Tuesday, June 7, 2011

’ते’, ’हे’ आणि ’मी’

’त्यांचं’ असं म्हणणं आहे
की आता जास्ती ताणू नये मी,
गोष्टींचा करावा शेवट – श्रावणातल्या शुचिर्भूत कहाणीसारखा !
मी म्हणतो – होय करेन की....
आधी कळू तर देत मला कथेचा पूर्वार्ध !!

’ह्यांचं’ असं म्हणणं आहे
उगाच नरडे फाकण्यात अर्थ नसतो
जेंव्हा तुम्हालाच नसतो गंध, तुमच्या षडजाचा !
मी म्हणतो – मांडू द्यात हो मला
जशी मला उमगलीये तशी माझी कविता !!

’त्यांचं’ असं म्हणणं आहे
की फार एकटं एकटं फिरू नये आता मी,
सुख, समाधान, संस्कृती, प्रजा, आनंद, भक्ती
सगळं कसं द्विगुणित व्ह्यायला हवं !
मी म्हणतो – पायवाटांची सलगी
मला जास्ती बरी वाटते हो – खोट्या साथीदारांपेक्षा !!

’ह्यांचं’ असं म्हणणं आहे
झाड झाडाला वाढवते हे तरं खरंय,
पण अंगभर काटे घेऊन जन्माला आलात तुम्ही
आता ’शरद’ आणि ’वसंता’चं अप्रुप कशाला?
मी म्हणतो – ओबडधोबड खरा
पण निवडुंगही कधीतरी हिरवा असतो बरं !!

’त्यांचं’ असं म्हणणं आहे
की पंगस्त पायांनी शर्यतीत भाग घेऊ नये मी,
कडेला उभे राहून टाळ्या पिटणार्‍यांच्या
ताज्या, प्रच्छन्न विनोदाचा विषय होऊ नये मी !
मी म्हणतो – इथे जिंकायचंय कुणाला?
फक्त शर्यत पूर्ण करण्यातच मानावी सार्थकता !!

’ह्यांचं’ असं म्हणणं आहे
कुवतीनुसार स्वप्ने विणावीत एखाद्याने,
माणसाने कसं नेमस्त चालावं, बोलावं, वागावं
तीन तासाच्या सुखपटातील नायकासारखं !
मी म्हणतो – नकाशे आणि तक्ते खुप झाले
घेऊ द्या की कधीतरी मला वेडी रान-उडी !!

’त्यांचं’ असं म्हणणं आहे
की शब्दांचे खेळ आता बंद करावेत मी
आणि शोधायला लागावं एक भरभक्कम, फसवा मुखवटा,
पांढरं निशाण फडकवण्याची वेळ जवळ येते आहे !
मी म्हणतो – हात कायमचेच आहेत जोडलेले माझे
समोरची मूर्ती बदलत जाते प्रत्येक वेळी !!
...
’ह्यांचं’ ’असं असं’ म्हणणं आहे आणि ’त्यांचं’ ’तसं तसं’
मी ’ह्यांचं’ही ऐकतो आणि ’त्यांचं’ही ऐकतो
आणि बांधत बसतो आडाखे माझ्या जुन्या मनाशी,
त्याला पक्कं ठाऊक असावं बहुधा -
’ह्यांचं’ म्हणणं, ’त्यांचं’ म्हणणं आणि उरलेलं ’माझं’ म्हणणं !!