Sunday, March 7, 2010

सलीलगाथा

आजतागायत डॉ. सलील कुलकर्णी यांची ओळख आपल्याला एक अतिशय प्रतिभावान, दर्जेदार व गुणी संगीतकार अन् तितक्याच ताकदीचे गायक अशी होती. या वर्षाच्या सुरूवातीपासून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे अजून एक दालन रसिकांच्या समोर खुले झाले आहे – अचाट शब्दसामर्थ्य असणारे लेखक सलीलदादा !!

’लोकसत्ता’च्या ’चतुरंग’ पुरवणीमध्ये ते ’म्युझिकली युवर्स’ या नावाचा स्तंभ महिन्यातून दोन शनिवारी लिहीत आहेत. संगीतकाराचे लिखाण म्हणजे संगीताला केंद्रबिंदू मानून अथवा सांगितीक परीभाषेतील, फार फार तर या क्षेत्रातल्या खाचखळग्यांविषयी/अनुभवांविषयी असेल असा एक सर्वसाधारण समज असतो. काही अंशी तो खराही आहे. एखादा सन्माननीय अपवाद वगळता आजपर्यंतच्या बहुतांशी संगीतकारांनी अथवा गायकांनी केलेले लिखाण हे एका ठराविक रूढ साच्यात अथवा एका विशिष्ट शैलीत केलेले दिसते. त्यातही बर्‍याच ठिकाणी विचार कलावंतांचे तर शब्दांकन कोणा पत्रकार अथवा साहित्याशी संबंधीत माणसाचे असा प्रवाद आढळतो.


सलीलदादांच्या लिखाणाचे सर्वात पहिले आणि ठळक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व लेख ते स्वतः लिहीत आहेत. या विचारधनावर नजर टाकताच लक्षात येते ते सलीलदादांचे मराठी भाषेवरचे वाखाणण्याजोगे प्रभुत्व. बारावीच्या परीक्षेत मराठी भाषेत बोर्डात सर्वाधीक गुण मिळवणार्‍या या मनस्वी कलाकाराला साहित्य, संस्कृतीच्या डोहात बरेच काळपर्यंत सुस्नात होण्याची संधी मिळाली. पु.ल, शांताबाईंपासून ते संदीप खरेसारख्या शब्दसम्राटांचा अत्यंत निकट सहवास लाभल्याने त्यांचे साहित्यीक अंग हे एका वेगळ्या मार्गाने घडत राहिले. सलीलदादांच वाचन अफाट. त्यांचं मराठी अभिजात साहित्यावर विलक्षण प्रेम. निसर्गाने त्यांना अमोघ स्मरणशक्ती आणि हेवा वाटाव्या अश्या सृजनशीलतेचं वरदान दिलेलं आहे. या सर्वांच प्रतिबिंब ’म्युझिकली युवर्स’ मध्ये पडत राहते.


कमालीची संवेदनशीलता हा सलीलदादांच्या अभिव्यक्तीचा अगदी स्थायीभाव. तो त्यांच्या लिखाणात न दिसेल तरच नवल. संगीतकार हा सूरांबरोबर एका अपार्थिव सृष्टीत रमतो असे म्हणतात. तसे तिकडे गुंतत असताना त्याच्यातला कवि,लेखक, ललितकार हा सदैव जागा रहावा हा एक चमत्कार असतो. सलीलदादांच्या मनाच्या एका कोपर्‍यात ही मिणमिणती वाक्‍-ज्योत कायम असणार. रोज आजूबाजूला घडणारे प्रसंग असोत की गीतामधल्या श्रुतींबरोबर केलेला विलास, त्यांचे मन एकेक गोष्ट टीपत असणार. हेच जमा झालेलं मौलिक शब्दसौंदर्य ते आता रिते करू पाहत आहेत. आणि आत्मानुभुतीचे बोल हे कायम निरागस, प्राजंळ आणि जवळचे वाटतातचं !!

अतिशय वेगळी पण प्रभावी शैली, अनाठायी बोजड शब्दांचा वापर नसलेली प्रवाही भाषा, कधी संवादरूपाने तर कधी दुसर्‍यांची अवतरणे देऊन विचार मांडण्याची सुलभ पद्धत आणि त्याचबरोबर वाचकांच्या थेट काळजाला हात घालण्याची भावगर्भता... सलीलदादांचे लेखन हे लौकीक ललिताच्या मापदंडाला केंव्हाच भेदून जनमानसाची नस बरोबर पकडते. हे वेगळेपण त्यामध्ये राखलेल्या दर्जामुळे सतत वाचनीय राहिले आहे. मी तर सलीलदादांच्या मराठी लिहीण्याच्या या धाटणीला ’मुक्तछंदातील गेयता’ असे विशेषण केंव्हाच बहाल केले आहे.


या स्तंभामध्ये त्यांनी सगळ्यात प्रथम लिहीली ’अर्पण पत्रिका.

इतकी सहज, सुंदर पण अंतरंग अर्पणपत्रिका वाचतानाच लेखकाच्या रूजूतेविषयी खात्री पटते.

दुसरा लेख होता ’दमलेल्या बाबाची कहाणी. तमाम मराठीविश्वाचे काळीज हलवून टाकणार्‍या या माईलस्टोन गीताविषयीचे आणि त्यातील अंतरंग मुद्द्याविषयीचे त्यांचे विवेचन हे एखाद्या कसलेल्या लेखकाला लाजवणारे आहे.

’कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो’ हा लेख खसखस पिकवणार्‍या नर्मविनोदी पण काहीश्या उपरोधीक शैलीत चिमटे काढून जातो. तत्वाला प्रमाणाबाहेर कवटाळून बसण्याच्या वृत्तींची उदाहरणे गंमतशीर पद्धतीने मांडत असतानाच इथे तुमच्या आमच्या रोजच्या जीवनात आढळणार्‍या विसंगतींवर बरोबर बोट ठेवण्यात आले आहे.

’एक होत्या शांताबाई’ हे व्यक्तिचित्रण असे काही रेखाटले गेले आहे की बस्स. खरं तर शांताबाई शेळके म्हणजे कलेचे माहेरघर. काव्याचं, भाषेचं एक चालतंबोलतं विद्यापीठ. त्यांच्या शब्दांनी रसिकांना, श्रोत्यांना अनेकदा सचैल स्नान घातले आहे. त्यांच्या कवितांचं गारूड मराठीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या मनी आहेच. पण सलीलदादांनी ’शांता शेळके’ या विस्मयजनक कलावंताचे इतर अनेक पदर मोठ्या खुबीने उलगडून दाखवले. या थोर कवयित्रीवर प्रेम करणार्‍या प्रत्येक मनाने अगदी जीवाभावाने वाचावा असा हा लेख.

नुकताच प्रकाशित झालेला त्यांचा ’नातलग’ या मालिकेतला जणू कळस ठरावा. इतके भावुक लिखाण पण त्यातला आक्रोश किंवा भळभळणारी जखम टाळून करणे भल्याभल्यांना देखील जमत नाही. या बाबतीत संगीतकार-कम-लेखक सलील कुलकर्णी प्रस्थापित लेखकांपेक्षा कितीतरी उजवे ठरतात. वाचकांच्या अंतःकरणाला गलबलून टाकत असताना सलीलदादांनी भाषेच्या हळुवारपणाची मदत घेतलेली आहे. मुळात ही शैली फारच अभिनव. छोट्या छोट्या प्रसंगाचे तुकडे एखाद्या कोलाजसारखे जोडत जोडत त्याच्याखाली अनुस्यूत असणारी भावविभोरता हे ’नातलग’चे प्रधान सूत्र. अवास्तव भावनातिरेक नाही, ओढूनताणून आणलेले गांभीर्य नाही, विदारक सत्य दाखवण्याच्या नावाखाली मांडण्यात येणारा दुःखांचा पसारा नाही. काहीच नाही. तरीही आपल्या मितभाषी कथनातून सलीलदादा चटका लावून जाणारे विचार बोलत राहतात. हे असं कमीत कमी शब्दात किंवा त्यातलं नाट्य टाळून भावना पोहोचवणं कसं काय जमतं कोणास ठाऊक? हा लेख प्रत्येक संवेदनशील माणसाने न चुकता वाचावा असाच आहे.


हे सदर ’लोकसत्ता’ मध्ये सुरू होऊन आत्ता कुठे अडीच महिने झाले. जेमतेम पाच लेख प्रकाशित झाले असतील. पण त्यातून डॉ.सलील कुलकर्णी यांची ताकद वाचकांच्या लक्षात आल्याखेरीज रहात नाही. सदराचं नावही किती समर्पक आहे - ’म्युझिकली युवर्स’. रसिकांच्या सेवेसाठी अथवा आनंदासाठी महिन्यातून दोनदा आपल्या भेटीस येणारा हा स्तंभ ललितलेखनातील एक मैलाचा दगड बनावा.

मनात उमटणार्‍या हिंदोळ्यांचे पडसाद अक्षरांमधून व्यक्त करत करत ही ’सलीलगाथा’ कधी मन तृप्त करत आहे तर कधी अंतर्मुख करून विचार करावयास भाग पाडते आहे. वाचक समरस होण्यामध्ये लेखनाची सार्थकता असते. सलीलदादांच्या लेखनाने हा परीणाम विनासायास साधला जात आहे असे मला वाटते.

या निमित्ताने मराठी साहित्यसृष्टीला एक थोर संगीतकाराची नव्याने ओळख होते आहे. त्याच्या शब्दाच्या हुकुमतीबरोबरच विषयवैविध्य आणि डोळे उघडे ठेवून जगात विहार करणार्‍या कलाकाराचा आत्मा या लेखांच्या रूपाने आपल्या सर्वांना अनुभवायला मिळत आहे, हे आपले भाग्यचं !!

(टीप - सदरहू लेख ऑनलाईन वाचण्याकरीता त्या त्या नावांवर टिचकी मारा.)