Monday, November 15, 2010

न दमणार्‍या बाबाची कहाणी

आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटनांकडे, व्यक्तींकडे पाहून काही ना काही सुचून जातं. लिहीतो आपण एखाद्यासाठीचं आणि मग ते बनून जातं गूज सगळ्यांच्याचं मनातलं.... अशीच मला जाणवलेली, आपल्या मुलीसाठी अविरत झटत राहणार्‍या कोण्या एका बाबाची ही कहाणी...... हे अप्रकट भाव त्या मुलीने आपल्या वडीलांसाठी म्हटले असले तरी ही कविता अर्थातंच जगातल्या तमाम बाबांना लागू पडणारी !!
“वाहवा”, “छान”, “मस्त”, “सुंदर”
कानावर पडत असतात कितीतरी शब्द
लोकांचा लोटलेला असतो नुसता महापूर,
स्टेजवरच्या माझी नजर मात्र शोधत असते
कोपर्‍यात अंग चोरून उभ्या असलेल्या तुम्हाला
अन् दिसत असतो भरून आलेला तुमचा ऊर.........
तुमच्या डोळ्यातला तो मूक प्रतिसाद
असतो मला स्वरगंधर्वांच्या दादीपेक्षाही प्रिय,
तुमच्या चेहर्‍यावर दाटलेलं ते कौतुक
असतं मला कुठल्याही पुरस्कारापेक्षाही प्रिय.......

तुम्ही बनता मग ढाल परत एकदा
आपल्या या चिमण्या पाखरासाठी,
सोसता गर्दीचं ऊन आणि प्रवासाचे चटके
पांघरता एक मायेची शाल
आपल्याला या शीणलेल्या लेकरासाठी..........
केंव्हा खाता, काय पिता,
दिसत नसतं कधीच मला,
कुठे बसता, काय करता,
माहीत नसतं कधीच मला,
पण माझ्या चेहर्‍यावर उमटलेली
त्रासाची एक आठीसुद्धा
तुमचा घास घश्यात अडकवते
हे पुरतं कळालेलं असतं मला........

सकाळी मी असते निजलेली, दुलईदार जगात स्वप्नांच्या
तेंव्हा तुम्ही मात्र निघालेले असता, नव्या दिवसाचा नवा व्याप ओढायला,
आम्ही करत असतो मौजमजा, सदाफुलीच्या पाकळ्यांशी
तेंव्हा तुम्ही मात्र वीटा रचत असता, आपलं नवं घरटं बांधायला...........
तुमचा दिवस कुठं उगवतो आणि कुठं संपतो काही कळत नाही
कळत नाही कुठून आणता तुम्ही एवढं बळ,
आमच्या गाण्यातल्या चंद्रकळा दिसतात लोकांना
दिसत नाहीत ते तुमच्या हातांना पडलेले वळ,
पंखाखाली धरता तुम्ही मला
जेंव्हा पडत असतात बाहेर वीजा, गारा आणि बरसात,
एकेक क्षण वेचत आमची गात्रं सांभाळताना
स्वतः मात्र तुम्ही उभे असता पाय रोवून त्याच पावसात....

तुम्हालाच दिसली सर्वात आधी
माझ्या बोबड्या बोलातली गझल, बंदीश आणि विराणी,
माऊलीच्या मायेने शिकवलीत मला
आभाळाची, गिरीशिखरांची, कोवळ्या उन्हाची संतवाणी.....

बाबा, वाटत नाही का कधी तुम्हाला?
टेकावं जरा जमिनीवर
आणि घ्यावा रानवार्‍याचा मोकळा श्वास,
बाबा, वाटत नाही का कधी तुम्हाला?
शांत बसावं सावलीखाली
आणि पहावा आपल्याच अंतरी सूरांचा शांत प्रवास,
बाबा, कुठून आणता तुम्ही
जगन्नाथाचा रथ ओढणारे ते दहा हात?
बाबा, कशी करता तुम्ही
माझ्या अडखळणार्‍या प्रत्येक पावलाला साथ?

मला माहितीये,
यावर हसून तुम्ही म्हणाल –
“छे गं मनू, मी कुठं काय करतो?
खरे कष्ट करतेस तू, मी फक्त गरजेला पुरतो...”
लांबवाल तुम्ही तुमचं हसू
अन् लपवाल त्याआड
डोकंभर भरून राहिलेली अनेक ओझी,
मला कुशीत घेऊन कवटाळाल जराशी
वहात रहाल परत, तशीच काळजी माझी,
...............
कोण्या संध्याकाळी एका दिवेलागणीला
देवासमोर हात जोडून उभी असेन मी,
मनभर पसरल्या असतील गोष्टी –
यशाच्या, कौतुकाच्या, शाबासकीच्या,
तेवत्या निरांजनाच्या सोबतीला असतील
माझी सर्वदूर निनादत असणारी गाणी,
तेंव्हाही आपण नजरेनी अस्संच बोलू की नाही माहिती नाही
पण माझ्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दात
मला मात्र आठवत असेल –
माझ्या कधीही न दमणार्‍या बाबाची कहाणी....
माझ्या कधीही न दमणार्‍या बाबाची कहाणी....