Tuesday, July 26, 2011

(आणि २६ जुलै च्या निमित्ते......)

६ वर्षांपुर्वी मुंबईत आला होता तो प्रलयंकारी पाऊस.... याच दिवशी, नाही का?
काही जणांच्या होत्याचं नव्हतं करणारा.... कित्येकांच्या जगण्याच्या तर्‍हाच बदलून टाकणारा......

या संहारक पावसाने उद्ध्वस्त झालेल्या एका स्त्रीचं हे मनोगत.... अकस्मात आलेल्या या जल-संकटाने तिचा पती हिरावून नेलाय.. काडी काडी जमवून उभा केलेला संसार मोडून टाकलाय...... कसा भासला असेल तिला हा पाऊस? वाफाळल्या कॉफी सोबत आपल्या सुरक्षित खोप्यामधून मजेत ओली गाणी ऐकताना या विचाराने हलवून टाकलं... प्रस्तुत कवितेचं साहित्यीक मूल्य फार नसलं तरी असा वेगळ्या रौद्ररूपात भेटलेला पाऊस तिच्या थिजलेल्या संवेदनांनी मांडण्याचा हा प्रयत्न ! नेहमीप्रमाणेच लाक्षणिक, संकेतार्थी वगैरे वगैरे.....

पाऊस वैरी बनून काल
माझ्या कुंपणात घुसला,
नाच नाचून त्याने
उभा संसार पुसला !

नव्हते त्याला भान
भिंती सांडून टाकताना,
आभाळाला नाही दया
काळीज असं लुटताना !

आता नाही हात पाठी
दोन चिमण्या पिलांना,
लाटा उफाळून आल्या
नेती खुडून फुलांना !

नाका तोंडात पाणी
आणि डोळ्यात ऊन खारे,
डोई कोसळत्या धारात
स्वप्न वाहिले ते सारे !

गोड हळवा पाऊस
फक्त गाण्यात राहिला,
काल गाठून त्याने
उभा संसार पुसला.....

काल गाठून त्याने
उभा संसार पुसला..... !!