Thursday, January 28, 2010

अशुद्ध मराठी - २

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे अनेक क्षेत्रांमध्ये मराठीची पार लक्तरं काढली जात आहेत.
अगदी सावरकरी मराठी किंवा १९१२ साली पुणे शहरात बोलली जाणारी मराठी आपण आता बोलावी असा कुणाचाच आग्रह नाही. प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द देणे शक्य नाही आणि व्यावहारीकही नाही हे मान्य. तशी काही आवश्यकताही नाही. व्याकरणातील अचूकता प्रत्येकालाच सांभाळता येईल असे नाही. आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इंग्रजी येणे आवश्यकच नव्हे तर अनिवार्य आहे हेही मला कबूल आहे. पण मराठीत काही लिहीताना अगर छापताना भाषेचा बाज सांभाळायला नको का?

आजच्या लोकसत्तातील क्लिनीक प्लसची जाहिरात पहा. "आणि असंही घडू शकतं की ते अश्या पाच छायाचित्रांच्या पंक्तीतील असेल की जे आम्ही देशभर पोहोचवणार आहोत"... आता असं मराठी आपण कधी बोलतो अथवा लिहीतो का?
कितीतरी आस्थापनांमध्ये मी ’बाहेर पडणेचा मार्ग’ असे वाचले आहे.
’रात्र अजून बाकी आहे, गोष्ट अजून बाकी आहे’ अश्या शब्दशः केलेल्या रूपांतरामुळे मूळ जाहीरातीतील काव्य मारले जाते हे कुणाच्या लक्षातही कसे आले नाही?
आमचे मुंबईस्थित मित्र ’म्हणाला’ च्या ऐवजी ’बोलला’ असे शब्दप्रयोग करायचे तेंव्हा सवयीचा भाग असेल म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो. पण उषा मंगेशकर झी मराठीवर सारेगम मध्ये मान्यवर परीक्षक म्हणून आल्या होत्या तेंव्हा ’व्ही शांताराम बोलले की...’ असे बिनदिक्कतपणे म्हणून गेल्या.
मध्यंतरी एका नावाजलेल्या लेखकाने रविवारच्या पुरवणीत लिहीताना ’इस्पिक एक्क्याला इस्पिकचा एक्का का म्हणू नये?’ अशी म्हण वापरली. 'Why not call spade a spade’ या वाक्प्रचाराचं केवढं हास्यास्पद रूपांतर !!!! मराठीत हाच आशय व्यक्त करणारे कितीतरी चांगलेचांगले शब्दप्रयोग आहेत. पण नाही.
कांचनताई म्हणतात त्याप्रमाणे ही भाषांतराची कामे चांगल्या पद्धतीने मराठी भाषा अवगत असणार्‍यांनाच दिली पाहिजेत. नाहीतर ’दाग अच्छे है’ चं मराठीकरण हे लोक ’डाग चांगले आहेत’ असंच करणार !!!!!!
यावर काहीतरी केलं पाहिजे असं मला सारखं वाटतंय. प्रसारमाध्यमांचा सतत पाठपुरावा करणं हे एकट्यादुकट्याचं काम नोहे. त्याविरूद्ध भाषाशुद्धीसारखी चळवळ उभारता येईल का?

जाता जाता - राशीचक्रवाले शरद उपाध्ये सांगतात त्या किश्श्याप्रमाणे "राजा, माझ्या भांगात कुकु कवा भरणार?" चं इंग्लिश सबटायटल "Raja, When you will fill red powder in my white line?" असं करणार्‍या बहाद्दराला ना मराठी समजली ना इंग्रजी :))