Monday, February 14, 2011

नाव तिचं शामी....

नाव तिचं शामी. जराशी वेडी आहे ती, अवखळ स्वप्नांच्या बाबत......
एरव्ही तिच्या संदूकीमध्ये कायम राखून ठेवलेली समंजसपणाची शाल ती पांघरतेच पण एखादा उत्कट प्रसंग आला की शामीची स्वप्ने हृदयातून गळ्यात, गळ्यातून डोळ्यात आणि डोळ्यातून सगळ्या आसमंतात एका क्षणात प्रकाशायला लागतात.
काहीच्या काही विद्या अवगत असतात ना माणसाला..... देवाने दिलेला, चांगला शहाळ्याच्या खोबर्‍यासारखा गळा गुपचुप एखाद्या माजघरात ठेवून द्यायचा की नाही....पण हिला हौस सार्‍या विश्वावर सुगंध फेकायची. सगळं जग ’माझं-तुझं’, ’पैका-अडका’, ’पळा-पळा कोण पुढे जातो’, यात रूतून बसलेलं असताना हिचा चांगुलपणा मात्र आपल्या पात्रातून ओसंडून वाहणार्‍या गंगामाईसारखा.... पाणपोईच उघडली होती जणू तिने सच्च्या दिलाच्या रसिकांसाठी.... लुटा..लुटा...श्रवणाचा आनंद लुटा...
आता वारं वाहणार, मग मन ओथंबणार आणि कुणीतरी धुक्याआडून मंजूळ स्वर लावतंय असं वाटतं न वाटतं तोच.. आपली रत्नकीळ प्रभा दाखवत शामीचं गाणं एकेक कोडी उलगडायला लागणार. देवा रे देवा !!
ऐकणारा पण मग ठार वेडा होऊन जाईल यात नवल ते काय? ओजस्वी शामीच्या गाण्यावर निंबलोण म्हणून उतराई व्हायला तिचे सगळे चाहते तर तयारचं ! मग... थोडासा टेचाचाच आविर्भाव... एक थेट अंतःकरणात घुसणारा निरागस कटाक्ष... आणि कलामंदीराच्या पडद्यांनाही हालवणारे सणसणीत बोल – “तुझ्या मनात... तुझ्या मनात, कुणीतरी लपलं गं... तुझ्या मनात”

शमिका श्रीकांत भिडे. याहीपेक्षा जास्ती जिव्हाळ्याचं नाव म्हणजे – “कोकणकन्या”. परशुरामाच्या भूमीत, खार्‍या वार्‍याच्या संगतीने निपजलेलं हे गुणी गायकरत्न. किनारपट्टीवरचा घोंघावणारा साहील, हिरव्या डोंगरातला गोडांबा आणि पावसच्या दैवी शांततेला बेमालूम मिसळून तयार झालेलं हे मिश्रण. नुसतं ग्रामोफोनची रेकॉर्ड अथवा प्लेयरमधली सीडी वाजल्यासारखं गाणं आणि अर्थाशी एकरूप होत – नव्हे, ते गाणं स्वतः जगत – गाणं यातला फरक उभ्या महाराष्ट्राला सोदाहरण दाखवला तो शमिकाने. तिनं म्हणावं “झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची, सर येते...” आणि श्रोत्यांनी सचैल भिजलेपणाचा अनुभव घ्यावा हे ठरलेलंच... असं सगळीकडे जीवंतपणाची सळसळाई आणत असताना शमिका मात्र कुठेतरी दूरवर आपल्याच शब्दांची सखी झालेली असायची.

’लिटल चॅंपस’च्या निमित्ताने मराठी संगीताच्या वठलेल्या गुलमोहराला कितीतरी नविन धुमारे फुटत होते. रोज डोकावणारी एक नवी पालवी नुसती बघितली तरी किती हरखून जायला व्हायचं. मर्‍हाटी विश्वामधली ती एक क्रांतीच होती जणू. याच संमोहनाच्या प्रमुख शिलेदारांपैकी एक होती शमिका. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अल्पावधीतचं शमिकाने कोकणातल्याच नाही तर देश-परदेशातील प्रेक्षकांना आपलसं करून घेतलं. एकीकडे गायनशास्त्रातील व्याकरणाचा यथोचित आब राखत असतानाच भावनांचा जातिवंत मोहोर तिने सारेगमच्या अंगणात फुलवला. आतमध्ये कमालीची शांत वाटणार्‍या छोट्याश्या शमिकाच्या सादरीकरणावर जनसमुदाय कुणी न सांगताच ताल धरू लागला. ती मात्र खोलवर गात राहिली – “मी गाताना, गीत तुला लडीवाळा, हा कंठ दाटुनी आला”

नाव तिचं शामी. तिची गोष्टच निराळी. आपल्याकडे कान लावून बसलेल्यांच्या अंतःकरणाचा कब्जा घ्यायला तिला बिल्कुल वेळ लागत नाही. खरं तर शांत तेवत राहणार्‍या नंदादीपासारखं तिचं व्यक्तीत्व. दूरदेशीच्या निगूढ शिवालयात एखाद्या योग्याने ओमकार घुमवावा तसा तो तिचा लागलेला पहिला सूर... आणि मग वाद्यांची साथसंगत, समोर खिळून बसलेले प्रेक्षक, कवितेचे शब्द अन् त्यांचे मोहक अर्थ वगैरे सगळं विसरून जाऊन श्रुतींबरोबर तिने केलेली ऐच्छिक क्रीडा... बस्सं यार, और क्या चाहीए?
शमिका गाऊ लागली की “मी जीवनगाणे गावे, तू स्वरात चिंब भिजावे, दोघांनी हरवून जावे, हरवून जावे” ही केवळ गीतकाराची संपत्ती न राहता ते वर्तमानातलं वास्तव बनून जातं. श्रोत्यांना असं कुठल्या कुठं नेऊन सोडून द्यायची किमया तिने पुष्कळ वेळा केली आहे.

शमिकाच्या जादूने मला पूर्ण व्यापून टाकलं ते “हे श्यामसुंदर राजसा” या पराकोटीच्या आर्ततेने गायलेल्या रचनेनी... काय अतर्क्य, अदभूत, अचाट गायली आहे ती हे पद.... “श्यामसुंदर राजसा” ने पुढे माझी कित्येक रात्रींची झोप उडवली. मला मूळापासून अस्वस्थ करून सोडलं. मन, बुद्धी, इंद्रीये या सर्वांना गवसणी घालून तिचा गंधार आणि पंचम थेट जीवात्म्याला जाऊन भिडला.
मुग्धाच्या ’घट डोईवर’ किंवा ’श्रीरंगा कमलाकांता’ मधून गोकुळात बालक्रीडा करणारा नंदलाल अंतःकरणावर आयुष्यभरासाठी कोरला गेला. आणि अगदी तस्संच शमिकाच्या ’श्यामसुंदर राजसा’ ने राधाधर श्रीकृष्णांची, गोपींच्या अद्वैत भावाने केलेली काळीज पिळवटून काढणारी भक्ती एक अक्षय भेट म्हणून देऊ केली. हे गाताना शमिकाची मनोभूमिका काय होती, तिने ते तांत्रिकदृष्ट्या किती परीपूर्ण गायलंय किंवा कुठल्या ’जागा’ कश्या घेतल्या या तपशीलात माझ्यातल्या ’साधका’ला यत्किंचीतही रस नाही. भौतिकतेच्या सोनसाखळ्यांनी जखडलेल्या, मोहमयी दुनियेच्या फसव्या रंगांना भुललेल्या तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य माणसाला ईश्वरभक्तीचे उमाळे आणण्यासाठी शमिकाच्या ’हे श्यामसुंदर राजसा’ सारखं जालीम औषध नाही.

नाव तिचं शामी. शामीची परडी कायमच तर्‍हेतर्‍हेच्या रंगोट्यांनी भरलेली.
कुणाला “वारा गाई गाणे” म्हणत मृदुपणे घातलेली फुंकर तर कुणावर “पावना अलीकडचा, पावना पलीकडचा” म्हणत मारलेला चरचरीत पांढरा रस्सा !!
कधी “चांदण्या रात्रीतले, स्वप्न तू विसरून जा” ही दग्ध विलापाची कोयरी तर कधी “खेळताना रंग बाई होळीचा” मधला उर्जायुक्त आवेश !!
एकीकडे “कधी सांजवेळी, मला आठवोनी” ही निष्पाप भावातली भैरवी तर दुसरीकडे “डोंगराचे आरून” मधला लोकगीताचा दणदणाट !!
कधी मातृत्वाच्या वैश्विक मायेतून गायलेले “खुळखुळा” तर कधी रंगमंच फोडून टाकणारे “पायल बाजे छमछम” सारखे जबरदस्त सादरीकरण !!
केंव्हा “श्रावणात घननिळा बरसला” असं हळुवारपणे म्हणत शब्दात उतरवलेली आकाशींची आर्द्रता तर केंव्हा “शोधू मी कुठे” मध्ये प्रकटलेली कमालीची सैरभैर चंचलता !!

शमिकाच्या गाण्यांची रेंज, तिचे गीतप्रकारातलं वैविध्य, तिची भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतावरील हळूहळू घट्ट होत चाललेली पकड, तिची कमिटमेंट, हसतमुख चेहर्‍याने विनातक्रार कष्ट करत रहायची तयारी या सगळ्याच गोष्टी तिच्याविषयीचा आदर प्रतिदिनी वाढवणार्‍या, आहेत.
आपल्या काव्यात्मक भाषेत बोलायचं तर “शमिका भिडे” म्हणजे कोकणकड्याने कलांगणाला सढळहस्ते प्रदान केलेलं अस्सल बावनकाशी सोनेरी स्वप्न. त्याचा कस दिवसेंदिवस वाढतोच आहे. या तेजोमंडलात माझ्यासारखे कितीतरीजण न्हाऊन निघतील यात शंकाच नाही.
आज शमिकाचा वाढदिवस. तिच्या सूरप्रधान गायकीचा एक निस्सीम चाहता म्हणून अभिष्टचिंतन करत असताना शमिकाच्या सांगितीक आणि वैयक्तिक आयुष्यातील भरघोस सुयशासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
जाता जाता...... तिची पूर्ण श्रद्धा असणार्‍या स्वामी स्वरूपानंदांच्या शब्दात सांगायचे तर -
“ध्येय असावे सुदूर, जे कधी न हाता यावे । जीवेभावे मात्र तयाच्या, प्रकाशात चालावे ।
प्रकाशात चालता चालता, चालणेचि विसरावे । भावातीत स्वभावसहज, ध्येयी तन्मय व्हावे ॥”