Tuesday, May 24, 2011

कुछ मीठा हो जाये !

(पूर्वप्रसिद्धी - सकाळ ’तनिष्का’ मे-२०११)
ज्याप्रमाणे मैफिलीची सांगता भैरवीने होते, क्रिकेट विश्वचषकाचा शेवट षटकाराने होतो, रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होते, नोकरीचा शेवट निरोपसमारंभाने होतो आणि जीवनाचा शेवट मृत्यूने होतो त्याच धर्तीवर मेजवानीच्या अंती एखाद्या पक्वान्नाचं असणं हे ठरलेलंच!! जेवणातले गोडधोड ही एक अटळ बाब म्हणून एव्हाना आपण स्वीकारलेली आहे. गोड पदार्थ अगर मिष्टान्न हा फक्त भारतीयच नव्हे तर जागतिक उदरभरणाचा परमोच्च बिंदू आहे. मूळ भोजन काहीही असो त्याची यशस्वी पूर्ती होण्यामध्ये या पक्वान्नांचा सिंहाचा वाटा असतो. असा भुकेल्यांच्या वाट्याला आलेला क्षण मधुर करून टाकणार्‍या बिनीच्या शिलेदारांपैकी काही निवडक मंडळींची ही थोडक्यात ओळख !

पुरणपोळी – काही काही पदार्थ हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन गेलेले असतात. बहुतेक प्रमुख सणांना अनिवार्य असलेली पुरणपोळी ही अशीच अखिल मराठी मुकादमखान्यात नियमितपणे आढळणारी वस्तू!
गूळ, डाळ आणि नेहमीच्या वापरातली कणिक अश्या सुगम वस्तूंना हाताशी धरून केला जाणारा हा पदार्थ मग थेट भल्या भल्या पक्वानांना आव्हान द्यायला निघतो. गाभ्यामध्ये भरलेल्या कमीअधिक गोड पुरणाला घट्ट कवटाळून वर मऊसुत पदर फडकवणारी पुरणपोळी सणाचा ’फील’ लगेच देऊन जाते.
गरमागरम पुरणपोळीला तुपाने आकंठ भिजवून त्याचा पहिला पिष्ठमय घास मुखात टाकताना होणारं सुख निव्वळ अवर्णनीय असतं. चवीला अतिशय चांगला असणारा हा पदार्थ करायला मात्र तितकाच अवघड आहे असे म्हणतात. जाणकारांनी अधिक खुलासा करावा! विशेषतः ’पुरण वाटणे’ या प्रक्रीयेला अनेक वर्षांपासून एक वेगळंच वलय प्राप्त झालं आहे. कधीही फसण्याची शक्यता असलेले पुरणाचे तंत्र जिला सांभाळता येते, तिचा घरामध्ये तातडीने ’सुगरण’ या उपाधीने सन्मान होतो. आजकालच्या यंत्राच्या आणि तंत्राच्या युगातही मन लावून, कष्टाने भरघोस पुरण वाटणार्यास गृहिणी पाहिल्या की आपली संस्कृती टिकून राहिली आहे याची मनोमन खात्री पटते.
पुरणपोळीची साथसंगत कोणी करावी हा वैयक्तिक आवडीनिवडीचा विषय आहे. दूध आणि कटाची आमटी हे पुरणपोळीचे पारंपारिक साथीदार. तुपात सचैल भिजलेली पोळी दूधात बुडवून खाताना स्वर्गीय सुख होतेच पण तिला आंबूस, तिखट अश्या कटाच्या आमटीची जोड लाभली की भोजनार्थीला एक वेगळीच रूचकर चव चाखण्याचे भाग्य लाभते. मराठवाड्यातील अथवा विदर्भातील काही काही मंडळी पुरणपोळी आमरसा बरोबर खाण्याचा प्रयोग करतात. पण हे म्हणजे किशोरी आमोणकर आणि लता मंगेशकर यांची संयुक्त मैफील ठेवण्यासारखे आहे. आपापल्या जागी दोन्हीही महान असले तरी आमरस हा आमरसाच्या बेहोशीत खावा व पुरणपोळी ही तिचा मान ठेवून साग्रसंगीत खावी हेच उत्तम.
येणार्‍या प्रत्येक सणागणिक पुरणपोळीची वेगवेगळी रूपे पहावयास मिळतात. श्रावणातली पुरणपोळी ही नाकातली नथ सांभाळत, शालीनतेची वस्त्रे लेवून आलेल्या घरंदाज कुलवधूसारखी भासते. खरं तर सगळा श्रावणंच एक पावित्र्याचा गजर करत येतो. त्याच दैवी आसमंतात, किंचीतश्या कुंद पावसाळी हवेत खरपूस, गरमागरम अश्या पुरणपोळ्या कुरोड्या-पापड्यांसह ताटात पडायला लागल्या की श्रावणातला घननिळा अंतःकरण व्यापायला सुरूवात करतो. पोळ्याची पुरणपोळी म्हणजे श्रमिकांच्या कष्टाने शिंपलेला प्रसाद वाटतो. लग्नाआधीच्या विधींमध्ये वाढल्या जाणार्‍या गुळचट पुरणपोळीमध्ये मंगलकार्य आणि मंगलकार्यामधील केटरींगवाला या दोहोंचीही टीपीकल खूण उमटलेली असते. श्राद्धपक्षात काही घरांमध्ये केल्या जाणार्‍या पुरणपोळ्या या अक्षरशः कर्तव्यकर्म उरकून टाकल्यासारख्या थोडक्यात आटोपलेल्या असतात. धकाधकीच्या जगातली पूर्वजांविषयीची ही अनास्था मग ताटात वाढलेल्या पोळीला गोड लागू देत नाही.
बाकी पुरणपोळीचा खरा मान आणि यथोचित सन्मान होतो तो होळीच्या दिवशी! या सणाला पुरणपोळीचा बेत जो काही जमून येतो त्याची सर कोणत्याही दिवसाला येणे नाही. यादिवशी पुरणपोळीला केंद्रस्थानी ठेवूनच जेवणाची रचना केलेली असते. ’होळी रे होळी, पुरणाची पोळी’ या हाकाळीबरोबर आपापल्या घरी केलेली पुरणपोळी मोठ्या आवडीने खाल्ली जाते आणि असे भुरके मारत तव्यावरच्या ऊन-ऊन पोळ्या खाणार्‍या कुटुंबियांना बघून हाडाच्या गृहलक्ष्मीला परम तोष प्राप्त होतो.

बासुंदी – दूधाचं दूधपण जाऊन त्याची माया घट्ट होऊ लागली की त्याला ’बासुंदी’ म्हणावं. बासुंदी हा जीभेसकट मनाला तोषवणारा एक असाधारण प्रकार आहे. सर्वसामान्यतः एखादी गोष्ट आटू लागली की आपल्याला दुःख होतं. पण इथे मात्र बासुंदीला फुटलेल्या प्रत्येक उकळीगणिक करणार्‍याचा उत्साह हा वाढताना दिसतो. बासुंदी हा खर्‍या अर्थाने राजेशाही पदार्थ. काही काही गोष्टी ठरवल्या तरी कुरूप बनू शकत नाहीत. त्या पद्धतीने गरीबाघरची काटकसरीची किंवा गर्भश्रीमंत्याच्या पाकखान्यातील सोनेरी पात्रांमध्ये वास्तव्याला असलेली बासुंदी ही चवीला लाजवाबच असते. तपमान आणि बाह्य भेसळीची नेटकी काळजी घेतली की तयार होणारी बासुंदी ही ’वाहवा’ मिळवूनच जाते.
बासुंदी चमच्याने खाणारे नेमस्त लोक मला पहावत नाहीत. डायबेटीस, शुगर, कोलेस्टेरॉल, बीपी, पित्त अश्या मानवविरोधी असंख्य शत्रूंमुळे काही काही जणांवर ही वेळ येते. पण इतरांनी मात्र बासुंदी हा ’खाण्याची’ नसून ’पिण्याची’ वस्तू आहे याच आविर्भावात घोट घ्यावेत. तोंडात मावेनाशी होऊन ओष्ठद्वयावरून ओघळणार्‍या सुमधुर थेंबांखेरीज जगात मनोहर अजून काही नाही याची प्रचिती आपल्याला निकराच्या बासुंदीप्राशनाने येते.
बासुंदीचा आग्रह हा साधारणपणे खाणार्‍याच्या डोळ्यांच्या फटीच्या घटत्या आकारमानानुसार करावा. बासुंदीचा जोर वाढत चाललेला असतो. जायफळ, वेलदोडे आणि इतर सुक्या मेव्याचे तुकडे अल्पावधीतल आपले काम दाखवायला लागलेले असतात. प्रत्येक घासागणिक पोट, जीभ, मन आणि मेंदू यांचा तीव्र झगडा चालू झालेला असतो. सुस्तीच्या सुनामी येऊन आदळू लागलेल्या असतात. त्याचा योग्य तो अंदाज घेऊन वाढप्याने पुढची वाटी भरावी असा पूर्वापार चालत आलेला संकेत आहे. पट्टीचे खाणारे मात्र कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे आपल्या गुंगीच्या खुणा लपवून ठेवत शक्य तेवढी बासुंदी आपल्या कंठात रिती करतात.
सांप्रत काळात, ’रबडी’ आणि ’रसमलाई’ या बासुंदीच्या दोन भगिनींचं प्रस्थ वाढलेलं दिसतं. दूधाला थोडं कमी आटवून त्यामध्ये गोळे सोडले की रस मलाई आणि त्यामध्ये इतर घटकांचं मिश्रण केलं की रबडी तयार होते. हे दोन्हीही पदार्थ एखाद्या स्वागतसमारंभात अगर सार्वजनिक कार्यक्रमात ठीक वाटतात पण घरगुती मिष्टान्नासाठी पारंपारीक बासुंदीला तोड नाही. बासुंदीमध्ये पेढे कुस्करून घालण्याची प्रथा अजूनही काही रसिक लोकांमध्ये टिकून आहे. क्वचित केंव्हा केंव्हा केशराच्या काड्या आणि मुबलक चारोळ्या घातलेली बासुंदीही आपल्या पुढ्यात येते.
बासुंदी थंड खावी की गरम याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. फ्रीजमध्ये पुरेशी थंड केलेली बासुंदी जीभेपासून जठरापर्यंत सर्व अवयवांना गोड गारवा देत जाते. त्यातील घनवटपणा द्विगुणित झाल्याचा अनुभव बर्‍याच मंडळींनी वर्णिला आहे. काही खवैयांच्या मते मात्र उकळी फुटलेली गरमागरम बासुंदी हीच खरी संतोषजनक पाककृती आहे. कुठल्याही पद्धतीने असो, बासुंदी ही खाणार्‍याला जालीम समाधान देऊन जाते हे मात्र खरं !

श्रीखंड – श्रीमंताघरी जन्माला आलेलं, एखादं चांगल्या नशिबाचं गुटगुटीत लेकरू असावं तसा श्रीखंड हा सर्वकाळी आपल्या मिजासीत वावरणारा पदार्थ आहे. कुंडलीत राजयोग घेऊनच श्रीखंडाने आपल्या भोजनाच्या प्रांतात पाऊल टाकलं असावं! चक्का, साखर आणि दिमतीला जुजबी इतर पदार्थ इतकीच सामुग्री असूनही पूर्णत्वाला गेल्यावर श्रीखंडाचा दिमाख असा काही वाढतो की इतरांना त्याचा तद्दन हेवा वाटावा!! घट्ट अश्या या दूग्धजन्य कृतीचा पहिलाच घास मिष्टान्नाची सर्वंकष खुमारी देऊन जातो. पुरी अथवा पोळी, वाटी अथवा डिश, घरगुती अथवा दुकानातील ब्रॅंडेड वेष्टन - कोणत्याही विकल्पामध्ये श्रीखंडाचा तोरा तसूभरही ढळत नाही. आधी डोळ्यांना व नाकाला पुरेश्या सुखोर्मी देऊन झाल्यावर मुखात घास घेतल्या क्षणापासून श्रीखंड जीभेशी लडीवाळ करू लागतं. जिव्हेच्या सर्व पेशींना हवेहवेसे लाडीक, मृदू स्पर्श करून होईस्तोवर त्या गोळ्याचं अवतारकार्य संपून देखील जातं. मग नादावलेल्या मनाने पुढचा घास घेणं, तो काही काळ तसाच तोंडात घोळत राहणं आणि मग अन्ननलिकेच्या अस्तरांना दुलईदारपणे खेटत खेटत त्याने इप्सित स्थळी पोहोचणं ही क्रिया बराच काळ चालू राहते. श्रीखंडग्रहणातलं सर्वोच्च शिखर गाठलं जातं ते पात्रातील श्रीखंड संपत आल्यावर! अंगठा वगळता हाताच्या कोणत्याही एका किंवा एकापेक्षा अधिक बोटांचा वापर करून उर्वरीत श्रीखंड चाटण्याची लज्जत काही न्यारीचं. चमच्यात अथवा पुरीमध्ये न सापडणारे अवशेष बोटांनी कब्जामध्ये घेऊन भांडे स्वच्छ, लख्ख केले की श्रीखंडपुराणाची इतिश्री होते.
आम्रखंड हा श्रीखंडाचा मोठा सौंदर्यवान उपप्रकार आपल्याकडे आढळतो. हापूस किंवा तत्सम उच्च प्रजातीच्या आंब्याचा गर अथवा रस घातला की एरव्ही उद्धट वाटणारी श्रीखंडाची श्रीमंत कांती एक हवेहवेसे रूपलावण्य धारण करते. आम्रखंड ही पाहताक्षणी प्रेमात पाडणारी पाककृती. केशरी रंगात न्हाऊन निघालेले, आंब्याच्या फोडींचे केंद्रशासित अस्तित्व विनातक्रार मान्य करणारे अन् अक्षयतृतीयेपासून ते लग्नाच्या रिसेप्शन पर्यंत सर्व ठिकाणी लक्षवेधक पद्धतीने मिरवणारे घट्ट आम्रखंड त्याच्या आठवणी कितीतरी काळ रेंगाळवत ठेवते.

जिलेबी – वळणं-वळणं घेत जाणार्‍या सगळ्याच गोष्टींचं मानवाला एक आदिम आकर्षण असतं. अनामिक वर्तुळांचा वेध घेत जाण्यात त्याचे आयुष्य जणू खर्ची पडते. पाकामध्ये बेमालूम मुरलेली, अनेक वेटोळ्यांनी स्वतःमध्ये गुरफटून बसलेली, एकाचवेळी कुरकुरीत आणि रसरशीत या दोन्ही लक्षणांनी युक्त अशी पिवळीधमक जिलेबी म्हणजे ताटाची शोभा कैकपटीने वाढवणारे प्रकरण आहे. जिलेबीची (प्राकृतातील उच्चार “जिलबी”) जाडी, आकार, विस्तार आणि वेटोळ्यांची संख्या ही जिलेबी तयार करणार्‍या व्यक्तीच्या सृजनशीलतेनुसार बदलत जाते. आपली कलाकुसर दाखवायला बल्लवाचार्यांना यापेक्षा मोठी संधी कुठेच मिळत नसावी. विशेषतः जिलेबीच्या सर्वात बाहेरच्या तिढ्याला सर्वात आतल्या आरंभबिंदूशी जोडण्यासाठी खानसामे जी काही कुशलता दाखवतात त्याने एखादा पट्टीच्या कलाकारालाही थक्क व्हायला होतं. मेंदीच्या कोनाची कल्पना जिलेबी तयार करण्याच्या रोमहर्षक कृतीकडे पाहून सुचली असावी असा अस्मादिकांना दाट संशय आहे.
कढईमध्ये जिलेबी उकळण्याचा कालावधी हा त्याच्या अंतिम गुणदोषांसाठी जबाबदार असा अत्यंत महत्वाचा घटक. कमी अथवा जास्त तळलेली जिलेबी मेजवानीचा इस्कोट करायला पुरेशी असते. त्यामुळे जिलेबी तयार करणार्‍याच्या मनाची एकाग्रता ही कायम कढई, कढईतील तूप अथवा पाक आणि त्या संयंत्राला मिळत असलेली आच यांच्याकडे एकवटलेली दिसते.
जिलेबी आणि विवाहभोजन यांचं एक अतूट नातं ठरून गेलेलं आहे. लग्नात मिरवणारी पिवळीधमक जिलबी मला नववधूच्या हरखून जाण्याचं आणि अंतरी फुललेल्या आमोदाचं प्रतिक वाटते. परातीमधून अगर मोठाल्या ताटांमधून केला जाणारा जिलेबीचा बेसुमार आग्रह हा अगदीच न टाळता येणारा प्रसंग असतो. ’एक जिलेबी’ असं परीमाण खरं तर आपल्याकडे अस्तित्वात नाही. हरीणाचे कळप, गुंडांच्या टोळ्या, अभिनंदनाचा वर्षाव किंवा प्रेक्षकांचे जथे असतात त्या प्रमाणे जिलेबी ही कायम दोन किंवा त्याच्या पटीमध्ये खाण्याची वस्तू मानली जाते. सुरूवातीच्या काही जिलेब्या तर फक्त माधुर्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी खाल्ल्या जातात. बाकी जिलेबीचा खरा अंमल हा आग्रहाने वाढलेल्या अतिरीक्त जिलेब्यांनीच सुरू होतो.
वर्षानुवर्षे जिलेबीची इमान-इतबारे साथ करणारा तिचा सोयरासांगाती म्हणजे मठ्ठा. अत्यंत विपरीत गुणधर्म असलेले हे दोन्ही पदार्थ एकत्र आल्यावर मात्र जबरदस्त धमाल उडवतात. मठ्ठा-जिलेबी खाण्यासाठी उठसूट कोणत्याही लग्नाला जाणारे कित्येक जिलेबीप्रेमी मला माहित आहेत. पैजा लावून जिलेबी खाणारे लोक हे तिच्या गोडीच्या प्रेमात कधीच नसतात. अश्या लोकांना चवीच्या पद्यापेक्षा अंकगणिताच्या गद्यामध्ये जास्ती रस असतो. त्यापेक्षा अर्धशिशीवर उपचार म्हणून प्रातःकाळी उठल्या उठल्या, तोंडही न धुता जिलेबी खाणारे पामर हेच तिचे खरे उपासक !!
जिलेबीमध्ये रंग टाकून तिला केशरी बनवणे किंवा तिची जाडी वाढवून ’इमरती’ नावाचा विचित्र पदार्थ तयार करणे यातून फार काही साध्य होते असे मला वाटत नाही. हे म्हणजे मूळच्या गोर्‍यापान, सुंदर मुलीने उगाच टॅल्कम पावडर लावून अगर विसंगत रंगाचा मेक-अप करून बाहेर पडण्यासारखे आहे. चमचमत्या पिवळ्या रंगाने नटलेली आणि आतबाहेर पाकाच्या ओलाव्याने नितळ झालेली जिलेबी हेच तिचे लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले साजिरे रूप....

खीर – पक्वान्नात वैविध्य आणायचं असेल तर ’खीर’ या लवचिक पदार्थाला पर्याय नाही. हव्या त्या मिश्रणात, हव्या त्या रूपात, हव्या त्या चवीत व हव्या त्या प्रमाणात पेश होणारी ’खीर’ म्हणजे अडीअडचणीला धावून येणारा देवदूत आहे. बहुतेक वेळा दूधाच्या समर्थ नेतृत्वाखाली कसलीही कुरबुर न करता सर्व घटकांनी आपापले योगदान दिले की ’खीर’ तयार होते. गरजेनुसार खीरीचे असंख्य अवतार स्वयंपाकघरात आणि तिथून थेट ताटामध्ये आविर्भूत होतात. शेवयाची खीर म्हणजे श्रीमंतांच्या रसमलाई अगर तत्सम भपक्याला गरीबांच्या अन्नपूर्णेने दिलेलं चोख उत्तर आहे. गव्हाची खीर उगाचच दंडातल्या बेटकुळ्या वर्धिष्णु झाल्याचा गोड गैरसमज करून देते. याचेच शहरी रूप असलेली दलियाची खीर आपला आटोपशीर व्यवहार नेमकेपणाने उरकत इतरांशी लगट टाळते. साबुदाण्याची खीर उपवासाचे महात्म्य पटवून देत असतानाच चेहरा स्थिर ठेवण्याची कला शिकवते. नाचणीची खीर नाडी तपासणार्‍या वैद्यासारखी गंभीरपणे काम करते. केरळी अथवा दाक्षिणात्य खिरी या अनेकविध उप-घटकांच्या भाऊगर्दीमध्ये मूळ ओळख हरवून बसलेल्या भासतात तर रव्याची खीर चवीला उत्कृष्ट असूनही दशक्रियाविधीसारख्या अमंगळ गोष्टींशी संबंध आल्याने जेवणाच्या टेबलावर उजळ माथ्याने फिरू शकत नाही. वास्तविक इतर राजमान्य पक्वान्ने उपलब्ध नसताना एक पर्याय म्हणून खीरींचा समावेश भोजनात केला जातो. पण या बद्दल कसलाही विषाद न बाळगता एखाद्या शिस्तबद्ध कॉम्रेडप्रमाणे खीर आपले कर्तव्य बजावून जाते.

लाडू – मिठाईच्या विस्तीर्ण प्रांगणामध्ये अढळस्थान मिळवलेलं बाळसेदार, लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणजे लाडू. या ना त्या कारणाने घराघरामध्ये लाडूभक्षणाचे प्रसंग सतत ओढवत असतात. लाडू म्हटले की तो गोल असायचाच. पृथ्वीच्या गोळ्याचा आकार घेऊन आलेल्या लाडवाला देवाच्या नैवेद्यामध्ये अग्रक्रम मिळतो. बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू, बेसन लाडू, कणकेचा लाडू, डिंकाचा लाडू, चुरमुर्‍याचा लाडू, नारळाचा लाडू, अळिवाचा लाडू, गुलकंद लाडू अश्या असंख्य ज्ञात-अज्ञात प्रकृतींमध्ये असू शकणारा लाडू खाणार्यांचचे चांगलेच लाड पुरवतो. लाडवाचा बोकणा भरल्यानंतरचे संभाषण हे स्वरांऐवजी ’उम्म’ ’वॉम’ ’ह्म्म’ ’ऑ’ ’ऑम’ अश्या व्यंजनांमध्येच जास्ती होत असते. त्यामुळेच की काय चाणाक्ष लोक लाडू कंठाखाली उतरेपर्यंत मौनाची कास धरतात. समारंभात अगर काही उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर लाडू वाटण्याची प्रथा आहे. पण असा औपचारिकतेच्या वर्खात गुंडाळलेला लाडू का कोण जाणे तितकासा गोड लागत नाही !
लाडूसमूहाचे रूपडे खरे उठून दिसते ते घरी मांडलेल्या लक्ष्म्यांच्या आराशीसमोर आणि दिवाळीच्या उत्सवी वातावरणात. या दोन्हीही प्रसंगी सर्व संकोच, सर्व काळज्या बाजूला ठेवून लाडवाच्या मोठाल्या खंडांनी आपले गाल फुगवावेत अशी बहुधा भगवंताची देखील इच्छा असावी... ताटात असो की पोटात, लाडू हा कमालीचे समाधान देऊन जातो असा सार्वत्रिक अनुभव आहे.

गुलाबजामुन – माणसाने मिष्टान्न का खावे याचे प्रत्यंयकारी उत्तर देणारा, हाती यायच्या आधीच मोहाची कुंपणे उध्वस्त करत वाढप्याच्या पात्रात मन गुंतायला लावणारा, रूप-रस-स्पर्श-गंध या चारही हुकुमी ऐक्क्यांमध्ये सरस असणारा व प्रत्येक भेटीत एक वेगळाच आठव देऊन जाणारा गुलाबजाम हे निर्विवादपणे एक श्रेष्ठ पक्वान्न म्हणून गणायला हरकत नाही. याच्या नावातील ’गुलाब’ भाकड अर्थाने आला असून ’जाम’ अथवा ’जामुन’ मात्र व्याख्येप्रमाणे खाणार्‍याची मती गुंग करायला समर्थ आहे. व्यावहारीक सोयीसाठी पाकातले आणि कोरडे असे गुलाबजामाचे दोन गट पाडले जातात. तसेच दंडाकार व गोल असे भौमितीक भेदभावही ते करण्याच्या पद्दतीनुसार ढोबळमानाने सापडतात.
गुलाबजाम हे खर्‍या अर्थाने स्वतंत्र पक्वान्न. ’याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्यावाचून’ अश्या करारी बाण्याने गुलाबजाम आपली जीवनयात्रा आक्रमत असते. आपलं अस्तित्व कुणावरही अवलंबून नसल्याने पोळीपासून ते चटणीपर्यंत कुठल्याचं बाह्यघटकाचा टेकू घेण्याची आवश्यकता त्याला भासत नसते. २/३ बहुमताने निवडून आलेल्या सरकारसारखं गुलाबजामचं तंत्र हे अगदी स्वायत्त बाण्याचं असतं.
जिलेबीप्रमाणेच गुलाबजाम हा एकापेक्षा अधिक अश्या मोजमापात खायचा पदार्थ आहे. विशेषतः पाकातले गुलाबजामून हे डोंगर रचून निथळणार्‍या पाकाकडे लक्ष न देता वेगाने खावेत असा रूढ नियम आहे. गुलाबजाम कधीही तोडून खाऊन नयेत. त्याचा मान हा समग्रतेमध्ये आहे. आपल्याला झेपणार्‍या आकाराचा गोळा उचलावा, पाकाला सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न करावा व सरतेशेवटी यातील फोलपणा ध्यानी आल्यावर आपली वस्त्रे सांभाळत आख्खा गुलाबजाम मटकवावा असे रसिकशास्त्र सांगते.
खरपूसपणा हा गुलाबजामची आसक्ती वाढवण्यास कारणीभूत ठरणारा एक प्रमुख गुणधर्म. अट्टल खवय्ये गुलाबजामच्या बाह्यरंगावरून त्याच्या चवीचा अंदाज बांधण्यामध्ये मश्गुल झालेले दिसून येतात. साखरेत लोळवलेले कोरडे गुलाबजाम हा अतीव समाधान देऊन जाणारा मिठाईचा प्रकार. इतकी वर्षे होऊन गेली तरी पाकासहीत अथवा पाकाविना नांदणार्‍या गुलाबजामुनाचे गारूड गोडघाश्यांच्या मनावर अद्यापही तसेच कायम आहे.

आमरस – आंबा म्हणजे फळांचा राजा. त्याचे वैभवशाली साम्राज्य कैरीच्या पन्ह्यापासून ते आंबा बर्फीपर्यंत दिमाखात पसरलेलं दिसतं. या राज्याचा मानबिंदू म्हणजे आमरस. लहानपणी गोष्टी ऐकताना, पुस्तके वाचताना जिथे जिथे ’अमृत’ हा शब्द यायचा, तिथे तिथे कोकणी हापूसच्या घट्ट आमरसाचीच छबी माझ्या डोळ्यांसमोर उभी रहायची. आमरस म्हणजे तृप्ती. आमरस म्हणजे घनीभूत गोडवा. आमरस म्हणजे समरसता आणि आमरस म्हणजे आतबाहेर ओथंबलेला रसास्वाद. काही गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा थेट त्यामध्ये उतरण्यात मौज असते. आमरस सेवन ही त्याच यादीतील अग्रक्रमाने येणारी बाब! वैशाखातल्या दुपारी सूर्य डोईवर आलेला असावा... निवांत, निष्पर्ण वातावरणात आंब्याच्या सालीचा अन् कोयीचा वास दरवळू लागावा.. मोठ्या पातेल्यामध्ये रत्नागिरी हापूसच्या रसाची पातळी क्षणागणिक वाढत जावी.... आपापल्या रूचीनुसार बर्फ, दूध किंवा बाधू नये म्हणून तूप घातलेलं आमरसाचं मोठं पात्र पुढ्यात यावं...घराचा कानाकोपरा पिवळाजर्द भासू लागावा.... आवेगाने पहिला भुरका घ्यावा आणि पोटात आमराई उमलून यावी.. आता कोकीळाचं कूजन आणि चैत्रातला मोहोर आमरसाच्या प्रत्येक हप्त्यागणिक रोमरोमात भिनायला सुरूवात व्हावी.. बास्सं! आमरस हा बोलायचा नसून त्यामध्ये नखशिखांत डुंबायचा विषय आहे!!

आईसक्रीम – जगामधील सर्व मानवांची विभागणी दोन गटांत करता येते – आईसक्रीम खाऊ शकणारे आणि आईसक्रीम खाऊ न शकणारे... आईसक्रीम आवडतच नाही असा द्विपाद प्राणी पृथ्वीतलावर सापडणे जरा कठीणच आहे. काही वैद्यकीय कारणांमुळे आईसक्रीम खाण्यावर बंधने आली की मनुष्याला अतीव दुःख होते. कसलेही दोष काढायला कणभरही जागा नसलेल्या आईसक्रीमने जनमानसाला अक्षरशः भुरळ घातली आहे.
वास्तविक नेहमीचेच दूध, साखर आणि संगतीला काही नैमित्तीक साथीदार घेऊन तयार केला जाणारा हा पदार्थ. पण शीतप्रक्रीयेचा परिसस्पर्श लाभला की थक्क करून टाकणारा जादूटोणा घडतो. गोठवलेल्या रूपड्यात स्वतःला अभिव्यक्त करत आईसक्रीम अश्या काही चित्तवेधक धाटणीने समोर येते की त्याला ’नकार देणे’ ही मरणप्राय घटना होऊन बसते. आईसक्रीम हा खर्‍या अर्थाने वैश्विक पदार्थ. जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही, कोणत्याही किमतीत उपलब्ध असणारे आईसक्रीम म्हणजे नवयुगातील मानवाला सापडलेला संतोषाचा ठेवाच आहे. आईसक्रीम केंव्हा, कसे आणि किती खावे याबद्दल जाणकारांमध्ये मतभिन्नता आढळते. वास्तविक या चित्तहारक, देखण्या कलाकृतीला स्थळकाळाचा कोणताही निकष नाही. भर थंडीमध्ये रात्रीच्या जेवणानंतर दात वाजत असताना, गार वाफा येत असलेल्या आईसक्रीम गोळ्याचा लचका तोडण्याची लज्जत जशी न्यारी तसे रणरणत्या उन्हात अंगाची लाही लाही होत असताना सॉफ्टीचा दाह शमवून जाणारा कोनही काही औरच!
आईसक्रीम हे भोजनाची कहाणी सुफळ, संपूर्ण करणारे पाश्चात्य उगमाचे वरदान आहे. याच्या चतुरंग सेनेमध्ये चोकोबार, मस्तानी, थिकशेक, मिल्कशेक, कुल्फी, कॅंडी इत्यादी अनेक सुखदायक उत्पादने सहजच अंतर्भूत असतात.
घसा बसेल अगर सर्दी होईल अश्या भीतीपोटी चाचरत चाचरत आईसक्रीम खाणारे लोक पाहिले की मला गलबलून येते. खरं म्हणजे जेवणाला परीपूर्णता आणण्यासाठी थंड आणि गोड पदार्थाची नितांत आवश्यकता असते. शून्य तपमानाच्या खाली जाऊन, आपलं सर्वस्व पणाला लावून आईसक्रीमचा गोळा तयार झालेला असतो. इंद्रधनुष्यासारखे अनेक रंग, अनेक हरहुन्नर चवी यांनी त्याचा शृंगार तडीस नेलेला असतो. रसिक माणसाने थेट पघळून जाऊन आईसक्रीमच्या अंतरंगात शिरकाव करणे अपेक्षित असते. आणि तसे अपरिमीत प्रेम करणारे आईसक्रीमचे कट्टर चाहते जगभर पसरलेले दिसतात. आबालवृद्धांना वेड लावणार्‍या या लाडक्या आईसक्रीमरूपी जादूगाराची महती वर्णावी तेवढी थोडीच आहे.

आपलं जीवन म्हणजे संघर्षाचं जीवन. अनेक व्याप, संकटे, प्रारब्धाच्या खडतर वाटा यांनी त्रासलेल्या मानवाला घटका-दोन घटका सुखाचा प्रत्यय यावा म्हणून भगवंताने विश्वात गोडाची निर्मिती केली. एरव्ही फुत्कारत असलेला, पिसून गेलेला जीव या पक्वान्नांच्या सेवनाने थोडा वेळ का होईना आनंदाला प्राप्त होतो. जीवनाची सार्थकता ही अशीच छोट्या छोट्या क्षणांमध्ये गवसणार्यान आनंदाच्या बेटांमध्ये आहे. तेंव्हा निर्धास्त मनाने आणि ईश्वराचा प्रसाद म्हणून आपणही या मिष्टान्नांवर आडवा हात मारूया अन् प्रफुल्लीत मनाने म्हणूया, “कुछ मीठा हो जाये !!”