Thursday, October 14, 2010

कालचा पाऊस....

काल शहरात पुन्हा एकदा पाऊस पडला,
पुर्वीसारखाच...अवचित..अवकाळी...सरसरून...

संध्याकाळची ढगांची गर्दी बघून
भिरभिरणार्‍या मनाला मी समजावलं सुद्धा -
’असं मनभावन होऊ नये आपण, एखाद्या कृष्णमेघासाठी
अन्‌ चातकाची तहान हवीच कश्याला आपल्याला?’
पण दोन-चार टपोरे थेंब दिसले नी दिसले काय
ते गेलंच नहायला, कोसळणार्‍या धारांच्या पंखाखाली....
ढगातला गारवा असा तुम्हां-आम्हांत आलेला बघून
मीही काढला खिडकीबाहेर तळहात,
गदगदून आलेलं वाटसरू झाड
होतं चुकलेल्या भेटीची वाट तस्संच पहात,

ठिबकणार्‍या त्या ओलाव्याने मग हळूच उगाळल्या आठवणी -
पाठलाग करणार्‍या दोन डोळ्यांच्या.... निशीदिनी घमघमणार्‍या कळ्यांच्या...
कानात साठवलेलं ते अशक्य गोड बोलणं...
आणि नुसतं बरोबर असण्याने आतमध्ये झंकारलेली इंद्रधनु गाणी..

खिडकीतून दिसणारा पाऊस
मला नेहमीच वेगळावेगळा भासतो,
दोन-चार क्षणांचीच सोबत असते खरी
पण लपलेल्या चेहर्‍याचा रंग, का कोण जाणे अंगभर वसतीला असतो...

कालच्या पावसानं सर्द भिजवून टाकलं
भिजवला नाही तो त्या सांजपावलांचा वेध -
असं कुणा अनामिक परीघात यायचा मोह,
असं कुणा अंतःकारणाच्या शिडकाव्याचा डोह,
असं कुणा नावाने जाणवत राहणारी हुरहुर,
असं कुणा किलबिलीने पालवलेला नवा सूर
मनाचं तंत्र काही म्हणजे काही सांगता येत नाही !

काल पुन्हा पाऊस पडला आणि वाटून गेलं -
या शिरशिरीलाही द्यावं एक छोटंसं नाव
द्यावा एखाद्या तरी स्वप्नाला लडीवाळ हात,
असेना का चुटकीसरशी उडून जाणारं सुख
रहावं आपण आपलं जीवनगाणं गात,
व्यक्त होता येणार नाही कदाचित आपल्याला
उत्कट उत्कट कवितांच्या ओळींसारखं...
आपली गझल, आपले अभंग, आपली भैरवी
कदाचित मांडू शकणार नाही आपल्या श्वासाच्या संवेदनांना,
काल शहरात पुन्हा एकदा पाऊस पडला तर वाटतं राहिलं
जाइजुईच्या वेली कधी ओळखतील का या चुकलेल्या शब्दसरींना.....