Monday, August 9, 2010

कुणीतरी आवरा रे यांना.......

फेसबुकवरची ’आवरा’ कम्युनिटी हे आमचे हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण. त्यावरून प्रेरीत होऊन मी बनवलेली ही यादी वाचकांच्या भेटीला अधूनमधून येत राहील.

(१) पुण्यातील 'निर्विकार' पुस्तक दुकानदार –
यांची दुकाने ही पुस्तक विक्रीसाठी नसून अप्पा बळवंत चौकाची शोभा वाढवण्यासाठी आहेत असा पुर्वी मला दाट संशय होता. गेल्या महिन्यातील एक-दोन प्रसंगांनंतर माझी खात्रीच पटली. वानगीदाखल नुकतीच घडलेला हा रोमांचक नाट्यप्रवेश.
स्थळ: अप्पा बळवंतमधील एक ’प्रथितयश’ पुस्तकांचं दुकान
वेळ: सकाळी ११.३० (तसेही पुण्यामध्ये कुणी काही विकत घ्यायला दुकानात येतात, त्या सगळ्याच वेळा मालक व दुकानातील कर्मचार्‍यांसाठी गैरसोयीच्या असतात!!)
पात्रे: एका पुस्तकाच्या आत्यंतिक शोधात असलेला मी, दुकानाचे मालक (वय वर्षे ५५, यांच्या चेहर्‍यावर आळस, बेफिकिरी, त्रागा, वैराग्य अश्या अनेक भावांच मिश्रण), कर्मचारी-१ (जुन्या काळच्या डॉक्टरांकडचा कंपाउंडर किंवा पेढीवरचा मुनीम), कर्मचारी-२ (तरूण पण औदासीन्याचा सॉल्लीड प्रादुर्भाव झालेला), माझ्याआधी दुकानात खरेदीसाठी आलेले व नंतरही इथे येउन हिरमोड करून घेणारे बिचारे काही ग्राहक.
मी दुकानात प्रवेश करतो. मालक गल्ल्यावर बसून रस्तावरच्या रहदारीत ’शून्य’ शोधत आहेत. कर्मचारी-१ एका ग्राहकाला कुठल्या तरी धार्मिक ग्रंथाची प्रत दाखवत आहे. कर्मचारी-२ काहीच न करता क-१ व ग्राहक यांच्या ट्रानझॅक्शनचे - ’सीआयडी’तले डॉ. साळुंके करतात तसे - बारकाईने निरीक्षण करत आहे. एव्हाना मला येऊन २ मिनीटे झालेली आहेत. कुणाचेच माझ्याकडे लक्ष नाही.
मी: (घसा खाकरत) एक्सक्यूज मी...
(मालकांना अजून शून्यातून बाहेर यायला वेळ आहे. क-१ ला काहीच होत नाही. क-२ एकवेळ माझ्याकडे बघतो. ’साली काय ही कटकट आहे?’ हा विचार तो न बोलताही मला त्याच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे वाचता येतो. पण तो अस्सल पुणेरी विक्रेता असल्याने माझ्याकडे साफ दुर्लक्ष करून क-१ आणि गि-१ यांच्या संभाषणात पुनःश्च दंग होऊन जातो.)
मी: मला एक पुस्तक पाहिजे. शिरीष कणेकरांचे. आहे का? (मी चढ्या आवाजात विचारतो. रोख थेट मालकांकडे..)
(मालक थोडेसे भानावर येतात. चर्येवर दूरचित्रवाणी निवेदकासारखा किंवा एअर-इंडियाच्या हवाईसुंदरीसारखा मख्खपणा कायम ठेवून क-२ ला माझ्याकडे जायची खूण करतात. क-२ ज्याम वैतागलेला आहे.)
क-२: कुठलं?? (तुच्छता, उपहास, हिडीसफीडीस वगैरे...)
मी: मला ’फटकेबाजी’ हवंय.
मालक: (अभिमानाने आणि विजयी मुद्रेने) नाहीये.
क-२: नाहीये
मी: संपलं का? का ठेवतंच नाही?
मालक: नाहीये...
मी: ’गाये चला जा’ आहे का? किंवा ’कणेकरी’?
मालक: (मानही न वळवता) नाहीये.....
(क-२ दुसर्‍या गिर्‍हाईकांना आपादमस्तक न्याहाळण्यात मग्न. मालकांचा शून्याचा शोध परत चालू. मी दुकानभर एक नजर फिरवतो. वरच्या सेल्फमध्ये मला ओळीने कणेकरांची बरीच पुस्तके दिसतात.)
मी: ते काय कणेकरांची पुस्तके. पाहू जरा कोणतीकोणती आहेत?
(आता वर चढून पुस्तके काढावी लागणार म्हणजे पर्यायाने काम करावे लागणार या कल्पनेने क-१ ला अंगभर सरसरून काटा येतो. ’हा खरोखरीच पुस्तके विकत घेणार आहे का?’ हा प्रश्न मालकांच्या कंटाळवाण्या डोळ्यात मला लख्खपणे दिसतो. मीही चिकाटी सोडत नाही.)
मी: बघू. बघू. काय काय नवीन आली आहेत?
मालक आणि क-२: (एकदमच) जुनीच आहेत. (काम टाळण्याचा अयशस्वी प्रयत्न).
मी: बघू दे ना पण. (मनोमन मला शिव्या घालत क-२ आतल्या भागातून एक स्टूल जोरजोरात ओढत आणतो. एक फडकं घेऊन आधी स्टूल झटकतो. मग रॅक. आणि मग पुस्तकांना उगाचंच झोडपू लागतो. त्याने हेच फडके मालकाच्या तोंडावरही मारावे म्हणजे मराठी उद्योजकांमध्ये जागृती उत्पन्न होईल असे मला मनापासून वाटते.. दरम्यान क-१ अजून पोथी तितक्याच नीरसपणे आधीच्या ग्राहकाला दाखवत आहे आणि नव्याने दुकानात दाखल झालेले लोक मा, क-१ किंवा क-२ ची दृष्टी पडावी म्हणून आटापीटा करत आहेत. क-१ जीवावर आल्यासारखा कणेकरांच्या पुस्तकांचा गठ्ठा माझ्या पुढ्यात आदळतो.)
मी: वा!! आहेत की बरीच पुस्तके तुमच्याकडे.. स्टॉक आला वाटतं !! (मालकाच्या मख्ख मुखकमलावर आपटून माझा उपहास रिबाऊंड होतो. आता मला इथे भयंकर रस यायला लागलेला असतो. मी पुस्तके चाळण्याचा टाईमपास करत दुकानात घडणार्‍या संभाषणांचा आस्वाद घ्यायला लागतो, मधल्या काळात अनेक पात्रांची रंगमंचावर एंट्री होते. मालक, क-१ आणि क-२ तितक्याच कुशलतेने सर्वांना रिकाम्याहाती पिटाळून लावण्यात यशस्वी होत असतात.)
............................................
गि-१: ’स्वामी’ आहे का?
मा: नाहीये....
............................................
गि-२: सुधा मुर्तींच ’वाईज आणि आदरवाईज’ मिळेल का?
मा. आणि क-२: नाही...
............................................
गि-३: आहारशास्त्रावरचं पुस्तक आहे का?
मा: कुठलं? लेखकाच नाव सांगा.
गि-३: कुठल्याही चांगल्या लेखकाचं दाखवा.
(क-१ उगाचच शेल्फात काहीतरी चाचपल्यासारखं करतो आणि म्हणतो) नाहीये...
गि-३: (बहुधा पुण्यात नवीन असावा) कुठे मिळेल हे?
मा: बघा दुसर्‍या कुठल्यातरी दुकानात..(जीवनातलं स्वारस्य संपलेल्या अवलियासारखा अलिप्त स्वर)
............................................
गि-४: अच्युत गोडबोलेंचं ’किमयागार’ आहे का?
मा: (रस्तावरची नजरही न हालवता) संपलंय...
गि-४: केंव्हा मिळू शकेल?
मा: (ओठाच्या चंबू करून अशक्य तोंडं करत) माहित नाही
............................................
गि-५: साखरे महाराजांची ’ज्ञानेश्वरी’ मिळेल का हो?
मा, क-१ आणि क-२: (कोरसमध्ये) नाही
............................................
गि-६: (ही कॉलेजात कलाशाखेला नुकताच प्रवेश घेतलेली मुलगी असावी) विं.दा. करंदीकरांचे कवितासंग्रह आहेत का? (क्या बात है!!! ’आमचे प्रेरनास्थान नंदुशेट हुलावळे यांणा झुंजार प्रतिष्ठाणतर्फे वाढदीवसाच्या शुभेच्छा’, ’येथे बाटली भरूण नेऊ नये’ ’कुठं गेल्ता भाऊ?’ वगैरे वाक्ये वाचायची/ऐकायची सवय लागलेल्या या पुण्यनगरीत ’कवितासंग्रह’हा शब्द – तोही एका षोडशवर्षीयेकडून - ऐकून अस्मादिकांचा उर भरून येतो.)
मा: इथे नाहीये. मागवावं लागेल. पोराला पाठवू का? (क-२ चा चेहरा ’स्वाईन फ्लु’चे निदान झाल्यावर होतो तसा काळवंडतो. कामाच्या शक्यतेने क-१ आणि क-२ शहारून जातात !!)
गि-६: किती वेळ लागेल?
मा: १०-१५ मिनीटे लागतील.
गि-६: पण नक्की मिळतील ना?
मा: (देवेगौडासारखा अडाणी चेहरा करत) काय सांगता येत नाही. बघतो पोराला पाठवून.
............................................
मी: ’विमला ठकारांची’ पुस्तके आहेत का?‍
मा: (बसल्या जागेवरून नकारार्थी मान हालवतो आणि तोंडाने ’च्यक्‌‍’ असा आवाज काढतो. ही मला सुटायची सूचना असते)
............................................
गि-७: शिव खेरांचं ’यू कॅन विन’ आहे का?
(मा, क-१ आणि क-२ काही बोलायच्या आधीच मी मोठ्यांदा ’नाही’ असं म्हणतो आणि पाठीमागे न बघता पायर्‍या उतरून चालू लागतो.)

(२) पुण्यातील ’अचल’ रिक्षेवाले –

’जवळचं भाडं?’ – नाही.
’लांबचं भाडं?’ – नाही
’सुट्टे पैसे?’ – नाही
’रिक्षात पेट्रोल?’ – नाही
पुणेरी रिक्षावाल्यांना खरंच कुणीतरी आवरायला हवे...............
’यांची’ दिवसभरातील महत्वाची कर्तव्यकर्मे –
१. चौकात अथवा रिक्षास्टॅंडवर टोळक्याने जमून गप्पा मारणे
२. पेपर (’लोकमत’ किंवा ’पुढारी’ फक्त) वाचणे
३. पत्त्यांचे विवीध खेळ रंगवणे
४. महिन्यातून एकदातरी भाडेवाढीसाठी व इतर प्रलंबित मागण्यांसाठी (म्हणजे कुठल्या??) मोर्चा काढणे
५. बसेचा संप, नैसर्गिक आपत्ती किंवा महत्वाचे कार्यक्रम अश्या प्रसंगी वाट्टेल ते दर आकारणे
६. गाडीत बसायला आलेल्या प्रवाश्यांना ’नाही’ म्हणून पिटाळणे
७. चुकून माकून रोडवर रिक्षा आलीच तर – ० ते १० किमी/प्रतीतास च्या गतीने ट्रॅफीकचा खेळखंडोबा करत,सर्व प्रकारचे नियम तोडत बाकीच्या वाहनचालकांना जेरीस आणणे
८. भरगर्दीच्या रस्त्यांवर शक्य तेवढी रस्त्याच्या मध्ये रिक्षा थांबवून उतरणार्‍या ग्राहकांशी सुट्ट्या पैश्यावरून अगर मीटरमधल्या आकड्यावरून प्रेमळ संवाद साधणे
९. नदीला थोडे पाणी आले की डेक्कनच्या पुलाखाली, पात्रात जाऊन बराच वेळ रिक्षा धुत बसणे ( व येणे प्रकारे प्रवाश्यांना घेऊन जायचा त्रास वाचवणे!!)
६. आणि यातून वेळ मिळालाच तर एखाद्या प्रवाश्याला (केवळ आपल्या घराच्या आसपासच्या भागातला असेल तरचं) ’हाफ-रिटन’ घेऊन (किंवा वीस-तीस रूपये जास्त घेऊन) सोडणे...

(३) ई-सकाळ च्या मुक्तपीठ वरील लेख आणि त्यावर वाचकांच्या प्रतिक्रीया –
काही विषय हे चर्चा करण्याचे नसून निव्वळ अनुभवण्याचे असतात....ई-सकाळवर मुक्तपीठमध्ये कै च्या कै लिहीतात लोक... आणि मग खवचट वाचक त्यावर अश्या काही इरसाल कॉमेंट देतात की बस्स...... नमुन्यादाखल वाचकांच्या या प्रतिक्रीया पहा –
चित्तथरारक प्रसंग said –
खरोखरच चीत्ताथरारक प्रसंग वर्णिला आहे तुम्ही... अंगावर काटे आले... डोक्यात गुलाब आला.... हाताला आणि पायाला पाने आली... शरीराचा खोड झालाय... पायाला मुळं फुटलीत...
लादेन said –
मीही असाच अफगणिस्तानच्या घाटातून ट्रक चालवत होतो. वळणावर गाडी स्लो करावी म्हणून ब्रेक दाबला तर लागेचना. खाली बघतो तर ब्रेक खाली उंट अडकलेला. आता मी दरीत पडणार असे वाटत असतानाच अचानक गाडी थांबली. समोर बघतो तर काय? शक्तीमानने आमची गाडी थांबवली होती. मी त्याला ’थॅंक्स’ म्हणालो आणि तो गेल्यावर साथीदारांना रागावून विचारलं ’हा उंट गाडीत कुणी आणला?’ सगळे म्हणाले ’मी नाही, मी नाही’ मी त्यांना झापले ’परत कोणी असे केले तर सगळ्यांना गोळ्या घालेन’
सुंदरा said –
बापरे !! लेख एकदम भारी आहे.... पण लेखासोबतचं चित्र चांगलं नाही....चित्रातले चौघे चोर वाटत आहेत..
धन्य ते लेख आणि धन्य त्यावर मत नोंदवणारे वाचक.... या सगळ्यांना(च) आवरा रे कुणीतरी... या नमुनेदार लेखांचे हे काही दुवे. मंडळी, लोक काय काय म्हणतात ते वाचाचं एकदा -
घाटातच फुटला घाम http://tinyurl.com/239hawh
मधमाश्यांनी वाजवली बेल http://tinyurl.com/28anf7p
तर थेट दरीतच http://tinyurl.com/293q765
असुर प्रहरी, व्याघ्राचिये दारी - http://tinyurl.com/2ejcsc3

(४) ट्विटरवर एकमेकांशी जाहीर संभाषण करणारे लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन
तमाम भारतीयांच्या मनात अढळ स्थान मिळवणार्‍या या जोडीने आजकाल एक नवाच पोरकटपणा चालू केलेला आहे. ही दोघे एकमेकांशी ’ट्विटर’वरून संवाद साधत असते. खाजगी संभाषणांसाठी यांच्याकडे सेलफोन/ईमेल नाहीत का? लताबाई रोमन लिपीत अतिभयानक हिंदी लिहीतात. बच्चनसाहेब बाईंच्या पोरकट ’ट्विटस’ना तितकीच पकाऊ उत्तरे देतात. आवरा रे या मोठ्यांना ......
गानकोकीळेचे ट्विटस् -
@SrBachchan namaskar amitji,aap ke pujjya babuji ki 101 vi varshgaanth par aapne madhushaala kitab prakashit ki hai, 8:40 PM Jul 17th via web in reply to SrBachchan

@SrBachchan ,jo aap ne mujhe bheji hai,uske liye mai aap ki reeni hu,puri kitab har taraha se bahot hi sunder hai.... 8:42 PM Jul 17th via web in reply to SrBachchan

@SrBachchan mujhe yaad hai,60 ke dashak me,mere bhai hridaynath ne,madhushala padhi,aur aap ke babuji ko khat likha tha,jisme likha tha, 8:45 PM Jul 17th via web in reply to SrBachchan

@ashabhosle meri pyari aasha,bachpan se tum ziddi to ho hi apni baat manwaogi hi, par kya karu meri choti behen jo ho,to tumhari baat to, 12:26 PM Jul 15th via web in reply to ashabhosle

@SrBachchan amitji aur ek baat kahu?abhi is waqt bhi mai meri fav.film baagbaan dekh rahi hu,to ye mehesus karti hu ki aap saath hi hai.,. 3:57 PM Jul 11th via web in reply to SrBachchan

@SrBachchan namaskar amitji,abhi 2/3 din pehele cable par sholey dekhi,kya baat haiii...aap,jayaji,dharmji,hemaji,sanjeev kumarji,pancham,, 3:33 PM Jul 11th via web in reply to SrBachchan
’बिग बी’चे ट्विटस् -
@priyankachopra Arre ! Kitna gym kariyega !! Complex de rahi hain aap hum sabko ! Kal hi badha deta hun apni timings ko !! Love Tuesday, August 03, 2010 10:42:56 PM via web in reply to priyankachopra

@mangeshkarlata Yeh toh mai dhanya ho gaya Lata ji Subah subah aapka aashirwaad mil gaya .. Bas aur kya chahiye jeevan mei .. 3:41 PM Jul 11th via Twitter for BlackBerry® in reply to mangeshkarlata

@mangeshkarlata Aap ko aur samast parivaar ko hum sab ki oor se bahut bahut dhanayavaad .. iswar kare aap ka pyar issi tarah bana rahe .. 3:54 PM Jul 11th via web in reply to mangeshkarlata

आवरण्याची नितांत गरज असलेल्या अजून काही गोष्टी पुढच्या भागात...
(क्रमश:)

18 प्रतिक्रीया:

Pankaj - भटकंती Unlimited said...

तो पुस्तकाचा एपिसोड माझ्याबाबतही घडलाय असे का वाटते? की ग्लोबल वॉर्मिंगसारखा सार्वत्रिक इश्यु आहे हा?
खरंच आवरा...

हेरंब said...

आवराआवरी अशी ही आवराआवरी... :D

Mahendra said...

अरे वा, तुम्ही पण मुपी फ्यॅन क्लब चे मेंबर का?? मस्त!!
आणि लता बाई आता म्हातारी झाली, त्यामुळे असे काहीसे वागणे अपेक्षित आहेच. ( मराठीत त्याला म्हातारचळ म्हणतात कां??) आणि तीच गोष्ट अमिताभ बच्चनला पण लागू होते नाही का?.

zampya said...

नमस्कार तुमच्या ब्लॉगला हे माझी पहिलीच प्रतिक्रिया.
रागावणार नसाल तर एक सुचवू का...एकाच पोस्ट मध्ये इतके सगळे देन्यापेक्षा छोट्या पोस्ट्स दिल्या तर त्या जास्त सोयीचे होईल..असे मला वाटते..चूक बरोबर माहित नाही पण छोट्या पोस्टसचा इफ्फेक्ट जास्त होत असावा.
असो तुमचा ब्लॉग छान आहे..आवडला.

अनिकेत said...

च्यायला कश्याला लोकं अश्या चांगल्या पोस्ट लिहीतात, आळस सोडुन कमेंट टाकावी लागते ना राव.. परत हसण्याचे कष्ट पडतात.

भन्नाट पोस्ट..बाय द वे, तुमचा ब्लॉग दुपारी १ ते ३ वेळात चालु असतो का हो? मध्ये मिस् झालेल्या पोस्ट वाचीन म्हणतो.. खि..खि..खि...

parag said...

Dear Vikrant chan lihila aahes pan he tya lonkanparyant pochane garjeche aahe Sahi tumhi asech blog lihit ja amhala pan vachayala khup aavadtat

ulhasbhide said...

व्वा ! विषयाची निवड आणि मांडणी आवडली.
मराठी माणसाच दुकान, रिक्षावाले, पुन:प्रत्ययाचा अनुभव आला.

मुक्तपीठ-लेख–प्रतिक्रीया हे नव्याने कळल. :D

Celebrities चे Twitters :
ही profiles खरी असतील का ?

Vikrant Deshmukh... said...

पंकज - खरंच रे, हा पुण्यातला अगदी सार्वत्रिक इश्यु आहे. यांची पोटं कशी भरतात हेच एक कोडे आहे.

हेरंब - :)

महेंद्रा - अहो आम्ही आधीपासूनच होतो. आता ’आवरा’ म्हणायची वेळ आली म्हणून लिहीलं !!
’म्हातारचळ’ शब्द योग्य वाटतो. यांना सांगणार कोण?

झंप्या - प्रत्येकाची स्टाईल !

अनिकेत - मीही मोठ्या कष्टाने आणि मुश्कीलीने एवढे लिहीले आहे. हा पुणेरी ब्लॉग आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळात आलेल्या प्रतिक्रीयांना उत्तरे मिळणार नाहीत. (तसेही उत्तरे द्यायची का नाही आणि कशी व किती द्यायची हे ठरविण्याचे सर्वाधिकार मालकांकडे सुरक्षित...)
(हे असे का असे विचारून अजून एक प्रतिक्रीया वाढवू नये. ब्लॉगस्पॉटने सुविधा दिली असली तरी उत्तरे देण्यासाठी आम्हांस आमचे ब्रॉडबॅंड व वीज जाळावी लागते)

पराग - धन्यवाद !

उल्हासकाका - हो, ते खरे असतात. ट्विटरवर ’Verified Account' अशी सोय असते. सेलिब्रिटीचे प्रोफाईल ही साईट स्वतः चेक करून घेते.

eeshwaree said...

ashakyaaaaaaaaa!!!!!!!!!!!!!!!! sahi lihilays!!!!!!!!! n pratikriya pan bhannat ahet saglya!!!chitale bandhu mithaiwale ya atyanta utsahi dukanatil apratim anubhawanwar pan lihi na ashich 1 khuskhushit post!! masta lihitos tu!! bhari!!!!

aruna said...

पुस्तकान्चेच कय, सगळ्याच दुकानातुन मराठी दुकान्दारान्चा थोड्या फ़ार फ़रकाने हाच अनुभव आहे.
आणी रिक्शावाल्यान्चे तर काय विचारायलाच नको.
शिवाय ते बोलतात पण rudely.

mrin said...

if it were not for autorickshaw drivers, we in mumbai would definitely have been called lucky. (12th august is a good opportunity to show these drivers that they also need us and not the other way round. a drive has been called to not use rickshaws on august 12th! please go to wwww.meterjam.com)my experience at the bookshops, namely ideal, majestic has been pretty encouraging actually.
so a good post, as usual!

Sagar Kokne said...

पक्का पुणेरी ब्लॉगर आहेस तू....बाकी ते आवरावालेही पुणेकर असणार अशी माझी दाट शंका आहे...:O

Sonal Dharma said...

विक्रांत,
लई भारी पोस्ट राव!
अगदी 'सामुहिक व्यथेला वाचा" फोडलीत!

बाकी रिक्षावाल्यांचा एक नेहमीचा,(म्हणजे खरतर सेअसोणाल) उद्योग लिहायचा राहिला तुमचा:
श्रावण ''माहीण्यात'' सत्यनारायण घालणे आणि louspeaker च्या भिंती लावून "वाट माझी बघतोय रिक्षावाला" तत्सम गाण्यांनी जनतेचे कान तृप्त करणे....!

पुस्तक विक्रेते अक्षरश मुर्दाड आहेत...त्यांच्याबाबतीत काही बोलणे म्हणजे त्यांच्याकडे नसलेल्या stock ची मागणी करण्या इतपत मूर्खपणा आहे...

मुक्तपीठ ला तर अवराच...काय तर म्हणे ब्रेक खाली चेंडू आला.....आणि प्रतिक्रिये वाले म्हणजे पारावरचे रिकामटेकडे....पण त्यांचे कल्पनेचे धुमारे थक्क करतात हो...!

अभिजीत said...

भन्नाट लेख ! सगळे मुद्दे पटले. पुस्तक विक्रेत्यांचा किस्सा माझ्या बाबतीत सुद्धा घडला आहे.

मी पण मुपी आणि मुख्यत: त्यावरील प्रतिक्रियांचा चाहता आहे.

विक्रम एक शांत वादळ said...

त्या 'अबक'(ABC) मध्ये असा अनुभव बहुतेक वेळा आलेला आहे मलाही पण आपण गरजवंत आणि त्याला अक्कल नसते त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा तेथे जातोच ; )
बाकी त्या ट्विटरवर शशी सुद्धा खूप बोर मारतो बर का :)

Amrita said...

ohmy god the episode at the bookstore is hilarious! lovely writing here at this blog. keep up the good work. i love AAWRA too :) majhi marathi khup sukhrel ha blog vaachun... miss my mom who uses all these "pakka" marathi words. they're so lyrical and fun :)

dont hate on me just because my comment is not in marathi :P

Vikrant Deshmukh... said...

Hey Amrita,
Welcome to this blog and many thanks for your comment.

Nachiket said...

Nivval Utkrusht..

mee svatha appa balvant choukatalyaa pustakaanchyaa kalkat dukaanaat ubhaa aahe asaa bhaas jhalaa...mhanaje agadee itakaa ki vaas, drushy, sparsh aadi sarv angaannee..

Mast yaar...