Monday, May 31, 2010

Happy Birthday, Deccan Queen !!

उद्या १ जून २०१०. 'डेक्कन क्वीन' ऐंशी वर्षे पुर्ण करून ऐक्यांशीव्या वर्षात पदार्पण करत आहे. इतर अनेक पुणेकरांसारखी माझ्या भावविश्वात अढळ स्थान मिळवलेली ही गाडी. रूळांवरचं चालतं-बोलतं एक उत्कट जगच... बहुरंगी, बहुढंगी..... हवंहवंस वाटणारं..... माझे आणि डेक्कन क्वीनचे ऋणानुबंध जवळपास गेल्या बारा वर्षांचे. त्यामुळे आठवणीही अगणित...........
सकाळी सव्वासातला (कधीही न चुकता सोडलेला) पुणे स्टेशनचा फलाट..... खंडाळ्यातला थरार... नेरळ जंक्शन किंवा डोंबिवली पास करताना गाडीने घेतलेला तुफान वेग.... पावसाळ्यात हिरव्याकंच आसमंतात तिने घेतलेले नेत्रदीपक वळण...पॅंट्रीकारमधून गरमगरम सर्व्ह होणारे चीज सॅंडविच आणि टोमॅटो सूप.... येताना दादर स्टेशनचा फलाट न थांबता ओलांडताना अंगावर उभे राहणारे रोमांच.... पारसिक बोगद्यात शिरण्यापूर्वी इंजिनाने दिलेली शिट्ट्यांची सलामी...कर्जतला मिळणारा दिवाडकरांचा वाफाळलेला वडा... दोन-दोन बॅंकर इंजिने पाठीमागे लावून गाडीने वेगात चढलेला घाट... दिवा जंक्शन किंवा मळवली सारख्या स्थानांवर अंगात वारं भरल्यासारखं चौखुर उधळलेलं WACM किंवा WCM इंजिनाचं वारू..... काय काय सांगू आणि किती किती?
डेक्कन क्वीन म्हणजे डेक्कन क्वीन. तिचा डौल, तिचा थाट, तिचं लोभसवाणं रूपडं, तिचा वक्तशीरपणा वगैरे गुणांचं गायन करायला लागलो तर अनेक लेख लिहून होतील.
मराठी भावगीतांमध्ये आढळणारी किंवा“तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे, तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे” “मन लोभले, मन मोहले” "गेले द्यायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे" अशी पदे जणू डेक्कन क्वीनसाठीच लिहीली गेली असावीत !!!
दरवर्षी १ जूनला कट्टर डेक्कन-क्वीन प्रेमी आणि काही उत्साही प्रवासी तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. दृष्ट लागेल अश्या पद्धतीने सजवलेली ’दख्खनची राणी’ आपल्या जन्मदिनीही वेळेवर सुटते आणि वेळेवर परतते. गेल्या ऐंशी वर्षात फक्त १६ दिवस सुट्ट्या घेतलेल्या या राणीची अपार ओढ शेकडो लोकांना न लागेल तरच नवल !!
यावर्षी वाढदिवसाबरोबरच डेक्कन क्वीनचा ’सहस्त्रचंद्रदर्शन’ सोहळा आहे. प्रवाश्यांच्या व रेल्वेप्रेमींच्या अंतःकरणात विशेष घर करून राहिलेली ही आपली लाडकी आगगाडी असे अनेक वर्धापनदीन साजरे करो आणि भारतीय रेल्वेच्या वैभवात रोज नवनवी भर घालत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!