Wednesday, June 15, 2011

समईच्या शुभ्र कळ्या

***************************************************************************
थोडं.......थोडं सावरून बसायला हवं........ दाद देण्याइतपत तरी हातांना जागा मिळावी........अंगावरचा काटा लपवता आला तर उत्तमच....... पण डोळ्यातल्या खार्‍या पाण्याचं काय? असू दे.... असू दे........
रंगमंचावर ती आली की मग सगळ्याचा विसर पडेल बहुधा....
त्या जुन्या गोष्टींमधल्या अष्टधा सम्राज्ञीसारखी ती येईल.... चेहर्‍यावर गोड हसू असेलच पण नजरेत एक अनामिक शोध ! मी तिला एकदा विचारलंही "काय शोधत असतेस गाणं सुरू करण्यापूर्वी? कुठे अज्ञातात हरवलेली असतेस?" .... यावर खळखळून हसून ती म्हणाली, "’सा’ शोधत असते मी ..... कुठं सापडतोय का बघत असते तो षडज्‌..." प्रेटी यंग गर्ल ’आर्या आंबेकर’च्या या उत्तरावर मी अवाक्‌!
***************************************************************************
"एकदम त्रास्स्स्स्स्स्स गायलीस......... म्हणजे ’नक्क्को ते गाणं’ असं गायलीस.... काय वेडं लागलंय का तुला?" परीक्षक अवधूत गुप्ते आर्याच्या एका जबरदस्त परफॉरमन्स नंतर तिला म्हणत होता. आम्ही माना डोलावल्या. अवधूतची उत्स्फुर्त टिप्पणी एकदम चपखल होती.
गेले सहा महिने सह्याद्रीच्या कड्याकपार्‍यांचं, कोकणाच्या समुद्रकिनार्‍याचं, विदर्भ-मराठवाड्य़ाच्या अस्सल मराठमोळ्या मातीचं, खानदेशाच्या खुमारीचं, गोव्याच्या माडबनांचं आणि जगभर पसरलेल्या प्राकृताच्या लेकरांचं हेच मत होतं. आज अवधूतच्या मुखातून जणू मराठी संगीत ऐकणारा समस्त रसिकवर्गच बोलत होता.
असं प्रचंड छळणारं गाणं ही आर्याची श्रोत्यांना घायाळ करून टाकणारी भेट !!
***************************************************************************
आज १६ जून २०११. आर्या आंबेकरचा वाढदिवस.
***************************************************************************
’जाहल्या काही चुका’ ......... आर्याने थेट वरच्या सप्तकात शिरकाव केला आणि इकडे माझी दातखीळ बसली ! गाण्यातले वेटोळे.... चालीमधल्या दुर्दम्य भिंती..... डोळे पांढरे करणार्‍या जागा...... ऐकताना तोंडाला फेस येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आर्या मात्र मिटल्या पापण्यांच्या आत सूरांना घट्ट चिकटून होती. तो विषाद, ती भूतकाळाची सल इकडे दिवाणखान्यात लोडाला टेकून ऐकणं शक्यचं नव्हतं....... उगाच घश्यातले आवंढे लपवत मी बाहेर दाटलेल्या अंधाराकडे पहात राहिलो - वेड्यासारखा !
असाच प्रपात तिने ’नवल वर्तले गे माये’ ला अनुभवायला दिलेला..... ’हास्यची विलसे ओठी, अद्‍भूतची जाली गोठी’ नंतर घेतलेली नखशिखांत थरारून टाकणारी तान ... त्या पाठोपाठ कुठल्याही ’ईसीजी’ मध्ये न येणारी हृदयाची स्वैर स्पंदनं ..... मी परत अवाक्‌ !
***************************************************************************
स्थळ: अकलूज, जि. सोलापूर.
दहा ते बारा हजार श्रोत्यांनी खच्चून भरलेलं एका प्रथितयश शाळेचे पटांगण.

वेळ: विवीधरंगी दिव्यांच्या प्रकाशात लख्ख उजळून निघालेली संध्याकाळ.
औचित्य:
पंचरत्न स्टेज शो.
हस्त नक्षत्राचा पाऊस पडावा तशी एका पाठोपाठ एक धुंवाधार गाणी सादर होत होती. प्रथमेश, मुग्धा, कार्तिकी, आर्या आणि रोहीत विलक्षण फॉर्ममध्ये होते. समोरून कानठळ्या बसवणारा प्रतिसाद !!
पुढची पेशकश घेऊन निळ्या मोहक ड्रेसमधे सजलेली आर्या रंगमंचावर आली. प्रेक्षकांमधून घणाघाती टाळ्यांची मानवंदना. म्युझिक सुरू.....
संपूर्ण कार्यक्रमाचा नूरच पालटून टाकेल अश्या खट्याळ आवाजातलं आर्याचं गीत - "जा जा जा रे.. नको बोलू जा ना......जा जा मीही भिते काय कोणा?"...... आसमंत मंत्रमुग्ध.... जादूची कांडी फिरवल्यासारखा !
"जोरा तुझा का रे पुन्हा......सांग ना....?" ......चेहर्‍यावर उमटवलेला प्रश्न ... कसलेल्या अभिनेत्रीसारखी भावमुद्रा........ मी ठार अवाक्‌ !
***************************************************************************
’पंचरत्न’ पासून ते ’पोएट बोरकर स्पीकींग’ पर्यंत आपल्या वैविध्यपुर्ण कलेने सर्वांची मने जिंकून घेणार्‍या, ’अनामवीरा’पासून ते ’मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना’ पर्यंत आपल्या लक्षवेधक गायकीने अमीट ठसा उमटवणार्‍या, कधी गाल फुगवून गुरंफटून बसणार्‍या तर कधी मधाळ स्मिताने वातावरण प्रसन्न करून टाकणार्‍या, संगीतावर जीवापाड प्रेम करणार्‍या आणि त्यासाठी कितीही कष्टाची तयारी असणार्‍या आर्या आंबेकरचा आज वाढदिवस !
सारेगम लिटल चॅंपस ने कित्येकांची जीवनं पालटून गेली. ’न भूतो न भविष्यती’ असे अनेक चमत्कार या मुलांनी घडवले. त्याचं मांदीयाळी मधीलच एक - शांत तेवणार्‍या पण तेजस्वी समईच्या कळ्यांसारखी आर्या !
ओतप्रोत भरलेल्या शालीनतेला पुणेरी दिमाखाची जोड देणारी आर्या !
आवाजातील अशक्य गोडव्यानं भावगीताच्या स्वप्नाळू विश्वाला अजूनच हळवे बनवणारी आर्या !
'सहज सख्या एकटाच’, ’गगन सदन’, ’अवघा रंग एक जाला’, ’गर्द निळा गगनझुला’, ’पान खाये सैंया’, ’सरीवर सरी आल्या गं’, ’मी अशी एकटी, ’बालगंधर्व-बंदीश’, ’ये जवळी घे जवळी’, ’सखी गं मुरली मोहन’ अश्या कितीतरी गीतांमधून आपल्या मनामनात जाऊन बसलेली आर्या !
***************************************************************************
२००९ मध्ये पुण्यात शनिवारवाड्यावर ’लिटल चॅंपस्‌’चा एक शो झाला होता. तुडुंब गर्दीबरोबर सांगितीक बेहोशी शेकडो प्रेक्षक अनुभवत होते. आर्या तिचे शेवटचे गाणे सादर करण्यासाठी रंगमंचावर आली. वादक वाद्ये जुळवण्यात मग्न होते. या छोट्याश्या पॉजमध्ये प्रेक्षकातून एकजण जीव खाऊन ओरडला - "आर्याsssssssssssss.....छमछम"... आर्याने आपली भिरभिरती नजर एका क्षणासाठी रोखली. अतिशय निरागस चेहर्‍याने पण खूप गोड हसून तिने होकारार्थी मान डोलावली...... जणू या गाण्याची फर्माईश येणार हे तिने आधीच जाणलं होतं.........
तिचा बालसुलभ उत्साह, तिचे लकाकणारे डोळे, तिच्या मनात दाटून आलेला आनंद....मी अवाक्‌ !

हीच तिची निरागसता, हाच तिचा चांगुलपणा, हीच तिची प्रसन्नता टिकून रहावी.... यशाच्या, कीर्तीच्या, सन्मानाच्या शिड्या चढत असताना तिने असाच परमतोष आपल्या गाण्यातून आम्हाला देत रहावा..... आणि सात्विकतेचे कोंदण लाभलेल्या या समईचा प्रकाश दशदिशा फाकून उरावा.... माझ्यातर्फे तिला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!
***************************************************************************
(Aarya Birthday Special: "सरीवर सरी आल्या गं" from Album "आठवा स्वर". Click below player to listen !)