Saturday, July 9, 2011

भेटी लागी जीवा

ओढ.. एक अनामिक ओढ..... याच ओढीपायी तहान-भूक, उन-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत....एकच गूज-"संपत्ती सोहळा नावडे जीवाला । लागलासे टकळा पंढरीचा".....
महाराष्ट्राचे लोकदैवत आणि आराध्य असलेल्या श्री पांडुरंगांचे समचरण पाहण्यासाठी प्रत्येक भागवत उत्सुक झालेला... इकडे पावसाची हलकीशी सर येऊन गेलेली.... आकाशाने सुद्धा विठाईचा सावळा रंग धारण केलेला.... आज पुणे शहरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‍गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन !... एरव्ही पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचा आटापीटा करणार्‍या सामान्य जीवांना त्यांच्याही नकळत आज भक्तीचा हलकासा स्पर्श झालेला.... ’गणेश कला क्रीडा मंचा’च्या भव्य हॉलमध्ये पाऊल टाकताच वातावरणात दाटलेला भक्तीभाव जाणवू लागला. एरव्ही टीव्ही चॅनेलच्या शो साठी सारे कसे खोटे खोटे चेहरे घेऊन येतात... पण आज इथे थेट पंढरपूर अवतीर्ण करण्याची क्षमता असलेले कलाकार आणि निवेदक असल्याने प्रेक्षकही साजूक बनून आलेले !
"ज्ञानोबा माऊली तुकाराम" अशी साद कानावर पडताच हात जोडले जात नाहीत, अबीर बुक्क्याचा वास मनभर दरवळत नाही आणि टाळ, चिपळ्या, मृदुंगाचा नाद हृदयाला जाऊन भिडत नाही तो मराठी माणूस कसला? अश्यातच पडदा वर जातो.... भुलोकीचे वैकुंठ म्हणवल्या जाणार्‍या पंढरपूरचे आणि वारीमधल्या मनोज्ञ क्षणांचे दर्शन घडवणारा रंगमंच.... रंगमंच कसला? भक्तांचा दरबारच तो.....
वादकांच्या धीरगंभीर सुरूवातीनंतर नामधून सुरू होते - "जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी". समोर मांडी ठोकून बसलेल्या पाचही मान्यवरांनी केलेल्या स्वरवर्षावाचा हा धावता आलेख !
***********************आनंद भाटे. स्व. पं. भीमसेन जोशींचे अंतरंग शिष्य!
’किराणा’ घराण्याचा वारसा पंडीतजींनी ज्यांच्या हातात मोठ्या विश्वासाने आणि प्रेमाने सुपुर्त केला ते लोकविलक्षण गायक आनंद भाटे...
अगदी लहान वयापासून निसर्गदत्त गायनी कळेला ज्यांनी तपश्चर्या मानलं ते आद्य गायक आनंद भाटे..
’बालगंधर्व’ चित्रपटाने इतिहास रचण्यापूर्वी कितीतरी आधीपासून मैफिलीच्या मैफीली आपल्या गळ्याच्या करामतीने मंत्रमुग्ध करून टाकणारे आनंद भाटे....
’इंद्रायणी काठी’ या त्यांच्या गुरूंनी अजरामर करून ठेवलेल्या पदाने आनंद भाटेंनी प्रारंभ केला. ’किराणा’ घराण्याची खासियत असलेल्या जोरकस ताना, स्वच्छ दाणेदार आवाज आणि सूरांवर कमालीची हुकुमत! राहुलबरोबर ’कानडा राजा पंढरीचा’ सादर करताना त्यांचा लागलेला आवाज तर लाजवाबचं !!
’तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ अभंगाने पार्थिव-अपार्थिवामधली रेषा जवळजवळ पुसून टाकलेली....
’जोहार मायबाप जोहार’ ही तर भाटेंची स्पेशालिटी. ’जोहार गावं तर फक्त आनंद भाटेंनीच’ अशी सांप्रत मराठी संगीत वर्तुळात एक वदंता आहे !! ’हे असं का?’ या प्रश्नाचं यथार्थ उत्तर मिळायला फारसा वेळ लागला नाही. अतिशय उत्कट भाव ओतून त्यांनी असा काही ’जोहार’ आळवला की दगडालाही पाझर फुटावा....
’अगा वैकुंठीच्या राया’ ने या सांगतेच्या भैरवीने कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू गाठला गेला. पुन्हा एकदा आनंद भाटेंनी ’आनंदगंधर्व’ ही पदवी सार्थ ठरवताना संपूर्ण प्रेक्षागृहाला अक्षरशं बेभान करून सोडलं. हजारो जीवांच्या वतीने जणू ते नारायणाला साद घालत होते. सगळा आसमंत भगवंतमय करून टाकणारा त्यांच्या आवाज आजही कानात घुमतो आहे.....
***********************
’ज्ञानेश्वर मेश्राम’ म्हटले की आपल्याला थेट माऊलींची ’आळंदी’ आठवते. तिथले अनौपचारीक पण स्नेहार्द्र वागणं घेऊन आलेला हा गुणी गायक. गावच्या मातीचा गंध बेमालूमपणे गाण्यामध्ये मिसळत ज्ञानेश्वर सच्च्या दिलाने आपली गानसेवा सादर करत असतो. ’कांदा, मुळा आणि भाजी’ या मोठ्या गोड अभंगाने त्याने प्रेक्षकांना जिंकून घेतलं. ’विठू माऊली तू’ आणि ’सोनियाचा दिस आज अमृते’ या दोन गीतांनी यथायोग्य भावाची पखरण केली. ज्ञानेश्वरने खरी कमाल केली ती गुलाबराव महाराजांच्या सुप्रसिद्ध ’राधे चाल बाई चाल’ या गवळणीच्या सादरीकरणातून... महाराजांच्या प्रज्ञाचक्षूला दिसलेलं गोपाळकृष्णांचं आणि राधेचं मनोहारी दर्शन त्याच्या खटकेबाज स्वरात ऐकताना मज्जा आली.
***********************
’IBN-लोकमत’ वाहिनीने तीन वर्षांपूर्वी आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम सुरू केला. पंढरीचा राणा कुणाला कमरेवर हात ठेवून उभा असलेला दिसतो, कुणाला जनीची कामे करताना दिसतो, कुणाला सावता माळ्याच्या शेतातील कांदा, मुळा आणि भाजी झालेला दिसतो तर कुणाला भक्तांबरोबर चंद्रभागेच्या वाळवंटी नाचताना दिसतो. संतांच्या शब्दांना सूरात गुंफून त्याचंच प्रातिभ दर्शन घडवण्याचं काम ’भेटी लागी जीवा’ या कार्यक्रमाने सुरू झालं. मागील दोन वर्षे आपल्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेमुळे लोकप्रिय ठरलेल्या या संकीर्तनाचे हे तिसरे पुष्प....
***********************
सावनी शेंडे-साठ्ये ची ओळख जाणकार आणि विचक्षण श्रोत्यांना नव्याने करून देण्याची अजिबात गरज नाही. कसदार श्रुतींचे निधान सतत जवळ बाळगून असलेल्या सावनीचे गायन हा खरोखरच एक अनुपम्य अनुभव असतो. अंतःकरणाचा थेट वेध घेणार्‍या सूरांची उपजत लाभलेली दैवी देणगी, मांडणीतील रंजकता, समोरच्याला तोष होईल अश्या सहेतुक पद्धतीने केलेली पदाची बांधणी आणि गायनाला लाभलेली निरागस, प्रसन्न, सहज व्यक्तीमत्वाची झालर यामुळे सावनीच्या मैफीली या कायमच दीर्घकाळ स्मरणात राहणार्‍या ठरतात.
’बोलावा विठ्ठल’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे तिने ’गणेश कला क्रीडा’चे प्रांगण अगदी भारून टाकले.
संत नामदेवांच्या काही रचना या अवाक करून टाकणार्‍या आहेत. त्यातीलच एक ’आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥’ हा भावस्पर्शी अभंग सावनीने कमालीच्या ताकदीने पेश केला. असं खिळवून टाकणं सावनीच करू जाणे....
कर कटीवर ठेवून अठ्ठावीस युगे उभा असलेला पांडुरंग.... भक्तांच्या पदरवाकडे मोठ्या उत्कंठेने पाहणारा पांडुरंग.... भोळा-भाबडा भाव घेऊन दारात येणा सर्वांना स्वतः सन्मुख जाऊन आलिंगन देणारा पांडुरंग.... सावनीने त्याच्या मनातले स्फूट असे काही प्रकट केले की डोळ्यात टचकन्‌ पाणी...
हे कमी की काय म्हणून तिच्या आज्जी कुसुमताई शेंडेंनी संगीतबद्ध केलेली अप्रतिम बंदीश ’मायबापे केवळ काशी’...... सूरांच्या उद्यानात आम्हाला मोठ्या आनंदाने व भाविक हृदयाने फिरायला घेउन जाणारी सावनी स्वतः देखील ठेहरावात बुडून गेलेली ! सगळीकडे नुसता एक शुचिर्भूतपणा दाटलेला....
सावनीची भैरवी ’अवघा रंग एक जाला’ तर नखशिखांत भिजवून गेली. वाह! सोयराबाईंसारख्या लौकीकार्थाने अशिक्षीत स्त्रीने वर्णन केलेली ’पाहता पाहणे गेले दुरी । म्हणे चोखयाची महारी ॥’ अशी अवधूतावस्था.... थेट ब्रम्हभावाच्या अनुभूतीचे शब्द... त्यात घनीभूत झालेला तो सगुण,साजिरा पंढरीनाथ... आणि त्या उच्चकोटीच्या अवस्थेला अक्षरशः समोर साकार करणारे सावनीचे गायन.... ’रंगि रंगला श्रीरंग’ हे तिथं उपस्थित असणार्‍या प्रत्येकाचं पालुपद बनून गेलं जणू !!
***********************
मायमराठीला ’अमृतातेही पैजा जिंके’ अशी पदवी ज्ञानेश्वर महाराजांनी का बहाल केली असेल याचा मी बरेच वेळा विचार करतो. ’भेटी लागी जीवा’च्या निमित्ताने मिलिंद कुलकर्णींचं ओघवतं निवेदन ऐकायला मिळालं आणि त्या प्रश्नाचं काहीसं उत्तर दिसल्यासारखं झालं. कुलकर्णी व्यासपीठावरून बोलू लागले की शारदीय कळा जणू मूर्त रूपात येऊन त्यांच्या मुखावाटे अविरत स्त्रवू लागते. अतिशय व्यासंगी, बहुश्रुत, कलासक्त आणि साहित्योपासक असलेला हा अष्टावधानी माणूस मूळ संहितेची लज्जत नेहमीच वाढवतो.
निवेदनातील नेमकेपणा, कार्यक्रमाला सुसंगत अशी चपखल उदाहरणे, परीणामकारक पण मनावर ठसणारा स्वच्छ, मोकळा आवाज, ऐनवेळच्या विषयांवर अत्यंत हजरजबाबीपणे केलेल्या मार्मिक टिप्पण्या आणि मैफीलीची सलगता टिकवून ठेवत, नव्हे ती अधिक रंगतदार करत केलेले मुद्देसूद विवेचन ही त्यांच्या सूत्रसंचालनाची ठळक सांगता येतील अशी वैशिष्ट्ये...
एखादी कलाकुसर असलेली मोत्याची माळ तितक्याच सुंदर पण भक्कम सोन्याच्या दोराने ओवावी तसे ’भेटी लागी जीवा’ची एकसंधता मिलींदच्या रसाळ निवेदनाने पेलली होती.....
"ज्ञानदेव मधील प्रत्येक अक्षराचे महत्व आहे. ज्ञानोत्तम, नरोत्तम, देवोत्तम आणि वरोत्तम... वरोत्तम का? तर त्यांनी वर ही असा मागितला जो पृथ्वीतलावरचा कोणाही अन्य भूतमात्राने मागितला नसेल ’जो जे वांछिल तो ते लाहो’...म्हणून ते ज्ञानदेव !"
अश्या अनेक दृष्टांतातून ’भेटी लागी जीवा’ पुढे सरकत राहतो.... संगीतसाधना, शब्दसाधना, श्रवणभक्ती एक होत जाते....काळाचं, परिस्थितीचं भान विसरून आपणही नकळत या शब्द-सूरांच्या पालखीत सामील होऊ लागतो !
***********************
राहुल देशपांडे. बस्सं नामही काफी है ! आजकालच्या तरूण वर्गात अभिजात संगीताची आवड निर्माण करणारा गुणी गायक, हरहुन्नरी पण नम्र कलावंत. प्रचंड लोकप्रियता, कौतुक आणि एक आख्यायिका बनून राहिलेल्या आपल्या महान आजोबांचा वसा सांभाळत असतानाच त्याची गायकी रोज नवेनवे शिखर पादाक्रांत करत असते. सुरूवातीला राहुलने "आधी बीज एकले" हे ’संत तुकाराम’ चित्रपटामधील पद मोठ्या आवेशात सादर केले. केशवराव भोळ्यांनी उत्कटतेने रचलेल्या या गीताला राहुलने आपल्या बिनचूक स्वरांनी असे काही डवरले की बस्सं.... राहुलसाठी संगीतक्षेत्रामध्ये आदरणीय असणार्‍या अनेक कलाकारांपैकी एक म्हणजे पं. कुमार गंधर्व. त्यांनी गायलेले तुकोबारचित "लक्ष्मीवल्लभा, दीनानाथा पद्मनाभा" हे ठेक्यातले भजन घेऊन राहुलने श्रोत्यांना तल्लीन करून टाकलं. वातावरण एकदम जमून आलेलं....आणि या सर्वावर जणू कळस चढवणारं राहुल आणि
आनंद भाटेंचं ड्युएट "कानडा राजा पंढरीचा" अतोनात दादींबरोबर कार्यक्रमातील सर्वात मोठा ’वन्स मोअर’ घेउन गेलं
***********************
अमर ओक यांचा चाहतावर्ग तसा फार मोठा.... ’अमर-बन्सी’ ची भुरळ आबालवृद्धांसहीत जाणकारांनाही.... निगर्वी, विनयशील, अत्यंत प्रतिभाशाली व सृजनशील बासरीवादक असलेले अमर ओक!
’भेटी लागी’ साजरा होत असताना अमरच्या जादुई बासरीचा आविष्कार श्रोत्यांना पहावयास मिळतो. ओकांनी ’माझे माहेर पंढरी’ हे संपूर्ण पद इतर वाद्यवृंदासहीत बासरीवर वाजवले. कहर म्हणजे एखादा निष्णात गवई घेतो तश्या ताना, आलाप, खास लयकारी त्या पोकळ बांबूच्या आणि श्वासांच्या अद्वितीय मिलाफातून..... दहाच्या दहा बोटे तोंडात जावीत अश्या थराराक कलाकृतीने कार्यक्रमातील सर्वात जास्ती टाळ्या मिळवल्या नसत्या तरच नवल !!
***********************
वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या गायक, वादकांच्या खांद्याला खांदा लाऊन तितक्याच आत्मविश्वासाने रंगमंचावर वावरणार्‍या आर्या आंबेकरचे सर्वांनाच अप्रुप होते. कमालीचा गोड गळा लाभलेली ही ’लिटल चॅंप’ सूरांशी नेहमीच प्रामाणिक असते.
’पांडुरंग कांती, दिव्यतेज झळकती, रत्नकीळ फाकती, प्रभा’ असे तिने नुसते म्हटल्याबरोबर प्रत्यक्ष परब्रम्ह असलेल्या त्या कानड्या विठ्ठ्लाची आभा आमच्या अंतरंगात....
आर्याचे शब्दोच्चार, तिच्या भावमुद्रा आणि कसलीही औपचारीकता न ठेवता अभंगातल्या स्थायी पदांना थेट घातलेला हात हे विषय नेहमीप्रमाणेच लक्षवेधक होते. त्यामुळेच की काय ’रूणुझुणु रूणुझुणु रे भ्रमरा’ सारखं गूढ काव्यही सुगम बनून गेलं....
’खेळ मांडीयेला’ या वैष्णव संप्रदायाचं उत्सवी वातावरण अधोरेखित करणार्‍या संत तुकारामांच्या अभंगाने तर सगळीकडे एक जबरदस्त चैतन्य निर्माण केलं. पण आर्याने अस्वस्थतेचे बांध फोडून डोळे वाहते केले ते कार्यक्रमाचे शीर्षक असलेल्या ’भेटी लागी जीवा’ने......भगवंताच्या दर्शनासाठी, त्याच्या कृपेसाठी, त्याच्या समीपतेसाठी कमालीचा आतुर झालेल्या परमभक्ताचे हे आर्त.... ’तुका म्हणे मज लागलीसे भूक। धावूनि श्रीमुख दावी देवा॥’ हे असे जिव्हारी लागणारे शब्द आर्या कुठेतरी खोल जाऊन गात होती आणि ती आस, ती तडफड आपल्याही आतमध्ये चालू आहे असं जाणवून गेलं... ईश्वरव्याकुळतेचा उद्रेक करणारं ’भेटी लागी जीवा’ नंतर कितीतरी दिवस कानात घुमत राहिलं !!!!
***********************
आपण पालखीला सामोरे जातो, मंदीरांमध्ये जाऊन हात जोडतो, तीर्थक्षेत्री जातो, आपल्याला काही कळो अगर ना कळो गाण्याच्या बैठकींनाही हजेरी लावतो, आपण संगीतामध्ये काही तरी शोधायला जातो आणि बहुतेक वेळा ओंजळ न भरल्याची तक्रार करतो. ’भेटी लागी जीवा’ सारखे कार्यक्रम मात्र अनपेक्षीतपणे काहीतरी भरभरून देऊन जातात आणि मग, ’धन्य ती गायनी कळा’ या समर्थांच्या उक्तीचा प्रत्यय या निमित्ताने येऊन जातो.
त्या नंतर मिटल्या डोळ्यांसमोर रेगांळत राहते चंदनाची उटी लावलेले पंढरीनाथांचे सावळे रूप, त्याच्या नामगजरात दंग होऊन गेलेले वारकरी, दिंडीत फडकणार्‍या पताका, श्री विठ्ठलांच्या अंगाखांद्यावर लडीवाळपणे विहार करणारे समस्त संतवृंद आणि या सात्विक विश्वाचे जवळून मनोमय दर्शन घडवणारे आपल्या लाडक्या कलावंतांचे सूर................
***********************
टीप: सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण IBN-लोकमत वाहिनीवर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे सोमवार दि. ११ जुलै २०११ रोजी दिवसभर होत राहील.