Monday, July 5, 2010

काय रे देवा....

(माझ्या अतिशय आवडत्या संदीप खरेंच्या ’काय रे देवा’ या कवितेचं हे आय.टी. व्हर्जन....मूळ कविता खाली दिली आहे. तीही अवश्य वाचा.)
आता पुन्हा प्रोजेक्ट येणार
एक्सेल चार्ट लालपिवळा होणार
मग कंपनीच्या तोंडाला पाणी सुटणार
मग वीकेंडच्या कामाचा फतवा निघणार
मग मध्येमध्ये बेसुमार रिव्ह्यू होणार
काय रे देवा..............

मग त्या अवांतर मेल कुणाला दाखवता नाही येणार
मग मी त्या आर्काईव्ह करणार
मग ऑफलाईन असूनही तो गलथानपणा कुणापुढे ओकावासा वाटणार
मग व्यवसाय-मित्र ते लगेच ओळखणार
मग जे बिलेबल असतील ते सहसंवेदनेने रडणार
मग बेंचवर असतील ते हसणार
मग आयटीत आलो नसतो तर बरं, असं वाटणार
आणि या सगळ्याशी पी.एम.ला काहीच देणंघेणं नसणार
काय रे देवा..............

मग त्याच वेळी नेमकं बाजूच्या पीसीवर ’फेसबुक’ उघडं दिसणार
मग त्यात ’आवरा’ ’सीआयडी’ वगैरे कम्युनिटी असणार
मग त्यावर लोक एकसे एक पीजे टाकत असणार
मग बाकीचे निवांत वाचत, खुदुखुदु हसत असणार
मग यांना एवढा वेळ मिळतो कसा काय.. असा प्रश्न पडणार
मग उगाच तळपायाची आग मस्तकाला जाणार
मग घेणं ना देणं... पण एच.आर.ला फुकाचे शाप लागणार...
काय रे देवा..............

मग ’ओरॅकल’ची विंडो धूसर होऊन जाणार
मग त्याला ’ट्विटर’ची मुक्ताफळं लगडणार
मग मिनीमाईझ केलेल्या मेसेंजर विंडोमध्ये उपस्थितांचे ’पिंग’ टपटपणार
मग १८ इंचाचा टीएफटी स्क्रीन अपुरा अपुरा वाटणार
मग हार्ड डिस्क क्रॅश व्हावी असं वाटणार
नेटवर्कची केबल काढून पोर्ट निकामी करावंस वाटणार
मग सारंच आयुष्य कसं मंद मंद विझत जाणार
पण तरीही हे फक्त हायबरनेशनमध्ये जाणार
बंद नाही पडणार
काय रे देवा..............

प्रोजेक्ट चालू होणार
मग कॉन्फरन्स रूम हिरव्यागार होणार
मग प्रत्येक कॉलमध्ये बिनकामाची गर्दी होणार
मग आपण सवयीने काहीतरी चांगलं सोल्युशन देऊ पाहणार
पण मॅनेजमेंट त्याला नाही जुमानणार
मग आपल्याला कंपनीचं खरं स्वरूप कळणार
मग नुसती ओझी वाहण्याच्या कल्पनेने आपण खंतावणार
आम्लपित्त होऊ नये म्हणून रात्रीच्या मीटींग टाळायला बघणार
क्लायंटच्या सुर्योदयाच्या आधी आपलं डॉक्युमेंट पाठवायला निघणार
पलीकडचा ’क्युबिकल’वालाही तोपर्यंत ’फेसबुका’वरून लॉग-आऊट झालेला असणार
यु-ट्युब, ऑरकूट, ब्लॉगचा त्याचा स्टॉकही संपलेला असणार
मग पीएमच्या पुढ्यात माईलस्टोन असणार
आणि माझ्या पुढ्यात ’आ’ वासलेले डेव्हलपमेंटचे सेट-अप असणार
जीवाचे हाल करणार्‍या अजून एका असाईनमेंटमध्ये,
मी कसायाच्या मागून जाणार्‍या गाईसारखा निमूटपणे राबत असणार...

प्रोजेक्ट गेल्या वर्षी आला,
प्रोजेक्ट यंदाही येतो,
प्रोजेक्ट पुढच्या वर्षीही येणार....

काय रे देवा..............
********************************************************************************
मूळ कविता -
आता पुन्हा पाऊस येणार
आकाश काळं निळं होणार
मग मातीला गंध सुटणार
मग मध्येच वीज पडणार
मग तुझी आठवण येणार
काय रे देवा...
मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार
मग मी ती लपविणार
मग लपवूनही ते कुणालातरी कळावंस वाटणार
मग ते कुणीतरी ओळखणार
मग मित्र असतील तर रडणार
नातेवाईक असतील तर चिडणार
मग नसतच कळलं तर बरं असं वाटणार
आणि या सगळ्याशी तुला काहीच घेण देण नसणार..
मग त्याच वेळी नेमका दूर रेडिओ चालू असणार
मग त्यात एखाद जुनं गाणं लागलेल असणार
मग त्याला एस.डी.बर्मननी चाल दिलेली असणार
मग ते साहीर नी गायलेलं असणार
मग ते लतानी गायलेलं असणार
मग तू ही नेमका आत्ता हेच गाण एकत असशील तर.. असा प्रश्न पडणार
मग उगाच छातीत काहीतरी हूर हूरणार
मग ना घेणं ना देणं
पण फूकाचे कंदील लागणार
काय रे देवा...
मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार
मग त्याला आकाशाची आसवं लगडणार
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार
मग पाच फूट पाच इंच देह अपुरा अपुरा वाटणार
मग ऊर फुटून जावंस वाटणार
छाताडातून ह्रदय काढून त्या शुभ्र धारांखाली धरावस वाटणार
मग सारच कस मुर्खासारखं उत्कट उत्कट होत जाणार
पण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत जाणार
बंद नाही पडणार
काय रे देवा...
पाऊस पडणार
मग हवा हिरवी होणार
मग पानापानात हिरवळ दाटणार
मग आपल्या मनाचं पिवळ पान मोडून हिरव्यात शिरू पाहणार
पण त्याला ते नाही जमणार
मग त्याला एकदम खरं काय ते कळणार
मग ते ओशाळणार
मग पुन्हा शरीराशी परत येणार
सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार
चहाच्या पाण्यासाठी फ्रिजमध्ये कूडमूडलेलं आलं शोधणार
एस.डी. चं गाणही तोपर्यंत संपलेल असणार
रेडिओचा स्टॉक भरलेला असणार
मग तिच्या जागी ती असणार
मग माझ्या जागी मी असणार
कपातल वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार

पाऊस गेल्या वर्षी पडला
पाऊस यंदाही पडतो
पाऊस पुढल्या वर्षीही पडणार

काय रे देवा......(संदीप खरे)