Sunday, May 30, 2010

आठवा स्वर

श्रावणातली ओलीसर्द सकाळ असावी...... सोनहळवं उन पानापानातून चमचमत असावं......
थेंबांचा गारवा आणि पूर्वेचा तेजोमय सखा मनाला थार्‍यावर राहू देत नसावा..... अन् अश्याच भारावलेल्या समयी कानावर पडावेत कोवळीकेचे सूर... तेच सूर जे वृंदावनात भगवंतांच्या वेणुमधून घुमले होते.. तेच सूर जे हिमालयाने गंगेच्या खळाळत्या पात्रात ओतले होते... तेच सूर जे समुद्रावरून वाहणार्‍या वार्‍याने गच्च धरून ठेवले होते आणि तेच सूर जे आठ महिने तुम्हा-आम्हा सर्वांचा जीव की प्राण होऊन गेले होते.
केवढं हे काव्यात्मक स्वप्न !! असे कोणं बरे होते ते देहभान हरपून टाकणारे सूर?
उत्तरासाठी फार पल्याड जायला नको. जुलै २००८ ते फेब्रुवारी २००९ या काळात घराघरात, मनामनात पुरतं ठाण मांडून बसलेले हे स्वर होते आपल्या लाडक्या लिटल चॅंपसचे.
निष्प्राण होत चाललेल्या, चैतन्य हरवत चाललेल्या मराठी संगीताला नवसंजीवनी देण्याचं, मराठी गीतांचा तो सुवर्णकाळ पुन्हा जीवंत करण्याचं एक अलौकीक काम या मुलांनी आपल्या बहारदार गायनाद्वारे केलं.
वयाची, तयारीची चौकट भेदून अनेकानेक उत्तुंग रचनांना न्याय देत या सर्व बालगायकांनी श्रोत्यांवर स्वरानंदाची अक्षरशः उधळण केली. आवाजाच्या थक्क करून टाकणार्‍या ताकदीबरोबरच या मुलांचा साधेपणा, निरागसता, नम्रपणा, सालस विद्यार्थी वृत्ती वगैरे गुण मराठी मनाला जवळून स्पर्शून गेले. अभिजात संगीतावर प्रेम करणार्‍या लाखो महाराष्ट्रवासियांनी या कलाकारांवर आपला जीव ओवाळून टाकला.
सोमवार, मंगळवार थोड्या वेळासाठी टी.व्ही. वर पहायला मिळणारे हे सगळे जणू आपल्या घरातलेच एक बनून गेले. त्यांच्याच गाण्याच्या गप्पा... त्यांच्याच बोलण्याची चर्चा.. त्यांच्या दिसण्याचं कौतुक तर कधी त्यांच्या वागण्याचं अप्रुप...
ज्यांच्या जादूई स्वरांच्या नुसत्या एका झलकेने आपण वेड्यासारखे हरखून जातो त्या आपल्या परमप्रिय गायकांचा स्वरनजराणा एक ठेवा म्हणून संग्रही असावा अशी तमाम चाहत्यावर्गाची मनापासून इच्छा होती.
या भावनांचा आदर करत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या रसिकहृदयाचा मान राखत, सौ. वर्षा भावे आणि श्री. उदय दिवाणे ही द्वयी या वैशाखात एक जबरदस्त भेट घेऊन येत आहे.
श्रोत्यांच्या भावविश्वाला पुर्णपणे व्यापून टाकणारे आठ लिटल चॅंपस आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, शमिका भिडे, शाल्मली सुखटणकर आणि अवंती पटेल, सूरांची मोहिनी घालण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहेत एका नव्याकोर्याप अल्बमच्या रूपाने – “आठवा स्वर” !!
’कलांगण’ संस्था आणि ’हरिभाऊ विश्वनाथ कंपनी’ यांची संयुक्त निर्मिती असलेला हा अल्बम पुर्णत्वास आला असून ७ जून २०१० रोजी प्रकाशित होतो आहे.
अतिशय गुणवान अश्या या आठ मुलांच्या अफाट गुणवत्तेला जोखून, त्यांच्या सांगितीक कौशल्याचं प्रातिभ दर्शन जगाला घडवण्यासाठी ख्यातनाम संगीत समुपदेशक आणि संगीत दिग्दर्शिका सौ. वर्षा भावे यांनी या ध्वनीफितीची निर्मिती केली आहे तर संगीत संयोजनाची धुरा सुप्रसिद्ध संयोजक कमलेश भडकमकर सांभाळत आहेत. गायक आणि श्रोत्यांना परस्परतोष होईल अश्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या या गीतमालेत अतिशय नविन, ताजी टवटवीत आणि स्वतंत्र धाटणीची एकूण तेरा गाणी रचण्यात आली आहेत.
प्रत्येक गायकाचे अंगभूत वैशिष्ट्य आणि त्याच्या कलेचा बाज लक्षात घेऊन वर्षाताईंनी ही गानसेवा करून घेतली आहे. रूढ संगीताच्या कक्षांना हळुवारपणे ओलांडत, सुरेल पदांची निर्मिती अगदी सहजपणे करणे ही वर्षा भावेंच्या संगीतकारीचं लगेचंच जाणवणारं ठळक लक्षण.
कमलेशदादा आणि वर्षाताई यांनी मुलांबरोबर बराच काळ व्यतीत केला असल्याने त्यांच्या मानसिकतेची यथार्थ कल्पना दोहोंनाही असणे स्वाभाविकच.
या सर्व लहानग्यांनी देखील आपल्या अमोघ वाणीनी “आठवा स्वर” मधल्या अतीव मनोहर गीतांच वैभव शतपटीने वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अभंग, भारूड, लोकगीत, भावगीत, रॉक, शास्त्रीय, उपशास्त्रीय, समूहगान अश्या अनेक गीतप्रकारांचा समावेश असलेला हा अल्बम म्हणजे विचक्षण आणि चोखंदळ श्रोत्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
या सर्वावर जणू कळस म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून मराठी भाषेवर रचलेले एक भारूड. मायबोलीच्या प्रेमाचा वन्ही चेतवणारे पण चित्तस्पर्शी असं हे पारंपारीक ढंगाचं गीत मुलांनी खरोखरच प्राण ओतून म्हटलं आहे.
“आठवा स्वर” या अल्बमच्या निमित्ताने आपले लाडके लिटल चॅंपस पार्श्वगायनाच्या क्षेत्रात स्वतंत्र असं पाऊल टाकत आहेत. त्यांना अपेक्षा आहे तमाम मराठी अंतःकरणांच्या शुभेच्छांची आणि आशिर्वादाची.
रविंद्र नाट्य मंदीर, प्रभादेवी (मुंबई) येथे येत्या ७ जूनला संपन्न होणार्‍या एका रंगतदार कार्यक्रमात हा अल्बम रसिकांना अर्पण होतो आहे.
या प्रकाशनसोहळ्यासाठी पं. यशवंत देव, पं. उल्हास बापट, सुचेता भिडे-चापेकर, मंजिरी असनारे-केळकर आदी कला क्षेत्रातील अनेक प्रथितयश व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
प्रकाशनाच्या दिवसापासून हा अल्बम सर्व प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
गैरफिल्मी संगीताच्या प्रांगणात एक आगळावेगळा मापदंड ठरू पाहणारी ही ध्वनीफित लिटल चॅंपस आणि त्यांच्या गायनावर अविरत प्रेम करणार्‍या प्रत्येक रसिक चाहत्याने जरूर पदरी बाळगावी.