Sunday, April 3, 2011

"चंद्र उगवला भुईवर, आपले आभाळाला पाय"....

**********************************************************************************
एखादी व्यक्ती किंवा घटना आपल्याला का इतके भारून टाकते?
आठवणींच्या कोकिळाबरोबर आपल्याला तिच्या लोभसवाण्या परिघावर का ओढत राहते?
तिच्या काकणभरचं मिळणार्‍या सहवासाची एवढी ओढ का लागते?
कधी आकाशातला सुहास्य चंद्रमा, कधी ठिबकणारं आळवाचं पाणी, कधी कुजबुजणारा तलम वारा तर कधी देहभान हरपणारा मातीचा मंद मंद सुगंध आपल्याला त्या अंतरी लपलेल्या गूज प्रतिमेची याद देत राहतात.... इंद्रिये, मन एकविध होऊन जातात अन्‌ श्वासांमध्ये उमटतो तोच एक वेड लाउन गेलेला सूर..............मुग्धाचा !!!
- (’अजि म्या नादब्रम्ह पाहिले’)
**********************************************************************************
२८ जुलैनंतर ’यमन’ ’हंसध्वनी’ ’मधुवंती’ ’भीमपलास’ ’भैरवी’ ’मारवा’ आणि ’बागेश्री’ ही मंडळी आपल्या चंद्रमौळी झोपडीत स्वखुशीने वास्तव्याला आली. मुग्धाने त्यांना नकळत आपल्या निवार्‍याला आणून सोडलं. आणि ही दाटीवाटी मोठ्या कौतुकाने पाहताना खोलवरच्या एका कोपर्‍यातले आनंदाश्रू काही केल्या थांबत नव्हते. वेड्या घरट्याची काहीच तक्रार नव्हती. आता कोणत्याही प्रहरी अवचित भेटायला येणारे सूरांचे पाहुणे मनाला काही केल्या थार्‍यावर राहू देईनात........
हा अमूर्ताचा सडा ओतणारी मुग्धा निरागसतेच्या हिरव्यागार शालीआड गुरफटून आगंतुकपणे निघून जायची आणि रेंगाळत रहायची अनिमीष नेत्रांनी टिपलेली तिची दर्शनं......त्या कळ्या वेचून साठवण्याइतकी मल्मली झोळी आपल्याकडे नव्हती ही खरी खंत...
- (’जे वेड मजला लागले’)
**********************************************************************************
आज ५ एप्रिल २०११.......... मुग्धा वैशंपायनचा वाढदिवस !!
**********************************************************************************
“How you handle this newly gained celebrity hood?” somebody on TV asked little Mugdha excitedly. Mugdha's very first reaction to this was slightly raised eyebrows and a big question mark spread all over her face.
‘What the damn thing is this?’ she might have murmured to herself.
Mugdha’s premier virtues – simplicity & down-to-earth conduct – are very much intact even at the wake of runaway success and monumental popularity. People who know her from close quadrants say that she has not changed at all!!!!
- (’The Conjuration Called Mugdha')
**********************************************************************************
मुग्धा सूर छेडू लागली की एरव्ही ओसाड वाटणार्‍या अक्षरांच्या वाटिकांमध्ये अचानक वसंत येतो. असं पायही न वाजवता त्याचं आगमन होतं ना होतं तोच मुग्धाची एखादी अफलातून तान... मग...छातीतून कळ आणि तोंडातून ’वाहवा’ एकाचवेळी..... रस्त्याच्या दोन्ही बाजूला नक्षत्रांची उधळण करत जाणार्‍या सम्राज्ञीसारखी ती मग स्वरांची रिमझिम सुरू करते.... आपण वेगळ्याच बेहोशीत !!
- (’आता उजाडेल’)
**********************************************************************************
मुग्धा गायला लागली की माझी स्थिती मोठी संमोहीत होऊन जायची. भोवतालच्या जगाचा, आपल्या छोट्यामोठ्या दुःखांचा, उद्याच्या चिंतेचा जणू विसर पडायचा. समस्त विश्व मावळून जायच.... शिल्लक रहायची उजळलेल्या स्फटीकासारखी एकच प्रकाशधार – मुग्धाच्या सुरेल षड्जाची !!
सर्व प्रेरणांना झाकोळून टाकणारे तिचे नेमके आलाप, रागदारीतला तिचा मुक्त संचार आणि पद्यातील विशिष्ट अक्षरांची तिने केलेली बेमिसाल उधळण...मती गुंग होऊन जायची. ती लय, तो आशय, ते थरारक सादरीकरण मनाच्या अगदी आतल्या कोपर्‍यात जाऊन घुमायचं....वेड्या जीवाला प्रश्न पडायचा – हे इतकं ऐश्वरीय गायन अनुभवल्यानंतर या जगात अजून ऐकण्यासारखं खरंचं काही आहे का?
- (’गा रे कोकीळा गा’)
**********************************************************************************
Many Many Happy Returns of The Day, Dear Mugdha !!!!!
आज शुभेच्छा काय बरं द्यायच्या?
मुग्धाचं गाणं उत्तरोत्तर वाढो आणि गगनाबाहेर जाऊन भिडो.... तिच्या असीम प्रतिभेचा उन्मेष या महाराष्ट्रदेशी असाच चढत्या-वाढत्या भाजणीने बहरत राहो.... आणि...... ती ’जे जे वांछील, तो ती लाहो’ :)
**********************************************************************************
(पोस्टचा काही भाग मी मुग्धावर लिहीलेल्या विवीध लेखांमधून)