Tuesday, April 20, 2010

अजून संपला नाही सीते...

गोष्ट तशी फार जुनी नाही.
तेंव्हाही देवळात डोळे मिटून भक्तीभावाने नमस्कार करणारे लोक घरी उद्धट, अर्वाच्य बोलायचे. तेंव्हाही माणसाला रात्रीच्या जेवणानंतर बागेत अनुभवायला मिळणार्‍या रातराणीच्या दरवळापेक्षा पैसा आणि प्रतिष्ठा प्यारी होती. भल्याभल्यांचे पाय मातीचेच होते आणि कित्येकदा एखाद्याचं वर्तन बघून सगळीच्या सगळी बोटं तोंडात जायची. तेंव्हाही गुलाबांच्या मध्येमध्ये असणारे काटे कधीकधी रसभंग करायचे तर नयनांचे डोह भरून यायला कसलेच मुहुर्त लागायचे नाहीत.
****************************************************************************
अश्याच एका वैशाखवणव्यात मी जीवाच्या आकांताने माझी बाईक घेऊन शहराबाहेर चाललो होतो. महत्वाची मीटींग आणि दिलेली वेळ पाळण्याबाबत माझा कायम(च) असलेला अट्टाहास यामुळे ही धावपळ झालेली. शांत रस्त्यावर कोपर्‍यावरून गिरकी घेतली आणि मला ’ती’ उभी असलेली दिसली. साधारण पंचवीशीची असावी......टप्पोरे डोळे, मध्यम बांधा, शालीन सौंदर्य.
पटापट काही आडाखे बांधले. नोकरी करणारी वाटत होती. विवाहीत आहे हे तर गळ्यातील मंगळसूत्रावरून लगेच कळालं. उन्हामुळे लालबुंद झालेल्या तिच्या चेहर्‍यावर एक सूक्ष्म वैतागाची छटा. कुणाची वाट पहात होती का? कुठेतरी खोल आपल्यातच बुडून गेल्यासारखी....
गाडी जवळून जाताना एक क्षणभर माझी व तिची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यातील अनेक प्रश्नचिन्हं आणि अबोल कैफीयत का कोण जाणे बराच वेळ माझा पाठलाग करत होती.
****************************************************************************
काही महिन्यानंतर अस्संच एकदा सिंहगड रस्त्यावरच्या रामकृष्ण मठात गेलो तर दरवाज्यापाशीच ’तिचं’ दर्शन. परत तेच प्रश्नार्थक डोळे. तेच अस्वस्थतेचे भाव.
माझी पावलं नकळत थबकली. चीरत जाणारी शांतता आणि वातावरणात पसरलेली एक करूणेची लहर.
एखाद्या अनुत्तरीत कवितेसारखे तिचं ते रस्त्याकडे मूकपणे बघणं का कोण जाणे मला थोडं अस्वस्थ करून गेलं.
****************************************************************************
एका रविवारी संध्याकाळी केंद्रातून घरी यायला निघालो. लॉ कॉलेजच्या सिग्नलला फोन आला म्हणून गाडी बाजूला घेतली. बोलत असतानाच समोर काहीशी गर्दी दिसली म्हणून पहायला लागलो. तिथं असलेल्या हॉटेलच्या पार्कींगमध्ये एक साधारण २७-२८ वर्षाचा तरूण एका स्त्रीला तारस्वरात ओरडत होता. थोडा पुढे गेलो आणि पाहिलं तर तीचं – मला याआधी दोनवेळा दिसलेली अनामिका !!!
तिच्या चेहर्‍यावर आणि डोळ्यात तसेच दाटलेले असंख्य प्रश्न. यावेळी मात्र चर्या रडवेली झालेली.
सदर इसम तिचा पती असावा. मोठमोठ्यांदा ओरडत तो तिला ओढत होता.
“येत नाही म्हणजे काय? XXXX कशी येत नाही तेच बघतो.” पतिराज चांगल्या घरातले, मोठ्या कंपनीत काम करणारे वाटत होते. पण त्याचा आवाज विकोपाला गेलेला. ही हलायला तयार नव्हती.
“येतेस का नाही?” तो परत ओरडला आणि उजव्या हाताने तिच्या कानशीलात जोरात भडकावली.
बघणारे आम्ही सर्वजण अवाक् झालो. तिलाही मोठा धक्का बसलेला. डोळ्यात टचकन पाणी आलेलं. पण तिच्या तोंडून एक अवाक्षरही बाहेर पडलं नाही.
“XXXX” शिवी देत त्याने परत एकदा तिच्या श्रीमुखात दिली. आता मात्र तिचा बांध फुटला असावा.
त्या फटक्याने भेलकांडत ती थोडीशी कडेला गेली आणि हमसाहमशी रडू लागली. आता ती बरोबर माझ्या समोर उभी होती. हुंदके आवरत तिने मोठ्या अपेक्षेने जमलेल्या लोकांकडे पाहिलं. म्हणजे मला तसं वाटलं. बरेचसे लोक काहीतरी तमाशा बघायला मिळतोय या भावनेतून आलेले. माझ्यासारखे काही लोक आता काय करता येईल या विचाराने गोंधळून गेलेले. नेमकं काय करावं कुणालाच सुचत नव्हतं.
तो परत तिच्याजवळ गेला. नजरेतला अंगार त्याच्या चालण्यात आणि बोलण्यात जाणवत होता. आता हॉटेलचा स्टाफ आणि काही ग्राहकही बाहेर आलेले.
आता तिचं रडणं थांबलेलं. “का करतो आहेस हे तू सगळं?” तिनं अंतःकरण पिळवटून टाकणार्‍या स्वरात विचारलं. तिचा आवाज मी पहिल्यांदाच ऐकत होतो. इतकं मधुर बोलणं असणार्‍या स्त्रीला तिचा पती फिजीकली मारू शकतो? पतिदेवाचं हृदय द्रवण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. त्याने आपल्या उजव्या हाताने तिला खस्संकन धरलं आणि हॉटेलच्या दिशेने ओढू लागला.
“अहो का त्रास देताय त्यांना?” माझ्या बरोबर उभे असलेले एक आजोबा न रहावून म्हणाले.
तो थांबला. आमच्या सर्वांकडे वळून पहात ओरडला, “माईंड युवर ओन बिझिनेस. आमच्या घरच्या भांडणात पडायचं काही कारण नाही. कुणी मध्ये आले तर याद राखा.”
दोन इंग्रजी शिव्या हासडत त्याने सरळ पार्किंग गाठलं. वॅगन-आरचा दरवाजा उघडला. तिला जवळपास आत कोंबलं. स्वःत ड्रायव्हिंगसीटवर बसून गुस्स्यानेच गाडी काढायला सुरूवात केली. ती बसलेली खिडकी माझ्या बरोबर समोर आली. ’१०० नंबरवर फोन करून पोलिसांना कळवावं का?’ असा विचार माझ्या मनात येत असतानाच आमची परत नजरानजर झाली. लहान मुलासारखा निरागस पण आता हताश भासणारा चेहरा मूकपणे बरंच काही बोलत होता. काय बरं दुःख असेल हिला? या माणसाचा नेमका प्रॉब्लेम काय असेल?
****************************************************************************
डिसेंबरची गुलाबी थंडी. क्लायंट कॉल असल्याने सकाळी जरा लवकरच ऑफीसला येत होतो. मगरपट्टा सायबरसिटीच्या मेन गेटने आत आलो आणि आमच्या टॉवरकडे जाऊ लागलो. अचानक लक्ष मधल्या मोठ्या फाऊंटनपाशी गेलं. ’ती’ दिसली. शाल गुरफटून, अंग चोरत एका कडेला उभी.
कुणाच्यातरी प्रतिक्षेत असल्यासारखी. चेहर्‍यावर एक शून्य. कसलेही भाव उमटू नयेत असा कसोशीचा प्रयत्न. पुर्वी दिसलेला निरागसपणा पार उतरलेला. त्याची जागा एका अनामिक करडेपणाने घेतलेली.
तिने मला ओळखलं असण्याची काही शक्यताच नव्हती. मला मात्र खुप अस्वस्थ वाटत होतं.
क्षणभर वाटलं की एकदा उतरावं खाली आणि विचारावं तिला , “आर यू हॅपी नाऊ? आनंदात आहात ना?”. उत्तराची भीती होती. काय काय वादळं येऊन गेली असतील तिच्या आयुष्यात?
का म्हणून खपली काढावी उगाच? मी आरश्यात पाहिलं. तिची नजर दूरवर कुठेतरी अज्ञातात... काय शोधत असावी कुणास ठाउक? सगळं काही आलबेल असेल? का तिने सगळेच प्रयत्न सोडून दिले असतील?
****************************************************************************
आता चार महिने झाले. परत काही ती दिसली नाही.............
परवा एक स्नेही म्हणाले, “सीतामाईंवर एक कार्यक्रम आहे. येता का?”
मी घाईघाईत म्हणालो “नको”.
कागद समोर ओढला आणि लिहू लागलो –

अजून संपला नाही सीते
तुझा या जगातील कठोर वनवास
राघव किती, कुठे माहीत नाही
अजून सरले नाही दुःखांचे नवमास ॥१॥
अजून तशीच आहे, तुझ्या मनातील वेदना
तसाच आहे पीळ, रोज पडणारा
सुवर्णमृगाच्या पाठलागाचा
अजून आहे भोग, रोज भिडणारा ॥२॥
अजून आहेत सीते, विरहाचे ऋतू सहा
अजूनही आहे डोळ्यात गरम पाणी
दिवस नवा ओढताना तू
अजून गात आहेस मुसमुस गाणी ॥३॥
अजून दिसत नाही पहाटेचे आकाश
नाहीत सापडले अजून उःशाप
अग्नीपरीक्षा मात्र चालूच आहेत
आणि या युगातही तुझे सायंकालीन विलाप... ॥४॥
****************************************************************************

11 प्रतिक्रीया:

SHARAD PURANIK said...

Ekdam bhannat... paar aat kholvar pohochla sandesh... sundar lihita tumhi deshmukh...

davbindu said...

खुपच वाचनीय झाली आहे पोस्ट.त्या स्त्रीच्या वेदना खोलवर पोहोचवल्यात.कधी संपणार नारी तुझा वनवास ग....

shashank said...

Seetamaila ashrupoorna namaskar,
Maharshi valmikinna saashtang dandawat!
shashank

विशाल तेलंग्रे said...

नेहमीप्रमाणेच छान झालिय पोस्ट...

vijaymulik said...

Mitra, shabd nahi aahet re. Hridayala bhidal......

eeshwaree said...

!!!!!!!.................... speachless!!!!!!!!!! mi pn pahileli ashich ek seetaamaai athawli.........!!!!!!!!

शांतीसुधा said...

खरंच जे लोक सगळ्या स्त्रियांकडून सीतामाई होण्याची अपेक्षा करतात त्यांना एक पत्नी, एक वचनी प्रभुरामचंद्र कसे आठवत नाहीत? म्हणे स्त्रियांनी सीतामाईचा आदर्श ठेवला पाहिजे. या जगात हजारो राम (प्रभु श्रीरामचंद्र) मिळतील पण एकच सीतामाई. का हे सगळं कशासाठी स्त्रीला कायम देव्हार्‍यात कोंडणं?

Swanand said...

मित्रा, ब्लॉग सुंदरच लिहिला आहेस. कविता काय किंवा लेख काय, तुझा तो हातखंडा आहे.
ब्लॉग वाचून एक गोष्ट मात्र जाणवली की त्यावेळीसुद्धा सीतेच्या मदतीला कोणी धावले नव्हते आणि आज देखील तेच होतंय.
कविता तर अप्रतिमच केली आहेस.

amol said...

कधी संपणार तुझा वनवास सीते ,या युगातही तुझे विलाप संपणार नाहीत हेच वाटले, त्या स्त्रीच्या वेदना खोलवर पोहोचवल्यात
from Amol Deshmukh

Sonal Dharma said...

लोक भाकरीवरून पिझ्झा वर आले,
धोतरावरून caprii वर आले,
भजना वरून rock वर आले....
पण काही गोष्टी नाही तर नाही बदलत........

एक माणूस म्हणला,"माझ्या घरात मी काहीही करेन (अगदी माझ्या घरच्यांना मारहाण सुद्धा)...तुझं काय ?" की लोक लगेच मुग गिळून गप्प.
पुढे तरी हे बदलेल का?

सा. ज. said...

surekh lihilay...