Sunday, September 26, 2010

मागणे हे एक.....

“बास्स... आज मागायचंच”, मावळतीच्या संधीप्रकाशाने चकाकणार्‍या शिखराकडे पहात तो पुटपुटला.
“खूप सोसलं, खूप भक्ती केली. आर्जवाचे कितीतरी अश्रू ढाळले.” त्याने एक मोठा श्वास घेतला, “या मंदीराचा लौकीक मोठा आहे. इथे कितीतरी अभागी जीव येतात – काय काय व्यथा घेऊन. आतमध्ये उभा असलेला तो विश्वेश्वर प्रत्येकाच्या जखमेवर फुंकर घालण्याचं काम शतकानुशतके करतो आहे म्हणे !!”
ही पायवाट त्याच्या अत्यंत ओळखीची. पहिल्यांदा तो इथे आला तेंव्हा किती हरखून गेला होता. भक्तीभाव शीगेला आणि डोळ्यात प्रेम साठवून घेतलेलं ते दर्शन. काही न बोलता, मूकपणे कितीतरी वेळ नुसतंच त्या मूर्तीकडे पाहणं झालं होतं. आजूबाजूला लोकांची केवढी गर्दी होती तेंव्हा. कोणी मोठ्या भावाने डोके टेकवत होते तर कोणाचा साष्टांग प्रणिपात. दुसर्‍याच्या अंतःकरणात वसतीला असलेल्या या भक्तीचं त्याला नेहमीच अप्रुप आणि आकर्षण सुद्धा..... आणि आज मात्र... या संध्याछायेच्या बिलोर्‍या घडीला मंदीरभर सांडलेलं एकाकीपण. कुठे गेली ती सर्व माणसे? त्यांच्या मनोकामना बहुधा पुर्ण झाल्या असाव्यात !!
“दारातून रिक्तहस्ते नाही पाठवलं म्हणे त्याने कधी कुणाला” पायर्‍यांपाशी तो अंमळ थबकला.
“किती दिवस झाले आणि किती वर्षे झाली आपण इथे येतोय....ऊन, वारा, पाऊस कश्याचीही तमा बाळगली नाही. कश्यासाठी येत होतो आपण?”
भणाणणारा वारा त्याच्या मनाला इतस्ततः पसरवत होता. आसमंतात मारवा आपसुकच फुललेला. मोठ्या कष्टाने विचारांना आवरत त्याने आपलं लक्ष गाभार्‍यावर केंद्रीत केलं – नेहमीप्रमाणं !
’घंटा वाजवण्यासाठी उचलण्याइतकीही शक्ती नाहीये आता हातात’,लक्षात आलंय त्याच्या..... थरथरत्या कायेला आता आधार या घनगंभीर खांबांचा... दूरवर कुणीतरी एकतारी छेडलेली...
आशेची की काय म्हणतात ती पावले टाकत त्याने थेट आत प्रवेश केला. पुजार्‍याने वाहिलेलं एकमेव फुल अजूनही त्या मुर्तीच्या डोक्यावर तस्संच... पायाशी तुळशीपत्रे आणि थोट्या माणसांनी अर्पण केलेले चिमुकले प्रसादाचे कण.
आता तो भगवंताच्या बरोब्बर समोर उभा होता. अंतःकरणातले कढ तसेच ठेवून त्याने एक कटाक्ष श्रीचरणांवर टाकला. या पायावर डोके टेकवण्याचं जणू व्रतच घेतलं होतं... आणि त्या चरणस्पर्शाने उमटलेले मोहोर अद्यापही ताजे. उठून समोर पहावं म्हटलं तर पापण्यातून वहायला लागलेल्या धारांमुळे सगळं धूसर होऊन गेलेलं....

त्याला आठवली ती आपली चंद्रमौळी झोपडी, अंगणात रात्री पडलेल्या देवदूतांच्या छाया, घश्याखाली घास ढकलताना विकल झालेलं मन आणि रोज क्षितीजाकडून निरोप घेऊन आलेला प्राक्तनाचा एकेक क्षण.... समरसून आळवलेल्या त्या ओव्या.... निर्धाराचे वळ... उत्फुलतेचं जीवन जगण्याची अतोनात धडपड... आणि अळवाच्या पाण्यासारखं निसटून चाललेलं सत्य !
चौथर्‍याचा आधार घेऊन तो तसाच लटपटत्या पायांनी देवाकडे बघत बसला.
“भक्त आमुचे व्यसन । भक्त आमुचे निजध्यान । ते कांता मी वल्लभ जाण । इये लोकी ॥” खुप रोमांचित होऊन गायला होता तो ही ओवी काही वर्षांपुर्वी.
’आज कृपेची याचना करायचीच’ खोटा आवेश आणून त्याने स्वतःलाच उभारी द्यायचा प्रयत्न केला.
बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत,
कसे रूजावे बियाणे, माळरानी खडकात ॥धृ॥

बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर,

लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर,
हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ,

कसे रूजावे बियाणे, रानमाळी खडकात
..... ॥१॥
बस्स.. ही चंद्रकिरणांची साथ तेवढी मिळाली नाही. अंग मोडून काम करायला आपण कायमच तयार होतो. ओबडधोबड माळरानावर विवेकाची नांगरणी केली. पण आषाढाने चकवा दिला तो अद्यापही तसाच.
आज मात्र मागायचंच. काही केल्या विन्मुख जायचं नाही इथून’..
निरंजनातील दिव्याची आभा सगळीकडे पसरू लागलेली. एकवार डोळे गच्च मिटून घेत त्याने आवंढा गिळला. पंचभौतिक विश्व एकीकडे... परमात्म्याचा प्रकाश दुसरीकडे.... देहाशी बेईमानी त्याला तशी कधीच रूचली नव्हती पण का कोणास ठाऊक आजकाल नियतीच्या गर्द अंधारात चांगुलपणाच्या हाताची पकड थोडीशी सैल होऊ लागलेली.

मुर्तीच्या डोळ्यात एकटक पहात तो म्हणाला “तू म्हणे भक्तवत्सल, कृपासिंधू. माझ्या इवल्याश्या प्रार्थना कधी तुझ्यापर्यंत पोहोचल्या की नाही कोणास ठाऊक? तू म्हणे जगनिय्यंता. विराट विश्वाच्या एका लहानग्या कोपर्‍यातून दिलेले माझ्या साधनेचे हाकारे तू कधी ऐकले आहेत की नाही कोणास ठाऊक?”
देव तसाच सस्मित....... निस्पंद शांततेचा भंग करत तो परत बोलू लागला. “आज मात्र तुला ऐकावंच लागेल. मी काही याचक नाही. पण आपल्या आराध्याकडंच नाही मागायचं तर मग हात पसरायचे तरी कुणापुढे? मागणं काही जास्त नाही. कुबेराचं वैभव नकोय मला आणि नकोत मला इंद्रधनुष्यांचे रंग. सोनेरी पानांवरचं दव नाही दिलंस तरी चालेल किंवा दाखवला नाहीस तरी हरकत नाही सुखी गावातला सुखी इमला. निखार्‍यांवरून चालण्याबद्दल काही प्रश्न नाहीये आणि मागतही नाहीये मी प्राजक्तफुलांची परसबाग. अगदी गरजेपुरतं मागतोय रे मी.....देशील ना?”
तो क्षण येऊन ठेपला होता. सर्व बळ एकवटून, धीराने त्याने हात जोडले. मस्तक लवून म्हणाला,
“हे भगवंता.... ज्ञान दे.... भक्ती दे...... मुक्ती दे..... तुझ्या स्वरूपात एक छोटीशी जागा दे....”
दुसरं काहीतरी मागण्याचा निश्चय करून आलेला तो, त्याची प्रार्थना आणि ह्या सार्‍या प्रसंगांचा अस्साच होणारा शेवट वर्षानुवर्षे मूकपणे पहात असलेला देव्हारा नेहमीप्रमाणेच मौन राहिला.....

21 प्रतिक्रीया:

विनायक said...

shevatachi ol ............................
aavadesh dada..
manyvar halli lekhanilahi hat lavatat he pahun bare vatale

विशाल तेलंग्रे said...

अद्वितीय! अनेक दिवसांनंतर असं मन तृप्त करणारं साहित्य वाचायला मिळालं. विक्रांता धन्यवाद त्याबद्दल!

Vikrant Deshmukh... said...

धन्यवाद, विनायक आणि विशाल !!!!!!!

अनिकेत said...

मस्त रे. खरंच प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या, विनंत्या वेगळ्या, गार्‍हाणी वेगळी. ५-५० रु. देऊन मागण्या मात्र असंख्य.

मनी नाही भाव आणि देवा मला पावं असे अनेक जण असतात, परंतु त्याचबरोबर भक्तीरसात ओथंबुन, भिजुन आलेले सुध्दा असतात.

कुणाच्या खात्यात काय टाकायचे आणि कुणाच्या काय हे तो भगवंतच जाणे.

आपण आपले हात पसरायचे काम करायचे

Pravin Kulkarni said...

अतिशय सुंन्दर लेख अहे विक्रांत...धन्यवाद !

aartiam said...

Khoop chhan vatal vachun ....Divasachi yahun mast suruvaat houch shakat nahi ... Thanks !!

SHARAD PURANIK said...

You age going the GA way... tyanchya anek kathan madhun asale prasang vachayala milatat.. great writing..

भुंगा said...

अद्वितीय लेख!..
वाचुन धन्य पावलो!

मनमौजी said...

अप्रतिम लेख..

Vikrant Deshmukh... said...

आरती / प्रविण - धन्यवाद.

Vikrant Deshmukh... said...

अनिकेत - खरे आहे. पण मागताना काय मागावे याबद्दल जो गोंधळ उडतो मनात त्याबद्दल टीप्पणी करायची होती.

Vikrant Deshmukh... said...

शरद / मनमौजी -
प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !!
जीए फार वरचे हो... मी आपलं सुचेल ते खरडत असतो. तश्याही त्यांची एखादी दुसरीच मी वाचली आहे. झेपली नाही पण.
ग्रेस, जीए, एलकुंचवार अश्यांच्या वाट्यालाच जात नाही मी :)

Vikrant Deshmukh... said...

भुंगा -
मान्यवर, तुमची पोचपावती मिळाली म्हणून उलट आम्हीच धन्य झालो !!

Swanand... said...

APRATIM !! Mitra, he asa likhan fakta tuch karavas. Asech changale lekh tu lihit rahavas ani aamhi vachat rahava.

kalyani said...

Khupach chan...mi e sakal var apalya blog baddal vachale ani gelya 1 mahinyat magache sarva lekh vachale..khupach khare khure lihine ahe..I was waiting for new post and its really a touchy one.Thanks Vikrant

Amrita said...

beautiful
agdi sundar!
the whole buildup is soo touching, brings to the mind all the right feelings and mood of gratitude. and confusion at the mystery of the whole affair of living. and again gratitude. and we just end up saying thanks to god.

ulhasbhide said...

विक्रांत,
बर्‍याच दिवसांनी लिहिलस आणि
काळजाला हात घातलास की रे !

rahul said...

well done vikrant


some thing new after so many days

how u forgetten to mumgdha vaishampayan

rahul said...

keep wirting as usual fantasticthanks

rahul said...

if possible write someting new on mugdha and athrvas anchoring

Anonymous said...

Wow Vikrant Aati sunder...really nice...