Thursday, January 21, 2010

मुग्धा, भगवान श्रीकृष्ण आणि ’घट डोईवर’

(टीप - उर्मिला धनगरने मंगळवारी ’घट डोईवर’ गायलं आणि मला मागच्या वर्षी लिहीलेल्या माझ्या एका लेखाची आठवण आली. ३० डिसेंबर २००८ ला मुग्धा वैशंपायन हे गाणे गायली होती. ०२ जानेवारी २००९ ला मुग्धाच्या सुमधूर आवाजातील ’घट डोईवर’ माझी रिंगटोन बनली. ती जवळपास ११ जानेवारी २०१० लाच मी बदलली. मला प्रत्येक दिवशी कामाचे आणि वैयक्तिक मिळून सरासरी १५ फोन येतात. त्यामुळे ३७४*१०=५६१० वेळा तर मी ते असंच ऐकलंय. शिवाय त्या एपिसोडनंतर या गाण्याने झपाटलं गेल्यामुळे दोनशे ते तीनशे वेळा मी हेडफोनवर लक्ष देऊन आस्वाद घेतला. गेल्या वर्षातले बरेचसे दिवस रात्री झोपी जाण्यापुर्वी एकदातरी मी मुग्धाने गायलेले ’घट डोईवर’ ऐकूनचं झोपी गेलेलो आहे. ह्या सर्वांना गृहीत धरले तर मी या गाण्याचं श्रवणसुख कमीतकमी ६००० वेळा घेतलं असं म्हणायला हरकत नाही. इतकी आकडेवारी देण्याचं कारण म्हणजे या मुग्धागीताने माझ्यावर केलेलं अशक्य गारूड !!! अश्याच एका मंतरलेल्या अवस्थेत मी मार्च २००९ मध्ये हा लेख लिहून काढला. का कोण जाणे, हे सगळंच माझ्या अगदी जीवाभावाचं वाटल्याने त्या वेळी मी तो प्रकाशित केला नाही. काल मात्र त्या गाण्याचं उर्मिला व्हर्जन ऐकल्यावर वाटलं की आपणं लिहिलेलं इथं मांडावंच !!!)

’बहुनि मे व्यतितानी जन्मानि तव चार्जुन । तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥’ असे म्हणणार्‍या पूर्ण पुरूषोत्त्तम भगवान श्रीकृष्णांचे आणि त्यांच्या जीवनाचे सगळ्यांनाच आकर्षण असते. भगवंतांचे रूप, त्यांच्या लीला, त्यांचे गुण, त्यांच्या रासक्रीडेचे प्रातिभ वर्णन, त्यांच्या भगवत्‍स्वरूपाच्या ठिकठिकाणी उमटलेल्या पाउलखुणा अश्या सर्वच गोष्टी मनाला भुरळ घालत राहतात.
मुग्धाने ’घट डोईवर’ म्हणून मला थेट गोकुळात नेलं.
तशी तिची श्रीकृष्णांवरची इतर अनेक गाणी उदा. ’चल उठ रे मुकुंदा’, ’नको वाजवू श्रीहरी’ ’,ऐन दुपारी’, ’वृंदावनी वेणू’ ,’राधा कृष्णावरी भाळली’ ,’श्रीरंगा कमलाकांता’ ,’कंठातच रूतल्या ताना’ ,’वाजवी पावा गोविंद’ ,’राधाधर मधुमिलींद’ वगैरेसुद्धा अतिशय भावगर्भ, सादरीकरणार अत्त्युत्तम च मंत्र’मुग्ध’ करणारीच आहेत.
पण ’घट डोईवर’ मुग्धाने जे म्हटलंय त्याला तोडंच नाही. लतादीदींनी गायलेल्या या गाण्याचं मुग्धाने पार सोनं करून टाकलं. अतिशयोक्तीचा आरोप पत्करून सांगायचं म्हटलं तर मला मूळ गाण्यापेक्षा कितीतरी चांगलं, काळजाला भिडणारं वाटलं. काय गायलंय तिनी हे !!! या गाण्याने माझ्या जीवनात पार उलथापालथ घडवून आणली...
गाणं सुरू होतं...
’घट डोईवर’....
’घट’ शब्दावर मुग्धाने जो हलका जोर दिलाय तो लाजवाब !! इतका गोंडस निषद कधी ऐकला नव्हता.
गोकुळात पाणी भरून निघालेली ही गोपी. तिचा आणि बालमोहन श्रीरंगांचा हा संवाद.
’घट डोईवर, घट कमरेवर’
मुग्धाच्या अगदी सुबक जागा.
या पहिल्याच ओळीत तिने मला मला जिंकून घेतलं... तिचे ते बोल जणू अंतःकरणातच स्त्रवू लागले.
’सोडी पदरा... नंदलाला’
वरच्या नोटस्‌‍मधलं हे मुग्धाचं खुपंच लोभसवाणं आर्जव.
’नंदलाला रे SSSSSSS रे’.
फक्त ही चीज ऐकण्यासाठी मी हे मुग्धागीत शेकडोवेळा ऐकलंय...काय भावस्पर्शी आलंब साकारलाय तिने या ठिकाणी? जाणकारांच्या मते दहाच्या दहा मात्रांना कसली जबरदस्त गवसणी घातलीये मुग्धाने या आलापामध्ये !!!
मुग्धाच्या गोड आवाजातला पुढचा masterpiece…
‘कुणीतरी येईल, अवचित पाहील’ ...
शब्दाची फेक (खरं तर इतक्या नाजूक deliveryला ’फेक’ कसं म्हणायचं?), तालाला वेटोळा एकदम चित्तवेधक.
विशेषतः ’अवचित’ हा उच्चार इतक्या कुसरीने येतो की बस्सं !!!
’जाता जाता आगही लावील’
मुग्धाचा टीपेचा सूर नेहमीच छान लागतो. गोपींच्या मनातील किंतु ती अगदी यथार्ततेने व्यक्त करते.
’सर्व सुखाच्या संसाराला’...
मला हा परमोच्च बिंदू वाटला. इथे येईपर्यंत आपण अगदी तन्मय झालेलो असतो आणि या ओळीत मुग्धा आपल्याला एकदम लक्ष लक्ष चांदण्यांची शीतलता देते. हा गंधार-रिषभाचा combo तिने ज्या gracefully गायलाय ना ते केवळ वेड लावणारं आहे....
मुग्धाने जेंव्हा ’सा रे ग म’च्या एपिसोडमध्ये हे गाणं म्हटलं तेंव्हा हे सौंदर्यस्थळ माझ्या पटकन लक्षात आलं नाही. पण दुसर्‍या दिवशी डाऊनलोड करून मोबाईलवर ऐकलं आणि या शब्दापाशी थबकलोचं. त्यानंतर प्रत्येक वेळी या गाण्यात बुडून जाताना हे ’सुखाच्या’ मनाचा वेध घेउन गेलं...
मुग्धाने केलेला ’खा’चा उच्चार ज्याने अंतरंगात अनुभवला त्यालाच परमानंद काय असतो, सूर-उन्मेष काय असतो, आत हरखून जाणं काय असतं हे कळेल. (गम्मत म्हणजे लताच्या ओरिजिनल गाण्यात ही ओळ अगदी uniform pitch मध्ये आहे. पण आपल्या मुग्धाने त्यावर जे improvisation केलंयं त्याला दाद द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीत.)

एवढ्या लहान वयात तिला सूरांची जी समज आहे ती थक्क करून टाकणारी आहे.
फिरून समेवर येताना ’सर्व सूखाच्या नंदलाला’ नंतर तिने घेतलेला ’नंदलाला’ आणि ’रे’ चा magnificent तुकडा परत एकदा अवाक् करून जातो.
या गाण्याला गेयता आहे, संगीत व चाल उत्तम आहे वगैरे सगळं ठीक आहे. पण मुग्धाच्या exquisite execution मुळे ते अविस्मरणीय बनून गेलं आहे.
मुग्धाची महानता या performance च्या शब्दाशब्दातून व्यक्त होत राहते.
कविला अभिप्रेत आशयघन परीणाम अगदी तस्साच – किंबहुना थोडा अधिकच असा मुग्धाच्या मनोहारी स्वर-कौशल्यामुळे जाणवत राहतो. कृष्णचरीत्रातला प्रीतिकंद काय भरभरून सादर केलायं तिने !!!
ही छोटीशी गान-सम्राज्ञी अलगदपणे आपला हात धरून भगवंतांच्या लीलाचरीत्रात घेऊन जाते.
मुग्धाची ताकद, तिचे अष्टपैलुत्व व तिचा अभ्यास इतर अनेक गीतांमधून वेळोवेळी प्रकट झाले आहेतच, पण या गाण्याने जे नखशिखांत व्यापून टाकले तो निव्वळ विलक्षण दैवी अनुभव !!
वाटतं की काही काही नसावं.... उरावा फक्त जाणिवेच्या पातळीवर मी आणि कानात रूंजी घालत मुग्धाने गायलेलं enchanting ’घट डोईवर’... हा राग तिने आळवत रहावा... आणि एकरूपतेच्या सीमेवर आपण होऊन जावं मुग्धामय... होऊन जावं सच्चिदानंद भगवान श्रीकृष्णमय...
ॐ नमो भगवते वासुदेवाय.... Long Live Mugdha !!!!

ता.क. –
मुग्धाने जरी एकच कडवे गायले असले तरी संपुर्ण गीतचं तसं सुंदर आहे. वाचकांच्या सोयीसाठी ते इथे देतो.

घट डोईवर घट कमरेवर
सोडी पदरा, नंदलाला, नंदलाला रे ॥धृ॥
कुणीतरी येईल, अवचित पाहील,
जाता जाता आग ही लावील,
सर्व सुखाच्या संसाराला, नंदलाला रे, नंदलाला ॥१॥
हलता कलता, घट हिंदळता,
लज्जेवरती पाणी उडता,
नकोच होईन मीच मला रे नंदलाला रे, नंदलाला ॥२॥
केलीस खोडी, पुरे एवढी,
जोवर हसते मनात गोडी,
हसुनी तूही हो बाजूला, नंदलाला रे, नंदलाला ॥३॥

गीतकार – पी. सावळाराम
संगीत – वसंत प्रभू
गायिका – लता मंगेशकर

*************************************************************************************