Wednesday, January 26, 2011

शब्दशलाका

असं म्हणतात की एक चित्र हजारो शब्दांची कहाणी मांडतं.

"A picture is worth a thousand words" - Anonymous

चित्रांची सृष्टी म्हणजे अपार्थिवाची सृष्टी. अगदी प्राचीन काळापासून चित्रमय जगत मानवी मनाला साद देत आलंय. एखादीच प्रतिमा, एखादाच नजारा कश्या आपल्या सगळ्या जाणिवा बदलून टाकतो. रोजच्याच चाकोरीत कितीतरी दृश्ये आपण नजरबंद करत असतोच पण त्यातली काही मात्र हृदयात अगदी खोलवर जाउन बसतात! त्याचवेळी मनःपटलावर विचारांचे असंख्य पारिजात देखील उमललेले असतात. फोटो म्हणजे अनुभूतीला पुन्हा पुन्हा जगायचा विषय.... त्याला शब्दात पकडायची खुमारी तर किती विलक्षण असेल? अश्याच काही निवडक चित्रांची स्फुट-अस्फुट भाषा आम्ही घेऊन येत आहोत एका नवीन उपक्रमाद्वारे - "शब्दशलाका"


प्रकाशाशी खेळ करणारी फोटोग्राफी आणि शब्दांची गुंफण घालणारे विचारवैभव म्हणजे एकाच सरस्वतीचे आशीर्वाद. डावं-उजवं करण्याचा प्रश्नच नाही. असेच आशीर्वादाचे मोती कधी काळी पृथ्वीतलावर ओघळले आणि अंधुकसे का होईना आम्हांस दर्शन घडलं याच विश्वमोहिनी शारदेच्या प्रांगणाचं.... तेच दर्शन आपणांस घडवण्याचा हा आमचा छोटासा यत्न !!
खरे तर या ‘शब्दशलाके’मधून आम्ही आमच्या व्यक्तिगत मर्यादाच आपल्यापुढे कबूल करतो आहोत. पंकजला मनात घर करणारे प्रासादिक शब्दांचे खेळ कधी जमले नाहीत आणि विक्रांतला डोळे दिपवणारी फोटोग्राफी कधी झेपली नाही. अर्थात पंकजला फोटोग्राफीचे काही जास्त कळते आणि विक्रांत एकदम विश्वकोषाचे मानवी रुप आहे असेही नाही. पण जे काही आमच्या झोळीत आहे ते तुमच्यासमोर रिते करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. "शब्दशलाके" मध्ये पंकज एका आठवड्याला एका विषयाला धरुन एक (किंवा दोन)चांगले फोटो समोर घेऊन येईल आणि विक्रांत त्याच फोटोच्या अनुषंगाने काहीबाही मनोविभ्रम आपल्यासमोर मांडेल. अर्थात हा दोघांचाही संयुक्त प्रातिभ-प्रयत्न असल्याकारणाने हे सदर आम्हा दोहोंच्याही व्यक्तीगत ब्लॉगवर प्रसिद्ध होईल. अपेक्षा आहे आपल्या नेहमीच मिळणार्‍या दिलखुलास दादीची आणि रसिकपणे केलेल्या अवगाहनाची.....

चला तर मग, आस्वाद घेऊया काही जबरदस्त खास प्रकाशचित्रांचा अन्‌ त्यावर उत्कटपणे लिहिलेल्या वेड्या ओळींचा.... "शब्दशलाका" आता बोलू लागेल, तुमच्या-आमच्या मनात झुलू लागेल, आहात ना आमच्याबरोबर प्रकाशाचे हितगुज ऐकायला?