Monday, April 26, 2010

विक्रम, वेताळ आणि आयपीएल अंतिम सामना

(परत एकदा कणेकरसाहेबांची माफी मागून..... कालच्या सामन्यानंतर रहावलंच नाही हो)
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. नव्या आवेशाने तो झाडाखाली आला आणि वेताळाला (भज्जीने निता अंबानीला घेतलं तसं) उचलून आपल्या खांद्यावर टाकलं. उशीर न करता तो परतीच्या वाटेवर चालू लागला. वेताळाला राजाचं (प्रफुल्ल पटेलना पुर्णाचं वाटतं तसं) फार कौतुक वाटलं.
तो बोलू लागला, “हे राजा. तुझ्या संयमाची आणि चिकाटीची कमाल आहे. अश्या घनघोर अरण्यात, अमावस्येच्या निबीड रात्री, तू मला नेण्यासाठी आयपीएलमध्ये शशांक मनोहरने घुसावे तसा घुसलास. तुझ्या प्रयत्नांना दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. सध्याच्या काळात १००% अपयशानंतरही पुन्हा तीच तीच गोष्ट ट्राय करणारे देव आनंद आणि तू असे दोघेच !! आता हा प्रवास सुकर व्हावा म्हणून मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो.
तुझंही तेवढंच टॅक्सफ्री मनोरंजन.
भारतवर्षात आयपीएल नावाचा चेंडूफळीचा महोत्सव दरवर्षी भरतो हे तुला माहीत आहेच.
सालाबादप्रमाणे या वर्षीही भरला. या नेत्रदीपक स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. देशोदेशींचे अनेक उत्तमोत्तम योद्धे आपली कला दाखवण्यासाठी (अल्टरनेट – गुण उधळण्यासाठी) इथे हजर झाले होते. प्रत्येक संघ जीवाची बाजी लावून विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होता.
’मुंबई इंडीयन्स’ या संघावर नशिबाची जरा जास्तच मेहेरनजर होती. फारसे स्टार खेळाडू नसतानाही साखळी सामन्यात एकापाठोपाठ जय मिळवत यांचा वारू चौखूर उधळला होता. कप्तान ’सचिन तेंडूलकर’ (एचडीएफसी स्टॅंडर्ड लाईफ, बूस्ट, टीव्हीएस व्हिक्टर, रिड ऍंड टेलर, रोज खाओ अंडे वगैरे जाहीराती करणारा खेळाडू) च्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. दुसरीकडे कप्तान धोनीच्या (पेप्सी, एअरसेल, मॅक्स मोबाईल, रिबॉक वगैरे जाहीराती करणारा अजून एक खेळाडू) मार्गदर्शनाखाली ’चेन्नई सुपर किंग’च्या संघाने देखील कठीण परिस्थीतीतून स्वतःला सावरत अंतिम फेरीत प्रवेश केला.
आता लोकांना एकच वेध लागले. कोण होणार आयपीएल-३ चा विजेता?
’मुंबई’ची संपुर्ण स्पर्धेतली कामगिरी पाहता ते सहज बाजी मारतील असे सर्वच रसिकांना आणि क्रिकेटतज्ञांना वाटत होते. चेन्नईचे आव्हान पुर्ण फॉर्मात असलेल्या मुंबईपुढे टिकणे शक्यच नव्हते. पण आता तूच पहा प्रत्यक्षात काय झाले ते?"
असे म्हणून वेताळाने आपल्या मॅकबुकवर २५ एप्रिलला मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडीयमवर झालेला अंतिम सामना विक्रमाला दाखवायला सुरूवात केली. हे रेकॉर्डींग पाहताना कितीतरी वेळा विक्रमादित्याला अमरसिंहासारखं जोरात ओरडायची अनिवार इच्छा झाली होती. पण विक्रम-वेताळाच्या कथेत वर्षानुवर्षे चालत आलेली मौनाची अट लक्षात घेऊन तो शांत राहिला.धोनीने करंडक उंचावल्याचे दृश्य स्क्रीनवर झळकताच वेताळाने शांतपणे मॅकबुकला हायबरनेशनमध्ये टाकले आणि तो विक्रमाला उद्देशून बोलू लागला, “राजा, पाहिलेस काय झाले ते? ’भरवश्याच्या म्हशीला टोणगा’ ही म्हणदेखील फिकी पडावी असा अवसानघातकी खेळ तुझ्या आणि माझ्याही आवडत्या मुंबईने केला. खेळात हारजीत तर होत असतेच.
पण नाणेफेक हारताक्षणी सचिनने खांदे का पाडावेत?
मला बरेच काही प्रश्न पडलेत.
रैनासारख्या खतरनाक फलंदाजाचे झेल सरकारने पद्मश्री पुरस्कारांचे कुणालाही वाटप करावे इतक्या सहजतेने का सोडले गेले?

एरव्ही इतरांच्या अंगावर वसावसा ओरडणार्‍या जहीर खानाने रैनाचा सिंपल स्कूप विजेचा झटका बसल्यासारखा खाली का टाकून दिला?
शिखर धवन या प्राण्याने महाअंतिम फेरीतले डावाचे पहिले षटक धावा काढण्याचा किंचीतसाही प्रयत्न न करता निर्धाव का खेळून काढले?
पहील्या पाच षटकात मुंबईची फलंदाजी मगरपट्टा चौकातील फ्लायओव्हरच्या कामापेक्षाही संथ का झाली? सचिन खरंच खेळण्याइतका फीट होता का?
कागदावर भरभक्कम वाटणारी मुंबईची फलंदाजी घरच्या मैदानावर खेळत असूनही बघताबघता का कोसळत गेली?
जेपीडुमिनी हा नमुना ब्राव्हो अथवा जयसूर्यापेक्षा T-20 साठी का आणि कसा उपयुक्त ठरतो?
पिंच हीटींगच करायची होती तर सौरभ तिवारीला पाठवायचे सोडून हरभजन या मनोरंजक खेळाडूला का धाडण्यात आले?
पोलार्डला क्रीजवर पाठवण्यासाठी दाते पंचांगातील कोणत्या नक्षत्रांची आणी मुहुर्तांची वाट पाहणे चालू होते? हे राजा विक्रमादीत्या, या प्रश्नांची उत्तरे माहीत असूनही तू दिली नाहीस तर तुझी ललित मोदी किंवा मराठी ’सारेगमप’पेक्षाही भीषण अवस्था होईल.” वेताळने संमेलनाध्यक्षांसारखा मोठा पॉज घेतला.
विक्रम अंमळ हसला. वेताळाचे ओझे थोडे बॅलन्स करत तो बोलू लागला, “वेताळा, तू निखील वागळे किंवा दीपक चौरसियासारखे (समोरच्याला बोलण्याचा अवसर न देता) एकापाठोपाठ एक खुप प्रश्न विचारतोस. आवाजात नाटकी आवेश न आणताही प्रश्नोत्तरे होऊ शकतात हे रजत शर्माने दाखवून दिलं तरी तुम्हा लोकांना सिद्धूच प्रिय. मुंबई हरल्याने जगातला एकूण एक जण अतीव दुःखाच्या डोहात बुडाला आहे असे जर तुला वाटत असेल तर ते मात्र साफ चुकीचे आहे.
सर्वप्रथम एक लक्षात घे की ’मुंबई इंडीयन्स’ म्हणजे स्टीव्ह वॉ, मॅकग्राथ, वॉर्न, टेलर बंधू, गिलख्रिस्ट वगैरेंनी खच्चून भरलेला ऑस्ट्रेलियाचा जगज्जेता संघ नाही. यांचा कर्णधार सचिन हा अगदी महत्वाच्या सामन्यांमध्ये, अंतिम फेर्‍यांमध्ये (विशेषतः धावसंख्येचा पाठलाग करताना) ढेपाळण्यासाठी प्रसिद्ध आहे.
जखमी असूनही हा सामना त्याला खेळणे क्रमप्राप्तच होते कारण आत्तापर्यंतच्या प्रवासात त्याची बॅट तळपल्याने संघाला मोठी धावसंख्या उभारता यायची. शिलेदारच खेळत नाही म्हटल्यावर सैन्याची दाणादाण उडाली असती. आणि जर तो खेळल्याने मुंबईने करंडक जिंकला असता तर करीअरवर ’चार चांद’ लागून पुढील वर्षीच्या नव्याने होणार्‍या लिलावात त्याचा भाव कितीतरी वधारला असता.
आत्तापर्यंतच्या बहुसंख्य लढती या मुंबईने प्रथम फलंदाजी करून जिंकल्या होत्या. उत्तरार्धात संथ होत जाणार्‍या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नसते. त्यात अंतिम फेर्‍या, डू-ऑर-डाय मॅचेस, प्रेशर सिच्युएशन्स मध्ये खेळण्याचा कर्णधाराचा पुर्वाश्रमीचा अनुभव काही फार चांगला नव्हता. याच साक्षात्काराने आणि चेस करताना दबावाखाली येऊन आपल्या फलंदाजीच्या होणार्‍या संभाव्य होलपाडीच्या विचाराने नाणेफेक हारताच सचिनचे खांदे पडले. त्याचा परीणाम पुर्ण टीमवर न होईल तरच नवल.
आता थोडंसं मुंबईच्या सुमार क्षेत्ररक्षणाबद्दल. जहीर खान, दिलहारा फरनांडो वगैरे मंडळी त्यासाठी कधीच प्रसिद्ध नव्हती. चेंडूला एकटे वाटू नये म्हणून सीमारेषेपर्यंत साथ करणे, मऊ गवत बघून स्वतःला, अलगद, फारसा सोस न होता, झोकून देणे आणी कमीतकमी दोन टप्पे पाडून थ्रो गोलंदाज किंवा यष्टीरक्षकाकडे पोहोचवणे अश्या कलांमध्ये ही मंडळी माहीर आहेत. यांच्याकडून जॉंटी ‍र्‍होडसच्या चपळतेची अपेक्षा करणं म्हणजे विजय मल्ल्यांकडून गवती चहाच्या किंवा पंचगव्याच्या प्रसाराची अपेक्षा करण्यासारखे आहे. समोर रैना असो की जकाती, महत्वाच्या क्षणी कुठलाच झेल हा कुठल्याच मुंबई प्लेयरच्या आवाक्यात येणं शक्य नव्हतं.
अश्या ढळढळीत चुकांमुळे आणि शेवटी रैनाच्या फटकेबाजीमुळे काहीश्या बॅकफूटवर गेलेल्या मुंबईला आक्रमक सुरूवातीची गरज होती. तिथेच त्यांच्या सेनापतीचा टेन्शन घेण्याचा जुना आजार उफाळून आला. दुखापतीमुळे असेल किंवा खालच्या फलंदाजांच्या क्षमतेविषयी असलेल्या अविश्वासामुळे, सचिनचा डाव रंगलाच नाही.
शिखर धवनने डावाचे पहिले षटक निर्धाव घालवले तिथेच मानसिकदृष्ट्या दबाव यायला सुरूवात झाली. खरे तर अश्या अतिमहत्वाच्या सामन्यामध्ये स्ट्रायकर एंडला येऊन सचिनने पहिले षटक खेळायचे तर पठ्ठ्या पंचांच्या बाजूस उभारून धवनचे ’घालीन लोटांगण, वंदीन चरण’ पहात राहिला.
मुंबई संघाने पाच षटकांचा पावरप्ले, पुणे महानगरपालिकेने केंद्र सरकारचा विकासनिधी वाया घालवावा तसा अक्षरशः वाया घालवला. धावांची गती कायम कमीच राहिली. गोलंदाज शेफारू लागले.
नुसतं घरच्या प्रेक्षकांच पाठबळ असून काय फायदा? डोके शांत ठेवून खेळावं लागतं.
मुंबईचा फलंदाजीचा क्रम तर मोडी लिपीपेक्षा अगम्य होता. हरभजन जर पिंच हिटर असेल तर खराडी बुद्रुक म्हणजे पुण्यातील कॅलिफोर्निया आहे. धावगती वाढवायची होती तर सौरभ तिवारीला वर पाठवायचं सोडून भज्जीचं ’भजं’ करण्यात काहीच हशील नव्हतं. पण भज्जीला सांप्रतकाळी ’उचलायची’ सवय लागल्याने दोन-चार फटके तरी उचलून मारेल या अंदाजाने त्याला वर पाठवायचा जुगार खेळला गेला.
जे.पी. डुमनीला या स्पर्धेत फारशी फलंदाजी करायला मिळाली नव्हती. त्यामुळे त्यालाही भारतीय मैदानांवर खेळायची संधी लाभावी अश्या उदात्त हेतूने सचिनने त्याला आधी पाठवले असावे.
बाकी पोलार्डचे लोणचे घालून त्याला अठराव्या ओव्हरपर्यंत मुरायला ठेवायची भन्नाट कल्पना फक्त मुंबईचा थिंक टॅंकच अमलात आणू शकतो. पोलार्डला स्पिन खेळता येत नाही असा पुर्वग्रह सचिनने फार आधीच करून ठेवला होता. फिरकी गोलंदाजांची षटके संपली की मग त्याला हळूच बाहेर काढायचा आणि झाडावरून बोरे टपटपा पडावीत तसे षटकार मारून तो सामना जिंकून देईल असा दुर्दम्य आशावाद बाळगून त्याला कुजेस्तोवर डग आऊटमध्येच ठेवायची रणनीती आखणारी टीम धन्य. तिचे कोच धन्य आणि त्यांचा कर्णधारही धन्य.
पण वेताळा एक गोष्ट सांगू. चेन्नईची टीम खर्‍या अर्थाने विजेतेपदाला पात्र होती. त्यांनी घेतलेले अफलातून झेल, त्या आश्विनने टाकलेले थरारक पहिले षटक, धोनीचा संयमी आणि शांत आविर्भाव, ताण अथवा दबाव न घेता खेळाकडेच दिलेले लक्ष वगैरे गोष्टी त्यांचं जेतेपद किती योग्य आहे हेच दर्शवत नाहीत का?
मुंबईचा संघ प्रेशर मॅचमध्ये कोसळणार हे भाकीत कित्येक क्रिकेटप्रेमी, अभ्यासक आणि सामान्य नागरीकांनी आधीच केले होते. त्यावर फक्त शिक्कामोर्तब करण्याचे काम मुंबई इंडीयन्सनी इमानइतबारे केले इतकंचं. बिग मॅच चोकर्स !!”
धाप लागल्याने विक्रम कडेला थांबला. वेताळ अर्चना पुरणसिंग सारखा खदखदा हसला.
विक्रमच्या खांद्यावर हलकेच टप्पू मारत म्हणाला, “राजा, तुझं वक्तृत्व फारच अमोघ आहे. एवढं चांगलं, लॉगिकल बोलणं आणि मध्ये पेरलेली टीका आमच्या कुमार केतकरांनाही जमत नाही. पण तू एक विसरलास. रादर, काल स्टेडीयममध्ये हजारो रूपयांचे तिकीट काढून हजेरी लावणार्‍या आणि जगभर टेलिव्हीजनवर डोळे खिळवून बसणार्‍या आपल्या लाखो चाहत्यांना मुंबई इंडीयन्स टीमने जसे उल्लू बनवले, तसेच तुला बोलते करून मी केले आहे. तुझी प्रतिज्ञा भंग पावली. आता मी परत चाललो. हा हा हा हा हा हा”
गुलशन ग्रोव्हरपेक्षा विकट हास्य करत वेताळ परत जंगलात आपल्या मूळ झाडावर जाऊन उलटा लटकू लागला. फायनलमध्ये अभिषेक नायर धावबाद झाल्यावर सचिनने जशी संतापाने बॅट जमिनीवर मारली तसाच राग रस्त्यावर काढून राजा विक्रमादित्य लोचट बीसीसीआय पदाधिकार्‍यांसारखा परत एकदा आशेने जंगलाकडे निघाला !!!

15 प्रतिक्रीया:

अनिकेत said...

अफलातुन. आपण महान लेखक असल्याची पुन्हा एकदा प्रचीती करुन दिलीत. आपण वापरलेली उदाहरणं प्रत्येक गोष्टींत चपखलं बसली आहेत.

सुंदर लेख.. अभिनंदन

Harshad said...

Wow!!
Great, majaa aali vaachtana.

विशाल तेलंग्रे said...

अरे विक्रांता, अतिशय छान दृष्टांत देऊन तू मुंबई इंडियन्स संघाच्या पराजयाची गाथा मांडली आहेस, मलाही तुझं थोडं कौतुक करावसं वाटतंय!

असो, तुला सांगायचीच राहिली होती एक गोष्ट, ती सांगतो पहिले. सामना चालू होण्याअगोदर चेन्नई संघाचा कर्णधार ढोणीचा मला ट्विटरवर थेट संदेश (DM) आला होता. मी त्याचे अनुसरण करीत नसलो तरी त्याने त्याच्या ब्लैकबेरी सेलफोनवरून (तो जाहिरात मात्र मैक्सची करतो!) कसा काय तो संदेश पाठवला याचेच मला कुतूहल वाटते, असो. त्याने मला आदरार्थी शब्दप्रयोग करून मराठीमध्ये सल्ला मागितला होता जिंकण्यासाठी! याअगोदर त्या सच्याला अनेक वेळा सांगून देखील त्याने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते. हा माझा घोर अपमान आहे असे समजून मी ढोणीला आधी फलंदाजी करणे कसे फायदेशीर ठरेल व पहिले पंधरा षटके गडी राखून संयमी खेळी खेळल्याने नंतर चौफेर फटकेबाजीस वातावरण कसे प्रतिकूल राहील, हे समजावून सांगितले होते! त्याने माझ्या सल्ल्याचा पुरेपुर फायदा घेत अतिशय उत्कृष्ट कामगिरी पार पाडली, त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे!

विशाल तेलंग्रे said...

माझी ही प्रतिक्रिया वाचून सच्यानेही आत्ताच फेसबुकवर माझी सर्वांना दिसेल अशा प्रकारे माफी मागितली, काही जरी झाले तरी माझा जीव आहे त्याच्यावर, माफ केलंय त्याला! ह्म्म, पण तो गर्वाने लालबंब झालेला झहिर आणि तो सरदार भज्जी सिंघ मात्र माझ्या सहनशीलतेच्या पलिकडचे आहेत. येत्या टी-२० विश्व करंडक महास्पर्धेत या दोघांना भारतीय संघात स्थान मिळता कामा नये, असे मी आत्ताच शशांकला बजावलंय! जर हे दोन नर या स्पर्धेत खेळले तर भारतीय संघाची अधोगती निश्चित समजावी! माझे सल्ले अशाप्रकारे फुकट असतात असा गैरसमज इतरांनी बाळगता कामा नये!

विशाल तेलंग्रे said...
This comment has been removed by the author.
SHAPU said...

apratim. I think Shirish Kanekar also would love this. Good Luck for all future posts :)

Yogita said...

Are ekdam sahi!! Maja aali!! As usual!

सिद्धार्थ said...

अरे सही. जबरदस्त. अगदी शालजोडीतले हाणले आहेत. सचिनचा मी मोठा चाहता आहे, सहसा त्याच्या वरची टीका सहन होत नाही पण तरीही तू मांडलेला एक ही मुद्दा चुकीचा वाटत नाही.

आणि हो तुझा आधीच लेख "सांगायची गोष्ट म्हणजे" देखील अफलातून होता. एकदम खुसखुशीत लिखाण. एक सो एक उदाहरणं. मस्त मज्जा आली.

SHAPU said...

na rahavalya mule aaj punha vachli hi post... bhari..

sayali said...

Wow It's a fabulous blog
Though i am a mumbai fan but that's ok

shobha said...

cricket baddal faarase kalat naahi pan lekh matra chaabuk aahe!!!

THE PROPHET said...

अप्रतिम...
जबरदस्तच आहे पोस्ट. खुद्द कणेकर देखील विचार करतील, कि तुम्ही त्यांचीच पोस्ट कॉपी पेस्ट करून लावलीय कि काय?(आणि स्वतः मात्र कॉपी पेस्ट लॉक केली!!!)

Gaurav said...

Baap re... farach bhannat banalay he...
ajun asach material yevot ashi apeksha..

Marathi Manus said...

Now I am waiting for your Vidamban on T-20 Team which has lost all 3 matches in super8. Can you please brief us now on ur Favorite player MSD? Hope you should. :) :)

Vikrant Deshmukh... said...

धन्यवाद गौरव. मी नक्कीच प्रयत्न करेन.

मराठी माणूस - धोनीचे डावपेच फार चुकले असे मला वाटत नाही. इथे ओव्हरऑल सगळेच नालायकासारखे खेळले. नेहरासारखी बैलं आपण का आणि कश्यासाठी उरावर बाळगतो कोण जाणे?
फलंदाजी वाईट..गोलंदाजी सुमार.. आणि क्षेत्ररक्षण??
मला वाटते आयपीएल चा ताण... मध्ये जर गॅप असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. आणि वेस्ट इंडीजचे पीचेस किती दरिद्री?