Tuesday, February 1, 2011

शब्दशलाका : "ही वाट दूर जाते.."


ही अशी सगळ्यांशी लगट करत जाणारी गावाकडची वाट कुणा पाऊलांच देणं असते?
तशी इतरवेळी स्वतःमध्येच रमलेली पण परक्यांच्या पायरवाने आपली समाधी थोडीशी सैल सोडणारी ही वाट... आकाशाच्या भेटीची तहान तिलाही असणारंच...

दोन्ही कडांना उमलून आलेल्या हिरवळीशी निवांत गुजगोष्टी करत बसाव्यात, अंगाखांद्यावर आभाळ देईल तितकाच शिडकावा घ्यावा आणि दूर क्षितिजापर्यंत पसरलेल्या आपल्या ओबडधोबड कायेला ताणून महिनोनमहिने पडून रहावं.....बास्स!
गावाकडच्या वाटेचं शेपूट सापडत नाही हो कधी... कुठे अशी भरकटल्यागत फिरत असते कोण जाणे. शोध घेत जावं तर चकित करून टाकणार्‍या अनेक गोष्टी तोंडावर मारते ही वाट...
माणसं चुकू शकतात, रस्त्यांना प्रमाद परवडण्यासारखे नाहीत. ती तिकडे डोंगरांची योगनिष्ठ माळ जगाला दुरूनच न्याहाळत असते. सगळे रस्ते आपल्या पायथ्याला येऊन संपणार आहेत याचं भान त्या तपस्व्यांनी केंव्हाच सोडलंय. नाहीतर असं पाहून न पाहिल्यासारखं कोण बरं करेल?

या विराटाच्या वळणांवर खुजा माणूस टेचात चालू लागला की आजूबाजूचे प्राणीही खदखदून हसत असणार... मनात एक अनामिक आशा घेऊन या शांत, एकाकी वाटेवरून झरझर चालणारा, वर्तमानापेक्षा भविष्याचा लळा लागलेला कुणी पाहिला की रवंथ करणार्‍या गायी हळूच मान हलवतात.

त्यांचं जग निराळं...
आपलं निराळं...
रस्ता तोच, पण गंतव्य निराळं...
काळ्या ढगांच्या सोबत...
रापलेल्या वाटेनी झुलणं निराळं...
आणि हाती नाही आले तरी...
शिखरांना पकडणं निराळं...

शब्द: विक्रांत देशमुख
फोटो: पंकज झरेकर