Friday, April 16, 2010

अशीही एक शुभेच्छा....

अशीच हसत रहा तू....
आपल्या सुखाच्या आणि दुःखांच्या क्षणात
संध्येच्या छायेत आणि दुपारच्या उन्हात,
आभाळालाही मग दाटून येईल माया
आणि,
गावोगावच्या देवळातील घंटांचा नाद
परत एकदा घुमेल निर्जन एकांतात,
मग परतून येतील
आईच्या डोळ्यामधल्या आनंदाच्या धारा
आणि तुझ्या यशाने
सुखावलेल्या वडीलांच्या अबोल ओल्या पापण्या,
तू अशीच आनंदी रहा......
श्रावणातल्या सोनेरी सकाळीसारखी,
मग ऐकू येतील कुणाकुणाला
मधुवनात गुंजणारी नव्या पक्ष्यांची नविन गाणी,
आणि मग,
दाराच्या पायरीपाशी थबकलेली पाउलं
सुखावून बघतील
आत रमलेल्या संसाराच्या भिंतींकडे,
तू अशीच ठसवत रहा
संस्कारांची महती आणि मजेत जगण्याच्या चंद्रकळा,
मग..........
तुझ्या आजूबाजूला पसरलं असेल
एक देवभूमीचं अनोखं चैतन्य
आणि एक अनाहूत सार्थकतेचा सुगंध…..
तर त्यावेळीही
जगाच्या एखाद्या छोट्याश्या कोपर्‍यात
आपल्या थरथरत्या हातांनी
आम्ही प्रार्थना करत राहू –
तुझ्या जीवनात उगवणार्‍या उद्याच्या प्रसन्न सूर्यासाठी !!!!
(कोणा एका सुहृदाचा वाढदिवस होता आज.. तेंव्हा अभिष्टचिंतनासाठी ही कविता स्फुरली. अश्या काव्यात्मक शुभेच्छा फार मस्त वाटतात ना?)