Wednesday, January 27, 2010

अशुद्ध मराठी - १

काल दिवाणखान्यात ऑफिसचे काम करत बसलो होतो. टी.व्ही. चालू होता. झी मराठी असावं बहुधा. ’जॉन्सन ऍंड जॉन्सन’ साबणाची जाहीरात लागली होती.
कानावर शब्द पडले, “परद्यात (पडद्यात नव्हे..) राहू दे, परदा ना उठवू दे” डोकंच फिरलं. काय हे मराठीचे धिंडवडे??
मूळ हिंदी जाहिराती मराठीत आणताना भाषेचे नियम किंवा भाषेचा लहेजा नको का सांभाळायला? “परदा ना उठाओ” चं भाषांतर “परदा ना उठवू दे” असं???
प्रसार माध्यमातून लावली जाणारी मराठीची वाट पाहीली की आजकाल मला भयंकर संताप येतो.
मध्ये एक पुस्तक प्रकाशित झालं. या अतिशय गाजलेल्या हिंदी पुस्तकाचं शीर्षक होतं “मस्त खाओ, स्वस्थ रहो”. मराठीत अनुवाद झाल्यावर पुस्तकाला नाव दिलं गेलं “मस्त खा, स्वस्थ रहा” !!!
हिंदीमध्ये ’स्वस्थ’ चा अर्थ निरोगी असा होतो. पण मराठीतला ’स्वस्थ’ म्हणजे निवांत. ही एवढी मोठी चूक लोकांना कळत नाही.
’कुरकुरे’च्या जाहिरातीतील ’टेढा है, मगर मेरा है’ चं मराठी रूपांतर ’वाकडा आहे पण माझा आहे’ असं करणार्‍या मराठी जाहीरातसंस्थांना काय म्हणावे?
मूळ हिंदी किंवा इंग्रजी शब्दांचे शब्दशः भाषांतर करण्याचा मुर्खपणा आपण लोक अजून किती दिवस करणार आहोत? आशय व्यक्त होईल असे समर्पक शब्द योजले की काम झाले. हास्यास्पद भाषांतराचा अट्टाहास कश्यासाठी?
शिरीष कणेकरांनी कोण्या एका कादंबरीकाराच्या बाबत लिहीलं होतं. हे महाशय इंग्लिश कथांवरून मराठी साहित्य लिहायचे. त्यांचा नायक त्याच्या साहेबाला भेटायला जातो तेंव्हा बाहेरच्या सेक्रेटरीला विचारतो “ साहेब आहेत का? काय करताहेत?” तो उत्तरते “मला भीती वाटते, ते कामात असावेत.” आता साहेब कामात आहेत यामध्ये घाबरण्यासारखं काय? तर हे म्हणजे मूळ इंग्रजी कादंबरीतल्या “I am afraid that he must be busy” चं भ्रष्ट मराठी रूपांतर होते.
मागे पेप्सीची जाहीरात करताना या शुंभांनी ’पेप्सी, हे मन मागतंय मोर’ अशी ओळ लिहीली होती. बहुतेक ती त्या वेळच्या होणार्‍या अभयारण्यातील मोर आणि लांडोरांच्या हत्येविषयी असावी !!!!
अश्या चुका किंवा असला बावळटपणा झी तेलगु किंवा ईटीव्ही, जेमिनी, सूर्या वगैरे दाक्षिणात्य वाहिन्यांवर चालतो का?
ता.क. – काही महिन्यांपुर्वी एका वृत्तपत्रात कोण्या एका फिरकी गोलंदाजाबद्दल लिहीताना पत्रकाराने ’अमुकतमुक हा एक वरच्या खाचेचा फिरकी गोलंदाज असूनही त्याला संघ करता आला नाही’ असं लिहीलं होतं. मी डोकं खाजवत ती बातमी परत परत वाचली. ही कसली वरची खाच आणि कसला संघ याला करायचाय? काहीच कळेना. संध्याकाळी त्याच वृत्तपत्रसमूहाचं इंग्लिश वर्तमानपत्र वाचताना डोक्यात प्रकाश पडला. तिथं छापलं होतं – “Top-Notch spinner like XXX couldn’t make it to the team.” आता बोला !!!!!!