Sunday, November 21, 2010

ड्रीम डेस्टीनेशन........

(काही वेळा आपली प्रतिभा उगाचंच सैरावैरा धावत असते. मन काहीच्या काही कल्पनाचित्रे उभी करते हो... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या अमोघ अश्या शैलीत ’ज्ञानेश्वरी’ ग्रंथात सहाव्या अध्यायात योगी साधकाच्या उपासनास्थानाचे अफलातून वर्णन केलेले आहे. अगदी पहिल्यांदा ते वाचून इतरांसारखा मीही थक्क झालो. नंतर मात्र त्या ओव्या आल्या की का कोण जाणे प्रत्येक वेळी समांतर विचारचित्रे मनात उभी रहायची. ज्ञानोबांचा काळ वेगळा होता. त्यावेळचे भौगोलिक, सामाजिक संदर्भही पुर्णतः निराळे. पण आता असे माऊलींच्या अपेक्षेत बसणारे साधनास्थान कुठे आहे? मला ते कसे दिसेल? याबद्दल विचार करायला लागले की माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभे रहायचे. हे ठिकाण कुठे अस्तित्वात असेल की नाही कल्पना नाही. पण मनःचक्षुसमोरून हा सीन काही हलेना. काही वर्षांपूर्वी मग मी ते सगळं लिहून काढलं. त्यावर्णनानुसार माझी बहीण श्रद्धा हीने ती भारतात असताना एक चित्रही काढले होते. आज ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून मी ते माझ्या कल्पनाविश्वात घट्ट बसलेलं स्थळ काहीबाही व्यक्त करायचा प्रयत्न करतो.... या वर्णनाच्या आसपास जाणारं एखादं ठिकाण माहित असल्यास वाचकांनी मला जरूर कळवावं :))
एक छोटसं गाव... गावाच्या मध्यातून जाणारी एक छोटीसी नदी.. जास्त खोल नसलेली, खळाळत वाहणारी, स्वच्छ-निर्मळ, तळ दिसणारी !! नदीच्या काठाने जाणारा रेल्वे रूळ आणि एक चिमुकलं स्टेशन.... स्टेशनच्या विरूद्ध बाजूला नदीच्या दुसर्‍या काठाला एक छोटसं मंदीर..... हिरव्यागार गावाबाहेर छोटे छोटे डोंगर... गावार फळभाज्या आणि पालेभाज्यांचे कप्पे..... छोटी छोटी आखीवरेखीव कौलारू घरं... स्वच्छ सूर्यप्रकाशातला वसंत ऋतूतला दिवस..... फुलझाडे फुलून आलेली.... पश्चिमेकडून वाहत येणारा मंद वारा....गाई चरायला घेऊन चाललेला शेतकरी...दिवसाची सुरूवात भूपाळीने झालेली..... देवळातल्या धूपाचा दरवळणारा सुगंध..... त्या शांततेचा भंग करत आलेली सकाळी साडेनऊची छोटीशी रेल्वे.... उतरणारा एखादाच उतारू आणि परत निघालेली रेल्वे ! रेल्वे गेल्यावर पुन्हा तशीच अवतरलेली निगूढ शांतता....
मधूनच एखाद्या पक्ष्याचा आवाज... वार्‍याच्या झुळुकीबरोबर हलणारी गवताची पाती.... स्टेशनच्या बाहेर असलेलं एक वृद्ध वडाचं झाड.... त्याखाली फळाची ताजी टोपली घेऊन बसलेला एक तितकाच वृद्ध शेतकरी.... स्टेशनपासून गेलेल्या छोट्याश्या पायवाटेच्या शेवटाला असलेली एक छोटीशी रेल्वे क्वार्टर... त्यातून येणारा दगडी कोळश्याचा टीपीकल वास...कॉलनीतल्या प्रत्येक घराच्या समोर काढलेले पाण्याचे छोटे छोटे पाट.... पाटाच्या कडेला काढलेले अळूचे वाफे.....
समोर डोंगरावर दिसणारे, डोलणारे हिरवेगार वृक्ष... डोंगरपायथ्याशी वसलेली टुमदार छोटीशी घरे... घरांच्या परसदारात असलेल्या काजू, फणस आणिक कश्या-कश्याच्या बागा ! समोरच्या बाजूस मात्र आंब्याचं झाड – गर्द सावलीचं, भूल पाडणारं... अश्याच एका उतारावर उभा असलेला एक निस्पंद बंगला..... बंगल्याच्या फाटकाबाहेर फुललेला लालचुटुक गुलमोहर...बंगल्याला खेटून वाहत असणारा एक चिमुकला, खळाळता झरा... त्याच्या पाण्याने निर्माण होणार्‍या रागदारीचं एक जीवनसंगीत..... बंगल्याच्या कुंपणाआत मऊ माती आणि गर्द हिरवाई... बंगल्याच्या खिडकीतून नदी, डोंगर, रेल्वे स्टेशन दिसत असावं !!
बाल्कनीत एक आरामखुर्ची... एक खास साधनेसाठी ठेवलेली खोली – तीन खिडक्या असलेली... दोन खिडक्या स्टेशनच्या दिशेस उघडणार्‍या.... एका खिडकीतून तो तपस्वी डोंगर दिसत असावा... समोर एक सागवानाचं सुंदर देवघर.... त्यात विराजमान झालेल्या श्रीराम,कृष्णांच्या गोंडस, गोजिरवाण्या मूर्ति !! मऊ आणि प्रशस्त ध्यानाचं आसन... नुकत्याच वाहिलेल्या सुगंधी फुलांचा सुटलेला घमघमाट... मागे पुस्तकांच एक भरलेलं कपाट....कोपर्‍यातल्या माठात वाळा घातलेलं पाणी !! खोलीत सद्‍गुरूंचा भव्य, सास्मित फोटो... जवळजवळ पूर्ण भिंत व्यापणारा... त्यांची प्रेमळ नजर, त्यांचे शिष्याच्या अंतःकरणाचा थेट वेध घेणारे डोळे.... हसरी मुद्रा आणि आजूबाजूला जाणवणारी दैवी आभा...
सकाळी पावणेदहाची वेळ.... बंगल्याच्या परीसरात पसरलेली गडद शांतता.... पक्ष्यांची गाणी अस्फूटपणे चालूच... लांबरून येणारा गाईं,बैलांना हाकणार्‍या शेतकर्‍याचा अस्पष्ट आवाज.... आणि स्टेशनमास्तरने रेल्वे गेल्यावर तिथे असलेल्या एकुलत्या एका पोर्टरला मारलेली हाक !!
खिडक्या पूर्ण उघडलेल्या... पूर्वेकडून येणारं आणि अजूनही कोवळं भासणारं रेशमी उन थेट खोलीत दाखल झालेलं... साधनागृह प्रकाशाने उजळून निघालेलं.... दूरवर देवळात एकदाच वाजलेली घंटा... आसनाशेजारी स्वामी स्वरूपानंद रचित ’स्वरूप-पत्र-मंजूषे’चं पुस्तक !! मनात उत्पन्न झालेला उदात्त परमात्मभाव.... त्या शांतीत बुडून जाऊन केलेलं ध्यान – सद्‍गुरूंच्या शिकवणीबरहुकुम.....स्वतःला पूर्णपणे विसरून जाणं...... मन सहजभावात तरंगरहीत.... निसर्ग, परमात्मा, सद्‍गुरू आणि मी यांची स्वरूपात झालेली एकरूपता.... स्तब्धतेत, मौनात विरघळून गेलेलं सर्व काही !!!
******************
वर उल्लेख केलेलं ’श्री ज्ञानेश्वरी’च्या सहाव्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकीक प्रतिभेतून उतरलेलं थरारक वर्णन
आणिकही एक पहावें| जें साधकीं वसतें होआवें| आणि जनाचेनि पायरवें| रुळेचिना ||१७२||
जेथ अमृताचेनि पाडें| मुळाहीसकट गोडें| जोडती दाटें झाडें| सदा फळतीं ||१७३||
पाउला पाउला उदकें| वर्षाकाळेंही अतिचोखें| निर्झरें का विशेखें| सुलभें जेथ ||१७४||
हा आतपुही आळुमाळु| जाणिजे तरी शीतळु| पवनु अति निश्चळु| मंदु झुळके ||१७५||
बहुत करूनि निःशब्द| दाट न रिगे श्वापद| शुक हन षट्पद| तेउतें नाहीं ||१७६||
पाणिलगें हंसें| दोनी चारी सारसें| कवणे एके वेळे बैसे| तरी कोकिळही हो ||१७७||
निरंतर नाहीं| तरी आलीं गेलीं कांहीं| होतु कां मयूरेंही| आम्ही ना न म्हणों ||१७८||
परि आवश्यक पांडवा| ऐसा ठावो जोडावा| तेथ निगूढ मठ होआवा| कां शिवालय ||१७९||
दोहींमाजीं आवडे तें| जें मानलें होय चित्तें| बहुतकरूनि एकांते| बैसिजे गा ||१८०||
म्हणौनि तैसें तें जाणावें| मन राहतें पाहावें| राहील तेथ रचावें| आसन ऐसें ||१८१||
वरी चोखट मृगसेवडी| माजीं धूतवस्त्राची घडी| तळवटीं अमोडी| कुशांकुर ||१८२||
सकोमळ सरिसे| सुबद्ध राहती आपैसे| एकपाडें तैसें| वोजा घालीं ||१८३||
परि सावियाचि उंच होईल| तरी आंग हन डोलेल| नीच तरी पावेल| भूमिदोषु ||१८४||
म्हणौनि तैसें न करावें| समभावें धरावें| हें बहु असो होआवें| आसन ऐसें ||१८५||
मग तेथ आपण| एकाग्र अंतःकरण| करूनि सद्गुरुस्मरण| अनुभविजे ||१८६||
जेथ स्मरतेनि आदरें| सबाह्य सात्त्विकें भरे| जंव काठिण्य विरे| अहंभावाचें ||१८७||
विषयांचा विसरु पडे| इंद्रियांची कसमस मोडे| मनाची घडी घडे| हृदयामाजीं ||१८८||
ऐसें ऐक्य हें सहजें| फावें तंव राहिजे| मग तेणेंचि बोधें बैसिजे| आसनावरी ||१८९||
आतां आंगातें आंग वरी| पवनातें पवनु धरी| ऐसी अनुभवाची उजरी| होंचि लागे ||१९०||
प्रवृत्ति माघौति मोहरे| समाधि ऐलाडी उतरे| आघवें अभ्यासु सरे| बैसतखेंवो ||१९१||