Wednesday, June 16, 2010

कथा – एका सोनकळीची...

कळायला लागल्यापासून तीन प्रकारचे सुवास मला अगदी वेड लावून जातात........
एखाद्या शांत देवळात गाभाराभर भरून राहिलेला धुपाचा दरवळ. पहिल्या पावसाचे दोन-चार टपोरे थेंब पडल्यावर आसमंत व्यापून टाकणारा मातीचा गंध आणि नुकत्याच उमललेल्या रातराणीचा कणन्कण मोहरून टाकणारा घमघमाट.......
वय वाढत गेलं...पुढं सरकत राहिलो...अध्येमध्ये कुठल्या ना कुठल्या वळणावर ही सुगंधाची बरसात व्ह्यायचीही.. कधी अलवारपणे तर कधी एकदम अनाहूत...या तिन्हींचा एकत्रित मिलाफ अनुभवायला मात्र २००८ उजाडावं लागलं. गळ्यात गंधार घेऊन अवतरलेली पुण्याची एक छोटीशी गानपरी ’सारेगम’च्या रंगमंचावर दाखल झाली अन् एकदम भास झाला की हे तिन्ही परिमळ एकत्र दरवळू लागलेत. ’आर्या आंबेकर’ हे नाव तेंव्हापासून मनावर कोरलं गेलं ते कायमचं !!

’लिटल चॅंपस’च्या निमित्ताने एक नविन पर्वच सुरू झालं होतं आयुष्यात जणू.. दर सोमवार, मंगळवार या मुलांना पाहणं, ऐकणं हा एक नविन छंद-चाळा जीवाला जडला होता. आर्याची जादू अंगात भिनायला फारसा वेळ लागला नाही. एका सोमवारी तिनं ’दे ना रे पुन्हा पुन्हा, गर्दनिळा गगनझुला’ हे कौशलंच गाणं, दृष्ट लागेल अश्या सुंदर पद्धतीनं म्हटलं..इकडे मी खल्लास !!
आवाजात शीगोशीग भरून वर थोडासा ओसंडणारा गोडवा हे आर्याचं बलस्थान आणि शालीन, मनोहारी भावमुद्रा हा तिच्या व्यक्तीमत्वाचा जगाला जाणवणारा ठळक भाग. कुणी तिला ‘स्वहस्ते सोन्या-मोत्याचे डाग उधळणार्या लक्ष्मी’ची उपमा दिली तर कुणाला तिच्या गायकीत ‘बाल-सरस्वतीचं’ दर्शन झालं. एक चाहता म्हणून काय आणि किती बोलावं तिच्या गाण्यांविषयी?
’चांदणे शिंपीत जाशी’ मधून तिनं केलेलं स्वरांच शिंपण इतकं जबरदस्त होतं की पं. हृदयनाथही अवाक् होऊन गेले.
’जाईन विचारीत रानफुला’ ही किशोरीताईंच्या दैवी आवाजातली रचना तिने समर्थपणे पेलली. नुसती पेललीच नाही तर त्याच्या वैभवाला आपल्या भावपुर्ण सूरांनी अशी काही झळाळी प्राप्त करून दिली की बस्स्सं...‘सहज सख्या एकटाच’ गाताना स्वरमाधुर्य काय असतं याची चुणुक आर्याने उभ्या महाराष्ट्राला दाखवली. ’आम्रतरूखाली’ सारख्या जागांवर घेतलेली तान तर दहाही बोटं तोंडात घालायला लावणारी होती.
’अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त’ हे तिच्या मुखातून ऐकताना ज्याच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत तो मनुष्य ’माणूस’ म्हणून जगायला लायक नाही असे खुशाल समजावे. ’स्तंभ तिथे ना कुणी बांधला’ म्हणताना तिच्या आवाजाला सुटलेला कंप आपल्या हृदयातही जाणवायचा. ’मृत्यूंजयवीरा’च्या उच्चाराने तर पार सैरभैर करून सोडलं. लताबाईंपेक्षा कितीतरी प्रचंड परीणाम आर्याच्या ’अनामवीरा’ने साधला असं मला आजही वाटतं !!
’जाहल्या काही चुका’ मध्ये आर्याचा परिपक्वपणा आणि समयोचित गांभीर्य दिसलं तर ’येऊ कशी प्रिया’ मध्ये एक खळखळतं चैतन्य...
तिने खरी धमाल उडवली ती लोकगीत आणि उडत्या चालीच्या गाण्यात... आर्याच्या मूळ गायनाचा तो पिंड नसतानाही दुर्दम्य आत्मविश्वास, संगीतशिक्षणाचा सखोल पाया, रसिकमनाचा कल जोखण्याची युक्ती, नविन प्रांगणातल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट करण्याची तयारी इत्यादि गुणांच्या जोरावर तिने या प्रकारच्या गाण्यांमध्ये तुफान मज्जा आणली.
’पान खाये सैंया’ श्रोत्यांच्या आजन्म लक्षात राहील ते आर्याच्या विलक्षण ठसकेबाज आविर्भावामुळे. या गीतात शेवटी एक छोटीशी हसण्याची लकेर आहे. ती तर आर्या सोडून अजून कुणी घेऊच नये !!
’छमछम करता है’ सारखं थिरकवणारं नवीन गीत गाणारी आर्या अगदी सहजतेने आणि ऐटबाजपणे ’पुण्याची मैना’ ’कुठं गेला व्हता’ वगैरे लावण्या आपल्यासमोर सादर करत होती.
आर्या आंबेकरने गायलेली नाट्यगीतं हा तर श्रोत्यांना मोहून टाकणारा अजून एक प्रकार. ’युवती मना दारूण’ मधल्या जीवघेण्या जागा, ’खरा तो प्रेमा’ गाताना तिने पार केलेले नाट्यसंगीतातले अनेक उंच-उंच टप्पे आणि ’नरवर कृष्णा समान’ म्हणताना साकारलेली मुर्तिमंत गंधर्वगायकी... अगदी बालगंधर्वांची आठवण करून देणारी...
अभिजात संगीतावर प्रेम करणार्‍य़ा सर्वांसाठी एक पर्वणीच असायची त्यावेळी..
भावगीत गातानाची आर्या हा तिच्या चाहत्यांसाठी एक संपुर्ण वेगळ्या विश्वात नेणारा अतिंद्रीय अनुभव असतो.
’या चिमण्यांनो परत फिरा’ ने विलापाचे चार मूक अश्रू जसे सांडले तसं ’समईंच्या शुभ्र कळ्या’ ऐकताना तो खोलवर पसरलेला उत्कटतेचा भाव रसरसून बाहेर आला होता.’अवघा रंग एक जाला’ ही संतरचना आर्याने अश्या काही सामर्थ्याने म्हटली की श्रोत्यांच्या मनात भक्तीचा उद्रेक व्हावा.
२६/११ च्या हल्ल्यानंतरच्या भागातली गाणी असो की पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या संकल्पनेतून उतरलेला विशेष भाग, सांगितीक दृष्टीने कस लागतील अशी गाणी मराठीजनांसमोर सादर करायची संधी आर्याला मिळाली आणि तिचं तिने अक्षरशः सोनं केलं. ’सरणार रण कधी’ आजही अंगावर काटा आणून जातं.........

आर्याची गाणी म्हणजे स्वरांच्या नभात फुललेलं जणू एक इंद्रधनुष्यच. एकेका रंगाने हरखून जायचं.. त्या उधळणीतली मौज अनुभवायची... सगळीच सुंदर आणि सगळीच मनमोहक.. कोणतं चांगलं म्हणायचं आणि कोणतं कमी चांगलं?? पण त्यातही मला वैयक्तिक सर्वात जास्त आवडलेली तीन गाणी म्हणजे ’मल्मली तारूण्य माझे’ ’नवल वर्तले गे माये’ आणि ’ये जवळी घे जवळी’ !!

सुरेश भटांनी शब्दकळेचे अपार लावण्य ओतून ’मल्मली तारूण्य माझे’ कविता लिहीली होती. आर्याने तिला आपल्या मखमली गळ्याचा असा काही साज चढवला आहे की ऐकताना मन अगदी धुंद-फुंद होऊन जातं. भावगीत असावं तर अस्सं !!
’नवल वर्तले गे माये’ रसिकांना थेट संतांच्या मांदियाळीमध्ये घेऊन जातं. खुप वर्षांचा अज्ञानाचा अंधःकार दूर होऊन आत्मज्ञानाचा, परमात्म्याच्या अनुभुतीचा प्रकाश उजळल्यावर परमशांत झालेलं मन कसा चिवचिवाट करत असेल हेच जणू आर्याने या गाण्यातून सगळ्यांना सूचित केलं. अंतर्‍यामधल्या तिने घेतलेल्या अप्रतिम तानांनी तर तो अनुपम्य सोहळा आपल्याही मनःचक्षुंसमोर उभा केला. या गाण्यानी कोणीही पारमार्थिक माणूस तर झपाटला जाईलच पण एखाद्या शुचिर्भूत पहाटेला कानावर पडलं तर सामान्य माणसाचं चित्त एका क्षणात प्रसन्न करून टाकण्याची ताकद आर्याच्या या भक्तीगीतामध्ये आहे.
आर्याने गायलेल्या अनेक एकाहून एक सरस आणि विलोभनीय गीतांमधलं माझं परमप्रिय आणि हृदयाच्या अतिनिकट जाऊन बसलेलं पद म्हणजे ’ये जवळी, घे जवळी, प्रिय सखया भगवंता...’.
हे शब्द ऐकले आणि नयनांचे काठ पाणावले नाहीत असं आजवर कधीही झालं नाही. क्षणोक्षणी व्यक्त होणारी तळमळ, परमेश्वराकडे मागितलेलं आर्जवी मागणं, देव-भक्त नात्यातला गोडवा, आळवणार्‍याच्या मनात खोलवर कुठेतरी लपून बसलेला एक विषाद, शरणागती असे कितीतरी भाव आर्याने दीड मिनीटाच्या या गाण्यातून मोठ्या यथार्थतेने उभे केले आहेत. काही काही गोष्टी शब्दात खरंच व्यक्त करता येत नाहीत. त्यात बुडून जाऊन अनुभवण्यातच खरी मौज असते. आर्याचं ’ये जवळी’ याच पठडीतलं गाणं... आपण फक्त ऐकत रहायचं.. ऐकत रहायचं आणि अंतःकरणात जे काही पाझर फुटतात, जे काही जाणवायला लागतं त्या प्रकाराशी समरस होऊन जायच... बास्सं !!जिने आपल्याला वैविध्यपुर्ण सूरांची अशी तृप्त करणारी मेजवानी वेळोवेळी दिली, जिच्या मोहक दिसण्यावर, निरागस हास्यावर आणि गोड-गोड बोलण्यावर उभा महाराष्ट्र फिदा झाला होता, मोठमोठाल्या संगीतकारांची आणि धुरीणांची शाब्बासकीची थाप जिला सदैव मिळत गेली, जिने अपार मेहनत आणि अविश्रांत कष्टाच्या जोरावर समोर येत गेलेली गायनातली आव्हानं लीलया पेलली अश्या आपल्या लाडक्या ’प्रेटी यंग गर्ल’ आर्या आंबेकरचा आज वाढदिवस...................
तिच्या स्वरांचा मधुरस आपल्या कानांवर कायम पडत रहावा अशी सर्वच संगीतप्रेमी रसिकांची मनापासून इच्छा आहे. ती तिने पुर्ण करत रहावी आणि त्यासाठी लागणारी साधना तिच्याकडून निरंतर होत रहावी हीच आजच्या दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना.
तिच्या सांगितीक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी माझ्याकडून लक्षलक्ष शुभेच्छा !!!!!!
Many Many Happy Returns of The Day, Dear Aarya…..
सोनकळी उमलत असते तेंव्हा आजूबाजूच्यांना पार वेड लावून जाते.... कधी अंग अंग पुलकित करणारा सुगंध फेकून तर कधी चांदरातीचे रंग दाखवून !! ते फुलणं कसं असतं हे बघायचं असेल तर आर्याच्या जीवनात डोकवावं आणि तिला ऐकता ऐकता हरवून जावं..

आर्या, तू अशीच गात रहा...
आणि असाच तोषवत रहा तुला ऐकायला आतूर असणारा प्रत्येक कान....
तू अशी यशाची शिखरं गाठत राहशील त्या प्रत्येक वेळी,
जगाच्या कुठल्या तरी छोट्याश्या कोपर्‍यात
आपल्या थरथरत्या हातांनी आम्ही पुन्हा पुन्हा वाजवू....कौतुकाची टाळी,
तू करशीलच निर्माण नंदनवन आपल्या स्वरांनी
अन् भरून टाकशील रसिकांच्या ओंजळी,
आर्या, तुझे सूर आत कायम निनादत राहतील
आणि आम्हाला सदैव आठवत राहिल ही गोड, सुरेल सोनकळी......................... !!