Thursday, February 4, 2010

गोविंदाय नमो नमः

पूर्वरंग –
गरम गरम व्हेज स्प्रिंग क्लीअर सूप, चीजने ओतप्रोत भरलेला वाफाळलेला गुबगुबीत पराठा, लाल रंगाची जराही छटा नसलेले चविष्ट छोले, तुळस आणि पुदिन्याच्या पानांची पेस्ट घालून केलेले ग्रीक सॅलड, घास घ्यायच्या आधीच दरवळलेल्या सुवासाने तृप्त करणारी पिवळीधमक बिर्याणी.... अहाहाहाहा... आणि हे सर्व मुंबईच्या बाबुलनाथ सारख्या गजबजलेल्या मध्यवस्तीत !!!!!

रविवारी काही खाजगी कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. दुपारी क्षुधाशांतीसाठी कुठे जायचे याचा विचार करत असतानाच माझा मित्र सौरभ याने गिरगावच्या इस्कॉन मंदीराशेजारी असणार्‍या ’गोविंदा’ उपाहारगृहाविषयी सांगितले. पाउले नकळत तिकडे वळली.
काय वर्णावा तो अनुभव? अतिशय सात्विक पण आपले जिव्हालौलव्य पुरेपुर पुरवणार्‍या या ठिकाणी प्रत्येक खवय्याने एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
(महेंद्र कुलकर्णींकडून प्रेरणा घेऊन मीदेखील मनात भरलेल्या खाण्याच्या जागांवर लेख लिहायचे ठरवले आहे. त्यासाठी आवश्यक म्हणून खाद्यपदार्थांचे काही फोटोही काढले. अर्थात त्यांच्याइतकं चांगलं लिहीता येत नसल्याने (आणि त्यांच्याइतका भारी मोबाईल-कम-कॅमेरा माझ्याकडे नसल्याने) खाद्यप्रेमी जनतेने हे वर्णन जस्सं जमलय तस्सं गोड मानून घ्यावं.)
गोविंदात गेल्यागेल्या सर्वप्रथम नजरेत पटकन भरणारी गोष्ट म्हणजे इथलं अतिशय प्रसन्न, शांत आणि स्वच्छ वातावरण. गेल्यागेल्याच सात्विकतेचा फील देणार्‍या या रेस्टॉरंटमध्ये काम करणारे वेटरपासून मॅनेजरपर्यंत सर्व कर्मचारी सदैव हसतमुख, शांत, सेवेसाठी तत्पर असे दिसले. जुन्याकाळच्या इंग्लिश कॅप आणि एप्रन घातलेले वेटर सराईतपणे खाद्यपदार्थांची ने-आण करत होते.
कुठेही गोंधळ नाही. गलबला नाही. चारही भिंतींवर कृष्णचरीत्रातले विवीध प्रसंग कथन करणारी मनोहर पेंटींग्स लावलेली आहेत. प्रत्येक टेबलवर डिशेससाठी कागदी कव्हर आणि खुर्च्या एकदम आरामदायक.
’गोविंदा’चं सगळ्यात मोठं वेगळेपण म्हणजे इथे कुठल्याही पदार्थात कांदालसूण नसतो. कांदा-लसूण असेल तरंच खाणं लज्जतदार या आपल्या समजूतीला व्यवस्थित छेद देण्याचं काम इथं अगदी पहिल्या घासापासून सुरू होतं.
सुरूवातीला आपण पाहतो ते नीटनेटक छोटेखानी मेनु कार्ड. ही पुस्तिका रीसायकल्ड कागदापासून तयार केलेली आहे. मुखपृष्ठावरचा मजकूर या रेस्टॉरंटमागील प्रेरणा आणि एकदंरीत मिळणार्‍या सेवेच्या धाटणीविषयी बरेच काही बोलून जातो. दुसरं म्हणजे टेबलवरील प्रत्येकाला स्वतंत्रपणे मेन्यु कार्ड दिलं जातं आणि ते शेवटपर्यंत आपल्याच टेबलवर असतं. बाकी हॉटेलात असते तशी ’कधी एकदा याच्याकडून कार्ड काढून घेऊन गल्ल्यावर परत नेऊन ठेवतो’ ही घाई मला इथे दिसली नाही.
स्टार्टरमध्ये अनेक प्रकार होते. पण आम्ही आमच्या मेजवानीची सुरूवार मसाला पापड आणि सूप ने करायची ठरवली. मंद संगीत चालू होतं. कृष्णभक्तीवरचे सुरेल अभंग वातावरणातील पावित्र्य द्विगुणित करत होते. ग्राहकांमध्ये परदेशी पाहुण्यांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळेच की काय इकडे साऊथ इंडीयन स्नॅकपासून ते पास्टा, पिझ्झापर्यंत आणि चाट, पाणीपुरी, पावभाजीपासून ते चायनीजपर्यंत सगळं काही मिळतं......
रोस्टेड मसाला पापडाचं आगमन झालं. स्वच्छ, ताजा पापड आणि वर भुरभुरलेला टोमॅटो, काकडी, कोथिंबिर आणि स्वादिष्ट शेव. हलकेच काळ्या मिरीचा शिडकावा केला. सोबतीला व्हेज स्प्रिंग क्लीअर सूप आलं. गरमगरम सूपात अलगद तरंगणारे कोबी, गाजर, घेवडा, पुदीना आणी इतर भाज्यांचे तुकडे जिभेला आव्हान देऊ लागले. भुरके मारून मारून हे द्रव्य आकंठ प्राशन केल्यावर जिभेपासून घश्याच्या शेवटच्या टोकापर्यंत एक उब निर्माण झाली.
माझ्या कट्टर सॅलडभक्तीला जागून मी ’ग्रीक सॅलड’ ऑर्डर केले होते. एका मोठाल्या तबकामध्ये अनेक पदार्थांची रेलचेल असलेले ग्रीक सॅलेड आमच्या पुढ्यात एखाद्या राजकन्येने रथातून वनात उतरावे तसे अवतरले. काही वेळ नुसतं बघतंच राहिलो.
मध्यभागी काकडी, टोमॅटो हे नेहमीचे शिलेदार तर त्यांना बिलगून लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगातील माझ्या अत्यंत लाडक्या सिमला मिरचीचे तुकडे.
पुदीन्याची पाने व कोबीच्या किसाचा सढळ हाताने वापर केलेला. त्याच्या सौंदर्यावर मोहीत होण्यात फार वेळ न घालवता आम्ही तुटून पडलो. पहिला घास तोंडात टाकला अन् आत्यंतिक सुख काय असतं याची चुणुक मिळाली. तुलशीच्या बीया अथवा तुलसपत्रांच्या रसामुळे निर्माण झालेली बहारदार चव आणि त्याला पुदीन्याच्या आंबट चटणीचा साज. क्या बात है !! जीभेवर अंमळ रेंगाळून उदरगुहेत प्रवेश करणार्‍या प्रत्येक तुकड्याबरोबर अंतरामध्ये ’खाऊ-बिहाग’ झंकारू लागला.
आम्ही पराठ्याचे तीन वेगवेगळे प्रकार मागवले होते. क्लासिक म्हणून गणला जाणारा मेथी पराठा. सर्वकाळ, सर्वक्षेत्री खादकांच्या पसंतीस उतरणारा आलू-पनीर आणि इथली स्पेशालिटी म्हणून किंवा काहीतरी वेगळे खायचे म्हणून मागवलेला ’चीझ’ पराठा. पराठ्यासोबत छोले, दहीरायता आणि लोणचे मिळणार होते.
वाफाळलेल्या पराठ्याने येतानाच अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. पराठ्याची जाडी आणि घेर लक्षणीय होता. सलामीच्या फलंदाजाने ४० चेंडूत ४० धावा काढाव्यात तसं मेथी पराठ्याने फारशी तोडफोड न करता जमेल तितकं क्षुधाशमनाचं काम इमानेइतबारे बजावलं.
आलू-पनीर मोठ्या डौलात आमच्या प्लेटमध्ये आला. अंगप्रत्यंगातून वाफा ओकणारा बटाटा पनीरबरोबर बेमालूमपणे मिसळून गेला होता. मला आलू पराठा हा नेहमीच ज्याच्या खांद्यावर आपण निश्चिंतपणे डोकं ठेवू शकू अश्या एखाद्या भरवश्याच्या मित्रासारखा वाटतो. त्यातला सुदृढ बांध्याचा एखादा घास तोंडात टाकल्यावर पिठुळलेला बटाटा अस्ताव्यस्त पसरून मुखामध्ये कार्बोहायड्रेटस्‌‍चा जो एक लगदा तयार होतो, त्याची सर दुसर्‍या कश्याला नाही.
पराठ्यांना इतर पदार्थांची सुरेख साथसंगत लाभत होती. एखाद्या तितक्याश्या सुंदर न दिसणार्‍या मुलीशी आपली ओळख वाढून तिच्या स्वभावाचे अनेक उत्तमोत्तम पैलू आपल्याला माहित व्हावेत तसे प्रत्येक घासागणिक छोल्याची खुमारी वाढू लागली होती. प्रारंभी त्याच्या बाह्यरूपाकडे पाहून नाक मुरडलेला मी ’काय भुललासी वरिलीया रंगा’ म्हणत छोल्यात मनसोक्त सूर मारत होतो.
दही रायता रूपाने, चवीने आणि मात्रेने फारंच समाधानकारक होता. बाकीच्या हॉटेलमध्ये दह्यामध्ये जाणीवपूर्वक ठेवलेल्या आंबटपणाला फाटा देऊन ताज्या गोड दह्यात केलेली ही कोशिंबीर केवळ अवर्णनीय होती.
ज्याची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो तो पराठ्यांचा राजा, ’चीझ’ पराठा आमच्या टेबलावर थोडा उशीरानेच दाखल झाला. पण पाहताक्षणीच ’आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे’ असं दिल खुश करून टाकणारा स्पंद निर्माण करून गेला.
हॉलिवूडपटात दाखवतात त्या उसळणार्‍या लाव्हारसाप्रमाणे पराठ्याच्या चारी बाजूंनी पघळलेले चीझ बाहेर ओसंडत होते. पराठ्याच्या वरच्या पापुद्र्याने मोठ्या कष्टाने अडवून ठेवलेले ते चीज मी त्याला तोंडात टाकताच चौखुर उधळले. टाळूला आणि जीभेला होणारा त्याचा मृदूमुलायम स्पर्श अंगावर गोड शहारा आणून गेला. कधी दातांशी लडीवाळपणे खेळत तर कधी छोल्यातल्या वाटाण्यांना हुलकावणी देत, चीझ पराठ्याचा अनिर्बंध संचार चालू होता.
मी गुणगुणू लागलो...’ये चीज बडी है मस्त...मस्त’
पराठ्याचे उरलेले कण चाटून पुसून साफ केल्यानंतर अस्सल पुणेरी मध्यमवर्गीय बाण्याने आम्ही जेवणाच्या शेवटी ’भात-पात’ करायचे ठरवले. जे अढळ स्थान गाण्याच्या कार्यक्रमात लावणी किंवा लोकसंगीताचं तेच भातामध्ये बिर्याणीचं... शिवाय अश्या धार्मिक रेस्टॉरंटमधल्या बिर्याणीला जरा चाखून तरी बघावं अशी अनिवार इच्छा आम्हाला तिघांनाही झाली.
काही क्षणातचं वेटरने सूर्यफुलाशी स्पर्धा करेल अश्या पिवळ्याधमक रंगात न्हालेली चटपटीत बिर्याणी आमच्या पुढ्यात आणून ठेवली. ’तोंडाला पाणी सुटणे’ या क्रियापदाचा अर्थ नव्याने कळाला. मसाल्याच्या खमंग वासाने आमच्याबरोबरचं आजूबाजूला बसलेल्या इतर गिर्‍हाईकांचंही चित्त चलीत करून टाकलं. काहीशी ओलसर पण अत्यंत स्वादीष्ट अश्या बिर्याणीचा फडशा पडायला अजिबात वेळ लागला नाही. प्लेटच्या तळाशी चिकटलेले काही कण आम्ही चाटूनपुसून साफ करत असतानाच वेटर अजून काही हवे का म्हणून विचारत आला. डेझर्ट शिवाय जेवणाची परिपुर्ती शक्य आहे का? जशी मैफीलीची सांगता भैरवीनेचं व्ह्यावयाची त्याप्रमाणे रंगलेल्या भोजनाचा शेवटचा अनिवार्य टप्पा म्हणजे स्वीटडिश. थोडासा विचारविनिमय करून समाप्तीचा मान ’सीताफळ आईसक्रीम’ डबल स्कूपला द्यायचा ठरवला. एकावर एक विराजमान झालेले दोन गलेलठ्ठ गोळे आमच्या ताटात येऊन पडले.
सीताफळाची सुमधूर चव असलेलं हे नितांतसुंदर आईसक्रीम जीभेवर पडताच विरघळू लागलं. आता काही बोलणेही मुश्कील होऊ लागले होते. आईसक्रीमचा मनमुराद आनंद लुटल्यावर आम्ही मोठ्या तृप्त मनाने उठलो.

उपसंहार –
अखिल मानवजातीचा प्रवास हा जीभेपासून पोटापर्यंत सतत चालू आहे. अश्या प्रवासात ’गोविंदा’सारखे विसावे मिळाले की तनमनाची शांती होऊन जाते. इथले दरही फार जास्ती नाहीत आणि मिळणार्‍या पदार्थांची यादी मात्र आश्चर्य वाटावं एवढी मोठी आहे. रोजच्या जेवणापेक्षा काही वेगळं खायचं असेल अथवा निराळ्या चवीचं पण अत्यंत उत्कृष्ट भोजन अनुभवायचं असेल तर आपण गिरगाव चौपाटीच्या जवळ असलेल्या या ’गोविंदाज रेस्टॉरंट’ ला एकदातरी भेट द्याचं !!!