Monday, January 24, 2011

हे भलते अवघड असते....

फलाट सोडून निघालेल्या गाडीसारखं गलबलून टाकणारं दुसरं दृश्य नसतं. इंजिनाच्या एका धक्क्याने सगळ्या डब्यांचा संसार, त्या बिलगलेल्या रूळांना अलविदा करायला लागतो. तो लोखंडी चर्रचर्र आवाज कुठेतरी आपलाही कंठ भरून आणतो. तडतडणारं मन लगेच रचून टाकतं एक नविन झेन हायकू –
फिरती चाके, सुटता काठ,
बदलत्या सांध्यांचा, जुनाच घाट,
कधी मनभर... कधी डोळ्याबाहेर...
वर्षानुवर्ष ही गाडी फलाटाचा असाच निरोप घेतेय. ’फारसे लागेबांधे ठेवू नयेत, इथली आपली भेट ही काही क्षणांचीच’ असा अदृश्य निर्देश जणू ती करत असते. गाडीचा निरोप असतोही विलक्षण सैरभैर करणारा..... उर्मिलेकडे एका क्षणात पाठ फिरवून वनवासात निघालेल्या श्री लक्ष्मणासारखा........!
फलाटाची आस सोडत, मान वळवत गाडीने घेतलेली गती मला नेहमीच अस्वस्थ करून सोडते. सुटलेल्या गाडीमध्ये एक छोटीशी का होईना जागा मिळावी म्हणून जीवाच्या आकांताने धावणारी खुजी माणसं मला बघवत नाहीत. अशी एखाद्याची गाडी चुकू शकते?
तांबड्याचा हिरवा व्हायचा अवकाश असतो फक्त एका क्षणाचा. मग सुरू होतो वेग घ्यायच्या आत दरवाज्याला लटकण्याचा केविलवाणा प्रयत्न..... कोण आता समजावणार यांना?
घड्याळ्याच्या काट्यांची पाईक असणारी ही गाडी... काळपुरूषही असाच कधीच कुणासाठी थांबत नाही म्हणे ! इंजिनाने श्वास भरून शिट्टी द्यायची, गाडीने सुरू व्ह्यायचं, फलाटाने हातातून हात अलगद सोडायचा... आमच्या संदीप खरेने एका कवितेत जबरदस्त दोन ओळी लिहील्या आहेत –
"का रे इतका लळा लावून नंतर मग ही गाडी सुटते?
डोळ्यांदेखत सरकत जाते, आठवणींचा ठिपका होते..."
रेल्वेला ’रिअर-व्ह्यू-मिरर’ नसतो हे किती बरं ना !!
गाडी सुटताना मी बाहेर पहायचं कटाक्षाने टाळतो.
गाडी सुटताना पोटात उठणारा एक अनाकलनीय गोळा मी मोठ्या शिताफीने दाबून टाकतो.
गाडी सुटताना कानावर पडणारे निरोपांचे भिजलेले संकेत मी ऐकून न ऐकल्यासारखे करतो.
गाडी सुटताना थरथरत्या मनाच्या तळघरात अस्पष्टपणे जाणवणारी हुरहुर मी झटकून टाकतो.
छाती फुटेस्तोवर गाडीच्या मागे पळूनही, हाती काहीच न लागल्याने, फलाटाच्या शेवटच्या टोकाला धापा टाकत, हताशपणे गुडघे धरून खाली वाकलेला माणूस माझ्या डोळ्यांना दिसणार नाही याची मी पुरेपुर दक्षता घेतो.
स्टेशनच्या मायेतून बाहेर पडल्यावर दूरपर्यंत दिसणार्‍या समांतर रूळांवर ’वेग घेऊ की नको?’ अशी गाडीची झालेली घालमेल मी केवळ एक कल्पनाविलास म्हणून हसण्यावारी नेतो.

Let me Confess…. खिडकीतून अगर उघड्या दरवाज्यातून सोडलेल्या स्थानाकडे मागे वळून बघण्याचा दुर्दम्य पोलादीपणा माझ्याकडे नाही. निरोपसमारंभ मला फारसे सहन होत नाहीत. प्रश्न वियोगाला गिळायचा नाही पण दूर जाण्याची साकाळलेली भावना मला तितकीशी रूचत नाही. माणसाने कसं इंजिनासारखं एका समोरच्याच दिशेला अग्रेसर असावं ! It’s a one way journey, dear….
फलाटाला अलविदा....
फलाटावरच्या सळसळत्या जीवंतपणाला अलविदा.....
फलाटाच्या ओथंबलेल्या जवळीकेला अलविदा....
काढत्या पायांनी परतीच्या वाटेला लागलेल्या बिनचेहर्‍याच्या गर्दीला अलविदा....
स्टेशन सुनं पडल्यावरही वेड्यासारखं वेळ दाखवत राहणार्‍या त्या तपस्वी घड्याळाला अलविदा...
गाडी निघून गेल्यावर मौनपणे आपल्या शिसाच्या अंगावर कोरडा, भावनाशून्यपणा आणणार्‍या रूळांना अलविदा..
गाडी सुटली...प्रवास सुरू झाला... प्रवास संपेलदेखील.. खिडकीतून डोकावत असणारा संभार किती आत घ्यायचा हे ज्याचं त्याने ठरवावं !! पुढचं स्टेशन.. पुढचं आवर्तन....
पण एक मात्र नक्की,
फलाट सोडून निघालेल्या गाडीसारखं गलबलून टाकणारं दुसरं दृश्य नसतं....