Friday, February 4, 2011

कहर

आजकाल अस्मादिकांना अत्यंत असंबद्ध स्वप्ने पडू लागली आहेत. म्हणजे पूर्वीही पडायचीच, पण आताशा सकाळी उठल्यावरही ती जशीच्या जशी लक्षात राहू लागलेली आहेत. Very dangerous sign.....
आणि ती स्वप्ने देखील अशक्य "वाढीव" कॅटेगरीमधील असल्याने सकाळी आठवून ’हसावे’ की ’रडावे’ हेच कळत नाहीये ! या स्वप्नांविषयी मोठ्या चिंतायुक्त स्वरात आम्ही आमच्या एका मित्रास सांगितले असता त्याने नेहमीप्रमाणे "आय.टी. मधील स्ट्रेस" या आवडत्या विषयापासून सुरूवात करून "होस्नी मुबारक इजिप्तसाठी कसा नालायक आहे" पर्यंत कैक गहन (आणि मूळ समस्येशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसलेल्या) विषयांवरची मते मोठ्या त्वेषाने ऐकवली.
“चौकस बुद्धीचे, विचारवंत मित्र आजूबाजूला असणे ही आता पर्वणी राहिलेली नसून वास्तविक ती म्हणजे ’सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी दारूण अवस्था आहे” हा नकारात्मक विचार माझ्या मनात डोकावून गेला. असो.
या विषयाचा गाढा अभ्यास असण्याची शक्यता असलेल्या माझ्या एका मानसोपचारतज्ञ मैत्रिणीच्या दवाखान्याची पायरी चढण्याचं धाडस मी केलं. तिने मी वानगीदाखल कथन केलेली काही स्वप्ने मोठ्या गंभीरपणे (म्हणजे नेहमीच्याच मख्खपणे) ऐकली. काचेच्या कपाटातून जाडजुड पुस्तके काढून हिरव्या रंगाच्या शिसपेन्सिलीने काही खुणा केल्या. (अवांतर: कपाळाल्या आठ्या घालून blank stare देताना ही मैत्रिण फार गोड दिसते!!...असो. असो.) नंतर सुमारे अर्धा तास स्वप्नांची व्युत्पत्ती, त्यांचे अर्थ, स्वप्नांचा सबकॉन्शस मनाशी असलेला गहीरा संबंध, प्रतिकात्मक स्वप्ने, बाल्यावस्थेपासूनच्या घटनांचे मनावर उमटलेले पडसाद, स्वप्नांवरून अंतर्मनाचा घेतला जाणारा वेध अश्या चिक्कार पैलूंवर तिने आपले अभ्यासपूर्ण चिंतन प्रकट केले. मला मात्र (ए.सी. मधल्या गुबगुबीत खुर्चीत बसून) ते ऐकत असता एक छोटीशी डुलकी लागल्याचा भास झाला.
त्या अर्धोन्मिलीत अवस्थेत मी एक ’मिनी’ स्वप्न स्वप्न पाहिले. (मैत्रिणीचे नाव ’मीना’, ’मीनल’ किंवा ’मोना’ नाही याची कृपया जिज्ञासू वाचकांनी नोंद घ्यावी. मान्यवर ’पुणेरी’ असले तरी त्यांच्या प्रत्येक ’कोटेड’ सिंबॉलमध्ये ’कोट्या’ असतातच असा चुकीचा गैरसमज करून घ्यायचे काहीच कारण नाही!!) त्या छोटेखानी स्वप्नात आम्ही आमच्या या डॉक्टर मैत्रिणीबरोबर मॅक्डोनाल्डमध्ये बसून ’यमन’ राग ऐकत कोक फ्लोट पित/खात आहोत असे दिसले.
या प्रसंगानंतर अर्वाचीत शास्त्रज्ञांनी ’स्वप्न’ या गूढ वस्तूवर केलेले संशोधन बव्हांशी खरे आहे असे आम्हास वाटू लागलेले आहे.
एका वेबसाईटवर म्हटल्याप्रमाणे मनुष्याला प्रत्येक रात्री सरासरी ७३८ स्वप्ने पडतात अन्‌ त्यातील केवळ एखादे लक्षात राहते. तर दुसर्‍या एका सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार पुरूष वर्गाची स्वप्ने ही ’कृष्णधवल’ तर भगिनीवर्गाची स्वप्ने ही ’इस्टमनकलर’ असतात. ’नियतीने इथेही अन्याय केलाय तर’ असा नाराजीचा सूर लावायचे खरे तर काहीच कारण नाही. निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. असो.
नमनाला गॅलनभर तेल ओतून झाल्यावर समेवर येत आम्ही आमच्या वाचकांपुढे गेल्या काही दिवसात पडलेली चित्र-विचित्र स्वप्ने ठेवण्याचे योजत आहोत. यात कोणताही कल्पनाविलास नसून सकाळी उठल्यानंतरही ठळकपणे स्मरणात राहिलेल्या काही खास स्वप्नांना शब्दरूपात मांडण्याचे इतिकर्तव्य या लेखाद्वारे करत आहोत हे ध्यानात ठेवणे इष्ट. मात्र कंसातील खोचक वाक्ये अगर टीपा आमच्या जन्मसिद्ध पुणेरी संपादकीय अधिकारातून आलेल्या आहेत हे सांगणे न लगे.
आमच्या स्वप्नांबाबत आम्हीच काही बोलणे बरोबर नव्हे. तरीही अंगभूत वाचाळपणामुळे त्यातील काही स्वप्ने मासलेदाखल इथे सादर करणे मान्यवरांना मौजेचे वाटते. असो.

स्वप्न क्र. १ - अदभुत प्रवास
’पॅलेस ऑन द व्हील्स’ सारख्या भासणार्‍या हेरीटेज ट्रेनमधून मी प्रवास करतो आहे. चालत्या रेल्वेच्या डब्यात माझ्या आलिशान बर्थवर बसून मी दाढी (स्वतःची) करत आहे. (या पूर्ण गाडीत आरसा मात्र कुठेच लावलेला नाही!) खिडकीतून बाहेर बर्फ पडताना दिसत आहे.
समोरच्या सीटवर पन्नास वर्षाचा एक गोरा इंग्रज मनुष्य बसलेला आहे तर वरच्या बर्थवर नाझी गणवेशातील एक इसम कानाला ’अंधेरी स्टेशन’ बाहेर मिळते तशी दहा रूपयांची कानपट्टी लावून झोपलेला आहे. मी दाढीचा शेवटचा हात फिरवून गोर्‍याला (शुद्ध मराठीत) विचारतो,
मी: कुठले स्टेशन आहे पुढचे?
गो: माहीत नाही. बहुतेक फ्रॅंकफर्ट असेल (घ्या, आता हा स्वप्नातला ब्रिटीशर सुद्धा मराठीत बोलतो ....थोड्या वेळाने बहुधा ’वाजले की बारा’ गाऊ लागेल! अजय-अतुल झिंदाबाद!! अमृता खानविलकर त्रिवार झिंदाबाद!!!)
मी: तुझ्या पासपोर्टवर लिहीले असेल की स्टेशनचे नाव...
गो: नाही. माझा पासपोर्ट ’तत्काळ’मध्ये काढला आहे (कमाल उत्तर. याला माझ्याकडून वरचा ’सा’)
मी: इथे ’शिवनेरी’चे तिकीट चालत नाही का? मी इंटरनेटवर बुक केले आहे.
गो: क्रेडीट कार्डवर केले असेल तर चालेल (काय संबंध ????)
मी: जरा माझ्या बॅगकडे लक्ष ठेवा, मी जरा आफ़्टरशेव्ह लावून आलोचं पाच मिनीटात! (दाढीचा ब्रश व रेझरचे काय झाले याचा तपशील मी जागा झाल्याने मिळू शकला नाही !)

स्वप्न क्रं २ - बिल्डर मेरा दोस्त
सेनापती बापट रोड किंवा तश्याच एखाद्या अत्याधुनिक रस्त्यावरच्या पॉश ऑफीसमध्ये मी बसलो आहे. टेबलच्या पलीकडे एक बिल्डर (जो या ऑफीसचा मालक असावा) बसलेला आहे. मी हिंदी सिनेमातील हिरोप्रमाणे टेबलावर पाय टाकून निवांत रेललेलो आहे. याबद्दल तिथल्या कुणाचाही आक्षेप नाहिये. एक ग्राहक जोडपे बिल्डरशी भांडत आहे. मालक मध्येच मलाही संभाषणात ओढत आहे.
ग्रा: अहो पण तुमच्या जाहिरातील ३००० रूपये स्क्वेअर फूट लिहीलं होतं..
बि: ती जुनी जाहीरात होती. आता रेट वाढले आहेत.
ग्रा: पण मी आधीच बुक केला होता फ्लॅट
बि: (माझ्याकडे वळून) यांनी पण केला होता. पण आता मी यांचा कॅन्सल करतोय.
मी: मला कश्याला ओढतोस मध्ये? तुमचे चालू द्या..(’ओढतोस’ या शब्दावरून प्रस्तुत स्वप्नकर्त्याची व बिल्डरची सलगी चाणाक्ष वाचकांच्या लक्षात यावी.)
बि: तेच ते. तुला मी एक संपूर्ण फ्लोअर दिला होता ना विकायला? तुलाच ठेवतोय का तू?
मी: हो ना... कुठे विकतोस बाबा... आधीच गरिबी.
ग्रा: यांच्या फ्लोअरला एक फ्लॅट द्या ना मला...
बि: (एकदम पझेसिव्ह होत) बिल्कुल नाही. तो सगळा फ्लोअर देशमुखांसाठी ठेवलाय. पहिल्यापासून (म्हणजे कधी?) तसा व्यवहार ठरलाय.
मी: (जोडप्याची कणव येऊन.. बाय द वे, माझ्या अंगी असलेले दया, क्षमा, चांगुलपणा, शिस्तप्रियता, सालसपणा, सभ्यता इत्यादी अनेक गुण मी स्वप्नात असलो तरी कायम असतात म्हटलं..) अहो काका, त्या तिकडे ’पुणे सेंट्रल’वाले एक नविन स्कीम करत आहेत. तिकडे पहा की. तुमच्या बजेटमध्ये पण बसेल.
(स्वप्न समाप्त. माझा तो बिल्डर सखा आणि ती आख्खा एक मजला माझ्या नावावर असलेली इमारत मी अजूनही शोधतो आहे. कुणाला याबाबत काही कुणकुण लागल्यास मान्यवरांशी त्वरीत संपर्क साधावा.)

स्वप्न क्र. ३ - गेम घ्यावा, गेम द्यावा
१०x१० च्या अरूंद केबिनमध्ये मी ’स्वामिनी’ आणि ’अमेय’ या माझ्या सहकार्‍यांसोबत बसलेलो आहे. स्वामिनीचा नवा ’ऍंडरॉईड’ नावाचा (आता ही कुठली शिंची नवी कंपनी??) तळहातापेक्षा मोठया साईजचा मोबाईल हॅंडसेट आम्ही न्याहाळत आहोत.
मी: किती गेम आहेत यामध्ये?
स्वा: १६७ गेम्स (हा अतर्क्य आकडा कुठून काढला असा बाळबोध प्रश्न विचारू नये. शेवटी ते स्वप्न आहे. सगळ्या गोष्टी लॉजिकली कश्या मिळणार?)
मी: डाऊनलोड केल्या तर चार्ज पडतो का?
स्वा: (प्रश्नाकडे नेहमीप्रमाणे संपूर्ण दुर्लक्ष करत) तू पट्टी आणली आहेस का?
मी: (स्वप्नातल्या स्वप्नात दचकत) पट्टी? ती कश्याला?
स्वा: गेम डाऊनलोड करताना मोजून घ्याव्या लागतात.
मी: (केबिनच्या बाहेर जमलेली गर्दी पाहून) हे एवढे लोक कसले जमले आहेत?
स्वा: ते सगळे गेम डाऊनलोड करायला आले आहेत.
मी: काय? पण हे तर आपल्या कंपनीचे दिसत नाहीत.
स्वा: अरे ते आसपासच्या कंपनीतून पण आले आहेत. त्यांना मी ३ ते ५ ही वेळ दिलेली आहे. (टीपीकल पुणेरी!!)
मी: वा, वा. चालू द्या. (काचेच्या दरवाज्यातून बाहेर पाहतो तर एक पगडीधारी इसम दिसतो.)
मी: अरेच्या, याला कुठेतरी पाहिलंय मी.
(इतका वेळ शांत बसलेला अमेय स्वप्नात पहिल्यांदा बोलतो)
अ: अरे ते आपले महापौर आहेत....
(खेळ खल्लास. महापौर गेम डाऊनलोड करायला यावेत इतका या स्वामिनीच्या ऍंडरॉईडचा महीमा..... धन्य तो ए. राजा, धन्य ते 3G स्पेक्ट्रम आणि धन्य ती टेक्नॉलॉजी!!)

स्वप्न क्रं ४ - जगबुडी
धड दिवस नाही अन्‌ धड रात्र नाही अश्या भ्रांत समयी मी गाडी पार्क करून पौड रोडच्या ’कॅफे दुर्गा’ मध्ये शिरतो आहे. नेहमी दुथडी भरून वाहणार्‍या या स्थानी आज प्रचंड शुकशुकाट आहे. मालक (नेहमीप्रमाणे) निर्विकार भाव आणून गल्ल्यावर बसलेला आहे. रोडवर देखील कमालीची शांतता आहे.
मी मालकाने पुढ्यात ठेवलेली कोल्ड कॉफी प्राशन करत त्याच्याशी बोलू लागतो.
मी: काय आज एवढी कमी गर्दी? कोणीच कस्टमर नाही?
मा: तुम्हाला माहीत नाही का आज काय आहे?
मी: (माझा ट्रेडमार्क बावळट चेहरा करत) नाही. काय आहे?
मा: अहो सगळ्या चॅनेल वर दाखवताहेत ना बातमी... आज कोथरूडमध्ये ’सुनामी’ येणार आहे!! (आता एक साधं तळं नसलेल्या कोथरूडमध्ये कसला डोंबलाचा सुनामी येणार? - आपली उगाच उठल्यावर घ्यायची शंका)
मी: काय बोलताय काय? कसं शक्य आहे? आणि मला पोहतासुद्धा येत नाही. (“आपल्या मर्यादांची जाणीव महापुरुषांना स्वप्नातही असते” - वास्तविक ब्लॉग लिहीताना हे वाक्य इथं आठवायचं काहीही कारण नव्हतं.. पण...असो.)
मा: शाळा पण लवकर सोडल्या आहेत आज.
मी: तरीच हे असले विचित्र ढग आले आहेत आज.... मी म्हटलंच तरी की तिकडे कुठेतरी जोरात पाऊस चालू आहे. आज सॉल्लिड वेगळं दिसतंय आभाळ...
मा: (स्वतः कॉफी पित पित) त्यांनी डिक्लेअर केलाय सुनामी (’दुर्गा’चा मालक खरंतर स्वतः कधी तिथली कॉफी पित नाही. पण सुनामी येवून सगळं संपण्याच्या शक्यतेने त्याने कॉफी प्यायला घेतली असावी... So Sad !!)
मी: पाठीमागे कसला आवाज येतोय?
मा: शाळेतली मुले आहेत
(मी ’दुर्गा’च्या पाठीमागे असलेल्या शाळेच्या पटांगणावर पोहोचतो. आता इतक्या चिंचोळ्या जागेत शाळा आणि मैदान कुठून आलं हा प्रश्न इथे गैरलागू अथवा श्रीराम लागू....म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखा. असो.)
मी तातडीने पाठीमागच्या मैदानात पोहोचतो आणि इतर मुलांसारखा चटई घेऊन, मांडी घालून खाली बसतो. समोर पश्चिमेचं क्षितीज दिसत असतं. (माझं स्वप्न ’ब्लॅक & व्हाईट’ असल्यानं मातकट, धूरकट वगैरे).. अचानक लांबून एक प्रचंड मोठा पाण्याचा लोंढा येताना सर्वात आधी मला(च) दिसतो. बाप रे! अंगावर काटा... आणि ही मोठाली लाट. मी अफाट आश्चर्यचकीत होतो. काही कळायच्या आत ती लाट आमच्या मैदानापर्यंत. मी मोबाईल काढून प्लास्टीक पिशवीत टाकतो.
(टीप १ - पिशवी कुठून आली ही पुस्तकी शंका घेण्यापेक्षा लेखकाने स्वप्नातही बाळगलेल्या व्यवहारकुशलतेचे कौतुक अपेक्षित आहे. फॉर द रेकॉर्ड, पावसाळ्यात मी कायम एक पिशवी जवळ बाळगतो. भारतीय क्रिकेट टीमची कामगिरी, पवारांचं राजकारण, फेसबुकचे प्रायव्हसी सेटींग आणि पुण्याचा पाऊस यांचा काहीही भरवसा देता येत नाही !!
टीप २ - ’सर सलामत तो पगडी पचास’ ही म्हण म्हणायला, दुसर्‍यांना ऐकवायला चांगली आहे. पण आपला मोबाईल पाण्यात जायची वेळ येते तेंव्हा ’सर’ आणि ’पगडी’ दोन्ही वाचवाव्या लागतात.)
मी पोज घेऊन उभा असताना पाण्याचा अक्राळ विक्राळ लोंढा येऊन मला बुडवतो. नाकातोंडात पाणी जाऊन मी खोकत, ओरडत पुन्हा पाण्याच्या वर येतो. तो अजून दोन मोठ्या लाटा. आता पूर्ण पौड रोड पाण्याने भरलेला. दुकानांच्या उंचीपेक्षाही जास्ती पाणी झाले असतानाही मी कायम पाण्याच्या पृष्ठभागावर कसा काय अशी रास्त शंका मला स्वप्नातही येते.
"कुठून येतंय हे पाणी?" मी माझ्यासारख्याच तरंगत असलेल्या एकाला विचारतो.
"अर्ध्या तासापूर्वी वर चांदणी चौकात सुरू झालंय हे... त्याच्याही आधी तिकडं मुंबई साईडला झालं.. सगळी गावं, शहरं पाण्याखाली गेली आहेत" तो बोलतो आणि परत पाण्याखाली जातो. मी ट्यूब टाकून पाण्यावर तरंगल्यासारखा वहात वहात डेक्कनच्या दिशेने चाललो आहे. पौड रोड फ्लायओव्हरच्या वरून पाणी...(माणूस जागेपणी सदोदीत अतिशयोक्ती करत असला की मग स्वप्नात तरी दुसरं काय होणार? च्यक च्यक च्यक........) इतक्यात मी पुन्हा त्या ग्राऊंडवर. पाणी आटलं आहे. मी खाली पाहतो तर माझ्या चटईवर प्रचंड चिकणमाती जमा झालेली. ढग आता विरळ होत आहेत. मी आजूबाजूला पाहतो. पाण्याच्या खुणा दिसत आहेत. मी घाम पुसत ओळखीचं कोणी दिसतं का ते पहात रस्त्याने झपझपा चालू लागतो....... !
(क्रमश:)