Friday, January 8, 2010

निद्राराणी Revisited........

चॉकलेटी ठिपका हळूहळू मोठा होऊ लागला.........
पाठीमागचा पिवळा रंगही आता दिसू लागला..........
मोठ्या कष्टाने मी डोळे थोडेसे उघडून किलकिले केले. इंद्रियांची संवेदना आता यायला लागली होती. आमरसाचे तुडुंब जेवण झाल्यानंतरची ही माझी वामकुक्षी चालू होती. (म्हणजे खरं सांगायचं तर मागचा बराच काळ चालू(च) होती......)
तो ठिपका म्हणजे पंख्याचा मधला गोल होता आणी पाठीमागचा क्रीम कलर हे आमच्या बेडरूमचे सीलींग होते !!!

दुपारची झोप हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. तसे म्हटले तर ’झोप’ हाच माझा अत्यंत आवडता विषय. मी जेंव्हा इतर काही काम करत नसतो तेंव्हा पेंगत असतो आणि खंडाळयाच्या घाटातून जशी रेल्वे एका बोगद्यातून बाहेर पडून दुसर्‍या बोगद्यात जाताना थोडासा बाहेरचा प्रकाश दिसतो तसे दोन झोपांच्या मध्ये मी थोडा(च) वेळ जागा असतो:)
मला कळायल्या लागायच्या आधीपासून माझी निद्रादेवीशी खूप घट्ट मैत्री जुळली. (कधी कधी हे मैत्र शत्रूत्वात परिवर्तीत होण्याइतके घोर प्रसंग या झोपाळूपणामुळे माझ्यावर ओढवले, पण ‘with all thy faults, we love thee’ या चालीवर मी लगेच परत तिच्याशी सख्यं प्रस्थापित केलं :-) :-)

अगदी लहानपणी मी अठरा अठरा तास झोपत असे म्हणे (बाळपणीचा काळ सुखाचा.....). ’आज खेळून दमलो’ ’आज सुट्टी आहे’ ’आज बरे वाटत नाही’ ’आज खूप बोर झाले’ अशी कुठलीही कारणे मला दीर्घ झोपेसाठी चालायची. झोप यायची माझी हमखास अचूक जागा म्हणजे अभ्यास. पुस्तक समोर धरले की ती निद्रादेवी कुठून जाणे पण समोर अवतरायची. डोळे जड व्हायला लागायचे. वाचल्या जाण्यार्‍या एकेका वाक्याबरोबर तिचा लडीवाळपणा वाढायला लागायचा. विशेषतः मराठी व्याकरण, भूमितीतील प्रमेये, जीवशास्त्रातील जीवघेणे भाग, भूगोलातील खंडनिर्मिती वगैरे माझ्या डुलकी येण्याच्या ठरलेल्या जागा. (गंमत म्हणजे परिक्षा संपून सुट्ट्या लागल्या की पहिले दोन दिवस डोळा अजिबात लागायचा नाही..... एवढे असूनही आपल्याला एवढे जोरदार मार्क कसे पडायचे हे कोडे मला आजतागायत कधीही उलगडले नाही :P :P)

लहानपणापासून का कोणास ठाउक मला आंघोळ केल्यानंतर प्रचंड झोप येते. त्यातून ती आंघोळ गरम पाण्याची असेल तर मग काय विचारूच नका !! अश्या स्नानानंतर मला कित्येकदा ऑफिस बुडवून गादीवर पडावेसे वाटले आहे. (स्वधर्म सोडून इतर गोष्टींचा मोह काय फक्त अर्जुनालाच होतो की काय?)

वर्गात तास चालू असता अथवा ऑफिसमध्ये एखादे प्रेझेंटेशन चालू असताना ज्याला आयुष्यात एकदाही डुलकी आली नाही अश्या महाभागाची ’ससून’ मध्ये नेऊन पूर्ण शारिरीक आणी मानसिक तपासणी करायला हवी. त्याच्या निरोगीपणाबद्दल (आणि जीवंत असण्याबद्दल) शंका घेण्यास फुल्ल वाव आहे.
समोर वक्ता बोलतोय आणि आपल्या पापण्या अचानक जड व्हायला लागतात, मोठ्या कष्टाने तोंड घट्ट मिटून आतच गिळलेली जांभई उलटी फिरून हातपाय बधीर करायला लागते, शरीर कधी पिसासारखं हलकं तर कधी काष्ठवत तटस्थ भासायला लागतं, वक्त्याचे शब्द कुठूनतरी दूरवरून येत असल्यासारखे मंद मंद ऐकू यायला लागतात, डोळ्यापुढची काळोखी गुहा अक्राळविक्राळ होत आपल्याला विळखा घालते ....डूर ....डूर....सूं.....सूं.......तेवढ्यात एखाद्या प्रश्नाने किंवा आपलाच तोल जाऊन आपण जागे होतो. पण ते दहापंधरा सेकंद जी सुखद अनुभूती देऊन जातात तशी लाखो रुपये देऊनही मिळणार नाही. (एकदा असेच एक व्याख्यान पूर्ण जागे राहून ऐकायचे अशी पैज माझ्याबरोबर मित्रांनी लावली होती. पैश्याचा आणि इभ्रतीचा प्रश्न असल्याने अस्मादीक जय्यत तयारी करून म्हणजे तोंडावर गार पाण्याचे हबकारे मारून, कडक कॉफी पिउन, दोन च्युईंगम चघळत ठेवून, आसनाला पाठ न टेकवता अगदी काटकोनात बसले. पण हाय रे देवा, ’वित्तिय तूट व चलनफुगवटा दूर करण्याच्या उपायांचा तौलनीक अभ्यास’ या प्रस्तावनेतचं मी गारद झालो व ब्रम्हानंदी टाळी लागून गेली. केन्सच्या या अर्थशास्त्रामुळे माझ्या पाकिटातील ’अर्थाचा’ अनर्थ झाला. तेंव्हापासून मी असल्या पैजा लावणेच सोडून दिले :D :D)

माझ्या बाबत घडणारी अजून एक गोष्ट म्हणजे कोणत्याही हलत्या वाहनात बसलं आणि प्रवास सुरू झाला की मला डोळे उघडे ठेवणे महामुश्कील होऊन जातं. ’चालत्या गाडीत असं होण्याचा संबंध हा लहानपणी पाळण्याला मिळणार्‍या झोक्याच्या लयीशी आहे’ असं गंभीर मत एकाकडून मी (बंद डोळ्यांनी) ऐकलेलं आहे !!! विशेषतः बाहेर रणरणतं उन असताना गाडीच्या काचा बंद करून, ए.सी. लावून, त्या गुबगुबीत सीटवर मान किंचितसी कलंडल्यावर जी डुलकी लागते ना तिला तोड नाही. (अर्थात हा उपक्रम आपण गाडी चालवत नसताना करावा. :P)

रात्रीची झोप ही खुप आवश्यक आणि उपयोगी असली तरी दुपारची झोप ती दुपारची झोप. तिचा रंग आगळाच. रात्रीची झोप ही जर घरंदाज, शालीन, आरस्पानी सौंदर्य असेल तर दुपारची नॅप म्हणजे अवखळ, खट्याळ, धुंद करणारा वेगवान प्रीतिकंद. आपल्याला काय, दोन्हीही तितकेच प्रिय ;-) ;-) दुपारच्या झोपेला भरपेट जेवलेलं असणं ही जशी प्रमुख अट आहे तसेच खोलीत थोडासा अंधार असणे व वातावरणात किंचित गारवा असणं (मग तो कृत्रिम का असेना) या दोन उपअटींनी तिची लज्जत, खुमारी आणखी वाढते. नीट पाठीवर आडवं पडून, हातपाय सैल करून, विश्वाची चिंता पूर्णपणे सोडून देउन या वामकुक्षीच्या डोहात उतरण्याचा अनुभव काही औरच. तो ज्याचा त्याने घ्यावा.

आजारपणात येणार्‍या झोपेला ’झोप’ म्हणणे म्हणजे गूळखोबर्‍याला पक्वान्न म्हणण्यासारखं आहे. ती फक्त एक ग्लानी असते. बाकी झोपेची खरी मौज ही ’जागॄती’ ते ’स्वप्न’ किंवा ’जागॄती’ ते ’सुषुप्ती’ या हळूच पण दररोज होणार्‍या नैसर्गिक प्रवासातचं आहे.

मराठी साहित्यविश्वाने या झोपेची म्हणावी तशी दखल घेतली नाही असं आमचं (पेंगुळलेल्या डोळ्यांनी व्यक्त केलेलं) ठाम मत आहे. नाही म्हणायला आद्य कवी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये कित्येक ठिकाणी ’निद्रिस्ताच्या उशी। जैसा सर्प तैसी उर्वशी।’ ’निद्रेही मानु अवसरे।एके दीजे।’ किंवा ’आत्मबोधाचिया वोवरा।पहुडला असे जो।’ असे बरेचसे उल्लेख मोठ्या कौतुकाने आणि खुबीने केलेले आहेत. बाकी मराठीत ’झोपा उडवणार्‍या’ निर्मितीच जास्त :P :P.

झोपेचा सर्वात गूढ किंवा परिशुद्ध प्रकार म्हणजे मॄत्यू.
मॄत्यू म्हणजे महानिद्रा. मॄत्यू म्हणजे महाविसर्जन. जन्मजन्मांचे कष्ट आणि शीण घालवायला जीव गाढ झोपेत जातो ते पुन्हा न उठण्यासाठीचं. किती विलक्षण निद्रा असेल ना ही? बघा ना, अलार्मची कटकट नाही, उठल्यावर जाणवणारी ठसठस नाही, कालचं ओझं नाही, उद्याची चिंता नाही, नाही, काहीच नाही. अस्सल चीरविश्रांती. आता माणूस गेल्याचं दुःख होतं, पण ते इतरांना!! जो जातो त्याला एकदम शांत शांत, परमविश्राम वाटत असणार.... म्हणूनच तर भगवद्‍गीतेने ’शांती निर्वाणपरमाम्’ हा शांतीचा अत्युच्च प्रकार सांगितलेला आहे. एकनाथ महाराजासारख्या संतांनी या मृत्युरूप निद्रेवर पुष्कळ भाष्य केलं आहे. अजून काही महापुरुषांच्या मते तर रोजची झोप म्हणजे छोटासा मृत्यूचं किंवा प्रयाण म्हणजे प्रदीर्घ निद्रा !!!!! (अर्थात त्यातून जागे झाल्यावर एकदम ताजेतवाने होऊन पुढच्या व्यवहाराला सुरुवात करणे हे दोन्हीकडे आहेचं.)
व्यवस्थित जमलं तर ’शवासन’ हे साधकाला कधीतरी विदेहीपणाचा नितांत सुंदर अनुभव देउन जातं. पण का कोणास ठाउक शवासनाला मी झोपेचा उपप्रकार कधीच समजत नाही.

झोपेचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न हजारो वर्षांपासून चालू आहे. संशोधकांनी अल्फा, बीटा, डेल्टा, थीटा इ. अवस्था किंवा आर.ई.एम.,नॉन-आर.ई.एम, डी-सिंक्रोनाईझ्ड स्लीप वगैरे प्रकार शोधून काढले आहेत. पण खरं सांगू? काही गोष्टी या शब्दात सांगण्यापेक्षा अनुभवण्यातचं खरी मज्जा असते.
अंथरूणावर अंग सरळ, मोकळं सोडून द्यावं, बाह्य जगाच्या सर्व जाणिवा विसर्जित करून टाकाव्यात आणि अगदी आनंदाने त्या निद्रादेवीच्या कुशीत खुशाल मिसळून जावं..... बस्सं!!!!!
(एका गुरूतुल्य व्यक्तीमत्वाच्या आग्रहाचा मान राखून पुर्नप्रकाशित...)