Friday, April 23, 2010

सांगायची गोष्ट म्हणजे...

(आमचे आराध्यदैवत शिरीष कणेकर यांची क्षमा मागून त्यांच्या लेखनशैलीची किंचितशी नक्कल करत)
“काय सांगतोस काय?” मी बराक ओबामाच्या अंगावर जवळपास ओरडलोच. आम्हाला बडीशेप द्यायला आलेली मिशेल केवढ्यांदा दचकली. मी व्हाईटहाऊसमध्ये नुसतं येणार म्हटलं की तिची बिचारीची धावपळ चालू व्ह्यायची. पतीदेवांच्या सगळ्यात जीवलग मित्राची सरबराई कशी करायची हे जगातल्या कुठल्याही महिलेला शिकवावं लागत नाही असं माझं (इतक्या देशांच्या भेटींनंतर) सूक्ष्म निरीक्षण आहे. यामुळेच ब्रॅड पीटच्या घरी कोकम सरबताचे दोन घुटके घेताना ऍंजेलिनाने केवळ मला आवडतात म्हणून फणसाचे गरे आणून पुढ्यात ठेवले तेंव्हाही मला विशेष नवल वाटलं नाही.
बराकने (आम्ही मोठी माणसं एकमेकांना नेहमी पहिल्या नावानेच हाका मारतो. एकदा ’बॉंबे हाऊस’मध्ये मी ’काय हे रतन? कोरसच्या डीलवर किती पैसे उधळतोस?’ अशी लाडीक संभावना केली होती तेंव्हा ’टाटा’च्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमधली चार-पाच टाळकी खाली पडायचीच बाकी राहिली होती. रतन मात्र माझ्यासारख्या दिग्गजाच्या प्रश्नावर काय बोलावे या विवंचनेत ’नॅनो’ सारखा एका कोपर्‍यात अंग चोरून उभा होता) आपल्या जुन्या मैत्रीला जागून ’बोराबोरा’ बेटांवरचा एक बिलीयन डॉलरचा प्रवाळयुक्त महाल मला गुढीपाडव्याला भेट म्हणून दिला तेंव्हा मोठ्या बाणेदारपणे मी म्हणालो “आम्ही पडलो सरस्वतीचे उपासक. धनाचा, वित्ताचा मोह आम्हांस नाही”.
त्याच्या दोन्ही मुली ‘मालिया’ आणि ‘नताशा’ सध्या अर्धमागधी आणि ज्ञानेश्वरकालीन मराठीचा अभ्यास करत असल्याने त्यांचा सराव व्हावा म्हणून मी ओबामा कुटुंबियांसमोर शक्य तेंव्हा अश्याच भाषेत बोलतो.
माझं हे एक चांगलं आहे. मी कोफी अन्नानला आवडते म्हणून वर्‍हाडीत बोलतो, अमर्त्य सेनाशी कुणालाच कळणार नाही अश्या अर्थशास्त्रीय परीभाषेत संवाद साधतो आणि मस्कतच्या राजाला (ज्याच्या नावात अदमासे ३ ’म’ आणि २ ’ल’ आहेत) जीभ अडकून पडेल अश्या सुरस अरेबिक भाषेत कथा सांगत राहतो. या राजाला आपल्याकडच्या ’उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ या मी सांगितलेल्या म्हणीचं फार म्हणजे फार आश्चर्य वाटलं. ’आमच्याकडे ही म्हण कधीच शक्य नाही कारण आम्ही बोलताना आमची जीभ कधीच टाळ्याला लागत नाही’ असं म्हणून तो फार मोठा विनोद झाल्यासारखा हसला. नोकरीसाठी त्याच्या देशात सहकुटुंब, सहपरीवार आलेले काही केरळी आपल्यालाही तो जोक कळल्याचे भासवत त्याच्याहीपेक्षा मोठ्यांदा हसले. नको तेंव्हा आणि सारखे विनोद करणारे लोक मला आवडत नाहीत. हेच मी मागे पु.लं.ना (त्यांच्या विनोदाने अजिबात हसू न आल्याने) निक्षून सांगितलं होतं.
स्पष्टवक्तेपणा हा आम्हा लोकोत्तर महापुरुषांचा स्थायीभाव!!
याच तिरीमिरीत मी बिन-लादेनला वर्ल्ड-ट्रेड-सेंटर पाडल्याबद्दल झाप झाप झापला होता. माझ्या तिखट शब्दांनी विदीर्ण होऊन लादेन आपल्या (सातव्या) बेगमच्या खांद्यावर डोके ठेवून, आख्ख्या अल-कायदाच्या समोर ढसाढसा रडला होता. मी मात्र त्यावेळी तिसरे महायुद्ध कसे टाळता येईल या विचाराने चिंताक्रांत होऊन जॉर्ज बुश (हा माझा अजून एक मित्र) सुट्टी साजरी करत असलेल्या बेटावर रवाना झालो. याच मोकळेपणापायी मागे एकदा लिओनार्डो-द-व्हिन्सीच्या चित्रांची परखड समीक्षा मी कोणाचा कसलाही मुलाहिजा न करता अस्खलित फ्रेंचमध्ये केली होती अन् त्याद्वारे या अतिनावाजलेल्या पेंटरची लक्तरं आयफेल टॉवरवर टांगली होती.
आपली गोष्टच वेगळी.
तरूण असताना फ्लीपर आणि गुगलीमधला फरक कळत नाही म्हणून त्या शेन वॉर्नला काय काय कठोर शिक्षा केल्या होत्या मी. अर्थात दिवसभर त्याला पिदवल्यावर संध्याकाळी “तू त्या कुंबळेकडे पाहू नकोस. त्याचा चेंडू प्रकाशकिरणांसारखा कायम सरळ जातो. तू आपला रिस्टस्पिनवर लक्ष केंद्रीत कर” असा हार्बर ब्रीजवर थोपटत दिलेला सल्ला तो आणि मी कसा विसरेन?
“तुझं क्रिकेटमधलं ज्ञान अगाधच”, (गावस्करांचा) सुनील माझ्याकडे अतीव आदराने पहात म्हणाला. “तुझ्या पाच टक्केही ज्ञान त्या धोनीला असतं तर...” उसासे टाकत सुनीलने (सचिनची विनाकारण स्तुती करणारा) अजून लेख लिहायला घेतला. ज्योएल गार्नर आणि माल्कम मार्शलला उसळत्या कॅरेबियन खेळपट्ट्यांवर कसे खेळायचे याविषयी मी दिलेल्या टीप्सबद्दलची त्याची कृतज्ञता अजून कायम होती. माझ्या एका चिठ्ठीमुळे तो प्रथितयश चॅनेलवरचा समालोचक आणि बीसीसीआयच्या महत्वाच्या समितीचा अध्यक्ष कसा बनला हा एक इतिहासच आहे.
आपल्या ज्ञानाचा फायदा दुसर्‍याला करून देण्याच्या बाबतीत मी नेहमीच उत्सुक असतो.
ख्रिस्तीयाने रोनाल्डोला ड्रिबलिंग जेंव्हा नीट जमत नव्हतं किंवा रोबर्टो कार्लोसच्या फ्री कीक गोलपोस्टच्या वरून जात होत्या तेंव्हा पेलेच्या अगणित विनंत्यानंतर मोहन बगानच्या हिरवळीवर मी त्यांना दहा मिनिटांचे अमूल्य मार्गदर्शन केलं होतं.
मनमोहनच्या मागे ’अर्थव्यवस्था खुली कर, खुली कर’ असा दोन वर्षे लकडा लावल्यावर कुठे भारतात आर्थिक उदारीकरणाचं धोरण अस्तित्वात आलं.
’क्वांटम फिजिक्स’पासून ते ’सिंहली भाषेच्या व्याकरणाची मूलतत्वे’ आणि ’द्वापारयुगातील जीवाश्मांचा तौलनिक अभ्यास’पासून ते ’जिलेट व्हेक्टर प्लस’ अश्या असंख्य विषयांवर पीएचड्या मिळवलेला मी ज्ञानवाटपाबाबत मात्र सदैव तत्पर असतो. असो.
शुक्रवारी रात्रीचं जेवण माझ्याबरोबरच घ्यायचं असा बराकने खुपच हट्ट धरल्याने मी. पं रविशंकरांना त्यांच्या शंकासमाधानासाठी दिलेली वेळ रद्द करून प्रायव्हेट जेटने या ’पांढर्‍या घरात’ दाखल झालो. (माझं हे मस्करीयुक्त भाषांतर मिशेलवहिनींना मुळीच आवडायचं नाही. यात बिल्कुल ’रेसिझम’ नाही हे मी त्यांनी दिलेली पुदिन्याची चटणी चाटूनपुसून खाताना कित्येक वेळा क्लिअर केलंय.)
स्वागतकक्षात उभ्या असणार्‍या एफबीआयच्या डायरेक्टरला मी बोटानेच निर्देश करताच लिमोझीनच्या मागील सीटावर असलेल्या भेटवस्तू आणायला तो धावला. ओबामा कुटुंबासाठी मी नेहमीच चितळेंची बाकरवडी, बेडेकरांची मिसळ आणि कयानीची श्रूसबेरी बिस्कीटं घेऊन जातो. आत येताक्षणी दोन्ही मुली पिशव्यांवर तुटून पडल्या. “पुणं तिथं काय उणं” असं म्हणतं बराकने माझा ओव्हरकोट स्वहस्ते काढला. “तो जागतिक बॅंकेचा अध्यक्ष कितीतरी वेळ तुझी वाट पहात बसला होता. हैतीच्या भुकंपग्रस्तांसाठी किती आणि कसे पैसे द्यावेत याविषयी बॅंकेला तुझा सल्ला हवा होता.” बराक डोळे रणजितसारखे बारीक करत म्हणाला.
“लोक पण ना..” मी ’मामाजीका आवळा’ची पुडी उघडून एक बोकणा भरला.
“मी पिटाळलं त्याला. म्हटलं किती त्रास देणार आमच्या पाहुण्याला?” बराक लाडेलाडे म्हणाला. अश्या वेळी तो बराचसा ’स्लमडॉग मिलेनियर’ मधल्या निरागस मुलासारखा दिसतो.
चर्चा आणि उहापोह यांचा मला मुळातच कंटाळा.
मागे भीमसेनांना आग्रा घराण्यातील अनवट रागांविषयीच माझं मत मी मोजून साडेतीन मिनिटात सांगितल्यावर त्यांना माझ्या सांगितीक उंचीची कल्पना येऊन अमाप आश्चर्याने ते निःशब्द झाले होते. मलाही कलाक्षेत्रात थोडेफार योगदान देणार्‍या व्यक्तींबरोबर यापेक्षा जास्ती वेळ घालवणं शक्य नव्हतं. याच न्यायाने मी डॉ. बुधाजी मुळीकांना ’आधुनिक शेतीतील सेंद्रीय खतांचा वापर’, नारळीकरांना ’श्वेतबटूचे सांख्य मॉडेल’, लक्ष्मी मित्तलला ’हेवी कंपन्यांचे डेट टू इक्वीटी रेशो कसे सांभाळावेत’, करूणानिधींना ’तामिळनाडूच्या विवीध मतदारसंघातील जातीय समीकरणं’, डॉ. ढेरेंना ’प्रागैतिहासिक काळातील व्यापारउदीम आणि चलनवलन’ तर बिल गेटसला ’लिनक्सच्या प्रसाराने विचलीत न होता विंडोज कशी सुधारावी’ इत्यादी विषयांवरचं मौलिक ज्ञान उदारहस्ते देत असतो.

बराकला माझ्या या अश्या चतुरस्त्र बोलण्याचं फारच कौतुक.
मिशेलने जेवणाचा बेत एकदम फक्क्ड केला होता. मुली शहाण्यासारख्या आईने न भरवता स्वतःच्या हाताने खाऊ लागल्या. मित्रांच्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत असा माझा नेहमीच कटाक्ष असतो. म्हणूनच मी मल्ल्यांच्या सिद्धार्थला ’वदनी कवळ घेता’ म्हणायला शिकवलं. ’आर्यन शाहरूख खान’ आणि ’अर्जुन सचिन तेंडूलकर’ ही एरव्ही व्रात्य असणारी दोन मुलं माझ्यासमोर गरीब गाईसारखी शांत बसतात आणि मला कुसुमाग्रज, पु,शि.रेगे, वर्डस्वर्थ वगैरेंच्या (अर्थात मला मुखोद्‍गत असणार्‍याच) कविता मनोभावे म्हणून दाखवतात. मी ते सर्व मोठ्या कौतुकाने ऐकतो आणि बक्षिस म्हणून ’सुलभ, रंजक अंकगणित’ या पुस्तकाच्या प्रती माझ्या स्वाक्षरीसहीत देतो.
जवळच्या मित्रांसाठी मी असा सदासर्वकाळ उपलब्ध असतो.
माझ्या पन्नास हजार डॉलरच्या छोटेखानी सेलवर जगाच्या कानाकोपर्‍यातून येणारे फोन मी नेहमीच दोन रिंगच्या आत उचलतो. कोकण रेल्वेवर रत्नागिरीजवळ काबुर्डेचा बोगदा खणताना मशिन अडकल्यावर श्रीधरन या माझ्या जुन्या मित्राने पहाटे दोन वाजता मला फोन करून ’असे कातळ फोडताना स्पिंडलचा डायमिटर किती ठेवावा’ याविषयीचा माझा सल्ला घेतल्याचं मला आठवतं.
नागपूरचा मित्र ’ग्रेस’ एका गहन उपमेच्या स्फुर्तीअभावी तळमळत असल्याचं माझ्या कानावर पडल्याक्षणी मी माझं ’क्वेट्टो’ परीषदेतलं सर्वाधिक महत्वाचं भाषण थांबवून ’पारधचांदण्यांच्या कैकमात्रा’ ’हळवदत्ताचे लघुपौरुष्य’ ’खिन्नाधाराची सानफुले’ ’नागरग्रहाची अवतारमिठी’ ’प्रद्युम्नलसित झोपेची लक्षणे’ ’कालिकेचे ताम्रवर्ण धुपारे’ असे अनेक दृष्टांत काही सेकंदात फोनवर दिले होते. या माझ्या अलौकीक प्रतिभेने थरारून जाऊन ग्रेसने पुढचा लेख माझ्यावरच लिहायला घेतला होता. नाव होतं ’मांडकप्रदेशातील शब्दावलिया’. पण अंगभूत नम्रपणामुळे व संकोचामुळे मी त्याला तसं करण्यापासून परावृत्त केलं. असाच विनय मी ’पद्मश्री’ ’ज्ञानपीठ’ ’भारतरत्न’ ’मॅगसेसे’ ’बुकर’ आणि ’नोबेल’ पुरस्कार नाकारताना दाखवला होता.
“तुला एक सांगायचयं”, बराक राष्ट्रवादीच्या मंत्र्यांपुढे कॉंग्रेसचे मंत्री बोलतात तश्या दबक्या आणि क्षीण आवाजात म्हणाला. जेवणानंतर मघई पान खाण्याच्या माझ्या विलक्षण लोभस कृतीकडे पाहण्याचा मोह टाळून तो गंभीर झालाय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचंच असणार, मी अंदाज बांधला.
ओबामा घराण्याच्या दोन्ही कुलदीपीका माझ्या अद्ययावत लॅपटॉपवर ’अल्लादीन’चा नविन गेम खेळण्यासाठी आत पळाल्या होत्या. मिशेल ’डेस्परेट हाऊसवाईवज’ पाहण्यात गुंतली होती.
“आता काय नविन?” मी मघईचा उबदार रस गिळत विचारलं. ’कात’ टाकण्याच्या बाबतीत एकून अमेरीकेत आनंदच आहे !!
“म्हणजे मी हे तुला बरंच आधी सांगायला हवं होतं”, बराक अपराध्यासारखा खाली मान घालून म्हणाला. अश्या वेळी तो बराचसा मॉर्गन फ्रीमनसारखा दिसतो. “ते तुमच्या इथे सानिया आणि शोएबचे लग्न झाले ना” बराक माझी भेदक नजर चुकवत म्हणाला “तो खरंतर अमेरीकेचा प्लॅन होता.”
“काय सांगतोस काय?” मी बराक ओबामाच्या अंगावर जवळपास ओरडलोच. आम्हाला बडीशेप द्यायला आलेली मिशेल केवढ्यांदा दचकली.
“हो. म्हणजे हे कारस्थान खुप महिने चालू होतं. तुला शेवटच्या क्षणी सांगावं म्हटलं. पण गेले काही आठवडे तू नासा स्पेस शटलमधून चंद्रावर तुझ्या उन्हाळी सुट्ट्यांसाठी गेल्याचं कळालं. म्हटलं, उगाच कश्याला डिस्टर्ब?”
“हम्म्म” मी फुगल्याचा खोटा अभिनय केला.
अमिताभने मला न विचारता ऐश्वर्याला सून म्हणून आणायचा निर्णय घेतल्यानंतर आमंत्रणासाठी पत्रिका द्यायला माझ्या घरी आल्यावरही मी असाच गुरंफटून बसलो होतो. एखादी गोष्ट आपल्याला खटकली की खटकलीच. सब-प्राईम कर्जे देऊ नका असे मी सिटीबॅंक आणि बॅंक ऑफ अमेरीकेच्या प्रेसिडेंटला अनेकदा करड्या आवाजात बजावलं होतं. पण त्यांनी मनमानी केल्यानंतर (आणि पुढे वाट्टोळं करून घेतल्यावर) ’लेहमन ब्रदर्स’, ’गोल्डमन सच’ वगैरेंना बेल-आऊट देण्यासाठी तमाम अमेरीका वित्तीय संस्थांच्या मिन्नतवरीला न जुमानता मी माझ्या खिश्यातून एक पैसाही दिला नाही.
“त्याचं काय आहे, एकदा का सानिया आणि शोएबचं लग्न झालं की या दोन्ही देशातला तणाव संपून मधुर संबंध निर्माण होतील असा आमच्या परराष्ट्र खात्याचा होरा होता.” बराक परत डोळे बारीक करत म्हणाला.
अश्या वेळी तो बराचसा मेक्सिकन चित्रपटातल्या ड्रग डीलरसारखा दिसतो.
“वाह वा...काय पण विचार? आणि काय पण महान उद्देश? या नियमानी तुम्ही उद्या ’मीरा’च लग्न राहुल महाजनशी (स्वयंवराविना) लावाल आणि मोहम्मद युसुफला ’डाबर वाटीका’ शॅंपोचा ब्रॅंड ऍंबॅसिटर बनवाल.” माझ्या उपहासपुर्ण बोलण्याचा विषाद न मानता बराकने दोन्ही हात जोडत म्हटलं “मला माफ कर. पण आता कळतंय, हा निर्णय जरा चुकीचाच होता.”
“जरा?” मी पोस्ट ऑफीसात ग्राहकांच्या अंगावर वस्सकन ओरडणार्‍या स्त्री कर्मचार्‍यासारखा खेकसलो.
“हे फार चुकीचे पायंडे पाडताय तुम्ही. म्हणजे माझ्या अश्या लग्नांना विरोध नाही, पण कश्यासाठी रचायची ही सगळी नाटकं? आणि का? आता प्रत्येक पाकिस्तानी मुलाला भारतीय ललनांची स्वप्ने पडू लागतील. उद्या सोहेल तन्वीर आमच्या अमृता खानविलकरला मागणी घालेल. आणि मग तिच्या लग्नात “वाजले की बारा” बरोबर “अब मुझे जाने दो घर, बज गये बारा” अशी ट्रानस्लेटेड लावणी पण वाजवावी लागेल. शशीने ट्विटरचा घेतला नसेल एवढा धसका अजय-अतुलला हिंदीचा आहे हे तुझ्यासारख्याला माहित नसावं? माणूस आहेस का कवि?” माझा आवाज टीपेला पोहोचलेला.
“भावजी नका हो इतकं टाकून बोलू” मिशेल ब्रेकच्यामध्ये आत येत डोळ्यांच्या कडा पुसत म्हणाली. “होतात कधीकधी चुका माणसाकडून. अमेरीकेचा अध्यक्ष झाला म्हणून काय झालं? आफ्रिकेतल्या पाड्याचे गुण येतात मध्येच उफाळून.”
मी अंमळ थांबलो. कुणी इमोशनल झालं की मी गलबलून जातो. मागे ऍपलचा स्टीव्ह जोब्स असाच माझ्या पुढ्यात रडवेला चेहरा घेऊन उभा असताना त्याला उभारी देण्यासाठी मी टिश्यू पेपरवर एक भाषण लिहून दिलं. तेच पुढे त्याने ’स्टे हंग्री स्टे फुलीश’ नावाने स्टॅनफोर्ड विद्यापीठात वापरून अजरामर करून टाकलं.
बराककडे एक विखारी कटाक्ष टाकत मी उरलेलं मघई पान संपवलं.
“आता एक करा”, मी स्वरात श्रीराम लागूसारखा कडवटपणा आणत म्हटलं, “काही दिवस तरी सीआयए आणि मीडीयाला यापासून दूर ठेवा. तुम्ही आततायी वागायचं आणी आम्ही निस्तरायचं हे अनादीकालापासून चालत आलंय. किती दिवस माझ्या डोक्याला ताप देणार आहात अजून?”
बराकने अश्रुपुर्ण नजरेने पण एका विश्वासाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझे हात धरले. “मला माहिती होतं, तू मोठ्या उदार अंतःकरणाने मला माफ करशील आणि सगळं काही ठिकठाक करशील. तू नसतास तर या जगात काय हाहाःकार माजला असता कोणास ठाऊक?”माझ्या चरणांकडे पहात तो पुटपुटला.
अश्या वेळी तो बराचसा जागा न मिळाल्याने बसच्या शेवटच्या पायरीवर उभा असलेल्या मुलासारखा दिसतो.
“हां राहू दे. राहू दे. तरी बरं, माझी चंद्रावर पण राहण्याची व्यवस्था आहे.” मी गॉगल चढवत देवकी पंडीतसारखं अर्धवट हसत म्हणालो.
(काल्पनिक)