशीच्या व्यक्तीचा आवाज तरी असा कितीसा असणार?
तर मंडळी, वाचा, ताडून पहा, आनंद लुटा पण डाव्या मेंदूतून उठणारे तार्कीक प्रश्न नकोत :P (ही खास पुणेरी सूचना !!)

झाले उपाय, नाना विपाय, अंती एकच स्फुरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥धृ॥

आम्ही गावयास गेलो
मारे ऐटीत नवी पाऊसगाणी,
ढगांचा दोष नव्हता काही
आमुच्याच खिशात खोटी नाणी,
भिजताना उगाच उद्याचे, श्रावण सगळे स्मरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥१॥

आम्ही टेकायाला गेलो
त्या त्या निकट पाऊलखुणा,
भासच होते संकेत सगळे
आधारही होता चक्क उणा,
हाय ! सुटणारे टोक, मी मजपाशी धरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥२॥

आम्ही द्यावयास गेलो
जगास मदतीचा हात,
आपुलकीच्याच डोळ्यांनी केला
साधून कसा अचूक घात,
बेईमानीचे रोज असे, अनेक झरे जिरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥३॥

आम्ही पकडाया गेलो
फुलपाखराच्या चंद्रपंखांना,
दार त्वरीत लावून घेतले
त्यांनीही आमच्या सुखांना,
पायी सोडलेले परागकण, फक्त हाती उरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥४॥

आम्ही पोहोचाया गेलो
पैलतीराला , मारूनी प्रयत्नांचे हात,
इतका शीणला जीव प्रवासी
चणे मिळूनही शिल्लक नाहीत दात !!
सकाळीचे कोरे कपडे, वाट पाहून पाहून विरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥५॥

आम्ही हसाया गेलो
पाहून आनंदाचे क्षण,
दिसले नाहीत कधीच,
त्या आत लपलेले व्रण
नशिबही कुढून आत, एकदा खरेच झुरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥६॥

आम्ही कराया गेलो
पुन्हा एकदा शब्दांचा खेळ,
विनोदी नच जाहली तरी
साधण्यास कवितेने वेडी वेळ,
लांब चेहर्‍याचे गंभीर मन, कवितेतही शिरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥७॥

आणि….
शेवटी म्हणायचं काय?
तर मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते !!! :P