Sunday, January 16, 2011

ऋतूराज आज वनी आला..........

कोपर्‍यावरच्या वळणावर वर्षानुवर्षं एक बाग उभी आहे. तशी आहे छोटीशीच पण बर्‍याच काळापासून या गावी वसतीला आहे म्हणे..... ठराविक दिवशी, ठराविक वारी तिथे माणसांची गर्दीदेखील जमते. अस्सं काहीतरी आठवल्यासारखं बागेत येणारे लोक म्हणजे एक मौजच असते ना !! कोणी काहीही म्हणो, बाग मात्र तशीच आपण आपल्यात दंग होऊन कसले कसले खेळ खेळत राहते. बगिच्यात वसंत कधी येतो आणी जातो काही कळत नाही. पण जराशी डवरून जायची मोकळीक दिली की बागेचं रंगरूप अस्सं काही पालटतं म्हणून सांगू? अगदी तरारून येते ती.....बागेच्या अंतरंगात डोकवायची फुरसत नसावी बहुधा कोणाला. इतर दिवशी मात्र आपल्याच सावल्यांशी मारलेल्या गप्पा आणि वार्‍याबरोबर मांडलेले सारीपाट. आपलीच गाणी आणि आपलीच धून. बागेच्या अंतरंगात डोकवायची फुरसत नसावी बहुधा कोणाला. नाहीतरी.....नाहीतरी.....असं तिच्याशी भरभरून बोलायला, बागेची भाषा अवगत असायला, कोणीतरी आकाशींचा पाहुणाच हवा !!
एके सकाळी मात्र गम्मतच घडते. मुठी भरभरून आनंद वाटत फिरणारा अवलिया हलक्याच पावलांनी आत दाखल होतो. त्याचं कोण अप्रुप.... अवलिया येतो, सगळ्या आसमंतावर एक प्रेमाची नजर टाकतो आणि घुमवतो त्याची ती प्रफुल्लीत करणारी जुनीच शीळ... पाठोपाठ बागेमधला कणन्‌कण गायला लागतो, “ऋतूराज आज वनी आला.... ऋतूराज आज वनी आला....”
************
नोव्हेंबर महिन्यातील एक प्रसन्न सकाळ. थंडीची दाट साय वातावरणावर पसरलेली. जगाचा कोलाहल केंव्हाच चालू झालेला. पुण्याच्या मध्यवर्ती भागातली एक प्रथितयश शाळा. अनेक वर्षांचा इतिहास अंगावर वागवणारी कोणी एक सुप्रसिद्ध संस्था. ’सलीलदादा आज आपल्या शाळेत – फुल्ल टू धमाल’ रंगीत खडूने लिहीलेल्या फळ्यावरच्या सूचनेने माझं लक्ष वेधून घेतलं. मराठीतला एक आघाडीचा संगीत दिग्दर्शक इथे काय करतोय? माझी उत्कंठा शीगेला पोहोचली. इथे नेमकं चालंलय काय? इथे एखादी गाण्याची स्पर्धा होणार आहे की मान्यवरांची सदीच्छा भेट? वेळ होता, ’हा काय प्रकार आहे’ जाणण्याची इच्छा निर्माण झाली आणि मी आतमध्ये दाखल झालो.
विविध इयत्तांमधील आणि विविध वयोगटांची सुमारे हजार एक विद्यार्थी मोठ्या उत्साहात शाळेच्या विस्तीर्ण अश्या पटांगणावर जमा झालेले. डोळ्यात औत्सुक्य, चेहर्‍यावर आनंद आणि मनात बरंचसं कुतुहल. शिक्षकांनी काय सांगून ठेवलंय यांना कळत नाही पण सार्‍यांच्याच नजरा मुख्य प्रवेशद्वाराकडे लागलेल्या. कोवळीकेचा चिवचिवाटच तो, स्टेजवरून दिल्या जाणार्या‍ सूचनांनी थोडीच थांबणार?? एवढ्यात गेट उघडून एक गाडी संथ गतीने शाळेत शिरते. ते पाहताच प्रचंड खुशीची लहर मैदानभर सळसळते. दार उघडते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी मोठ्या प्रेमाने खाली उतरतात. हा तर लहानग्यांचा लाडका सलीलदादा. ज्यांच्या सुरेल गीतांनी घराघरातून स्थान मिळवलं तो गुणी कलाकार सलीलदादा. ज्याच्या अनेकविध गीतप्रकारांनी सानथोरांना आपलंस केलं तो सर्वांचाच आवडता सलीलदादा. बाईंनी न सांगताही टाळ्यांचा जोरदार कडकडाट होतो. ओसंडून वाहणार्‍या आमोदाच्या हजारो नजरा ज्याच्यावर खिळल्यात तो प्रमुख पाहुणा ओळखीचं स्मितहास्य करत, शांतपणे माईकचा ताबा घेतो.....
************
फुलणं हा फुलांचा अंगभूत गुणधर्म. त्यांना तसं कलेकलेनी, काळीज राखून फुलवणं ही निगा राखणार्‍या माळ्याची खासियत. बागेतल्या कोपर्‍याने पोटामध्ये काही गुपितं साठवली आहेत. निरागस उन्हात चमकणारे तितकेच निरागस डोळे आहेत या बागेचे. अंकुरलेल्या बीजांची अपेक्षा असते उत्तम निगराणीची. वेळच्या वेळी सोनखत घातलं की कुणी न सांगता ती रोजच्या रोज आकाशाकडे झेपावत असतात. वेलींच्या कथा तर अजून आगळ्या.....वादळवार्‍यापासून स्वतःला वाचवत, वाचवत नजाकतीने वाढायचंच पण मांडवाला घातलेल्या वेटोळ्यांच शालीनता काही सोडायची नाही. संस्कारांच लेणं उराशी घेऊन फोफावणार्‍या या जाईजुईं...... यांना नेहमी वाटत असणारच की आपल्याशी आपलं होऊन कोणीतरी बोलावं !!
************
’अग्गोबाई-ढग्गोबाई’ सलीलदादाने नुसती पहिली ओळ गायचा अवकाश की समोर बसलेली असंख्य मुलं ताल धरून गायला लागतात. ’दै.सकाळ’ च्या ’फुल्ल टू धमाल’ या बालगोपाळांसाठी योजलेल्या खास पुरवणीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी डॉ. सलील कुलकर्णी गावोगावच्या शाळांमध्ये जाऊन एक अत्यंत बहारदार कार्यक्रम करत असतो.
शालेय मुलांशी त्यांना रूचेल, पटेल आणि आवडेल असा संवाद साधणं ही फारच कठीण गोष्ट. अत्यंत संवेदनशील पण त्याचबरोबर संस्कारक्षम अश्या त्या मनांचा ठाव घेणं ही प्रत्येकाला जमण्यासारखी बाब नाहीच मुळी.
डॉ. सलील या मनस्वी, गुणी प्रतिभावंताने मात्र आपल्या अनौपचारीक शैलीने व विलक्षण साधेपणाने यात मातब्बरी मिळवलेली. मनोरंजनाबरोबरच कुठलातरी स्थायी विचार देऊन जाणारी बालगीते हा सलीलच्या सांगितीक कार्याचा एक महत्वाचा भाग. निरनिराळ्या शहरांमध्यल्या विद्यामंदीरांमध्ये जाऊन सलील यातलीच काही गाजलेली गीते थोडी, थोडी सादर करतो आणि रूजवात होते जीवनशिक्षेच्या नवीन अध्यायाची !!
स्थळ बदलते. वेळ बदलते. समोर नवनवीन शाळा व त्यातील नवनवीन विद्यार्थी. प्रत्येकाचा आवाका वेगळा. प्रत्येकाची समज वेगळी. आणि पार्श्वभूमी तर अगदीच भिन्नभिन्न. पण त्या त्या वयोगटाशी त्यांच्या परिभाषेत बोलायचं कसं आणि मैत्रीपुर्ण संवादातून अंतःकरणात शिरकाव करायचा कसा ही सलीलला चांगलीच अवगत असणारी कला.... या स्नेहपूर्ण बोलण्याच्या जोरावरच मग तो जमलेल्यांना भुरळ पाडायला लागतो. घड्याळाचा काटा पुढे सरकत राहतो. सरत्या काळाचं भान ना मुलांना असतं ना हातातली कामे बाजूला ठेवून हे सगळं पाहणार्‍या त्यांच्या शिक्षकांना....... संस्थेच्या अध्यक्षांपासून ते गेटवरच्या वॉचमनपर्यंत सगळेजण गुंग.....
************
“तुमच्यापैकी किती जण रोजच्या रोज नियमित वाचन करतात?” सलीलदादाचा अनपेक्षितपणे आलेला प्रश्न. काही हात वर जातात. “अगदी खरं खरं सांगायचं बर का..... जरं खोटं बोललात तर काय होईल माहिती आहे का?” सलीलच्या चेहर्‍यावर मिश्कील हास्य उमटलेलं.... “जो खोटं बोलेल त्याला.....वार्षिक परीक्षेच्या......गणिताच्या पेपरमधील.......पान क्रं २ वरचा.........प्रश्न क्रमांक १............ अजिबात कळणारच नाही !!!”
समोर पसरलेली खसखस अगदी सच्ची असते. निखळ विनोद हे सलीलच्या संभाषणकौशल्याचं बलस्थान. छोट्या छोट्या कोट्यांमधून बच्चेकंपनीच्या ओठावर मनापासून हसू आणत, आणत तो स्टेजभर एखाद्या चैतन्यासारखा फिरत राहतो.
“तुम्ही वाचायला हवं. वाचाल तर वाचाल. मनोरंजनासाठी कधीतरी टी.व्ही. बघणं निराळं पण वाचन हे मुख्य हवं. तुम्ही सगळे जण या अश्या उत्तम शाळेचे उत्तम विद्यार्थी.... खरंच किती भाग्य आहे हे... तुमचे गुरूजन, तुमचे पालक किती चांगले मिळालेत तुम्हाला. किती मेहनत घेत असतात ते तुमच्यावर. तुम्ही तुमचा विकास कसा करून घेणार आता? नसत्या सिरीयल बघण्यापेक्षा तो वेळ वाचनाला दिला तर, मला सांगा, फायदा कुणाचा होणार आहे यात? तुम्ही मोठे व्हाल, आई, बाबा, आज्जी, आजोबा व्हाल... तेंव्हा लहान असलेली तुमची मुले, नातवंडे जेंव्हा गोष्ट सांगण्यासाठी तुमच्याकडे हट्ट धरतील तेंव्हा तुम्ही काय सांगणार आहात? आता टी.व्ही.वर पाहिलेल्या मालिकांच्या कथा? मन आणि बुद्धी तेजस्वी बनवायचं असेल तर वाचन हे तुम्ही केलंच पाहिजे. त्याला पर्याय नाही. असूच शकत नाही.”
सलीलदादा सोप्या शब्दात वाचनाचं महत्व ठसवंत असतो. दैदीप्यमान शालेय कारकीर्द असलेला, बारावीच्या परीक्षेत मराठी विषयात बोर्डात पहिला आलेला सलील छोट्या छोट्या कवितांमधून, रूपककथांमधून वाचनाचं महत्व जमलेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवू लागतो. त्याचा प्रभाव ऐकणार्‍यांवर तत्काळ पडू लागतो. एकाग्रचित्त झालेल्या चेहर्‍यावर निश्चयाचे भाव हळूहळू दिसायला लागतात. ’फुल्ल टू धमाल’ पुरवणीमध्ये मनोरंजना बरोबरच येणारा माहितीचा खजिना किती उपयुक्त आणि कसा लाभदायी आहे याची जाणीव सलील करून देत राहतो.
************
बागेला कौतुक पहिल्या पावसाचं......बागेला नवलाई रात्रीच्या शांत चांदण्यांची.......आपल्याच नादात प्रतिदिनी वाढत जाणारी ही बाग अशीच, केंव्हापासून तरी जीवनाचे मनोहारी रंग भरते आहे. नेहमीच दिसत राहणार्‍या या बागेला कुणाची चाहूल लागत असेल? बागेलाही वेध लागतात बरं..... वार्‍याची झुळूक जेंव्हा मायेची तलम शाल पांघरत येते तेंव्हा बाग हरखून जाते. तिकडे गावाबाहेरच्या मंदीरात सांजऋचा सुरू झाल्या की बागेचेही डोळेही शांतपणे मिटतात. जे जसं समोर येईल ते जीवन समृद्ध करायचा वसाच घेतलाय या झाडांनी, फळाफुलांनी, पानापानांनी आणि त्यावर ध्यानस्थ बसणार्‍या चिमणपाखरांनी !!
************
“आज तुम्ही सगळे मला एक वचन द्याल?” सलीलदादा आपला उजवा हात उंचावत विचारतो. समोरून जोरदार रूकार. “आज जेंव्हा घरी जाल, आपल्या बाबांना काहीतरी भेट द्या तुम्ही... अगदी सहज... कसल्याही कारणाशिवाय... काहीही द्या. एखादं पेन द्या, फुल द्या, कार्ड द्या, काही नाही तर एक पापा द्या..... एक गच्च मिठी मारा, कारणाशिवाय.... आणि त्यांनी विचारलं तर सांगा – बाबा, तुम्ही मला खुप आवडता, म्हणून हे... बस्सं.....”
सलील पोटतिडकीने बोलत असतो. सर्वांच्याच मनात संमिश्र भाव उमटत असतात. स्टेजवर बसलेल्यांना कानकोंडं व्हायला लागतं. सलीलचा पॉज म्हणजे जणू अंतःकरणाच्या संवेदनशीलतेला घातलेली सादच.... चांगुलपणाला, शहाणपणाला, कुटुंबवत्सलतेला दिलेली हाक.... बर्‍याच वर्षांपुर्वी रविंद्रनाथ टागोरांनी ’शांतिनिकेतन’च्या माध्यमातून मुक्तशाळेचा एक अभिनव प्रयोग केला होता. आज सलील ’फुल्ल टू धमाल’ मधून तसेच सोपे संस्कारांचे पाठ, कसलीही बोजडता न आणता, असे उघड्यावर देत असतो.
“सलीलदादा, तुम्ही आमच्यासाठी ’दमलेल्या बाबाची कहाणी’ म्हणावं अशी आमची विनंती आहे” एक धिटुकली उभं राहून म्हणते. आता अवाक् होण्याची पाळी मुख्याध्यापकांबरोबर सलीलदादाची....
“बरं म्हणतो, पण कुणीही या गाण्याला किंवा गाणे चालू असताना टाळ्या वाजवायच्या नाहीत.... या गाण्याचा अर्थ कळायचं तुमचं वय नाहीये खरंतर, पण आपण मगाशी जे बोलत होतो ना, आपली आई, आपले बाबा आपल्यासाठी किती कष्ट करत असतात याची जाणीव नसते आपल्याला.... हे गाणं तुम्ही मोठे झाल्यावर जेंव्हा ऐकाल तेंव्हा मी काय म्हणत होतो ते तुमच्या लक्षात येईल. पण आत्ता एवढ्यापुरतं सांगायच म्हणजे, तुम्ही तुमच्या पालकांवर खूप प्रेम करा, त्यांचा मान राखा....”

’कोमेजून निजलेली एक परीराणी’ धीरगंभीर आवाजतले गायन सुरू होते आणि इतका वेळ बेफाम दंगा करणारे बालगोपाळ एका आश्चर्यजनक समजूतदारपणे शांत, निश्चल बसून गाण्याच्या भावाशी तदाकार होऊ लागतात.

************
’आयुष्यावर बोलू काही’ या मराठी कलेच्या इतिहासात मानदंड ठरलेल्या कार्यक्रमाच्या पाचशेव्या प्रयोगात सलील म्हणाला होता
“मला तर फार आवडेल कुणी मला ’पिडीयाट्रीक संगीतकार’ म्हटलं तर.......बालगीत ही करायला कठीण.. मुलांच्या हृदयात उतरण तसं अवघडच ......बालगीतं म्हटलं की तो खरच एक वेगळा विचार असतो ... आपणंच शिकत असतो लहानांकडून....”
बालचमूच्या मानसिकतेची यथार्थ कल्पना असणारा सलील नेहमीच त्यांच्या चिमुकल्या विश्वात शिरकाव करून त्यांना जीवाभावाच्या वाटणार्‍या गोष्टी मांडत आलाय. लहानग्यांच्या मनात उमटणारे, कवितांमधून, गीतांमधून व्यक्त झालेले कितीतरी तरल भाव सलीलने अश्या काही सुंदर सुरावटींमध्ये पेश केलं की प्रत्यक्ष पु,ल. देशपांडे उद्गारले “तुमची बालगीते ऐकली की फ्रेश वाटतं....” संगीतातून हे काम गेली अनेक वर्षे करून झाल्यानंतर सध्या ’दै. सकाळ’च्या या उपक्रमाच्या निमित्ताने तो महाराष्ट्राच्या उद्याच्या उषःकालाला थेट भेटतोय. करमणूक अथवा मनोरंजन हा या भेटीमधला तसा गौणच भाग. मुख्य विषय आहे धमाल!!
पण त्याचबरोबर उघड्या मनाने जगाकडे पहायला उत्सुक असणार्‍या पुढच्या पिढीला चांगल्या विचारांची शिदोरी देण्याचा प्रयत्न ’फुल्ल टू धमाल’ च्या या विशेष सादरीकरणांमधून चालू आहे. यात उपदेशाचा दर्प नाही, ज्ञानाचे डोस अथवा कृत्रिमतेचा लवलेश नाही, ओढूनताणून आणलेला मोठेपणाही नाही. वागण्याबोलण्यातील सहजता आणि कमालीची उत्स्फुर्तता ही सलील कुलकर्णी या व्यक्तीमत्वाच्या भात्यातली अमोघ शस्त्रे. त्यांचाच बेमालुम वापर सढळपणे करत सलील ठिकठिकाणच्या शाळकरी मुलांशी त्यांच्या पातळीवर जाऊन संवाद साधतोय. आधी भरपूर खेळकर वातावरण निर्माण करून त्यातून समाजाला अपेक्षित असणारं प्रबोधनही नकळत करतोय. हा उपक्रम विशिष्ठ वयोगटासाठी आखलेला असला तरीही, असं एखादं सत्र पहायला मिळालेल्या, माझ्यासारख्या त्रयस्थ माणसाला, हातातून निसटून गेलेल्या बालपणाची याद त्यानिमित्ताने होतेय........
************
ती कोपर्‍यावरची बाग तुमच्या-आमच्या अगदी ओळखीची आहे. प्रत्येक ऋजू स्वभावाच्या माणसाने त्यात कधी ना कधी फेरफटका मारलेला आहे. अनादी काळापासून फुलत राहिलेली, नित्य अनुभवायला मिळणारी ती शैशवाची बाग आहे. मानवी इतिहासाच्या सगळ्या पर्वात आणि काळात ती अहर्निशी अशीच नैसर्गिकपणे मोहरून येत असते. ’मुले म्हणजे देवाघरची फुले’ ’Child is a father of man’ वगैरे वापरून वापरून गुळमुळीत झालेली वाक्ये आपल्याला चांगलीच माहित असतात. या बागेतली विवीधरंगी अशी कितीतरी सुमनं रोज आपल्या आजूबाजूला वावरतही असतात. पण या पिटुकल्यांच्या अंगणात जाऊन त्यांना आपलंस करण्यासाठी गरज असते सलीलसारख्या एखाद्या मनोभाव जाणणार्‍या अवलियाची !! घटकाभरच्या गम्मतीजम्मती बरोबरच योग्य ते विचार प्रदान करण्याचं, मूल्यसंवर्धनाचं मोठं लोभसवाणं पण महत्वाचं काम या जाहिरातसत्राच्या द्वारे सलील करत आहे. आपल्या लाडक्या सलीलदादाबरोबर घालवलेला एक-दीड तास मुलांसाठीही पदरात फार काही टाकून जाणारा ठरतोय....
नवीन दिवस..... डोक्यावरचे ढग बदलतात...... गावाची पाटी नवी....... नवी शाळा.... नवीन चेहरे..... नवीन प्रश्न आणि नवीन किलबिलाट......... भरभरून वाहणारा उत्साह मात्र तोच....
सलील मुलांच्या आवडीचे गाणे गाऊ लागतो.....पुढचा कितीतरी वेळ.....हशा, टाळ्या, मज्जा, हळुच मारलेल्या टपल्या, कान टोचत शिकवलेला छोटासा धडा, चेष्टा, मस्करी, आपल्या वैभवशाली परंपरेचा पाईक होण्याची दिली गेलेली शिकवण, संगीत, नाच, गायन, मनमोकळे श्वास, सलीलदादा आणि त्याच्याभोवती जमलेला निरागस गोतावळा........ एकंदरीत काय तर फुल्ल टू धमाल................