Friday, December 31, 2010

कोण?

(बर्‍याच दिवसांनी अशी प्रहसनात्मक, डीप मिनींग असलेली रचना सुचली. मान्यवर खुश आहेत त्यामुळे... लिहीताना मज्जा आली एकदम..... बाकी यात लपलेले अर्थ प्रत्येकाने आपापल्या परीने उचलावेत. Misinterpretations ना लेखक जबाबदार नाही.)
रोजचीच बात, जन्माचा घात,
काढून दात, उगा हसतंय कोण?
पायाला चाक, कश्याचाबी धाक,
कापलेलं नाक, त्याला फसतंय कोण?
घेताना उडी, काढून खोडी,
पायात पाय, घालतंय कोण?
हाताला काम, कामाला दाम,
छदामाच्या नावानं, झुलतंय कोण?
करून पूजा, गावाची मजा,
आलियासी भोगा, भोगतंय कोण?
नुसत्याच फुका, देवाला हाका,
पायरीवर डोकं, घासतंय कोण?
वाहणारा मेळा, हिच्या-तिच्या गळा,
बांधायला हार, झाड शोधतंय कोण?
रूपाला भुलून, नको तिथं बोलून,
घोड्यावर ओझं, लादतंय कोण?
वस्तीला पाहुणा, राहतोय शाहणा,
जन्माची सोयरीक, दळतंय कोण?
चावडीला हसणं, गोधडीत रडणं,
मुखवट्याचा खेळ, आता खेळतंय कोण?
.........
कुठं झालं सुरू, आता कसं करू,
प्रश्नांच्या मागे, धावतंय कोण?
उद्याचीच गाणी, तीही मनोमनी,
गोष्ट नवी-जुनी, आता सांगतंय कोण?