Monday, February 15, 2010

Happy Birthday, शमिका भिडे


एकदा प्रातःसमयी तुझे सूर पडले कानी,
’हे श्यामसुंदर राजसा’ म्हणत पुकारलंस त्या घनश्यामाला,
इकडे भक्तीनं भरून वाहत होतं माझं मन..
शिगोशीग भरलेली आर्तता अन् ईश्वराचं प्रेम...
भरपूर काही शिकवून गेलीस त्या दिवशी मला,

एकदा माध्यान्हीला तुला ऐकलं,
आणि तो गोड आवाज ऐकत हरवून गेलो परत,
’तू जीवनगाणे गावे, मी स्वरात चिंब भिजावे’
हा गान-वर्षाव करत राहिलीस मन धुंद करत करत,

एकदा एका केशरी संध्याकाळी,
तुझे स्वर उमटले होते दूरवर कुठूनतरी,
’कधी सांजवेळी, मला आठवूनी’
उडाली भुर्रकन पाखरं स्मृतींची
तुझे प्रभावी बोल... जागवून गेले जाणीव सरल्या ऋतूंची,

एकदा गूढ काळ्याशार रात्री,
निस्पंद रानातून फिरताना,
आठवली तुझी भावपुर्ण कविता....
’चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा’
गुणगुणताना भरून आलेला कंठ,
तू साकारलेले आलाप आठवता

एकदा मेघसरींनी नखशिखांत भिजताना,
आळवले तुझेच अवीट गोडीचे गीत,
’श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीमधारा’
थेंबाथेंबातून, पानापानातून तुझ्या मनोहर स्वरमाधुर्याने
ओल्या सृष्टीचा होऊन गेला ’मल्हार’ सारा,

तू दिलेल्या भेटी आहेतच अश्या दीर्घकाळ स्मरणार्‍या’,
अंतरात बहरवलेले आमोदाचे तुषार
आणि ओठांवर आणलेल्या रचना बहारदार,
रसिकांना दिलेलं अपार श्रवणसुख...
आणि तुझ्या गाण्यानं हलकेच उभं केलेलं स्वप्नातलं विश्व,

शमिका, तू गावंस आणि गात रहावंस,
शमिका, तू गावंस आणि गात रहावंस,
छेडत रहावास तोच धैवत, रिषभ आणि गंधार...
तुला ऐकणार्‍याने मात्र स्वतःला पुर्ण विसरून जावं
आणि रहावा एक तुझाच स्वराकार.....
रहावा एक तुझाच स्वराकार.....
*******************************************************************

नमस्कार,
आज वाढदिवसानिमित्त मी शमिकाला फोन करून शुभेच्छा दिल्या. तिच्या सर्व चाहत्यांच्या वतीने तिचे अभीष्टचिंतन केलं. वर लिहीलेली छोटीशी कविता ऐकविली.
शमिकाने नेहमीच्याच नम्र व गोड शैलीत सर्व चाहत्यांचे, पाठीराख्यांचे, सुयश चिंतणार्‍यांचे आभार मानले. तिच्याच शब्दात सांगायचे तर - "माझे गायन आवडणार्‍या आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणार्‍या सर्व रसिकांना धन्यवाद. तुमचे आशिर्वाद आणि प्रेम मला माझ्या पुढच्या वाटचालीसाठी असेच अखंड मिळत राहो. वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल thank you...thank you आणि thank you.....आपली शमिका"