Wednesday, February 10, 2010

'तो' आणि त्याचं क्षितीज

एका आळसटलेल्या सकाळी तो उठतो
(इतरही उठतातच की),
जुन्या झरोक्यातून येणार्‍या किरणांना चुकवत चुकवत
त्याला पहायची असतात वसंतातली उन्हं,
स्वतःचेच हुंकार ऐकू जातील इतपत मौनपणे
तो टाळतो आपल्या भविष्याचा विचार,
(जणू वाळूत तोंड खुपसून बसलेला शहामृगचं)
त्याला आकडेवारी करायची असते
आणि मांडायचे असतात वारेमाप हिशोब –
प्राक्तनातल्या लाटांचे...
अपुर्‍या राहिलेल्या कथांचे.....
पडलेल्या गोंडस स्वप्नांचे.....
रानभरीचं देणं कधीच पाहिलेलं नसतं त्याने,
आवंढे गिळायचे कधी आणि उसासे सोडायचे कधी
त्याला पडतात नेहमीचेच सतावणारे प्रश्न,
(याची उत्तरे मात्र शोधत नाही तो!!)
गर्दीत हरवून जात असताना
तो पकडायचा प्रयत्न करतो सोनपाखरांची फडफड,
कानात भुणभुणणारा नाद
कायमंच अनोळखी वाटत आलाय त्याला,
(दग्ध दुपार नी कातर संध्या... कश्याचं कश्याचं कौतुक नाही)
स्थळ, काळ, वेळ यांच्या सीमा भेदत
चालू ठेवलाय गूढ नक्षत्रांकडचा प्रवास,

त्याला फार म्हणजे फार आश्चर्य वाटतं –
जेंव्हा दिसतात पोलादी निश्चयाची माणसं....
जेंव्हा हसतात आपल्याच सुखात निमग्न माणसं....
जेंव्हा बोलतात एकदम भरभरून माणसं –
चंद्राच्या कलांबद्दल, मनातल्या फुलाबद्दल आणि तुटलेल्या ’दिला’बद्दल...
(त्याला मात्र दुसर्‍याच्या डोळ्यात बघायचीही भिती!)

इतरांसारखा तोही जोडतो आपले हात
भरून मात्र कधी येत नाहीत डोळे,
क्षणक्षण वेचत, कर्तव्य वगैरेंच्या गप्पा मारत
असंच पुढे सरकत रहायचं....
भावकोडग्या लोकांमध्ये गुदमरतो त्याचाही श्वास,
(इलाज नाही काही, जोपर्यंत मिळत नाही
त्याच्या कवितेला एखाद्या वेड्या बकुळाची फांदी..)

मोठ्या आशेनी रोज मोजायला जातो तो
आपल्या चिमुकल्या क्षितीजाला,
वेड्यावाकड्या रंगांच्या भुलवणार्‍या छाया
पंचमहाभूतांची ही भंगुर काया
नेहमीच अपुरी पडणार असते अथांग आकाशाला कवेत घ्यायला,
दिस येतो आणि दिस जातो,
पापण्यांच्या फटीतून दिसणारं क्षितीज
कधीच कळणार नसतं त्याला.....