Thursday, April 28, 2011

शहर

सोडून जावंस वाटतंय हे शहर
आणि वाकुल्या दाखवणार्‍या या लबाड इमारती,
पाय झालेत जड, हाती उरलेत प्रश्नचिन्हांचे उन कढ,
ते काहीही असो
कधी तरी सोडावंच लागणार ठिबकणार्‍या वेदनांचं हे शहर....

कधी काळी
साग्रसंगीत उद्याने पिकायची इथे,
आकाशात भरारी मारणार्‍या गरूडांनी
सलाम केला होता इथल्या जिद्दी मातीला,
स्वतःच्या पायावर पहिल्यांदा उभ्या राहिलेल्या बाळाचं अडखळणं
किती कौतुकाने पाहिलं होतं इथल्या गल्ल्यांनी,
घंटारव तर प्राचीन ऋषीच्या पावित्र्यासारखा
नुसता निनादत असायच्या इथल्या चौसोपी वाडयांमधून,
पण ऋतू कसे बेईमान झाले
हे कळलंच नाही तळहाताच्या रेषा बघणार्‍यांना.....
भर दुपारी घर सोडावं लागलं की तो होतो - त्याग !
तर रात्री तोंड लपवत निघावं लागलं की त्याला दुनिया म्हणते - पलायन !!
असो...
या शहराने कुणाचीच पत्रास ठेवली नाही म्हणा,
तसा आक्षेप काहीच नव्हता कुंपणावर बसलेल्या त्या किरमीजी रंगाच्या सरड्यालाही !

कधी काळी
पोटाखाली हात धरून पोहायला शिकवलं या शहराने,
पायात रूतलेला काटा काढल्यावर लावायंच मलम
इथल्याच वैद्यांकडे मिळालं होतं मला,
"होडीला वल्ही मारायची गरज नाही, नुसती तिला तरंगू दे"
काठावरून ओरडून सांगायची मला इथली शिकलेली माणसं,
पोटाची आग शमवणं इतकं खडतर असतं?

कधी काळी
कुणी डंख मारल्यावर धावून यायचा फुलपाखरांचा थवा
ओल्या घावांवर जमेल तशी फुंकर मारायला,
त्यांनी मानधनाची अपेक्षा कधीच केली नाही बरं !
त्यांना माहिती नसावं बहुधा
कसल्या तरी अपेक्षेने, ओशट चेहर्‍याने मागे रेंगाळणं..
प्रत्येकाच्या तागडीचा काटा कसा समतोलाकडे झुकलेला असायचा,
आणि वेशीवरचा तो निरूत्तर कुत्रा
ओळखीच्यांच्या पायांशी उगाच फार लगट करायचा,
आज ती खिदळणारी कौलंही नाहीत आणि त्या ओळखीच्या नजराही.....
गाठोडी वळून उरलंसुरलं पिशवीत कोंबताना
शहर सोडण्याच्या दुःखाची जाणिव व्यवस्थित दाबून टाकतो मी !

कधी काळी
पंचांग पचांगासारखं वागायंच इथे,
तृप्तीची त्रिवार ढेकर ऐकल्याशिवाय
इथल्या चंदनी हवेला नसायची क्षणाचीही उसंत,
चांगलं वागणार्‍याला नजरेनी अभिषेक केला जायचा
आणि पिंडाला शिवायचा कावळा कसलीही कुरबुर न करता,
अचानक हे काळे ढग कुठून आले काही कळालं नाही
त्याने हिरावून मात्र नेली या शहराची निरागसता,
माझ्यावर हद्दपारीचा शिक्का मारताना
त्यांच्यातला चोपड्या घेऊन बसलेला एक जण कुचकट हसताना दिसला !

मंद मंद दिव्यांच्या मादक अंमलाखाली
कसं सुस्त झोपून राहिलंय हे शहर.....
ओळखीच्या भिंती सोडून जाऊ?
अंगणातल्या एकाकी चाफ्याला सोडून जाऊ?
संध्याकाळच्या डोकं फिरवणार्‍या केशरी संदेशांना सोडून जाऊ?
मोठ्या प्रयत्नांनी गवसलेल्या ओंजळभर पाण्याला सोडून जाऊ?
प्रश्न माझ्या इच्छेचा नव्हताचं कधी..
मानेवरच्या ’जू’ ला बांधलेली ती दोरी
कुणाच्या हाती आहे हे पहायंचंच होतं मला एकदा,
शहराने मात्र वावटळीसारखं पिटाळून द्यायचं ठरवलं मला...
मग.... पाठीवर खिळलेले ते डोळे....... उंबर्‍यावर झालेली करकर.....
आम्रवृक्षाचा केविलवाणा हट्ट.... मन नावाच्या निसरड्या घटनेची चकमक....
अडकला हो जीव अडकला !!
तो मारव्यातला ’कोमल रिषभ’ का माझा प्रवास असा अचानक थांबवतो कोण जाणे....

या शहरानं असं कितीही नाचवलं ना
तरी .........एकदा तरी सोडून जावंस वाटतंय हे शहर...............